निकालपत्र
(घोषितव्दारा - श्रीमती ए.जी.सातपुते, मा.अध्यक्षा )
अर्जदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे.
अर्जदार हे मौजे बोरगाव (ब) ता. कळंब जि. उस्मानाबाद येथील रहिवाशी असून ते शेतकरी आहेत. अर्जदार व त्यांचे बंधु जयचंद रणदिवे यांना मौजे बोरगाव (ब) येथे एकत्रित कुटुंबाची जमीन असून त्याचा गट नं. 132 व 143 असा आहे. अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र. 1 यांच्याकडुन सदचे बियाणे खरेदी केल्याने ते गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांचे ग्राहक आहेत. अर्जदाराची जमीन ही चांगल्या प्रतीची असुन, सदरील बियाणे पेरताना 4 से.मी.वर पेरले व पेरतेवेळी सदरील जमिनीचा ओलावा हा 10 से.मी वर होता. तसेच बियाणे पेरताना इतरही योग्य ती काळजी अर्जदाराने घेतली होती.
अर्जदाराने सन – 2011-2012 च्या खरीप हंगामासाठी गैरअर्जदार क्र.1 यांच्याकडुन दि. 11/06/2011 रोजी रितसर पावती घेऊन के.एस.एल. 411 या जातीच्या सोयाबीनच्या 18 बॅग बियाणाची खरेदी केली होती. त्यानंतर अर्जदाराने पेरणीच्या वेळेस सदरील खरेदी केलेल्या सोयाबीनच्या बॅगा कात्रीच्या सहाय्याने उलटया फाडुन सदरील बियाणे पेरणीस घेतले. त्यानंतर अर्जदार यांने त्यांचे स्वत:च्या व वडीलोपार्जित बंधुच्या मालकीचे मौजे बोरगाव (बु) ता. कळंब जि. उस्मानाबाद येथील जमीन गट नं. 132 व 143 मध्ये दि. 08/07/2011 रोजी पेरणी केली असता सदरील बियाणे उगवले नसल्याचे आढळुन आले. त्यानंतर तक्रारदारानी दि. 15/07/2011 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद यांचेकडे रितसर अर्ज देऊन कृषी विभागा मार्फत न उगवलेल्या बियाणांचा पंचनामा करणे संदर्भात अर्ज दिला. त्यानंतर दि. 20/07/2011 रोजी तालुका कृषी कार्यालय कळंब यांनी सदरील सोयाबीन प्लॉटमध्ये कुठल्याही प्रकारची त्रुटी आढळुन आल्या नाहीत. व सदरील सोयाबीनच्या बियाणांची उगवण झालेली नाही असा निष्कर्ष देऊन पंचनामा केला.
अर्जदाराने प्रत्येकी सोयाबीनच्या एका बॅगसाठी एक पोते खत असा वापर करुन सदरील 18 बॅगेसाठी 18 खताचे पोते वापरले. तसेच पेरणीच्या पुर्वी अर्जदार यांनी त्यांच्या शेतामध्ये एकरी पाच ट्रॉली शेणखत असा एकुण मिळून 90 ट्रॉली शेणखत वापरला. सदर शेणखत टाकण्यास अर्जदारास एका ट्रॉलीस रु. 15,000/- प्रमाणे एकुण रक्कम रु. 1,35,000/- खर्च आला. तसेच बियाणांचा रक्कम रु. 21,600/- व रासायनिक खतासाठी रक्कम रु. 20,000/- खर्च आला असुन असे एकुण सर्व मिळुन रक्कम रु. 1,76,600/- आला आहे.
