अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, पुणे
मा. अध्यक्षा : श्रीमती. प्रणाली सावंत
मा. सदस्या : श्रीमती. सुजाता पाटणकर
************************************************************
ग्राहक तक्रार अर्ज क्रमांक: एपीडीएफ/371/2008
तक्रार अर्ज दाखल दिनांक: 09/02/2007
तक्रार निकाल दिनांक : 25/11/2011
1. श्री. भालचंद्र रामचंद्र अगरवाल, ..)
2. सौ. विजया भालचंद्र अगरवाल, ..)
दोघेही राहणार विश्वास अपार्टमेन्ट, दत्तवाडी, ..)
पुणे – 411 030. ..)... तक्रारदार
विरुध्द
1. टूर मॅनेजर व कंडक्टर, ..)
रामोजी सिटी आणि हैदराबाद सिटी ..)
स्थानिक पत्ता :- ई टी. व्ही. ऑफिस, ..)
राजयोग बिल्डिंग, राजेंद्रनगर, नवीपेठ, ..)
म्हात्रे पुलाजवळ, पुणे – 411 030. ..)
..)
2. सॅमसन टूर्स प्रा.लि., ..)
पाटील प्लाझा, 230/31/32, ..)
मित्रमंडळ सभागृहाजवळ, पुणे – 411 030. ..)
..)
3. मकरंद टूर्स, ..)
14, राजेंद्रश्नगर, सुवर्णगड चेंबर्स, ..)
म्हात्रे पुलाजवळ, पुणे – 411 030. ..)
..)
4. ग्लोब ट्रोटर्स, ..)
1206 ब, शॉप नंबर 4, बुट्टेपाटील चेंबर्स, ..)
संभाजी पार्कसमोर, जंगली महाराज रोड, ..)
पुणे – 411 005. ..)
(जाबदार क्र.4 यांना दि.12/10/2011 रोजीच्या ..)
आदेशान्वये वगळण्यात आले आहे.) ..)
..)
5. श्री. मुकुंद माने, ..)
ग्रूप को-ऑर्डिनेटर रामोजी फिल्म सिटी, ..)
पुणे रीजनल ऑफिस, ..)
ई. टी.व्ही. ऑफिस, राजयोग बिल्डींग, ..)
राजेंद्रनगर, नवीपेठ, ..)
पुणे – 411 030. ..)... जाबदार
************************************************************
तक्रारदार :- स्वत:
जाबदार :- एकतर्फा
************************************************************
द्वारा :-मा. अध्यक्षा, श्रीमती. प्रणाली सावंत
// निकालपत्र //
(1) प्रस्तूतचे प्रकरण सन 2007 मध्ये दाखल झालेले आहे. सदरचा तक्रार अर्ज तक्रारदारांनी पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच येथे दाखल केला होता तेव्हा त्यास पीडीएफ/33/2007 असा नोंदणीकृत क्रमांक देण्यात आला होता. मा.राज्य आयोग, मुंबई यांचे आदेशान्वये सदरचे प्रकरण अतिरिक्त पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच येथे वर्ग केल्यानंतर सदरचा तक्रार अर्ज एपीडीएफ/371/2008 असा नोंदविण्यात आला आहे.
