सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर
उपस्थिती - मा.सौ.सविता भोसले,अध्यक्षा
मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्य.
मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्या.
तक्रार अर्ज क्र. 8/2015.
तक्रार दाखल दि.05-01-2015.
तक्रार निकाली दि.29-10-2015.
श्री. राजेंद्र तुकाराम कदम,
रा. मु.पो.गिरवी,ता.फलटण,जि.सातारा. ... तक्रारदार.
विरुध्द
1. मा.प्रबंधक,
तिरुपती बालाजी मोबाईल्स,
छ.शाहु स्टेडिअम, गाळा नंबर 54, तळमजला,
भू विकास पेट्रोल पंपासमोर, सातारा 415 002.
2. मा.प्रबंधक,
सोनी ऑथोराईज्ड सर्व्हिसिंग सेंटर,
गीता एंटरप्रायजेस, अनंतराज अपार्टमेंट,
147/3, रविवार पेठ,सातारा.
3. मा.प्रबंधक,
सोनी इंडिया प्रा.लि.
ए-31, मोहन को-ऑप.इंडिस्ट्रीयल इस्टेट,
मथुरा रोड, नवी दिल्ली – 110 044. .... जाबदार.
तक्रारदारातर्फे –अँड.व्ही.पी.जगदाळे.
जाबदार क्र. 1 तर्फे – एकतर्फा.
जाबदार क्र.2 व 3 तर्फे – अँड.टी.व्ही.कदम.
अँड.एम.डी.पवार.
न्यायनिर्णय
(सदर न्यायनिर्णय मा.सौ.सविता भोसले, अध्यक्षा यानी पारित केला)
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 नुसार दाखल केला आहे. तक्रारअर्जातील थोडक्यात मजकूर पुढीलप्रमाणे-
तक्रारदार हे गिरवी, ता.फलटण, जि.सातारा येथील कायमस्वरुपी रहिवाशी आहेत. तर जाबदार क्र. 3 हे मोबाईल उत्पादनकर्ता आहेत. जाबदार क्र. 1 हे जाबदार क्र. 3 चे सातारा येथील अधिकृत विक्रेते आहेत तर जाबदार क्र. 2 हे जाबदार क्र.3 चे अधिकृत सर्व्हीसिंग सेंटर आहे. तक्रारदाराने जाबदार क्र. 1 यांचेकडून सोनी कंपनीचा एक्सपेरिया-सी मॉडेल (IMET NO.35895052422621) या मॉडेलचा मोबाईल दि. 10/1/2014 रोजी रक्कम रु.20,350/- (रुपये वीस हजार तीनशे पन्नास मात्र) ला खरेदी केला. प्रस्तुत खरेदीचे बील व वॉरंटी कार्ड जाबदाराने तक्रारदाराला दिलेली आहे. प्रस्तुत मोबाईलला जाबदार यांनी 1 वर्षाची वॉरंटी दिलेली आहे.
प्रस्तुत मोबाईल खरेदी केलेनंतर काही दिवसच तो व्यवस्थीत चालला मात्र काही दिवसानंतर प्रस्तुत मोबाईलचे टचपॅडला अडचणी येऊ लागल्या. म्हणजेच मोबाईलस्क्रीन व्यवस्थीतपणे चालत नव्हते, ते अधूनमधून दिसत नव्हते तसेच तक्रारदाराचा प्रस्तुत मोबाईल डयुअल सिम/ दोनसिमचा असलेने त्यातील एक सिमचे स्लॉट ऑपरेट होत नव्हते, म्हणजेच मेमरी कार्ड मोबाईलवर दिसत नव्हते. याबाबत तक्रारदाराने जाबदार यांचेशी संपर्क केलेवर जाबदार क्र. 1 ने तक्रारदाराला सांगितले की, जाबदार क्र. 2 या अधिकृत सर्व्हीसिंग सेंटरमध्ये मोबाईल दुरुस्त करुन घ्या. तक्रारदार त्याप्रमाणे जाबदार क्र. 2 कडे जाऊन मोबाईल दाखवला परंतू जाबदार क्र. 2 ने मोबाईल दुरुस्त करुन दिला नाही. तर प्रस्तुत मोबाईलला वॉटर डॅमेजमुळे बिघाड आलेने रक्कम रु.1,450/- खर्च होईल असे सांगितले. वॉरंटी कालावधी असतानाही मोबाईल दुरुस्त करुन दिला नाही त्यामुळे सेवेत त्रुटी केली आहे. म्हणून तक्रारदाराने जाबदार क्र. 1 ते 3 यांना वकीलामार्फत नोटीस पाठविली. प्रस्तुत नोटीस मिळूनही जाबदार यांनी तक्रारदाराचे मोबाईलमधील दुरुस्ती केली नाही अगर नोटीसला उत्तरही दिला नाही. त्यामुळे तक्रारदाराने जाबदाराने दिले सेवेतील त्रुटी काढून मिळावी व नुकसानभरपाईसाठी सदर तक्रार अर्ज मे मंचात दाखल केला आहे.
