|
तक्रार दाखल तारीख – 27/01/2017 तक्रार निकाली तारीख – 16/12/2017 |
|
न्या य नि र्ण य
(व्दाराः- मा. सौ. रुपाली धै. घाटगे, सदस्या)
1) तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे—
यातील वि.प.क्र.1 ही नामांकित घरगुती उपकरण उत्पादित करणारी कंपनी असून वि.प.क्र.2 हे वि.प.क्र.1 यांचे अधिकृत विक्रेते आहेत, तर वि.प.क्र.3 हे वि.प.क्र.1 चे अधिकृत सर्व्हिस सेंटर आहे. तक्रारदारांनी वि.प.क्र.2 यांचेकडून दि.28/05/2015 रोजी तोशिबा कंपनीचा 32 इंची टीव्ही रक्कम रु.27,000/- या किंमतीस खरेदी केला. सदर टीव्ही घरी नेल्यावर 15 दिवसांचे आत तो बंद पडला. सदरचा टीव्ही वॉरंटीमध्ये असल्याने तक्रारदारांनी तो वि.प.क्र.3 यांचेकडे दाखविला. त्यांनी तो दुरुस्त करुन दिला. परंतु तदनंतर पुन्हा दोन वेळा सदरचा टीव्ही बंद पडला व तो तक्रारदारांनी वि.प.क्र.3 यांचेकडून दुरुस्त करुन घेतला. त्यानंतर तक्रारदारांनी वि.प.क्र.2 व 3 यांचेशी संपर्क साधून सदरचे टीव्हीमध्ये उत्पादीत दोष असल्याने तो परत घेवून पैसे देणेस सांगितले असता वि.प.क्र.2 व 3 यांनी पैसे 2 महिन्यात परत देतो, असे सांगितले. परंतु आजअखेर त्यांनी पैसे परत दिलेले नाहीत. सदरचा टीव्ही हा वि.प.क्र.2 व 3 यांचे ताब्यात आहे. अशा प्रकारे वि.प. यांनी तक्रारदार यांच्या सेवेत त्रुटी ठेवून अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे. सबब, तक्रारदारास वि.प. यांचेकडून टीव्हीची रक्कम रु.27,000/-, उत्पादित दोष असलेला टीव्ही तक्रारदारास दिल्यामुळे दंड म्हणून रक्कम रु.20,000/-, शारिरिक, मानसिक त्रासापोटी रक्कम रु.20,000/-, अशी एकूण रक्कम रु.67,000/- ची मागणी तक्रारदाराने केली आहे. तसेच सदर रकमेवर दि.14/9/2016 पासून द.सा.द.शे. 18 टक्के दराने व्याज मिळावे अशीही मागणी तक्रारदाराने केली आहे.
2. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत टीव्ही खरेदीचे बिल, वॉरंटी कार्ड, जॉब कार्ड, वि.प. यांनी दिलेला सर्व्हिस सेंटरचा पत्ता इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तिवादही दाखल केला आहे.
3. वि.प. क्र.2 यांना या तक्रार अर्जाची नोटीस लागू होवूनही ते याकामी हजर झाले नाहीत व त्यांनी आपले म्हणणे दाखल केले नाही. सबब, प्रस्तुतचे प्रकरण त्यांचेविरुध्द एकतर्फा चालविणेचा आदेश दि.25/4/2017 रोजी नि.1 वर पारीत करण्यात आला. वि.प.क्र.3 यांना नोटीस लागू झालेनंतर ते याकामी हजर झाले परंतु त्यांनी म्हणणे दिले नाहीत. सबब, त्यांचेविरुध्द म्हणणे नाही असा आदेश दि.25/4/2017 रोजी पारीत करण्यात आला.
