जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,धुळे.
मा.अध्यक्ष - श्री.डी.डी.मडके.
मा.सदस्या – श्रीमती.एस.एस.जैन.
---------------------------------------- ग्राहक तक्रार क्रमांक – 135/2011
तक्रार दाखल दिनांक – 18/07/2011
तक्रार निकाली दिनांक – 26/09/2012
श्री.रामचंद्र महादू जावळे. ----- तक्रारदार
उ.वय.65, कामधंदा-वॉचमन.
रा.प्लॉट नं.13,शांतीनगर,
सुरतवाला बिल्डींग जवळ,
रेल्वेस्टेशन समोर,धुळे.ता.जि.धुळे.
विरुध्द
(1) मॅनेजर,तिरुपती गॅस एजन्सी ----- विरुध्दपक्ष भारत गॅस डिस्ट्रीब्यूटर्स,
3302/3,ग.नं.2 पुर्ती बिल्डींग मागे,
आग्रारोड,धुळे.
(2) मॅनेजर,दि.नॅशनल इन्शूरन्स कं.लि.धुळे.
(3) मॅनेजर,नॅशनल इन्शूरन्स कं.लि.
कॉर्पोरेट ऑफीस,रॉयल इश्यूरन्स
बिल्डींग 14/7,टाटारोड,चर्चगेट,मुंबई-20.
कोरम
(मा.अध्यक्ष – श्री.डी.डी.मडके)
(मा.सदस्या – श्रीमती.एस.एस.जैन)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – वकील श्री.सी.व्ही.जावळे.)
(विरुध्दपक्ष क्र.1 तर्फे – वकील श्री.आर.एस.शिकारे.)
(विरुध्दपक्ष क्र.2 तर्फे – वकील श्री.के.पी.साबद्रा.)
(विरुध्दपक्ष क्र.3 तर्फे – गैरहजर.)
निकालपत्र
(द्वारा – मा.अध्यक्ष,श्री डी.डी.मडके.)
--------------------------------------------------------------------------
(1) मा.अध्यक्ष,श्री.डी.डी.मडके – तक्रारदार यांच्या गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन झालेल्या नुकसानीची भरपाई विरुध्दपक्ष यांनी न देऊन सेवेत त्रृटी केली म्हणून तक्रारदार यांनी सदर तक्रार या न्यायमंचात दाखल केली आहे.
(2) तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, त्यांनी विरुध्दपक्ष क्र.1 यांचेकडून दि.26-09-1998 रोजी रक्कम रु.1,900/- भरुन गॅस कनेक्शन घेतले आहे. त्यांचा ग्राहक क्र.31085 आहे. विरुध्दपक्ष क्र.1 यांनी त्यांच्या सर्व ग्राहकांची एलपीजी अॅक्सीडेंट पॉलिसी घेतली आहे. त्यात तक्रारदारांचाही पॉलिसीधारक म्हणून समावेश आहे. सदर पॉलिसीचा क्र.251100/46/09/ 950000002 आहे. तक्रारदारांचे घरात विरुध्दपक्ष क्र.1 यांचेकडून घेतलेल्या गॅस सिलेंडरचा दि.07-12-1998 पासून नियमित वापर चालू आहे. दि.01-08-2009 रोजी सकाळी 9.00 वाजता तक्रारदारांचे घरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. सदर स्फोटामुळे तक्रारदारांचे घरातील पंखा, मेकअप बॉक्स, घडयाळ, अंथरुण, गाद्या, सुटकेस, स्वयंपाकाची भांडी, भिंतीवरील विद्यूत फीटींग, गॅस शेगडी इ. चे नुकसान झाले. त्याचे मुल्य रु.40,000/- एवढे आहे.
(3) गॅस सिलेंडरच्या स्फोटा बाबत तक्रारदारांची तक्रार, धुळे शहर पोलिस स्टेशनला अग्नी उपद्रव रजि.नं.3/2009 अन्वये नोंदविण्यात आली आहे. त्या बाबत पोलिसांनी दोन वेळा प्रत्यक्ष घटनास्थळावर येऊन पंचनामा व चौकशी केली. सदर अपघातात झालेल्या नुकसानीची भरपाई मिळणे करिता विरुध्दपक्ष क्र.1 यांनी विरुध्दपक्ष क्र.2 नॅशनल इन्शुरन्स कंपनी यांना कळवले. त्यानंतर तक्रारदार यांनी विरुध्दपक्ष क्र.3 यांना पत्र देऊन नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. परंतु त्यांनी रक्कम दिली नाही.