गैरअर्जदार क्र. 2 यांनी प्रती सोयाबनीच्या बॅगचा उतारा हा 15 क्विंटल असा दिलेला आहे. तरी सदरील 18 बॅग सोयाबीनचे एकुण उत्पन्न हे 270 क्विंटल गृहीत धरुन प्रत्येकी क्विंटलचा सोयाबीनचा भाव रु. 2400/- असुन 270 क्विंटलचा भाव रक्कम रु. 6,53,400/- इतका होतो. सदरील सोयाबीनचे बियाणे न उगवल्यामुळे अर्जदाराचे एकुण रक्कम रु. 8,30,000/- इतके नुकसान झालेले आहे. अर्जदाराने त्याचे अर्ज पुष्ठयर्थ त्यांची शेतजमीन 7/12 उतारा, बियाणे तपासणी अहवाल, बियाणे खरेदी केलेली पावती यांच्या प्रती दाखल केलेल्या आहेत. अर्जदारास झालेल्या मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रासापोटी रु. 10,000/-, तक्रारीचा खर्च रु. 5,000/- गैरअर्जदार यांचेकडुन देण्यात यावा.
गैरअर्जदार क्र. 2 च्या म्हणण्यानुसार सदरचे बियाणे हे 2011-2012 दि. 20/07/2012 बियाणे अहवाल दिलेला आहे. तो बियाणे कायदयांर्तगत तपासण्यात आलेला नाही. व त्या कायदयाचा कोणताही नियम-CPS-1005/2011/Pra.Kra.2/1 A, Dated 19/03/2005 तसेच बियाणे तपासणी अहवाल हा कोणत्याही तज्ञांनी दिलेले दिसुन येत नाही. व सदरच्या बियाणे तपासणी अहवालावरील पंचनाम्याच्या वेळी गैरअर्जदाराना बोलावलेले नाही. तसेच सामनेवाला यांच्या म्हणण्यानुसार सदर बियाणे योग्य पध्दतीने व काळजीने अर्जदाराला पेरता आलेले नाही. त्यामुळे त्यात सामनेवाला यांचा काही दोष नाही. उगवण झाली नाही बियाणांची हे म्हणणे देखील अर्जदाराचे खोटे तथ्यावर आधारीत आहे. तसेच दि. 20/11/12 ची जी पावती दिली, त्या पावतीवरुन सन-2011-12 या काळात त्यांनी आपल्या शेतात इतक्या बॅगाचे बी उगवले व त्यासाठी योग्य अशी जमीन तयार करुन पेरा केला हे अर्जदाराचे म्हणणे देखील तथ्यशील वाटत नाही. तसेच गैरअर्जदार यांनी आपल्या बियाणाची चाचणी केली होती. ती वैज्ञानिक दृष्टीने उगवण क्षमता असलेली होती. म्हणून सदरच्या अर्जदाराने केवळ गैरअर्जदार यांना त्रास व्हावा या उद्देशाने केलेला दिसुन येतो. म्हणून अर्जदाराचा अर्ज फेटाळण्यात यावा. बियाणांची उगवण क्षमता ही भरपुर गोष्टींवर अवलंबून असते. पाणी, हवा, जमीनीची आर्द्रता, उगवण क्षमता, तापमान जमीनीतील ओलावा, खते, व प्रतिकारक अशी प्रतिबंधके यावर अवलंबून असते. बीज पेरण्या अगोदरच त्याची तयारी करावी लागते. म्हणून यात गैरअर्जदाराचा काहीही दोष नसुन अर्जदारच या सर्व बाबींवर अवलंबून असल्यामुळे सदरचा अर्ज फेटाळण्यात यावा.
मुद्दे उत्तरे
- अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय
- गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत त्रूटी केली आहे काय ? होय
- अर्जदार अनुतोष मिळण्यास पात्र आहे काय ? होय
- काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
मुद्दा क्र. 1 चे उत्तर होय असून अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक होतो त्याने गैरअर्जदाराकडुन बियाणे खरेदी केल्याची पावती जोडलेली असून ते शरद रणदिवे मुरुड असे असून त्यावर KSL 441 Soyabean 25 Kg, 18 नग घेतलेले आहेत त्याची एकुण रक्कम रु. 21,800/- इतकी होते. Sunflower – m 17 हे 2 किलो ग्रॅमची बॅग 1 नग रु. 720/- मध्ये घेतलेली आहे.