4. वि.प.क्र.1 यांनी याकामी ता.02/08/17 रोजी म्हणणे दाखल केले असून तक्रारदाराची तक्रार नाकारलेली आहे. वि.प.क्र.1 यांचे कथनानुसार, तक्रारदार यांनी महत्वाच्या बाबी जाणीवपूर्वक लपवून ठेवल्या आहेत, ज्या या तक्रारीचा निर्णय करणेस बाधा आणतात. तक्रारदार यांचा हेतू वि.प. यांचे मानहानी करणेचा तसेच कायद्याचा दुरुपयोग करणेचा आहे. तक्रारदार यांनी दि.28/5/15 रोजी खरेदी केलेला टीव्ही वितरणावेळी चांगल्या स्थितीत चालत होता व तक्रारदार यांनी तो योग्य व चांगल्या प्रकारे चालत असलेची खात्री करुनच ताब्यात घेतला आहे. सदर उपकरणाची वॉरंटी ही तीन वर्षांची आहे. सदर वॉरंटीनुसार वि.प. हे टीव्हीची दुरुस्ती करुन देवू शकतात, पण त्यामध्ये मूळ उत्पादनात त्रुटी असल्याखेरीज सदरचा टीव्ही बदलून देत नाहीत. तक्रारदाराने वि.प. यांचेकडे दिलेली पहिली तक्रार ही दि.12/3/16 रोजीची आहे. त्यामध्ये टीव्ही काम करत नाही अशी नोंद आहे. त्याप्रमाणे संबंधीत तज्ञाने टीव्हीची तपासणी केली असता त्याचे मुख्य बोर्ड व पॅनेल यात काही दोष निर्माण झालेचे दिसून आले. त्या दोषाचे निवारण करण्यात येवून तक्रारदारास टीव्ही चालू स्थितीमध्ये दि.5/4/16 रोजी ताब्यात दिला. तदनंतर दुसरी तक्रार ही दि.22/6/16 ची होती. त्यानंतर अधिकृत तज्ञाने त्याची पाहणी केली असता पॉवर बोर्डचा मुद्दा होता, तो योग्य प्रकारे निवारण करुन तक्रारदारांना टीव्ही दि.24/6/2016 रोजी चालू स्थितीत देण्यात आला. तदनंतर तक्रारदाराची तिसरी तक्रार ही दि.2/9/16 रोजीची होती. त्यावेळी तज्ञाने टीव्हीची पाहणी केली असता त्याचे पॅनेलमध्ये दोष निर्माण झालेचे दिसून आले. त्यावेळी संबंधीत सेवा पुरवठादार यांचेकडे योग्य तो स्पेअर पार्ट उपलब्ध नसलने सदर तक्रार डी.ओ.ए. टीमकडे मंजूरीसाठी पाठविली व या मंजूरीकरिता काही कालावधी लागला. परंतु वि.प. तक्रारदाराकडे टीव्ही बदलून देणेकरिता गेले असता त्यांनी त्यास नकार दिला व टीव्हीची किंमत मागणेस सुरुवात केली, जी वि.प. यांनी नाकारली. वॉरंटीचे अटी व शर्तीनुसार वि.प. हे टीव्ही दुरुस्त करुन देणेस असमर्थ असतील तर दुसरा टीव्ही दिला जातो. परंतु सदिच्छेच्या वृत्तीने व समझोत्याच्या दृष्टीने वि.प. हे तक्रादार यांना कोणत्याही नुकसान भरपाई व खर्चाशिवाय टीव्हीची किंमत रु.27,000/- देण्यास तयार झाले. मा.सर्वोच्च न्यायालयाने भारती निटींग कंपनी विरुध्द डी.एच.एल.वर्ल्डवाईड एक्प्रेस कुरीअर डिव्हीजन ऑफ एअरफ्राईट लि. AIR 1996 SC 2509 मध्ये मा. राष्ट्रीय आयोगाचा निकाल कायम ठेवताना वॉरंटीच्या अटी व शर्ती या दोन्ही पक्षकारांना बंधनकारक राहतील व त्यानुसार करारामध्ये निश्चित केलेली जबाबदारी ही त्या कराराप्रमाणेच मर्यादित स्वरुपाची असते असा दंडक घालून दिला आहे. वि.प. यांनी तक्रारदार यांना त्यांची वस्तू बदलून देण्याची तयारी दर्शविली होती. सबब, तक्रारअर्ज फेटाळणेत यावा अशी विनंती वि.प. क्र.1 यांनी केली आहे.
