::: आ दे श :::
( पारित दिनांक : 29/09/2015 )
माननिय सदस्या श्रीमती जे.जी. खांडेभराड, यांचे अनुसार : -
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये दाखल केलेल्या या तक्रारीचा सारांश थोडक्यात खालीलप्रमाणे -
तक्रारकर्ता हा वाशिम जिल्हयातील रहिवाशी आहे. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्र. 2 उत्पादीत महिंद्रा टर्बो 595 हा ट्रॅक्टर, विरुध्द पक्ष क्र. 1 यांच्या वाशिम स्थित शो- रुममधून डिसेंबर 2012 मध्ये विकत घेतला होता. त्याचा रजिष्ट्रेशन नं. एम.एच. 37, एफ 2822 हा असून, चेचिस नं. 1870 के जी व इंजिन नं. एनएलटीए 00061 असा आहे. ट्रॅक्टर विकत घेतेवेळी सदर ट्रॅक्टरच्या 8 सर्व्हीसींग विनामुल्य असल्याचे बुकलेट तसेच एक वर्षाची वॉरंटी दिली होती.
तक्रारकर्त्याने दिनांक 15/11/2013 रोजी ट्रॅक्टरची तिसरी सर्व्हीसींग करणेसाठी विरुध्द पक्ष क्र. 1 कडे नेला आणि दुसरे दिवशी ट्रॅक्टरची संपूर्ण सर्व्हीसींग करण्यात आली होती. ट्रॅक्टरमध्ये इंजिन ऑईल व इतर भागातील ऑईल बदलविण्यात आले व त्याप्रमाणे तक्रारकर्त्यास बिल क्र. 1833 दिले होते व त्यामध्ये 7.5 + 1 लिटर इंजिन ऑईलची रक्कम लावण्यात आली होती. त्याचदिवशी तक्रारकर्ता त्यांचा ट्रॅक्टर मौजा उमरी येथे घेवून घरी आले. दुसरे दिवशी दिनांक 16/11/2013 रोजी ट्रॅक्टर शेतामध्ये नेत असतांना अचानक बंद पडला. त्यामुळे तक्रारकर्त्याने सदरहू ट्रॅक्टर दुस-या वाहनाच्या सहाय्याने दिग्रस येथील शर्मा इंजिनिअरींग अँण्ड मेकॅनिकल वर्क्स यांचे गॅरेजमध्ये आणला. त्यांनी सदर वाहनाची पाहणी केली व इंजिनमध्ये एकही थेंब ऑईल नसल्यामुळे इंजिन लॉक झाले असल्याबाबत तक्रारकर्त्यास सांगितले. त्यामुळे तक्रारकर्त्याने याबाबत विरुध्द पक्ष क्र.1 यांचेकडे याबाबत तक्रार नोंदविली व फोनवर संपर्क केला परंतु विरुध्द पक्ष क्र.1 कडून वाहन पाहण्यास कोणीही आले नाही. तक्रारकर्त्याने 4-5 दिवस वाट पाहिली, त्यानंतर दिनांक 21/11/2013 रोजी शर्मा यांचे गॅरेजमध्ये ट्रॅक्टरचे इंजिन उघडण्यात आले. त्यावेळेस त्यांनी ट्रॅक्टरचे इंजिन लॉक झाले असल्याबाबत व अमरावती येथील वर्कशॉप मधून काम करुन घेण्याविषयी तक्रारकर्त्यास सांगितले. त्याप्रमाणे तक्रारकर्त्याने दिनांक 22/11/2013 रोजी रवि सिंगई वर्कशॉप, अमरावती यांचेकडून इंजिनचे संपूर्ण काम करुन घेतले. नविन पिस्टन व क्रॅन्क चे कामास तक्रारकर्त्यास जवळपास 60,000/- रुपये खर्च आला. तसेच ट्रॅक्टरचे इंजिन खाजगी वाहनाने अमरावती येणे नेणे व इतर प्रवासखर्च मिळून जवळपास 10,000/- रुपये खर्च आला व ट्रॅक्टर 10 ते 12 दिवस बंद स्थितीत उभा ठेवल्यामुळे जवळपास 30 ते 40,000/- रुपयाचे नुकसान, असा एकूण रुपये 1,10,000/- रुपयाचा आर्थिक भुर्दंड विरुध्द पक्ष क्र. 1 यांची हलगर्जी व निष्काळजीपणामुळे तक्रारकर्त्यास सोसावा लागला. त्यामुळे तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष यांना दिनांक 02/12/2013 रोजी नुकसान भरपाई देण्यासंबंधी नोटीस पाठविली परंतु विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी सदर नोटीसला खोटे ऊत्तर पाठविले. अशाप्रकारे विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी सेवा देण्यात उणीव केलेली आहे.