मुद्दा क्र. 2 चे उत्तर होय असून अर्जदाराने सदरचे बियाणे लावले असता त्यात पीक आलेले नाही. सदरची जमीन पाळी घातलेली आहे तेव्हा जे पीक पंचनाम्यासाठी बियाणे समिती अर्जदाराकडे आली होती. तेव्हा सदरचे बियाणाची उगवणी झालेली नव्हती. म्हणून अर्जदाराने सदराची तक्रार दिलेली आहे ती योग्य वाटते. तसेच अर्जदाराचे शेतीचे नुकसान गैरअर्जदारामुळे झालेले आहे. अर्जदार व गैरअर्जदार यांनी सदर बियाणांचा मुक्तता अहवाल दिलेला नाही. तसेच जो पंचनामा करण्यात आला त्यातही आजू बाजूच्या गट नंबरची माहिती दिलेली नाही. सदरचा पंचनामा झाला त्यावेळी अर्जदाराच्या शेतात गैरअर्जदारास बोलावले नव्हते. तसेच सदर शेतातील पाहणी तज्ञांद्वारे केली असता त्यांनी पाळी घातलेली आहे. शेतात पाणी दिलेले आहे असे दिलेले आहे. तसेच सदरच्या पंचनाम्यावर एकुण 3 सदस्यांच्या सहया आहेत. त्यामुळे अर्जदाराच्या पिकाचे नुकसान झाले हे निश्चीत होते. मात्र पीक किती आले असते याचे अर्जदारांनी आपल्या तक्रारीत सांगितलेले नाही. अर्जदाराचे पीक प्रथमावस्थेत गेलेले असल्यामुळे व हे पीक 3 हेक्टर मध्ये लावले होते याचा अंदाज येण्यासाठी जो सात बारा न्यायमंचात दाखल केलेला आहे, त्यातही 3 हेक्टर क्षेत्रात सोयाबीन लावलेले दिसुन येते. म्हणून हे न्यायमंच अर्जदाराचा अर्ज अंशत: मंजुर करत आहे. अर्जदाराने योग्य तो पुरावा पुर्णत: मंचात दाखल केलेला नाही. तसेच अर्जदाराने आपली केस पुर्णत: सिध्द केलेली नसल्यामुळे हे न्यायमंच केवळ अर्जदाराने गैरअर्जदाराकडुन घेतलेल्या बियाणे KSL सोयाबीन व Sunflower या दोन बियाणांची रक्कम रु. 21,000/- व रु. 720/- यावर खरेदीच्या तारखेपासुन 9 टक्के व्याज लागु राहील. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी वैयक्तीक अथवा संयुक्तीकरित्या दयावी. तसेच अर्जदारास मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु. 3,000/- व दाव्याचा खर्च रु. 2,000/- मंजुर करत आहोत.
सबब हे न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करत आहे.
आदेश
1) अर्जदाराची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येत आहे.
2) गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी वैयक्तीक अथवा संयुक्तीकरित्या अर्जदारास रक्कम रु.
21,000/- (अक्षरी एकेवीस हजार रुपये फक्त) व रु. 720/- (अक्षरी सातशे वीस रुपये
फक्त) यावर खरेदीच्या तारखेपासुन 9 टक्के व्याज आदेशाची प्रत प्राप्तीपासुन 30
दिवसाच्या आत देण्यात यावेत.
3) गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, आदेश क्र. 2 चे पालन मुदतीत
न केल्यास तक्रार दाखल तारखेपासुन त्यावर अतिरिक्त द.सा.द.शे. 12 टक्के व्याज
देण्यास जबाबदार राहतील.
4) गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी वैयक्तीक अथवा संयुक्तीकरित्या अर्जदारास मानसीक व
शारिरीक त्रासापोटी रु. 3,000/- (अक्षरी तीन हजार रुपये फक्त) व तक्रारीच्या
खर्चापोटी रु. 2,000/- आदेशाची प्रत प्राप्तीपासुन 30 दिवसाच्या आत देण्यात यावेत.