2. तक्रारदाराने प्रस्तुत कामी जाबदार क्र. 1 ते 3 यांनी तक्रारदाराला सेवात्रुटी दिली आहे असे घोषीत होऊन मिळावे, जाबदार क्र. 1 ते 3 यांचेकडून तक्रारदाराला वादातीत मोबाईलऐवजी नवीन व कार्यक्षम त्याच श्रेणीचा, दर्जाचा मोबाईल मिळावा, दरम्यानच्या नुकसानीबाबत रक्कम रु.50,000/-, जाबदार क्र. 1 ते 3 यांचेकडून मिळावेत, तक्रार अर्जाचा खर्च म्हणून रक्कम रु.20,000/- तसेच मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.30,000/- तक्रारदाराला जाबदारकडून मिळणेबाबत आदेश व्हावेत अशी विनंती याकामी तक्रारदाराने केली आहे.
3. तक्रारदाराने प्रस्तुत कामी नि. 2 कडे अँफीडेव्हीट, नि.5 चे कागदयादीसोबत नि. 5/1 ते नि. नि.5/6 कडे अनुक्रमे तक्रारदाराने जाबदाराला पाठवलेली नोटीस, नोटीसची पोहोचपावत्या, तिरुपती बालाजी मोबाईल्स कडून मोबाईल खरेदी केलेचे बील, सर्व्हीस जॉब शीटस्, नि.13 कडे तक्रार अर्जासोबत दाखल केलेले शपथपत्र हेच पुराव्याचे शपथपत्र समजणेत यावे म्हणून पुरसिस, नि. 18 कडे लेखी युक्तीवाद वगैरे कागदपत्रे तक्रारदाराने याकामी दाखल केली आहेत.
4. प्रस्तुत कामी जाबदार क्र. 1 हे नोटीस लागू होऊनही मे मंचात गैरहजर राहीलेने त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश नि. 1 वर पारीत झालेला आहे. जाबदार क्र.1 ने नि. 14 कडे त्यांचेविरुध्द झालेला एकतर्फा आदेश होणेसाठी अर्ज दाखल केला आहे. प्रस्तुत आदेश रद्द करणेचे अधिकार या मे मंचात नसलेने अर्ज नामंजूर करणेत आला आहे व नि.15 कडील त्यांचे म्हणणे दाखल करुन घेतलेले नाही. नि. 16 कडे जाबदार क्र. 3 ने म्हणणे, नि.18 चे कागदयादीसोबत नि. 18/1 व नि.18/2 कडे वॉरंटी कार्ड (झेरॉक्स), नि.18/2 कडे मोबाईल लिक्वीड इनग्रेशनमुळे बिघडलेचे फोटो (झेरॉक्स), नि.19 व 20 कडे जाबदाराचे पुराव्याचे शपथपत्र, नि. 21 कडे पुरावा संपलेची पुरसीस, नि.22,23 कडे जाबदाराचा लेखी युक्तीवाद वगैरे कागदपत्रे जाबदाराने याकामी दाखल केली आहेत. जाबदाराने त्यांचे म्हणणे/कैफियतमध्ये तक्रारदाराचे तक्रार अर्जातील सर्व कथन फेटाळलेले आहे
i तक्रारदाराचा तक्रार अर्ज व त्यातील कथन मान्य व कबूल नाही.
