** निकालपत्र **
(19/03/2013)
प्रस्तुतची तक्रार, तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे जाबदेणारांविरुद्ध दाखल केलेली आहे. तक्रारीतील कथने खालीलप्रमाणे.
1] यातील जाबदेणार हे “ट्रेकॉन कुरियर प्रा. लि.” या नावाने कुरिअरचा व्यवसाय, शॉप नं. 2 व 3, कांचनगंगा अपार्टमेंट, शनिवार पेठ, पुणे येथे करतात. प्रस्तुतची तक्रार ही चोला क्रियेशन तर्फे मॅनेजर श्री. विभूती भुषण गुप्ता यांनी दाखल केलेली आहे. तक्रारदार कंपनीस त्यांचा माल दिल्ली येथे पाठवायचा होता. दि. 14/9/2010 रोजी यातील तक्रारदार यांनी जाबदेणारांतर्फे डॉकेट नं. 202088094, बील नं. 595 द्वारे रक्कम रु. 17,997/- चा माल आणि दि. 16/9/2010 रोजी डॉकेट नं. 2073556531, बील नं. 596 द्वारे रक्कम रु. 32,865/- असा एकुण रक्कम रु. 50,582/- चा माल, दिल्ली येथे पाठविण्यासाठी जाबदेणारांचे प्रतिनिधी श्री. अनिल काटे यांच्या ताब्यात दिला. श्री. अनिल काटे यांनी तक्रारदारांचा वर नमुद केलेल्या रकमेचा माल स्विकारला व तक्रारदारांनी सांगितल्याप्रमाणे सीटीएस मॉल, मोतीग्रा, दिल्ली येथे पोहचविण्याची हमी दिली. यातील तक्रारदार यांनी थोडे दिवस वाट पाहून सीटीएस मॉल, मोतीग्रा, दिल्ली येथे माल पोचलेबाबत चौकशी केली असता, सदरचा माल पोचला नसल्याचे तक्रारदार यांना समजले, त्यामुळे तक्रारदार यांनी जाबदेणारांशी याबाबत वेळोवेळी संपर्क साधला असता जाबदेणारांनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली व उद्धट भाषा वापरली व माल पोहोचवलेबद्दल माहिती दिली नाही, त्यामुळे तक्रारदार यांनी दि. 7/10/2010 व दि. 22/10/2010 रोजी रितसर पोलिस कमीशनर व पोलिस इन्सपेक्टर, शनिवार पेठ पोलिस चौकी यांच्याकडे तक्रार दिली. परंतु आजतागायत सदरच्या पार्सलचा पत्ता लागला नाही. यातील तक्रारदार यांनी वारंवार जाबदेणार यांच्याकडे पार्सलबाबत विचारणा केली असता जाबदेणार यांनी सतत त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली, त्यामुळे तक्रारदार यांनी मानसिक त्रास सोसावा लागला. जाबदेणार यांनी तक्रारदार यांचे पार्सल दिल्ली येथे न पोहचविता गहाळ केल्यामुळे तक्रारदार यांनी जाबदेणार यांच्याकडे पार्सल मालाच्या किंमतीची म्हणजे रक्कम रु. 50,582/- ची मागणी केली, परंतु जाबदेणार यांनी त्यास नकार दिला. मालाची रक्कम परत न करता तक्रारदार यांना उद्धट वागणूक देऊन कार्यालयातून बाहेर काढले. त्यामुळे जाबदेणार यांनी तक्रारदार यांच्या मालाचे पार्सल निश्चित ठिकाणी पोहचविण्याची हमी देऊन, ते न पोहचविता गहाळ करुन दोषपूर्ण/सदोष सेवा दिलेली आहे आणि सेवेमध्ये कमतरता ठेवलेली आहे. त्यामुळे तक्रारदार जाबदेणार यांचेकडून पार्सल मालाची किंमत रक्कम रु. 50,582/-, मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 50,000/-, व तक्रारीचा खर्च रक्कम रुम 2000/- मागतात. या अनुषंगाने तक्रारदार यांनी याकामी त्यांचे शपथपत्र, दि. 14/9/2010 रोजीचे बील नं. 595, दि. 16/9/2010 रोजीचे बील नं. 596, पोलिस इन्सपेक्टर, शनिवार पेठ पोलिस चौकी यांच्याकडे केलेल्या दि. 7/10/2010 आणि 22/10/2010 रोजीच्या तक्रारीची प्रत, पोलिस कमिशनर यांच्याकडे केलेल्या दि. 7/10/2010 रोजीच्या तक्रार अर्जाची प्रत, पोलिसांनी श्री काटे यांचा घेतलेला जबाब इ. कागदपत्रे दाखल केली आहेत.