5. वि.प. क्र.1 यांनी याकामी शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
6. प्रस्तुतकामी तक्रारदार यांनी वि.प. नं. 2 यांचेकडून ता.8/5/2015 रोजी तोशिबो कंपनीचा 32 इंची टीव्ही रक्कम रु.27,000/- इतक्या रकमेचा खरेदी केला होता. सदरचा टीव्ही बंद पडला. सदरचा टीव्ही वि.प.क्र.3 सर्व्हिस सेंटर यांनी दुरुस्त करुन दिला. पुन्हा तक्रारदारांचा टीव्ही 15 दिवसांनी बंद पडला. सदरचा टीव्ही वारंवार बंद पडलेमुळे अखेर ता.04/09/16 रोजी दुरुस्तीसाठी सोडला. सबब, सदरचा वारंवार बंद पडत असलेला सदोष टीव्ही तक्रारदार यांना देवून व त्यापोटी मोबदला रक्कम स्वीकारुन तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली का ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो. त्याअनुषंगाने दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता अ.क्र.1 ला सदरचा टीव्ही वि.प. यांचेकडून रक्कम रु.27,000/- ला दि.28/5/15 रोजी खरेदी केलेची पावती दाखल केलेली आहे. तसेच वॉरंटी कार्ड देखील दाखल आहे. अ.क्र.3 ला जॉब शीट दाखल आहे. सदरचे जॉबशीटचे अवलोकन केले असता, Warranty Expiry date 27/05/16 to 27/05/18 Repair – Panel defect असे नमूद आहे. प्रस्तुतकामी वि.प. यांनी त्यांचे लेखी म्हणणेमध्ये सदरचा टीव्ही तक्रारदार यांना विक्री केलेचे मान्य व कबूल केले आहे. सदर वॉरंटीनुसार वि.प. हे त्यास एलसीडी दुरुस्त करुन देवू शकतात पण त्यामध्ये मूळ उत्पादनात त्रुटी असलेखेरीज सदरचा एलसीडी बदलून देता येत नाही असे वि.प. यांनी लेखी म्हणणेमध्ये कथन केलेले आहे. वि.प. यांनी सदरचे एल.सी.डी. संदर्भात तीन तक्रारी तक्रारदाराने केलेचे मान्य केले आहे. दि.12/3/16 रोजी एल.सी.डी. काम करत नाही. त्याप्रमाणे संबंधीत तज्ञाने तपासणी केली असता त्याचे मुख्य बोर्ड व पॅनेलमध्ये दोष होते. सदरचे तक्रार दोषांचे निवारण केले. ता.22/06/2016 रोजी सदरचे एल.सी.डी. पॉवर बोर्डचे निवारण केले. दि.02/09/2016 रोजी पॅनेलमध्ये दोष निर्माण झाले. योग्य स्पेअर पार्ट उपलब्ध नसले कारणाने सदर तक्रार डी.ओ.ए. टीमकडे मंजूरीकरिता पाठविली. सबब, वरील वि.प. यांचे कथनावरुन सदरचे एल.सी.डी. टीव्हीत वेळोवेळी दोष निर्माण झालेचे वि.प. यांनी मान्य केलेले आहे. तसेच सदरचा एल.सी.डी. वि.प. यांनी बदलून देणेचे वि.प. यांनी त्यांचे लेखी म्हणणेमध्ये मान्य व कबूल केलेले आहे.