ii तक्रारदाराने जाबदारकडून Xperoa C, मॉडेल नं.सी 2305 हा मोबाईल योग्य ती माहीती घेऊन विकत घेतला आहे. जाबदार नं. 3 कंपनीच्या वस्तुंची विकत घेतलेपासून 1 वर्षापर्यंत वॉरंटी देताना सदर वस्तुंची जबाबदारी ही वॉरंटीच्या आधीन राहून असते, नियमबाहय नाही. जाबदाराने तक्रारदारांना दिले नियमांची प्रत म्हणण्यासोबत जोडली आहे.
iii तक्रारदाराने प्रस्तुत मोबाईल खरेदीपासून 8 महिने व्यवस्थीत वापरला व पहिल्यांदा दि.28/8/2014 रोजी टचपॅड, मेमरीकार्ड, स्लॉट व्यवस्थीत कार्यान्वीत न होणे, दुसरे सिमकार्ड कार्यान्वीत न होणे वगैरे तक्रारी घेवून आले. प्रस्तुत मोबाईलचे निरिक्षण केले असता, सदर मोबाईल हा लिक्वीड इनग्रेशनमुळे बिघडणेचे तक्रारदाराचे लक्षात आणून दिले. त्याचा पुरावा म्हणून फोटो दाखल केला आहे.
iv प्रस्तुत मोबाईल हा लिक्वीड इनग्रेशन ते बिघडला असलेने जाबदार क्र. 3 ने दिलेली स्टँडर्ड वॉरंटी लागू होत नव्हती त्याच कारणामुळे जाबदार क्र. 3 चा सर्व्हीस अधिका-यांनी सुरुवातीला कमीत कमी रक्कम रु.1,450/- खर्चाचे इस्टीमेट, सिमबोर्ड अँसे बदलणेसाठी दिली व तक्रारदाराने त्यास परवानगी दिली व तक्रारदारला बजावून सांगीतलेली लिक्वीड इनग्रेशनमुळे इतर पार्टस खराब झाले असतील तर खर्चाचे इस्टीमेट बदलण्याची शक्यता आहे व प्रस्तुत मोबाईल दुरुस्ती केली असता मोबाईलचा मेन बोर्ड म्हणजे “UPCB” जो सिम बोर्डशी जोडला गेला होता तोसुध्दा खराब झालेचे आढळलेने रक्कम रु.1,450/- हा खर्च बदलून रक्कम रु.6,530/- एवढा खर्च येणार होता ही बाब तक्रारदाराला सांगीतली असता तक्रारदाराने खर्चाची असतील तर खर्चाची रक्कम देणेस असमर्थता दाखवून व आडमुठेपणाने मोबाईल परत न घेता पूर्वीच्याच खर्चाचे रकमेवर मोबाईल दुरुस्त करुन द्यावा असा हट्ट धरला. तक्रारदाराने मोबाईल व्यवस्थीत व काळजीपूर्वक हाताळला नसलेने तो बिघडला आहे. यामध्ये जाबदाराचा कोणताही दोष नाही. जाबदाराने तक्रारदाराला कोणतीही सेवात्रुटी दिलेली नाही. त्यामुळे तक्रार अर्ज खर्चासह फेटाळणेत यावा असे म्हणणे जाबदाराने दाखल केले आहे.
5. वर नमूद तक्रारदार व जाबदार यांनी दाखल केले कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे मंचाने प्रस्तुत तक्रारअर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दयांचा विचार केला.
अ.क्र. मुद्दा उत्तर
1. तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक आहेत काय? होय.
2. जाबदार यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा पुरविली आहे काय? होय.
3. अंतिम आदेश काय? खालील नमूद
आदेशाप्रमाणे.
विवेचन-
6. वर नमूद मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत. कारण-तक्रारदाराने जाबदार क्र. 3 सोनी कंपनी मोबाईल उत्पादनकर्ता असलेली सोनी कंपनीचा एक्स्पेरिया-सी-मॉडेल (IMEI No.358095052422621) या मॉडेलचा मोबाईल दि.10/1/2014 रोजी रक्कम रु.20,350/- या किंमतीस विकत घेतला. प्रस्तुत बीलाची मूळ प्रत तक्रारदाराने याकामी नि. 5/4 कडे दाखल केली आहेत. तसेच जाबदारानेही प्रस्तुत तक्रारदाराने सदर मोबाईल जाबदारांकडून खरेदी केलेचे मान्य केलेले आहे. सबब तक्रारदार हे जाबदाराचे ग्राहक असून जाबदार हे सेवापुरवठादार आहेत हे स्पष्ट सिध्द होत आहे.