त्यामुळे, तक्रारकर्ते यांनी, सदर तक्रार, या न्यायमंचासमोर, दाखल करुन, विरुध्द पक्ष क्र. 1 कडून ट्रॅक्टरची नुकसान भरपाई रुपये 1,10,000/- व शारीरिक, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई रुपये 40,000/- असे एकूण रुपये 1,50,000/- तक्रारकर्त्यास दयावेत, तसेच त्या रक्कमेवर दरसाल, दरशेकडा 12 टक्के दराने व्याज, व तक्रारीचा खर्च रुपये 5,000/- मिळावा, अशी विनंती, सदर तक्रारीचे शेवटी, केलेली आहे.
सदर तक्रार शपथेवर दाखल असुन, त्यासोबत एकंदर 09 दस्त जोडलेले आहेत.
2) विरुध्द पक्ष क्र. 1 यांचा लेखी जबाब -
त्यानंतर निशाणी 10 प्रमाणे विरुध्द पक्ष क्र. 1 ने त्यांचा लेखी जबाब मंचासमोर दाखल करुन तक्रारकर्त्याचे बहुतांश म्हणणे फेटाळले. तक्रारकर्त्याने नोटीस व तक्रारीमध्ये ट्रॅक्टरचे वेगवेगळे नोंदणी क्रमांक नोंदविले, तक्रारकर्त्याने सर्व्हिसिंगनंतर वाहनाचा ताबा चांगल्या स्थितीत घेतला व ट्रॅक्टर गावाला घेऊन गेले. वॉरंटीचा भंग करुन तक्रारकर्त्याने इंजिनचे काम माघारीच करुन घेतले असेल तर त्याची कोणतीही जबाबदारी विरुध्द पक्षावर येत नाही. कारण तक्रारकर्त्याने वरील ट्रॅक्टर हा कारंजा किंवा वाशिम येथील सर्व्हीसिंग सेंटरवर आणला नाही, कंपनीच्या अधिकृत इंजिनीयर कडून तपासणी करुन घेतली नाही. तक्रारकर्त्याचा ट्रॅक्टर दुरुस्त करण्याबाबत विरुध्द पक्षाने कधीही नकार दिला नाही इ. विरुध्द पक्षाने पुढे अधिकचे कथनात नमुद केले की, तक्रारकर्त्याची तक्रार बनवाबनवीची आहे कारण तक्रारकर्त्याचेच म्हणण्याप्रमाणे त्याने ट्रॅक्टर वाशिम येथून त्याचे गाव उमरी पर्यंत 70 किलोमिटर नेला. ट्रॅक्टरमध्ये ऑईल नसते तर वाशिम येथेच ट्रॅक्टरचे पिस्टन जाम झाले असते व ट्रॅक्टर चालू स्थितीत नसता. विरुध्द पक्षाच्या कार्यालयाला किंवा सर्व्हीसिंग सेंटरला सुचना न देता केलेली दुरुस्ती ही नियमबाहय आहे. कोणतेही काम न करता खोटे आरोप करुन काहीतरी रक्कम मिळावी या उद्देशाने तक्रार दिसते कारण दिनांक 09/12/2013 रोजी नोटीसचे ऊत्तर दिलेले आहे. दिनांक 15/01/2013 च्या जॉब कार्डवर व इतर बिलावर तक्रारकर्त्याच्या सहया आहेत. जे सामान आवश्यक असते त्याची रक्कम तक्रारकर्त्याला द्यावी लागते. सर्व्हिसिंग बद्दल कोणतीही आकारणी केलेली नाही. तक्रारकर्त्याची तक्रार वॉरंटीच्या नियमात बसत नाही, त्यामुळे ही तक्रार चालू शकत नाही. वॉरंटीच्या नियमाप्रमाणे दुरुस्ती करुन देण्यास विरुध्द पक्ष तयार आहे, त्यांनी कधीही नकार दिलेला नाही. तक्रारकर्त्याकडून कोणताही फोन करण्यात आलेला नाही किंवा सर्व्हीस सेंटरवर तक्रार नोंदलेली नाही. शिवाय तक्रारकर्ता खोटी तक्रार घेऊन आलेला असून स्वच्छ हाताने आलेला नाही. त्यामुळे तक्रार खारिज करण्यात यावी व विरुध्द पक्षाला नुकसान भरपाई म्हणून रुपये 10,000/- देण्यात यावे.
सदर जबाब, विरुध्द पक्ष यांनी, शपथेवर, सादर केला.