(4) तक्रारदार यांनी गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई रु.40,000/-, मानसिक त्रासापोटी रु.20,000/- व तक्रार अर्जाचा खर्च विरुध्दपक्ष यांचेकडून मिळावा अशी शेवटी विनंती केली आहे.
(5) तक्रारदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्टयर्थ नि.नं.3 वर शपथपत्र तसेच नि.नं.5 वरील कागदपत्रांच्या यादीनुसार 7 कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यात नि.नं.5/1 वर जबाब, नि.नं.5/2 वर पंचनामा, नि.नं.5/5 वर विमा प्रस्ताव, नि.नं.5/6 वर गॅस ग्राहक कार्ड आणि नि.नं.5/8 वर विमा कंपनीस पाठवलेले पत्र यांचा समावेश आहे.
(6) विरुध्दपक्ष क्र.1 मॅनेजर, तिरुपती गॅस एजन्सी, धुळे यांनी सदर प्रकरणी आपला खुलासा दाखल केलेला नाही.
(7) विरुध्दपक्ष क्र.2 मॅनेजर,दि.नॅशनल इन्शूरन्स कं.लि.धुळे. यांनी आपला खुलासा नि.नं.13 वर दाखल करुन तक्रारदार यांचा अर्ज खोटा आहे, विमा कंपनीने सेवेत त्रृटी केलेली नाही, कायद्याच्या चौकटीत ती बसत नाही. त्यामुळे तक्रार रद्द करावी अशी विनंती केली आहे.
(8) विरुध्दपक्ष क्र.2 मॅनेजर,दि.नॅशनल इन्शूरन्स कं.लि.धुळे. यांनी आपल्या खुलाशात पुढे असे म्हटले आहे की, गॅसचा वापर नीट न केल्यामुळे व निष्काळजीपणामुळे सदर घटना घडली आहे. त्यात विरुध्दपक्ष यांचा काहीही दोष नाही. तक्रारदारांची नुकसान भरपाईची मागणी अवास्तव व खोटी आहे. ती देण्यास विमा कंपनी जबाबदार नाही.
(9) विरुध्दपक्ष क्र.2 मॅनेजर,दि.नॅशनल इन्शूरन्स कं.लि.धुळे. यांनी पुढे असेही म्हटले आहे की, नुकसानीचे मुल्यांकन करणेसाठी श्री.मिलिंद वर्मा सर्व्हेअर यांना नेमले आहे. त्यांनी मुल्यांकन करणेसाठी घटनास्थळी भेट दिली. सर्व्हेअर यांनी मागणी केलेली कागदपत्रे व सहाय्य तक्रारदार यांनी दिले नाही. पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसारच भरपाई मिळू शकते. त्यामुळे सदर तक्रार अर्ज प्रीमॅच्युअर आहे. त्यामुळे तक्रारदारांचा अर्ज रद्द होण्यास पात्र आहे.
(10) विरुध्दपक्ष क्र.2 मॅनेजर,दि.नॅशनल इन्शूरन्स कं.लि.धुळे. यांनी आपल्या म्हणण्याचे पृष्टयर्थ नि.नं.17 वर श्री.मिलिंद वर्मा सर्व्हेअर यांचे शपथपत्र आणि नि.नं.19/1 वर 6 फोटो दाखल केले आहेत.
(11) तक्रारदार यांची तक्रार, विरुध्दपक्ष क्र.2 विमा कंपनीचा खुलासा व दाखल कागदपत्रे पाहता तसेच उभयपक्षांच्या विद्वान वकीलांनी केलेला युक्तिवाद ऐकला असता आमच्यासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.