प्रस्तुत मोबाईलला जाबदारांनी एक वर्षाची वॉरंटी दिलेली होती. परंतू मोबाईल खरेदी केलेपासून कांही दिवस तो व्यवस्थीत चालला मात्र कांही दिवसांनंतर प्रस्तुत मोबाईलचे टचपॅडला अडचणी येऊ लागल्या, मोबाईल स्क्रीन व्यवस्थीत चालत नव्हते, ते अधूनमधून दिसत नव्हते, मोबाईल अचानक बंद व्हायचा, मेमरी कार्डचे स्लॉट व्यवस्थीत ऑपरेट होत नव्हते, डयुअल सिम मोबाईल असूनही दुसरे सिम ऑपरेट होत नव्हते. त्याबाबत तक्रारदाराने जाबदाराशी संपर्क केला असता जाबदार क्र. 1 ने जाबदार क्र. 2 या अधिकृत सर्व्हीसींग सेंटरमध्ये जाणेस सांगितलेवरुन तक्रारदार समक्ष जाबदार क्र.2 कडे सर्व्हीसींग सेंटरमध्ये जाऊन भेटले त्यावेळी दि.25/8/2014 रोजी जाबदार क्र. 2 ने तक्रारदारकडून प्रस्तुत मोबाईल जमा करुन घेतला व त्याचे जॉबशिट तकारदार यांना दिले व दोन दिवसांनी या मोबाईल चेक करुन सांगतो असे सांगितले. त्याप्रमाणे तक्रारदार हे जाबदार क्र. 2 यांना दिनांक 30/8/2014 रोजी भेटले असता वॉटर डॅमेज असल्यामुळे रक्कम रु.1,450/- खर्च येईल व दोन दिवसात मोबाईल दुरुस्त होऊन मिळेल असे सांगितले. तक्रारदाराने प्रस्तुत रक्कम रु.1,450/- जाबदाराकडे जमा केली. त्यानंतर जाबदार क्र. 2 ने दि.30/8/2014 रोजी नवीन जॉबशीट तक्रारदाराला दिले. परंतू त्यानंतर तक्रारदाराला वारंवार भेट घेऊनही त्यांचा मोबाईल दुरुस्त करुन दिलेला नाही. प्रस्तुत मोबाईल हा वॉरंटी पिरिएडमध्ये बिघडलेला असल्याने जाबदाराने तो दुरुस्त करुन देणेची जबाबदारी जाबदार यांचेवर होती व दुरुस्त करुन देणे जाबदारांवर बंधनकारक असतानाही जाबदाराने वारंवार हेलपाटे मारुनसुध्दा तक्रारदाराला मोबाईल दुरुस्त करुन दिला नाही, टाळाटाळ केली, त्यानंतर तक्रारदार दि. 9/10/2014 रोजी प्रस्तुत जाबदार क्र. 2 कडे मोबाईल दुरुस्त झाला आहे का पहाणेसाठी गेले असता जाबदाराने तक्रारदाराला सदर मोबाईल दुरुस्त करणेस जास्त खर्च येणार आहे. त्यामुळे रक्कम रु. 10,000/- जमा केले तरच मोबाईल दुरुस्त करणेत येईल असे तक्रारदाराला जाबदार क्र. 2 यांनी सांगीतले. त्यामुळे तक्रारदाराला मोठा धक्का बसला. वॉरंटी कालावधीत मोबाईल विनामोबदला दुरुस्त करुन देणे जाबदारावर बंधनकारक असतानाही जाबदाराने एवढया मोठया रकमेची मोबाईल दुरुस्तीसाठी वॉरंटी कालावधीत तक्रारदाराकडे मोठया रकमेची मागणी करणे ही सेवात्रुटीच आहे. तसेच मोबाईल विनामूल्य दुरुस्त करुन न देणे ही सुध्दा सेवेतील त्रुटी आहे. तक्रारदाराने जाबदार यांना दि. 