3) विरुध्द पक्ष क्र. 2 यांचा लेखी जबाब - विरुध्द पक्ष क्र. 2 ने त्यांचा लेखी जबाब इंग्रजी भाषेत ( निशाणी 18 प्रमाणे ) मंचासमोर दाखल करुन तक्रारकर्त्याचे बहुतांश म्हणणे फेटाळले. विरुध्द पक्ष क्र. 1 प्रमाणेच लेखी जबाबात मजकूर नमुद करीत, विरुध्द पक्षाचे म्हणणे आहे की, या विरुध्द पक्षाने किंवा विरुध्द पक्ष क्र. 1 ने ट्रॅक्टरची सर्व्हीसिंग देण्यास कधीही नकार दिलेला नाही, सेवेत न्युनता नाही किंवा ट्रॅक्टरमध्ये ऊत्पादनातील दोष नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याच्या खोटया दाव्यास या विरुध्द पक्षाची कोणतीही जबाबदारी येत नाही. तक्रारकर्त्याची तक्रार खोटी आहे कारण ऑईलशिवाय वाशिम ते उमरी बु. हे 70 किलोमिटर इतके अंतर ट्रॅक्टर धावू शकत नाही. बिलात दर्शविल्याप्रमाणे नमुद सर्व्हिसिंग सेंटर विरुध्द पक्ष कंपनीने प्राधिकृत केलेले नाही. तक्रार दाखल करण्यापूर्वी तक्रारकर्त्याने या विरुध्द पक्षाकडे कधीही तक्रार केलेली नाही. त्यामुळे विरुध्द पक्ष जबाबदेही होऊ शकत नाही. तक्रारकर्त्याचा दावा वॉरंटीच्या कक्षेत मोडत नाही. विरुध्द पक्ष वॉरंटीच्या अटी व शर्तीला बांधील आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार रुपये 20,000/- खर्चासह खारिज करण्यात यावी.
4) कारणे व निष्कर्ष ::
सदर प्रकरणामध्ये तक्रारकर्ते यांची तक्रार, विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 चे स्वतंत्र लेखी जबाब, उभय पक्षाने दाखल केलेले सर्व दस्तऐवज, विरुध्द पक्षाने दाखल केलेला प्रतिज्ञालेख, तसेच विरुध्द पक्षाचा तोंडी युक्तिवाद यांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन, खालील निष्कर्ष कारणे देऊन नमुद केला तो येणेप्रमाणे.
या प्रकरणात तक्रारकर्त्यास युक्तिवाद करणेसाठी पुरेशी संधी देऊनही त्यांनी युक्तिवाद केला नाही. सबब दाखल दस्तांवरुन निर्णय पारित केला.
तक्रारकर्ता यांचे तक्रारीत असे म्हणणे आहे की, तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्र. 2 म्हणजेच महिंद्रा अँन्ड महिंद्रा हया कंपनीचा, विरुध्द पक्ष क्र. 1 यांच्या शो- रुममधून डिसेंबर 2012 मध्ये महिंद्रा टर्बो 595 हा ट्रॅक्टर विकत घेतला. सदर ट्रॅक्टर विकत घेतेवेळेस, ट्रॅक्टरच्या 8 सर्व्हीसींग विनामुल्य असल्याचे बुकलेट विरुध्द पक्ष क्र. 1 कडून तक्रारकर्त्याला देण्यात आलेले होते. तसेच सदर ट्रॅक्टरची एक वर्षाची वॉरंटी दिली होती. त्यामुळे त्यांच्यामध्ये ग्राहक व विक्रेता असे संबंध प्रस्थापित झालेले आहेत. तक्रारकर्ता यांनी दिनांक 15/11/2013 रोजी तिसरी सर्व्हीसींग करण्याकरिता सदर वाहन विरुध्द पक्ष क्र. 1 चे सर्व्हीसींग सेंटर, वाशिम येथे नेले आणि त्याचदिवशी ट्रॅक्टरची संपूर्ण सर्व्हीसींग करण्यात आली होती. तसेच ट्रॅक्टरचे इंजिन ऑईल व इतर भागातील ऑईल बदलविण्यात आले होते. त्याचदिवशी तक्रारकर्त्याच्या ट्रॅक्टरची सर्व्हीसींग पूर्ण झाल्यामुळे, तक्रारकर्ता त्यांचा ट्रॅक्टर उमरी येथे घेवून घरी आले होते. आणि दुस-या दिवशी म्हणजेच दिनांक 16/11/2013 रोजी तक्रारकर्ता शेतीच्या कामाकरिता शेतामध्ये नेत असतांना, अचानक सदर वाहन बंद पडले. त्यामुळे सदर वाहन तक्रारकर्ता यांनी दिग्रस येथील शर्मा इंजिनिअरींग अँण्ड मेकॅनिकल वर्क्स यांचे गॅरेजमध्ये आणले. त्यांनी सदर वाहनाची पाहणी केली असता, इंजिनमध्ये एकही थेंब ऑईल नसल्यामुळे इंजिन लॉक झाले असल्याबाबत तक्रारकर्त्यास सांगितले. तक्रारकर्त्याने, विरुध्द पक्ष क्र.1 कडे याची तक्रार नोंदविली. परंतु विरुध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रारीची दखल न घेतल्यामुळे, तक्रारकर्त्याने सदर वाहन दिनांक 22/11/2013 रोजी रवि सिंघई वर्कशॉप, अमरावती यांचेकडून रक्कम रुपये 60,000/- देऊन दुरुस्त करुन घेतले. त्यामुळे हयात विरुध्द पक्ष क्र. 1 चा निष्काळजीपणा आहे व म्हणून प्रार्थनेनुसार नुकसान भरपाई द्यावी, असे तक्रारकर्त्याचे कथन आहे.