2] प्रस्तुतची तक्रार दाखल करुन घेतल्यानंतर जाबदेणार यांना नोटीस काढली असता, त्यांनी मंचामध्ये उपस्थित राहून त्यांची कैफियत दाखल करुन तक्रारदारांच्या तक्रारीतील कथने खोडून काढलेली आहेत. जाबदेणारांच्या म्हणण्यानुसार, तक्रारदार यांनी त्यांना कोणताही मोबदला दिलेला नाही त्यामुळे तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायदा, 1986 च्या कलम 2(1)(ड) नुसार ‘ग्राहक’ होत नाहीत, त्यामुळे या मंचास प्रस्तुतची तक्रार चालविण्याचे कार्यक्षेत्र नाही. त्याचप्रमाणे तक्रारदारांनी पार्सलमध्ये असलेल्या मालाची सविस्तर माहीती दिलेली नाही किंवा सदरच्या मालाचा विमाही काढलेला नाही, त्यामुळे तक्रारदार हे नुकसान भरपाईस पात्र ठरत नाहीत, असे जाबदेणारांचे म्हणणे आहे. जाबदेणारांच्या म्हणण्यानुसार, सदरच्या मालाचे पार्सल हे ट्रांझिटदरम्यान गहाळ झाले असेल, परंतु तक्रारदारांनी बुकिंगच्यावेळी पार्सलमध्ये असलेल्या मालाची सविस्तर वर्णण न केल्यामुळे व त्याची किंमत उघड न केल्यामुळे नुकसान भरुन देण्याची जबाबदारी त्यांची नाही. या व इतर कारणांवरुन तक्रारदारांची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी अशी मागणी जाबदेणार करतात. जाबदेणारांनी त्यांच्या लेखी जबाबाच्या पुष्ठ्यर्थ शाबितीसाठी शपथपत्र किंवा कोणतेही पुराव्याचे कागदपत्रे दाखल केलेले नाही.
प्रस्तुतच्या प्रकरणामध्ये तक्रारदार यांनी दाखल केलेले शपथपत्र व कागदपत्रे, त्याचप्रमाणे तक्रारदारांनी केलेल्या युक्तीवादाचा तसेच जाबदेणारांनी दाखल केलेल्या कैफियतीचा विचार करुन गुणवत्तेवर निर्णय देण्यात येत आहे.
3] तक्रारदार यांनी दाखल केलेल्या तक्रारीतील कथने, कागदपत्रे व युक्तीवादाचा तसेच जाबदेणारांनी दाखल केलेल्या कैफियतीचा विचार करता खालील मुद्ये निश्चित करण्यात येत आहेत. सदर मुद्ये व त्यावरील निष्कर्ष खालीलप्रमाणे-
मुद्ये निष्कर्ष
[अ] तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायदा, 1986 :
च्या कलम 2(1)(ड) नुसार जाबदेणार यांचे :
‘ग्राहक’ आहेत का? : होय
[ब] जाबदेणार यांनी तक्रारदार यांना कबुल :
केल्याप्रमाणे मालाचे पार्सल निश्चित ठिकाणी :
न पोहचविता ते गहाळ करुन सदोष सेवा :
दिलेली आहे का ? : होय
[क] जाबदेणार हे तक्रारदार यांना नुकसान :
भरपाई देण्यास जबाबदार आहेत का ? : होय
[ड] अंतिम आदेश काय ? : तक्रार अंशत: मंजूर
कारणे :-
4] प्रस्तुत प्रकरणातील तक्रारदार यांनी याकामी त्यांचे शपथपत्र, दि. 14/9/2010 रोजीचे बील नं. 595, दि. 16/9/2010 रोजीचे बील नं. 596, पोलिस इन्सपेक्टर, शनिवार पेठ पोलिस चौकी यांच्याकडे केलेल्या दि. 7/10/2010 आणि 22/10/2010 रोजीच्या तक्रारीची प्रत, पोलिस कमिशनर यांच्याकडे केलेल्या दि. 7/10/2010 रोजीच्या तक्रार अर्जाची प्रत, पोलिसांनी श्री काटे यांचा घेतलेला जबाब इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, तक्रारदारांनी जाबदेणारांकडे दि. 14/9/2010 व दि. 16/10/2010 रोजी अनुक्रमे रक्कम रु. 17,997/- व रक्कम रु. 