मुद्देः | निष्कर्षः |
(अ) तक्रारदार विरुध्दपक्ष यांचे ग्राहक आहेत काय ? | ः होय. |
(ब) विरुध्द यांनी तक्रारदारास द्यावयाचे सेवेत कमतरता ठेवली आहे काय ? | ः होय. विरुध्दपक्ष क्र.2 व 3 यांनी. |
(क) तक्रारदार अनुतोष मिळण्यास पात्र आहे काय ? | ः होय. |
(ड) आदेश काय ? | ः अंतिम आदेशा प्रमाणे |
विवेचन
(12) मुद्दा क्र. ‘‘अ’’ – तक्रारदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे पाहता, तक्रारदार हे विरुध्दपक्ष क्र.1 गॅस एजन्सीकडून नियमित घरगुती वापराचा गॅस सिलेंडर घेत असल्याचे व त्यांचे अधिकृत ग्राहक असल्याचे स्पष्ट होते. तसेच विरुध्दपक्ष क्र.1 यांनी त्यांच्या सर्व गॅस ग्राहकांचा विमा विरुध्दपक्ष नॅशनल इन्शूरन्स कं.लि.यांचेकडे उतरविल्याचेही दिसून येते. त्यामुळे तक्रारदार हे सदर विम्याचे लाभधारक ग्राहक आहेत. म्हणून मुद्दा क्र. ‘‘अ’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(13) मुद्दा क्र. ‘‘ब’’ – तक्रारदार यांनी विरुध्दपक्ष क्र.1 तिरुपती गॅस एजन्सी यांचेकडून ग्राहक क्र.31085 अन्वये घरगुती वापराच्या गॅसचे सिलेंडर घेतले आहे. तसेच तक्रारदार यांच्या घरी दि.01-08-2009 रोजी सकाळी गॅस सिलेंडरचा स्फोट झाला व त्यात त्यांचे घरातील वस्तु, लाईट फीटींग, पंखे इ.चे नुकसान झाले. त्याची नोंद व पंचनामा पोलिस स्टेशन धुळे येथे करण्यात आला, याबद्दल उभयपक्षात कोणताही वाद नाही. विरुध्दपक्ष क्र.1 यांनी LPG Accident Ploicy No.251100/46/09/950000002, Public Liability Insurance Policy नॅशनल इन्शूरन्स कं.लि. यांचेकडून घेतली होती. त्या अनुषंगाने विरुध्दपक्ष क्र.1 यांनी विमा कंपनीस तक्रारदारांच्या गॅस स्फोटा बाबत पत्र दिले आणि त्यानुसार विमा कंपनीने सर्व्हेअर श्री.मिलिंद वर्मा यांना मुल्यांकन करणेसाठी नियुक्त केले हेही उभयपक्षास मान्य आहे.
(14) तक्रारदारांची तक्रार अशी आहे की, सदरील गॅस स्फोटामुळे त्यांचे रु.40,000/- चे नुकसान झाले आहे. विमा कंपनीच्या म्हणण्यानुसार सर्व्हेअर हे मुल्यांकनासाठी गेले असता त्यांना आवश्यक माहिती/कागदपत्रे देण्यात आली नाहीत. त्यामुळे मुल्यांकन करता आले नाही. म्हणून विमा कंपनीने सेवेत त्रृटी केलेली नाही.
(15) या संदर्भात आम्ही तक्रारदार यांनी दाखल केलेल्या जबाब, पंचनामा व शपथपत्र इ.कागदपत्रांचे बारकाईने अवलोकन केले आहे. त्यामध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यानंतर तक्रारदाराने पोलिसांना माहिती दिल्याचे दिसून येते. त्यामध्ये घरात स्फोट झाल्यानंतर घरातील संसारोपयोगी सामान, कपडे, धान्य, गाद्या, घडयाळ यांचे नुकसान झाल्याचा उल्लेख आहे. तसेच पंचनाम्यामध्ये जळालेल्या वस्तु, भांडी, परशी, पंखे, इ. जळाल्याचे नमूद आहे. तसेच मागील बाजूचा पाईपही वितळल्याचा उल्लेख आहे. पोलिस पंचनाम्यानुसार नुकसानीचे मुल्य रु.35,000/- ते रु.40,000/- असल्याचे नमूद आहे. विमा कंपनीचे सर्व्हेअर यांनी शपथपत्रात तक्रारदार यांच्या घरी गेलो होतो व गॅस स्फोट झालेल्या परिस्थितीचे व साहित्याचे फोटो काढले. त्यावेळी घरात फक्त वयस्कर महिला होत्या, त्या कोणतीही माहिती देण्यास समर्थ नव्हत्या. त्यांना नुकसानीचे मोजमाप करणेसाठी माहिती देण्यास कळवले. परंतु माहिती देण्यास कोणीही पुढे आले नाही, त्यामुळे मुल्यांकन करता आले नाही असे म्हटले आहे.