(2) प्रस्तूत प्रकरणातील जाबदारांनी प्रवासाच्या दरम्यान दिलेल्या सदोष सेवेबाबत योग्य ते आदेश होऊन मिळणेसाठी तक्रारदारांनी सदरहू तक्रार अर्ज दाखल केला आहे. याबाबत थोडक्यात हकीकत अशी की,
(3) तक्रारदार श्री. भालचंद्र अगरवाल व सौ. विजया अगरवाल हे जाबदारांनी आयोजित केलेल्या हैद्राबादच्या प्रवासासाठी गेले होते. दिवाळी सुट्टीमध्ये दिवाळी कार्निवल पॅकेज म्हणून हैद्राबाद येथील प्रेक्षणीय स्थळे दाखविण्याचे जाबदारांनी कबूल केले होते. या प्रवासाच्या दरम्यान स्नो वर्ल्ड, लुंबिनी पार्क, लेझर शो, सालारजंग म्युझियम व बिर्ला मंदिर दाखविण्याचे जाबदारांनी कबूल केले होते. या प्रवासासाठी प्रति व्यक्ति खर्च रु. 6,500/- मात्र जाबदारांतर्फे सांगण्यात आला होता. तक्रारदारांनी या सहलीला जाण्याचे ठरविले व जाबदारांनी सांगितल्याप्रमाणे त्यांची रक्कम तक्रारदारांनी अदा केली. हैद्राबाद येथे पोहोचल्यानंतर जाबदारांनी कबूल केल्याप्रमाणे आपल्याला सालारजंग म्युझियम व प्लॅनेटोरियम दाखविले नाही तसेच बिर्ला मंदिर नीट बघता आले नाही अशी तक्रारदारांची तक्रार आहे. लुंबिनी पार्क येथील लेझर शो च्या वेळेस प्रचंड गर्दीमुळे नियोजनाच्या अभावी आपल्याला त्याचा आनंद घेता आला नाही अशी तक्रारदारांची तक्रार आहे. सालारजंग म्युझियम व चारमिनार ईदच्या दिवशी बंद असते याची पूर्व-कल्पना जाबदारांना असणे आवश्यक होते व त्याप्रमाणे त्यांनी सहलीचे नियोजन करणे आवश्यक होते असे तक्रारदारांनी नमुद केले आहे. सहलीच्या दरम्यान नियोजीत स्थळी वेळेत न पोहाचणे व त्यामुळे ठरलेली ठिकाणे गडबडीने बघणे असेही प्रकार घडले. संपूर्ण सहलीच्या दरम्यान जाबदारांतर्फे कोणताही जबाबदार प्रतिनिधी मार्गदर्शनासाठी अथवा व्यवस्थेसाठी उपलब्ध नव्हता व त्यामुळे सहलीचे नियोजन अत्यंत गोंधळपूर्व वातावरणात झाले अशी तक्रारदारांची तक्रार आहे. अशाप्रकारे जाबदारांनी सहलीला नेऊन कबूल केल्याप्रमाणे आपल्याला सर्व स्थळे दाखविली नाहीत तसेच योग्य व्यवस्था केली नाही व आपल्याला सदोष सेवा दिली याचा विचार करता, जाबदारांना अदा केलेली रक्कम नुकसानभरपाईसह देण्यात यावी अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे. तक्रारदारांनी तक्रार अर्जाच्या पृष्टयर्थ प्रतिज्ञापत्र व संबंधित सहलीची माहितीपत्रके व रक्कम अदा केल्याच्या पावत्या मंचापुढे दाखल केल्या आहेत.
(4) प्रस्तूत प्रकरणातील जाबदार क्र. 1,2, 3 व 5 यांचेवर नोटीस बजावणी होऊन सुध्दा ते मंचापुढे गैरहजर राहिले म्हणून त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश निशाणी 1 वर पारीत करण्यात आला. तर जाबदार क्र. 4 हे अनावश्यक पक्षकार असल्यामुळे त्यांना वगळण्यात यावे या तक्रारदारांच्या विनंतीनुसार मंचाच्या परवानगीने जाबदार क्र.4 यांना तक्रारदारांनी वगळले आहे.
