द्वारा- श्री. एस.के. कापसे, मा. सदस्य यांचेनुसार
निकालपत्र
दिनांक 24 एप्रिल 2012
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
[1] तक्रारदारांनी जाबदेणार यांनी विकसित केलेल्या यशवंत विहार प्रकल्पामध्ये बिल्डींग 1 मधील तळ मजल्यावरील दुकान नं.30, क्षेत्र 207 चौ.फुट विकत घेण्यासाठी दिनांक 5/11/1999 रोजी रुपये 501/- देऊन बुकिंग केले. दिनांक 11/11/1999 रोजी रुपये 25000/- चा चेक जाबदेणार यांना दिला. दुकानाचा बांधकामाचा दर रुपये 1100/- ठरला होता. तक्रारदारांचे पती जाबदेणार यांच्याकडे सुतारकाम करीत होते. तक्रारदारांनी कामाचे मजुरीचे पैसे दुकान नं 30 च्या ठरलेल्या रकमेपोटी एकूण रुपये 1,56,000/- जाबदेणार क्र.5 व 6 यांच्याकडे जमा केली. तक्रारदारांनी दुकान नं.30 संदर्भात नोंदणीकृत करारनाम्याबाबत आग्रह धरला असता दुकान नं.30 मधून मागील भागातील जिन्याला जाण्या येण्यासाठी जागा दयावयाची आहे, त्यामुळे दुकान नं.30 देता येणार नाही, त्याऐवजी तुम्हाला दुकान नं 31 देत आहोत, त्याबाबत आपण करार करु असे जाबदेणार क्र.5 व 6 यांनी तोंडी सांगितले. तक्रारदारांनी जाबदेणारांकडे दुकानाच्या नोंदणीकृत करार नाम्यासाठी 70 टक्के रक्कम देऊनही, तक्रारदारांनी वारंवार विनंती करुनही जाबदेणार यांनी करारनामा करुन दिला नाही. जाबदेणार यांनी तक्रारदारांची दिशाभुल करुन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाकडून दुकान नं. 31 वर तक्रारदारांचे नावे मिटर क्र 8000376284 दिला. नोंदणीकृत करारनामा केला नाही. जमा खर्चाचा हिशेब ठेवला नाही. नकाशात फेरबदल केले. प्रत्यक्षात दुकान नं. 30 अथवा दुकान नं.31 चा ताबा तक्रारदारांना दिला नाही. म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून नुकसान भरपाई पोटी रुपये 1,00,000/-, दैनंदिन कामे करु न शकल्याबद्यल रुपये 1,00,000/-, जीवनातील नैराश्याबद्यल रुपये 1,00,000/-, तक्रारीचा व इतर खर्च रुपये 25,000/- एकूण रुपये 3,25,000/- मागतात. तक्रारदारांनी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
[2] जाबदेणार क्र.1,3,4 व 5 यांनी लेखी जबाब दाखल करुन तक्रारदारांच्या मागणीस विरोध दर्शविला. तक्रारदारांनी दुकान क्र.30, 207 चौ.फुट, सर्व्हे नं 144/4, धायरी, पुणे बुकिंग संदर्भात जाबदेणार यांना रुपये 25,000/- दिले होते. दुकानाची किंमत रुपये 4,00,000/- निश्चित करण्यात आली होती. जाबदेणार क्र.2 व 6 जाबदेणार फर्मचे भागिदार नाहीत. तक्रारदारांचे पती कारपेंटर म्हणून जाबदेणारांसोबत काम करीत होते. त्यांनी जाबदेणारांकडे केलेल्या कामाचा संपुर्ण मोबदला त्यांना देण्यात आलेला आहे. तक्रारदारांच्या पतीने जाबदेणार क्र.5 व 6 यांना रुपये 1,56,000/- अदा केलेले आहेत. दुकानाचे बुकिंग सन 1999 मध्ये करुनही आजतागायत तक्रारदारांनी संपुर्ण मोबदला अदा केलेला नाही. तक्रार मुदतबाहय आहे. तसा वेगळा अर्ज देखील जाबदेणार यांनी दाखल केलेला आहे. आजच्या बाजारभावा प्रमाणे जर तक्रारदारांनी मोबदला दिला तर जाबदेणार दुकान तक्रारदारांना देण्यास तयार आहेत. उभय पक्षकारांमध्ये कुठलाही करार नव्हता. जाबदेणार यांच्या सेवेत त्रुटी नाही म्हणून तक्रार खर्चासह नामंजुर करावी अशी मागणी जाबदेणार करतात. जाबदेणार यांनी शपथपत्र आणि कागदपत्रे दाखल केली.
[3] जाबदेणार क्र.2 व 6 यांनी जाबदेणार क्र. 1,3,4 व 5 प्रमाणेच त्यांचे म्हणणे दाखल करुन तक्रारदारांच्या मागणीस विरोध दर्शविला व तक्रार खर्चासह नामंजुर करावी अशी मागणी केली.
[4] तक्रारदारांनी रिजॉईंड दाखल करुन जाबदेणार यांचे लेखी म्हणणे नाकारले व सोबत MSEB यांचे बिल दाखल केले.
[5] उभय पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पहाणी केली. तक्रारदारांनी दाखल केलेल्या जाबदेणार यांच्या दिनांक 11/11/1999 रोजीच्या पावतीचे मंचाने अवलोकन केले असता त्यावर बिल्डींग नं.1, मजला- ग्राऊंड, शॉप नं 30, क्षेत्र 207, रुपये 25,000/- चा चेक असे नमूद केल्याचे स्पष्ट होते. तसेच तक्रारदारांनी दाखल केलेल्या जाबदेणार यांच्या दिनांक 5/11/1999 च्या खतावणीचे मंचाने अवलोकन केले असता त्यावर तक्रारदारांचे नाव, रेट रुपये 1100/-, दुकान नं.30, जाबदेणार यांना तक्रारदारांकडून एकूण प्राप्त झालेली रक्कम रुपये 1,56,000/- नमूद करण्यात आलेली आहे. याच पावतीमध्ये तक्रारदारांनी जाबदेणार यांना शेवटी दिनांक 28/12/2001 रोजी अदा केलेली रक्कम रुपये 50,000/- नमूद करण्यात आलेली आहे. तक्रारदारांनी दाखल केलेल्या MSEB यांच्या मार्च 2012 च्या मुळ बिलाचे मंचाने अवलोकन केले असता त्यावर तक्रारदारांचे नाव, दुकान नं.31, यशवंत विहार, धायरी, पुणे असे नमूद केलेले आहे. याचाच अर्थ जाबदेणार यांनी दुकान नं.31 संदर्भात तक्रारदारांच्या नावाने इलेक्ट्रिक मिटर घेतलेला आहे. तक्रारदार दुकान नं.31 चा ताबा मागतात. जाबदेणार यांनी तक्रारदारांकडून दुकान क्र. 30 संदर्भात substantial consideration स्विकारुन सुध्दा दुकान क्र.30 अथवा दुकान नं. 31 संदर्भात तक्रारदारांच्या नावे मिटर घेऊन त्याचाही ताबा तक्रारदारांना दिला नाही, नोंदणीकृत करारानामा देखील वारंवार मागणी करुनही केला नाही. ही जाबदेणार यांच्या सेवतील त्रुटी आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. उलट तक्रारदारांकडून मोबदल्यापोटी मिळालेले रुपये 1,56,000/- जाबदेणार यांनी आजपर्यन्त वापरुन तक्रारदारांना दुकानाच्या ताब्यापासून वंचित ठेवलेले आहे. जाबदेणार यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदारांनी उर्वरित रक्कम दिली नाही. परंतु जाबदेणार यांनी तक्रारदारांकडून रकमेची मागणी करणारे पत्र, नोटीस पाठविली याबद्यलचा पुरावा दाखल केलेला नाही. याचाच अर्थ दुकानी किंमत रुपये 1,56,000/- होती हे सिध्द होते. त्यामुळे आजच्या बाजारभावाची जाबदेणार यांनी तक्रारदारांकडून केलेली मागणी मंच नामंजुर करीत आहे. सन 1999 मध्ये दुकान बुक करुनही दुकानाचा ताबा न मिळाल्यामुळे तक्रारीस कारण सतत घडत आहे, तक्रार मुदतबाहय नाही, असे मंचाचे स्पष्ट मत आहे. सदर कामी उभय पक्षकारांनी दुकान नं. 30 संदर्भात दुकानाचे क्षेत्रफळ व ठरलेला भाव खतावणी मध्ये नमूद केलेला आहे. परंतु उभय पक्षकारांनी दुकान नं 31 संदर्भात क्षेत्रफळ व ठरलेला भाव कोणताही कागदोपत्री पुरावा मंचासमोर दाखल केलेला नाही. त्यामुळे दुकान नं. 31 चा ताबा व नोंदणीकृत करारनामा जाबदेणार यांनी करुन दयावा असे आदेशित करणे न्यायोचित होईल असे मंचाचे स्पष्ट मत आहे. जाबदेणार यांच्या सेवेतील त्रुटी मुळे तक्रारदारांना निश्चितच शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला आहे. म्हणून नुकसान भरपाई पोटी तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून रुपये 25,000/- मिळण्यास पात्र आहेत असे मंचाचे स्पष्ट मत आहे. पुराव्या अभावी तक्रारदारांच्या इतर मागण्या मंच नामंजुर करीत आहे.
वरील विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे
:- आदेश :-
[1] तक्रार अंशत: मंजुर करण्यात येत आहे.
[2] जाबदेणार क्र. 1 ते 6 यांनी वैयक्तिकरित्या आणि संयुक्तिकरित्या
तक्रारदारांना दुकान नं. 31, यशवंत विहार, स.नं 144/4, पुणे 41 चा ताबा दयावा व नोंदणीकृत करारनामा आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत करुन दयावा.
[3] जाबदेणार क्र.1 ते 6 यांनी वैयक्तिकरित्या आणि संयुक्तिकरित्या तक्रारदारांना नुकसान भरपाई पोटी रुपये 25,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावा.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.