(16) वरील परिस्थिती पाहता तक्रारदार हे मध्यमवर्ग कुटूंब असल्याचे दिसून येते. त्यामुळे घरातील वयस्कर महिलांनी निरक्षरतेमुळे अथवा कायदेशीर प्रक्रीयेची माहिती नसल्यामुळे किंवा अनोळखी मानसासमक्ष निर्भिडपणे बोलण्यास संकोच वाटल्यामुळे बोलणे टाळले असणे शक्य आहे. त्यामुळे घडलेल्या दुर्घटने बाबतची सत्यता पडताळून पाहण्यासाठी व मुल्यांकन करण्यासाठी सर्व्हेअर यांना पोलिस पंचनामा व फीर्याद पुरेसे होते. घटनास्थळी जळालेल्या वस्तुंचे मुल्य काय होते याच्या पावत्या किंवा रेकॉर्ड मिळणे शक्य नव्हते. तसेच सर्व्हेअर हे घटना घडल्यानंतर 14 दिवसांनी घटनास्थळी गेले होते हे त्यांनीच काढलेल्या व प्रकरणात दाखल केलेल्या फोटोवर नमूद असलेल्या दिनांक व वेळ यावरुन स्पष्ट होते. त्यामुळे त्यांनी काढलेल्या फोटोमध्ये दुर्घटना घडलेल्या दिवसाचे जसेच्या तसे चित्र येऊशकत नाही. तसेच सर्व्हेअर किंवा विमा कंपनीने तक्रारदारास एखादे पत्र देऊन माहिती द्यावी असेही कळवलेले दिसून येते नाही. त्यामुळे आमच्यामते विमा कंपनीने विमा दावा प्रलंबीत ठेऊन सेवेत त्रृटी केली आहे. म्हणून मुद्दा क्र. ‘‘ब’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(17) मुद्दा क्र. ‘‘क’’ – तक्रारदार यांनी त्यांच्या घरातील नुकसानीचे मुल्य रु.40,000/- एवढे तक्रारीत नमूद केले आहे. या कथना बाबत तक्रारदार यांनी नंतर असे स्पष्टीकरण केले की, नुकसानी बाबत जबाब देतेवेळी झालेल्या नुकसानीचा वास्तवीक अंदाज आला नाही. त्यामुळे रु.15,000/- नुकसान झाल्याचे त्यावेळी सांगण्यात आले. परंतु पोलिस पंचनाम्यात या बाबत सर्व तपशील दिला आहे. त्यात रु.35,000/- ते रु.40,000/- असा उल्लेख असल्याचे म्हटले आहे. या बाबत सर्व्हेअर यांनी काढलेले फोटो पाहिले असता त्यात तक्रारदारांचे घरातील छतावरील पंखा वाकून उलटा झाल्याचे दिसून येते. त्यावरुनही गॅस सिलेंडरच्या स्फोटाची तिव्रता व त्यामुळे होणा-या नुकसानीचा अंदाज या न्यायमंचास येतो. त्यामुळे सर्व्हेअर यांनी मुल्यांकन केले नसले तरी पोलिस पंचनामा पाहता तक्रारदार यांचे किमान रु.35,000/- एवढया रकमेचे नुकसान झाले असणे सहज शक्य आहे, असे आम्हास वाटते. त्यामुळे तक्रारदार हे विरुध्दपक्ष विमा कंपनीकडून गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे झालेल्या नुकसानीपोटी रक्कम रु.35,000/- व त्यावर तक्रारदार यांनी नोटिस पाठविल्याची तारीख 21-03-2011 पासून द.सा.द.शे.9 टक्के दराने व्याज, तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.2,000/- व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.1,000/- मिळण्यास पात्र आहेत. म्हणून मुद्दा क्र. ‘‘क’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(18) विरुध्दपक्ष क्र.1 यांनी तक्रारदारांच्या गॅस दुर्घटने बाबत विरुध्दपक्ष नॅशनल इन्शूरन्स कं.लि.यांचेशी पत्रव्यवहार करुन, विम्या संबंधी त्यांची जबाबदारी पार पाडलेली आहे. त्यामुळे त्यांना तक्रारदारांची नुकसान भरपाई देण्यास जबाबदार धरता येणार नाही असेही आमचे मत आहे.
(19) मुद्दा क्र. ‘‘ड’’ – उपरोक्त सर्व विवेचनावरुन हे न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
आदेश
(1) तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
(2) विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 नॅशनल इन्शूरन्स कं.लि.यांनी, वैयक्तिक व संयुक्तिक रित्या, या आदेशाच्या प्राप्ती पासून पुढील 30 दिवसांचे आत...
(अ) तक्रारदारास झालेल्या दुर्घटनेमुळे नुकसान भरपाई म्हणून रक्कम
(ब)तक्रारदारास मानसिक त्रासापोटी 2,000/- (अक्षरी रु.दोन हजार मात्र) व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी 1,000/- (अक्षरी रु.एक हजार मात्र) दयावेत.
(3) विरुध्दपक्ष क्र.1 यांचे विरुध्द कोणताही आदेश नाही.
धुळे.
दिनांक – 26-09-2012.
(श्रीमती.एस.एस.जैन.) (डी.डी.मडके)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,धुळे.