(5) प्रस्तूत प्रकरणातील तक्रारदारांच्या तक्रारीच्या अनुषंगे त्यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता, जाबदार क्र. 1 रामोजी फिल्म सिटीद्वारे स्नो वर्ल्ड, लेझर शो सह लुंबिनी पार्क, सालारजंग म्युझियम व बिर्ला मंदिर दाखवायचे आश्वासन सहल आयोजकाने दिले होते, ही बाब सिध्द होते. या माहितीपत्रकामध्ये प्रतिव्यक्ति प्रवासाची रक्कम रु.6,500/- नमुद केलेप्रमाणे दोन व्यक्तिंची रक्कम तक्रारदारांनी जाबदारांना अदा केल्याचे दाखल पावतीवरुन सिध्द होते. आयोजित केलेल्या सहलीमध्ये जाबदारांनी कबूल केलेली सर्व प्रेक्षणीय स्थळे दाखविली नाहीत तसेच अत्यंत अयोग्य पध्दतीने नियोजन करुन त्रास दिला ही तक्रारदारांनी वस्तुस्थितीबाबत शपथेवर केलेली तक्रार जाबदारांनी हजर होऊन नाकारलेली नाही. सबब या अनुषंगे जाबदारांविरुध्द प्रतिकुल निष्कर्ष निघतो. अशाप्रकारे जाहिरात करुन प्रवाशांना सहलीचे बुकींग करण्यासाठी आकर्षित करायचे व नंतर कबूल केल्याप्रमाणे सहलीचे नियोजन करावयाचे नाही ही बाब जाबदारांच्या सेवेत दोष निर्माण करते असा मंचाचा निष्कर्ष आहे. तक्रारदारांनी आपण जाबदारांना अदा केलेली रक्कम जरी परत मागितली असली तरीही ते हैद्राबाद येथे जाऊन आलेले आहेत व काही प्रेक्षणीय स्थळांना जाबदार त्यांना घेऊन गेलेले नाहीत या वस्तुस्थितीचा विचार करता, अशाप्रकारे सहलीची संपूर्ण रक्कम परत करण्याचे आदेश करणे अयोग्य ठरेल असे मंचाचे मत आहे. सबब तक्रारदारांची ही विनंती नामंजूर करण्यात येत आहे. मात्र जाबदारांच्या ढिसाळ नियोजनामुळे तक्रारदारांना जो त्रास झाला तसेच कबूल केलेली काही प्रेक्षणीय स्थळे जाबदारांनी तक्रारदारांना दाखविली नाहीत याचा विचार करता, शारीरिक व मानसिक त्रासाच्या नुकसानभरपाईपोटी व सदरहू तक्रार अर्जाचा खर्च म्हणून दोन्ही तक्रारदारांना एकत्रितपणे रु.10,000/- मात्र मंजूर करण्यात येत आहेत.
(6) प्रस्तूत प्रकरणामध्ये तक्रारदारांनी ज्यांनी सहल आयोजित केली त्या रामोजी फिल्म सिटीसह माहितीपत्रकामध्ये नमुद अन्य सर्व एजंटसना याकामी जाबदार म्हणून सामील केलेले आहे. मात्र या एजंटचा सहभाग फक्त रक्कम स्विकारण्यापुरता मर्यादित असून सहल आयोजित करण्याचे आश्वासन व जबाबदारी जाबदार क्र.1 रामोजी फिल्म सिटी यांनी स्विकारली होती हे माहितीपत्रकावरुन लक्षात येत असल्यामुळे अंतिम आदेश फक्त जाबदार क्र.1 यांचेविरुध्द करण्यात येत आहे.
(7) वर सर्व नमुद निष्कर्ष व विवेचनांच्या आधारे प्रस्तूत प्रकरणात पुढीलप्रमाणे आदेश निर्गमित करण्यात येत आहेत.
// आदेश //
(1) तक्रार अर्ज मंजूर करण्यात येत आहे.
(2) यातील जाबदार क्र.1 यांनी तक्रारदारांना शारीरिक व मानसिक त्रासाची नुकसानभरपाई तसेच सदरहू तक्रार अर्जाचा खर्च म्हणून एकत्रितपणे रक्कम रु.10,000/- (रु. दहा हजार मात्र) निकालपत्राची प्रत मिळाल्यापासून तीस दिवसांचे आत अदा करावेत. अन्यथा त्यांना या रकमेवर निकाल तारखेपासून संपूर्ण रक्कम प्राप्त होईपर्यंत 12% दराने व्याज द्यावे लागेल.
(3) वर नमूद आदेशांची अंमलबजावणी जाबदारांनी निकालपत्राची प्रत मिळालेपासून तिस दिवसांचे आत न केलेस तक्रारदार त्यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायद्याच्या तरतूदीं अंतर्गत प्रकरण दाखल करु शकतील.
(4) निकालपत्राच्या प्रती दोन्ही पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात याव्यात.
(श्रीमती. सुजाता पाटणकर) (श्रीमती. प्रणाली सावंत)
सदस्या अध्यक्षा
अतिरिक्त पुणे जिल्हा मंच, पुणे अतिरिक्त पुणे जिल्हा मंच, पुणे
पुणे.
दिनांक –25/11/2011