32,685/- च्या मालाचे पार्सल सीटीएस मॉल, मोतीग्रा, दिल्ली येथे पोहचविण्यासाठी दिले होते. सदरचे पार्सल हे जाबदेणारांचे कर्मचारी श्री अनिल काटे यांनी स्विकारुन, त्याच्या वजनाची नोंद करुन ते निश्चित स्थळी पोहचविण्याचे आश्वासनही दिले होते व त्याबाबतच्या पावत्याही जाबदेणारांनी तक्रारदारांना दिलेल्या आहेत. यावरुन तक्रारदार व जाबदेणार यांच्यामध्ये ‘ग्राहक’ व ‘सेवा पुरविणारे’ असे नाते आहे हे स्पष्ट होते. त्यामुळे तक्रारदार ग्राहक संरक्षण कायदा, 1986 च्या कलम 2(1)(ड) नुसार हे नि:संशयरित्या जाबदेणारांचे ‘ग्राहक’ आहेत, असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
जाबदेणारांच्या कथनानुसार, तक्रारदारांनी पार्सलमधील मालाचे विवरण केलेले नाही किंवा त्याचा विमाही उतरविलेला नाही. सदरचा माल विनाविमा स्विकारणे हे जाबदेणारांवर बंधनकारक नव्हते. जाबदेणारांनी तक्रारदारांच्या मालाचे पार्सल विनाविमा स्विकारुन ते निश्चित स्थळी पोहचविण्याची हमी दिली होती. त्याचप्रमाणे माल स्विकारल्यानंतर त्यांनी तक्रारदारास पावतीही दिलेली होती. यावरुन जाबदेणार किरकोळ विधाने करुन तक्रारदारांच्या पार्सलची जबाबदारी व जाबदेणार यांचे त्यांचेबाबत असलेली जबाबदारी व कर्तव्य झटकण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे मंचाचे स्पष्ट मत आहे. जाबदेणारांनी मंचामध्ये उपस्थित राहून त्यांची कैफियत सादर केली, परंतु त्याच्या पुष्ठ्यर्थ शपथपत्र दाखल केलेले नाही वा पुरावाही दिलेला नाही, त्यामुळे त्यांचे कथने ग्राह्य धरता येणार नाहीत. तक्रारदारांनी दाखल केलेली कागदपत्रे विचारात घेता, जाबदेणारांनी त्यांची कर्तव्यता समजावून न घेता तक्रारदारांना उडवाउडवीची उत्तरे देऊन उद्धटपणाची वागणुक दिलेली आहे, त्यामुळे तक्रारदार यांना शनिवार पोलिस स्टेशन यांच्याकडे व पोलिस कमिशनर, पुणे यांच्याकडे तक्रार दाखल करावी लागली. प्रस्तुतच्या प्रकरणामध्ये जाबदेणार यांनी त्यांची कायदेशर जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पाडेलेली दिसून येत नाही. जाबदेणार यांनी तक्रारदार यांना कबुल करुनही त्यांचे पार्सल योग्य व निश्चित स्थळी न पोहचविता गहाळ करुन नि:संशयपणे दोषपूर्ण व सदोष सेवा दिल्याचे स्पष्ट दिसून येते. त्यामुळे तक्रारदार हे त्यांनी मागणी केल्याप्रमाणे पार्सलची किंमत रक्कम रु. 50,582/-, त्याचप्रमाणे रक्कम रु. 10,000/- नुकसान भरपाईपोटी आणि रक्कम रु. 2000/- तक्रारीचा खर्च मिळण्यास पात्र ठरतात. सबब खालीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहे.
:- आदेश :-
1] तक्रारदारांची तक्रार ही अंशत: मंजूर करण्यात येते.
2] असे जाहिर करण्यात येते की, जाबदेणार यांनी तक्रारदार
यांना कबूल करुनही त्यांचे पार्सल योग्य व निश्चित स्थळी
न पोहचविता गहाळ करुन दोषपूर्ण व सदोष सेवा दिलेली
आहे.
3] जाबदेणार यांनी तक्रारदार यांना पार्सलची एकुण किंमत
रक्कम रु. 50,582/- (रु. पन्नास हजार पाचशे बॅऐंशी मात्र)
त्याचप्रमाणे रक्कम रु. 10,000/- (रु. दहा हजार मात्र)
नुकसान भरपाईपोटी आणि रक्कम रु. 2,000/- (रु. दोन
हजार मात्र) तक्रारीच्या खर्चापोटी, द.सा.द.शे. 9% व्याजदराने
दि. 14/09/2010 पासून ते रक्कम अदा करेपर्यंत, त्यांना या
आदेशाची प्रत मिळाल्यापासून सहाआठवड्यांच्या आत द्यावी.
6] आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.