18/10/2014 रोजी वकीलांमार्फत नोटीस पाठवली. प्रस्तुत नोटीस जाबदार यांना मिळूनही जाबदाराने नोटीसला उत्तर दिले नाही व तक्रारदाराचा मोबाईलही दुरुस्त करुन दिलेला नाही. म्हणजेच जाबदाराने तक्रारदार यांना सदोष सेवा पुरविली आहे हे स्पष्ट होते. जाबदाराने कथन केलेप्रमाणे तक्रारदाराचे मोबाईल मध्ये लिक्वीड इनग्रेशनमुळे बिघडलेचे सिध केलेले नाही किंवा त्याबाबत कोणताही पुरावा मे मंचात दाखल केलेला नाही. जाबदाराने दाखल केले मोबाईलच्या फोटोच्या झेरॉक्स प्रतीवरुन सदर मोबाईलमध्ये लिक्वीड इनग्रेशनमुळे बिघाड झाला होता हे सिध्द होत नाही. त्यामुळे जाबदाराने तक्रारदाराला मोबाईल वॉरंटी कालावधीत बिघडलेला असलेने तो विनामूल्य तक्रारदाराला दुरुस्त करुन देणे जाबदार यांचेवर बंधनकारक असतानाही जाबदाराने सदर मोबाईल विनामूल्य दुरुस्त करुन दिलेला नाही. तो जाबदारांचे ताब्यातच आहे. ही सेवात्रुटीच आहे. सबब मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
वरील सर्व कारणमिमांसा, कागदपत्रे, लेखी व तोंडी युक्तीवाद वगैरे सर्व बाबींचा साकल्याने विचार करुन, प्रस्तुत तक्रारदाराचा मोबाईल वॉरंटी कालावधीत नादुरुस्त झाला तो जाबदाराने विनामूल्य दुरुस्त करुन देणे जाबदारांवर बंधनकारक असतानाही तो दुरस्त करुन दिला नसलेने जाबदाराने तक्रारदाराला सेवा देण्यात कमतरता/त्रुटी केली आहे हे स्पष्ट होते. सबब सदर जाबदाराने तक्रारदार यांना प्रस्तुत जुन्या मोबाईल ऐवजी त्याच मॉडेलचा त्याच कंपनीचा, व त्याच किंमतीचा नवीन मोबाईल बदलून देणे न्यायोचीत होणार आहे असे आमचे स्पष्ट मत आहे. जाबदाराने त्यांचे म्हणण्यातील आक्षेपांच्या सिध्दतेसाठी कोणतेही पुरावे दाखल केलेले नाहीत. जाबदाराने लेखी युक्तीवादास नमूद केलेले न्यायनिवाडे येथे लागू होत नाहीत. सबब तक्रारदार हे जाबदार यांचेकडून प्रस्तुत जुन्या मोबाईलऐवजी त्याच मॉडेलचा, त्याच किंमतीचा नवीन मोबाईल मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
8. सबब प्रस्तुत कामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2. तक्रारदार यांना जाबदार क्र. 1 ते 3 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकपणे तक्रारदाराला
सोनी कंपनीचे एक्सपेरिया-सी-मॉडेल चा नवीन मोबाईल हॅण्डसेट अदा करावा.
तक्रारदाराचा जुना मोबाईल हॅण्डसेट जाबदाराचे ताब्यातच आहे त्यामुळे तो जाबदाराने
जाबदार क्र. 3 कंपनीकडे जमा करावा.
3. तक्रारदार यांना जाबदार क्र. 1 ते 3 यांनी मानसिकत्रास व तक्रारअर्जाचा खर्च म्हणून
रक्कम रु.5,000/- (रुपये पाच हजार मात्र ) अदा करावेत.
4. वरील सर्व आदेशांची पूर्तता/पालन जाबदार यांनी आदेश पारीत तारखेपासून 45
दिवसात करावी.
5. विहीत मुदतीत आदेशाचे पालन जाबदार क्र. 1 ते 3 यांनी न केल्यास
तक्रारदार यांना ग्राहक संरक्षण कायदा कलम 25 व 27 नुसार जाबदारांविरुध्द
कारवाई करणेची मुभा राहील.
6. सदर न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य पाठवणेत याव्यात.
7. सदर न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
ठिकाण- सातारा.
दि. 27-10-2015.
(सौ.सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा