द्वारा- श्रीमती अंजली देशमुख, मा. अध्यक्ष
:- निकालपत्र :-
दिनांक 30 डिसेंबर 2011
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
1. तक्रारदारांनी जाबदेणारांकडून त्यांना रहाण्यासाठी म्हणून पत्रयाच्या शेडसहित जागा खरेदी केली. जागेचे क्षेत्रफळ 10’ x 25’ चौ.फुट होते. किंमत रुपये 75,000/- ठरली होती. दिनांक 16/10/2005 रोजीच्या पावतीद्वारे तक्रारदारांनी जाबदेणार यांना रुपये 20,000/- रोख दिले. नंतर तक्रारदारांनी वेळोवेळी जाबदेणारांना सर्व रक्कम अदा केली. परंतू जाबदेणार यांनी तक्रारदारांना जागा ताब्यात दिली नाही. म्हणून तक्रारदारांनी दिनांक 17/6/2008 रोजी नोटीस पाठविली. जाबदेणार यांनी नोटीसचे उत्तर दिले नाही. म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून जागेचा ताबा व खरेदीखत करुन मागतात, तसेच नुकसान भरपाई पोटी रक्कम रुपये 10,000/- मागतात. तक्रारदारांनी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली आहेत.
2. जाबदेणार यांनी लेखी जबाब दाखल केला. त्यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदार यांनी त्यांच्याकडून 10’ x 25’ चौ.फुट जागा खरेदी केली. परंतू त्याची किंमत रुपये 75000/- होती हे खोटे आहे. जागेची रक्कम रुपये 1,20,000/- ठरली होती. तक्रारदारांनी त्यांना फक्त रुपये 20,000/- दिले. उर्वरित रक्कम दिनांक 15/4/2006 पर्यन्त देण्याचे तक्रारदार व त्यांचे पती कै. दत्तात्रय गायकवाड यांच्यात ठरले होते. तक्रारदारांनी उर्वरित रक्क्म दिली नाही त्यामुळे जागेचा ताबा देण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. तक्रारदारांनी जाबदेणार यांना नोटीस पाठविली हे त्यांना मान्य नाही. जाबदेणार यांचे पती मयत झाल्यानंतर तक्रारदारांनी बनावटरित्या तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारदारांनी जी पावती दाखल केलेली आहे ती जाबदेणार यांना मान्य नाही. जागा व शेडची संपुर्ण रक्कम मिळाली असे त्यात कुठेही नमूद करण्यात आलेले नाही. त्या पावतीमध्ये तक्रारादारांनी ज्या ज्या रकमा दिलेल्या होत्या त्यांचे आकडे टाकून सहया केल्याचे दिसून येते, म्हणून पावती जाबदेणार यांना मान्य नाही. म्हणून सदरील तक्रार रुपये 15000/- खर्चासह नामंजुर करावी अशी मागणी जाबदेणार करतात. जाबदेणार यांनी शपथपत्र दाखल केले.
3. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचानी पाहणी केली. तक्रारदारांनी जी रुपये 20,000/- त्रिमुर्ती डेव्हलपर्स यांना दिल्याची पावती क्र.134 दिनांक 16/10/2005 दाखल केलेली आहे त्यावर तक्रारदारांचे नाव व प्लॉट नं.9, पत्रयाच्या शेडसह 10’ x 25’ sq.ft असे नमूद करण्यात आलेले आहे. पावतीच्या मागील बाजूस तक्रारदार म्हणतात त्याप्रमाणे सदरील जागेची किंमत रुपये 75,000/- होती त्यापैकी रुपये 20,000/- दिनांक 16/10/2005 रोजी देण्यात आले, व उर्वरित रक्कम वेळोवेळी दिल्यानंतर ती वजा करुन बाकी राहिलेली रक्कम दिनांक 17/6/2008 पर्यन्त देण्यात आल्याचे दिसून येते. रक्कम दिल्यानंतर प्रत्येक तारखेला जाबदेणार यांची सही व दिनांक नमूद करण्यात आल्याचे दिसून येते. सर्वात शेवटी दिनांक 17/6/2008 रोजी 0000 अशी रक्कम व सही केल्याचे दिसून येते. यावरुन तक्रारदारांनी जाबदेणार यांना जागेची शेडसह संपुर्ण रक्कम रुपये 75,000/- अदा केल्याचे दिसून येते. उभय पक्षकारात लिखीत स्वरुपात करारनामा झाल्याचे दिसून येत नाही. पावतीवरील सही त्यांची नाही असेही त्यांचे म्हणणे नाही. जाबदेणार यांच्या म्हणण्यानुसार जागेची शेडसह रक्कम रुपये 1,20,000/- होती व तक्रारदारांनी फक्त रुपये 20,000/- च अदा केले होते. जागेची शेडसहित किंमत रुपये 1,20,000/- होती हे जाबदेणार यांनी पुराव्यानिशी सिध्द केलेले नाही. उलट तक्रारदारांनी परिचित श्री. भगवान तुपारे, रा. अप्पर, पुणे 37 व श्री. कमलाकर नारायण गायकवाड, रा. अप्पर, पुणे यांचे शपथपत्र दाखल केलेले आहे. सदरहू शपथपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारदारांनी ही जागा शेडसह जाबदेणार यांच्याकडून रक्कम रुपये 75,000/- ला खरेदी केली होती व ही रक्कम तक्रारदारांनी जाबदेणार यांना त्यांच्या साक्षीने दिल्याचे नमूद करण्यात आल्याचे दिसून येते. यावरुन तक्रारदारांनी जाबदेणार यांना जागेची पत्रयाच्या शेडसह संपुर्ण किंमत रक्कम रुपये 75,000/- अदा करुनही जाबदेणार यांनी जागेचा पत्रयाच्या शेडसह ताबा दिलेला नाही हे सिध्द होते. जाबदेणार यांच्या सेवेतील ही त्रुटी आहे. म्हणून जाबदेणार यांनी तक्रारदारांना जागेचा ताबा पत्रयाच्या शेडसह दयावा असा मंच आदेश देत आहे. तक्रारदार हया भाजी व्यावसायिक आहेत. त्या भाजी विकून, मोल मजूरी करुन चरितार्थ चालवितात. त्यांनी जाबदेणार यांना जागेची संपुर्ण रक्कम अदा करुनही जाबदेणार यांनी जागेचा पत्रयाच्या शेडसह ताबा न दिल्यामुळे निश्चितच शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला असे असे मंचाचे मत आहे. म्हणून जाबदेणार यांनी नुकसान भरपाई पोटी रक्कम रुपये 10,000/- तक्रारदारांना दयावी असा आदेश देण्यात येत आहे.
वरील विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे-
:- आदेश :-
1. तक्रार मान्य करण्यात येत आहे.
2. जाबदेणार यांनी तक्रारदारांना प्लॉट नं.9, पत्रयाच्या शेडसह, 10’ x 25’ चौ.फुट चा ताबा व तक्रारदारांच्या नावे खरेदीखत आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत करुन दयावे.
3. जाबदेणार यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाईपोटी रक्कम रुपये 10,000/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावी.
3 जाबदेणार यांनी तक्रारदारांना तक्रारीचा खर्च रुपये 1,000/- अदा करावा.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.