तक्रारकर्त्याच्या अशा कथनावरुन, विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी दाखल केलेले दस्तऐवज तपासले असता, असे निदर्शनास आले की, तक्रारकर्त्याने दिनांक 15/11/2013 रोजी सदर वाहन त्याच्या तिस-या सर्व्हिसींग करिता विरुध्द पक्ष क्र. 1 च्या सर्व्हिस सेंटरमध्ये नेले होते. दिनांक 15/11/2013 रोजीचे जॉब कार्ड, या दस्तावरुन असा बोध होतो की, विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी, तक्रारकर्त्याच्या ट्रॅक्टरबद्दल ज्या काही अडचणी होत्या त्या दूर करुन, त्याचा ताबा चांगल्या स्थितीत व तक्रारकर्त्याच्या अपेक्षेप्रमाणे काम करुन, तक्रारकर्ता पूर्ण समाधानी आहे या कथनावर तक्रारकर्त्याची सही त्या जॉब कार्डवर घेवून, वाहन तक्रारकर्त्यास परत दिले होते, असे दिसते. शिवाय इंजीनमध्ये ऑईल नसते तर तक्रारकर्त्याचे सदर वाहन त्याच्या गावापर्यंत पोहचू शकले नसते, असे मंचाचे मत आहे. तसेच तक्रारकर्त्याच्या कथनानुसार, सदर ट्रॅक्टर दिनांक 16/11/2013 रोजी बंद पडला, तेंव्हा तक्रारकर्त्याने पुन्हा ट्रॅक्टर विरुध्द पक्ष क्र. 1 च्याच सर्व्हिसींग सेंटरमध्ये दुरुस्ती करण्यास का आणला नाही ? याचा खुलासा, तक्रारकर्त्याने युक्तिवाद न केल्याने, मंचासमोर आलेला नाही. तसेच दिनांक 16/11/2013 रोजी सदर ट्रॅक्टर पुन्हा बंद पडल्यानंतर त्याबद्दलची लेखी तक्रार त्यांनी विरुध्द पक्ष क्र. 1 कडे का केली नाही, याचा उलगडा मंचाला झालेला नाही. विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी मंचात असे लेखी कथन केले आहे की, तक्रारकर्त्याचा ट्रॅक्टर वॉरंटीच्या नियमात बसत असेल तर, नियमाप्रमाणे ते आजही दुरुस्त करुन देण्यास तयार आहेत. परंतु तक्रारकर्त्याने सदर ट्रॅक्टर अधिकृत सर्व्हिस सेंटरमध्ये न घेऊन जाता, तो दुसरीकडून दुरुस्त करुन घेतला, हे सदर वाहनाच्या वॉरंटीच्या शर्ती, अटीमध्ये बसत नाही. त्यामुळे सदर प्रकरणात विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 ची कोणतीही सेवेतील न्युनता आढळत नाही. म्हणून तक्रारकर्त्याची नुकसान भरपाई मिळण्याची प्रार्थना मंजूर करता येणार नाही. अशा परिस्थितीत, अंतिम आदेश पारित केला तो येणेप्रमाणे.
अंतिम आदेश
- तक्रारकर्त्याची तक्रार खारिज करण्यांत येते.
- न्यायिक खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
- उभय पक्षांना या आदेशाच्या प्रती निशुल्क पुरवाव्या.
(श्रीमती जे.जी. खांडेभराड) (श्री. ए.सी.उकळकर) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्या. सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.
svGiri