7. वरील सर्व कागदपत्रांवरुन व कथनांवरुन वि.प. यांनी तक्रारदार यांना सदोष एल.सी.डी. दिलेचे शाबीत होते. प्रस्तुतकामी वि.प. क्र.2 व 3 यांना या मंचाची नोटीस लागू होवून देखील याकामी ते हजर नाहीत. त्या कारणाने वि.प. क्र.2 यांचेविरुध्द एकतर्फा आदेश व वि.प. नं.3 विरुध्द नो से आदेश पारीत झालेले आहेत. उत्पादित कंपनीने कोणत्याही उत्पादनाची विक्री करत असताना, विक्रीपश्चात असणारी सेवा देणेची जबाबदारी प्रिव्हिटी ऑफ कॉन्ट्रॅक्ट (Privity of contract) या तत्वानुसार उत्पादित कंपनी व त्याचे विक्रेत्याची असते. तसेच सदरची जबाबदारी ही केवळ उत्पादन विक्री करण्यापुरतीच मर्यादित नसून विक्रीपश्चात सेवा देण्याची असते. वि.प.क्र.2 हे वि.प.क्र.1 यांचे अधिकृत विक्रेते आहेत, तर वि.प.क्र.3 हे वि.प.क्र.1 चे अधिकृत सर्व्हिस सेंटर आहे. त्यामुळे तक्रारदार व वि.प. क्र.2 व 3 यांचेमध्ये Privity of contract असलेचे दिसून येते. तक्रारदाराने वि.प. यांचेकडून घेतलेला सदरचा एल.सी.डी. टीव्ही वॉरंटी पिरियडमध्ये आहे. सदरचे एल.सी.डी.मध्ये वारंवार दोष निर्माण झालेचे वि.प. यांनी कबूल केलेले आहे. सदरचे एल.सी.डी.मध्ये कोणते दोष होते व त्यांचे निवारण कश्याप्रकारे केले, याबाबतचा वि.प. यांनी कोणताही कागदोपत्री पुरावा या मंचात दाखल केलेला नाही. सदरचा एल.सी.डी. वि.प. यांचे ताब्यात असलेचे तक्रारदारांनी पुराव्याचे शपथपत्रामध्ये कथन केलेले आहे.
8. सबब, वरील सर्व बाबींचा विचार करता, तक्रारदार हे वि.प. क्र.1 ते 3 यांचेकडून तोशिबा कंपनीचा एल.सी.डी टीव्ही यांची एकूण रक्कम रु.27,000/- मिळणेस पात्र आहेत. तसेच सदर रकमेवर दि.04/09/2016 रोजीपासून सदरची संपूर्ण रक्कम तक्रारदार यांना मिळेपावेतो द.सा.द.शे. 9 टक्के प्रमाणे व्याज मिळणेसही तक्रारदार पात्र आहेत. प्रस्तुतकामी तक्रारदार यांनी उत्पादित दोष असलेला टीव्ही दिलेमुळे दंडाची रक्कम रु.20,000/- तसेच मानसिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी रु.20,000/- रकमेची मागणी केलेली आहे. तथापि कागदपत्रांचे अवलोकन केले असता, तक्रारदार याने सदरचे एल.सी.डी. टीव्हीचा एक वर्षे उपभोग घेतलेचा दिसून येते. परंतु सदरचे एक वर्षीचे कालावधीमध्ये सदरचा एल.सी.डी. टीव्ही चार वेळा बंद पडलेला आहे. या सर्व बाबींचा विचार करता तक्रारदार हे वि.प. क्र.1 ते 3 यांचेकडून मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम रु.8,000/- व तक्रारीचे खर्चापोटी रु.2,000/- मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
मुद्दा क्र.4 - सबब आदेश.
आ दे श
1) तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करणेत येते.
2) वि.प. क्र.1 ते 3 यांनी तक्रारदार यांना तोशिबा कंपनीच्या एल.सी.डी. टी.व्ही. ची खरेदीची रक्कम रु.27,000/- अदा करावी. तसेच सदर रकमेवर ता.04/09/2016 रोजीपासून सदरची संपूर्ण रक्कम तक्रारदारास मिळेपावेतो द.सा.द.शे. 9 टक्केप्रमाणे व्याज अदा करावे.
3) वि.प. क्र.1 ते 3 यांनी तक्रारदाराला मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम रु. 8,000/- (रक्कम रुपये आठ हजार मात्र) व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु. 2,000/- (रक्कम रुपये दोन हजार मात्र) अदा करावी.
4) वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता वि.प. क्र.1 ते 3 यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5) विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम 25 व 27 प्रमाणे वि.प. विरुध्द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.