जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच बीड यांचे समोर.
तक्रार क्रमांक –174/2012 तक्रार दाखल तारीख – 18/10/2012
तक्रार निकाल तारीख– 17/04/2013
मीठू भानुदास मस्के
रा.मु.पो.कामखेडा ता.जि.बीड. ..अर्जदार
विरुध्द
तिरुमला ट्रेडींग कंपनी
शुध्द सरकी पेंडीचे विक्रेते ...गैरअर्जदार
श्री.छत्रपती राजर्षी शाहु बँक,
मोंढा शाखेच्या बाजुला, जुना मोंढा,
बीड.ता.जि.बीड.
-----------------------------------------------------------------------------------
समक्ष - श्रीमती निलीमा संत, अध्यक्ष
श्रीमती माधुरी विश्वरुपे, सदस्य.
-----------------------------------------------------------------------------------
तक्रारदारातर्फे - स्वतः
गैरअर्जदारा तर्फे – अँड.आर.बी.धांडे
------------------------------------------------------------------------------------
निकालपत्र
(घोषित द्वारा ः-श्रीमती माधुरी विश्वरुपे, सदस्य)
तक्रारदारांनी गैरअर्जदार यांचेकडून ता.06.08.2012 रोजी 60 किलोग्रॅम पेंडीचे पोते खरेदी केले. गैरअर्जदार यांनी दुकानात पेंडीचा नमूना दाखवला तो शुध्द व चांगल्या दर्जाचा होता. तक्रारदारांनी पोते खरेदी केले तेव्हा त्यांचे तोंड मशीनने शिलाई केले होते. तक्रारदारांनी पेंडीच्या पोत्याची किंमत रु.1140/- गैरअर्जदार यांना दिली व याबाबतची रितसर पावती घेतली.
तक्रारदारांनी घरी गेल्यानंतर पेंडीचे पोते उघडून पाहिले असता पेंड कडक व काळया रंगाची असून पेंडीमध्ये आळया व किडे दिसून आले. अशा प्रकारे गैरअर्जदार यांनी कमी प्रतीच्या दर्जाची पेंड विक्री केली अशी तक्रारदारांची तक्रार आहे.
सदर प्रकरणात गैरअर्जदार हजर झाले असून लेखी म्हणणे दि.21.03.2013 रोजी दाखल केले आहे. गैरअर्जदार यांच्या लेखी म्हणण्यानुसार तक्रारदारांनी पेंडीचे पोते परत दिल्यास रु.1140/- देण्यास गैरअर्जदार त्यावेळेसही तयार होते व आजही तयार आहेत. गैरअर्जदार यांनी सदर पेंड स्वतः तयार केली नाही. तक्रारदारांनी पेंडीचे उत्पादकांना सदर प्रकरणात पार्टी केले नाही.
तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्रे, गैरअर्जदार यांचा लेखी जबाब, याचे सुक्ष्म निरीक्षण केले. तसेच तक्रारदारांचा स्वतःचा युक्तीवाद तसेच गैरअर्जदार यांचे विद्वान वकील श्री.आर.बी.धांडे यांचा युक्तीवाद ऐकला.
तक्रारदारांनी गैरअर्जदार यांचेकडून ता.06.08.2012 रोजी रक्कम रु.1140/- एवढया किंमतीचे गायछाप पेंडीचे पोते विकत घेतल्याचे पावती वरुन दिसून येते.
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार सदरची पेंड कमी प्रतीची टणक, काळया रंगाची असून त्यात किडे व आळया असल्याचे दिसून आल्यामुळे गैरअर्जदार यांना सदर पेंडीचे पोते परत करुन किंमत रु.1140/- देण्यास सांगितले परंतु गैरअर्जदार यांनी हे पैसे परत देण्याचे नाकारले. गैरअर्जदार यांनी सदर पेंडीचे पोते सिल केलेले दिल्यामुळे पेंड कमी दर्जाची असल्याचे घरी गेल्यानंतर उघडून पाहिल्यावर लक्षात आले. गैरअर्जदार हेच सदर पेंडीचे उत्पादक आहेत. कारण सदरील पेंडीच्या पोत्यावर दुकानाचे नांव छापले आहे. तसेच पेंडीच्या पोत्यामध्ये दुकानाच्या नांवाचा ब्रँन्ड दर्शविणारी एक चिठठी आहे. अशा प्रकारे गैरअर्जदार यांनी चांगल्या दर्जाची पेंड दाखवून कमी प्रतीच्या पेंडची विक्री केल्याबाबत तक्रारदारांची तक्रार आहे.
तक्रारदारांनी या संदर्भात गैरअर्जदार यांना ता.13.08.2012 रोजी वकिलामार्फत नोटीस पाठवली असून गैरअर्जदार यांनी ता.01.09.2012 रोजी सदर नोटीशीचे उत्तर दिले आहे.
गैरअर्जदार यांच्या म्हणण्यानुसार सदर पेंडीचे उत्पादन त्यांनी केलेले नाही. तक्रारदारांनी उत्पादक कंपनीला पार्टी केले नाही. गैरअर्जदार यांचे विद्वान वकील श्री.धांडे यांनी युक्तीवादात नमूद केल्याप्रमाणे आजही रु.1140/- तक्रारदारांना देण्यास तयार आहेत. गैरअर्जदार यांनी ता.01.09.2012 रोजी तक्रारदारांच्या नोटीशीचे उत्तरामध्ये नमूद केल्याप्रमाणे तक्रारदारांनी पेंडीचे पोते (Sealed) बंद स्थितीत परत केल्यास रु.1140/- परत देण्यास तयार आहेत असे दिसून येते.
तक्रारीतील कागदपत्रावरुन सदर पेंडीचे गैरअर्जदार हे विक्रेते आहेत. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार गैरअर्जदार हेच सदर पेंडीचे उत्पादक आहेत. परंतु या बाबतचा कोणताही पुरावा न्यायमंचासमोर नाही. त्यामुळे तक्रारदारांचे सदरचे म्हणणे ग्राहय धरता येत नाही असे न्यायमंचाचे मत आहे.
तक्रारदारांनी विकत घेतलेल्या पेंडीच्या पावतीवर सदर पेंड गाय छाप कंपनीची असल्याचे नमूद केले आहे. तक्रारदारांनी सदर पेंड कमी दर्जाची दिल्याबाबत गैरअर्जदार यांना तात्काळ माहीती दिली आहे. त्याप्रमाणे गैरअर्जदार यांनी तक्रारदारांना सदर पेंडीचे उत्पादका बाबत माहीती देवून सदोष पेंड उत्पादक कंपनीकडे पाठवणे आवश्यक होते.परंतु गैरअर्जदार यांनी तक्रारदारांना उत्पादक कंपनीबाबत कोणतीही माहीती दिली नाही. अशा परिस्थितीत गैरअर्जदार यांनी तक्रारदारांना दयावयाच्या सेवेत कसूरी केल्याचे स्पष्ट होते असे मंचाचे मत आहे. गैरअर्जदार यांनी तक्रारदारांना उत्पादक कंपनीबाबत माहीती न दिल्यामुळे कंपनीला तक्रारीत समाविष्ट करता आले नाही हे तक्रारीत आलेल्या पुराव्यावरुन स्पष्ट होते. गैरअर्जदार, तक्रारदारांना पेंडीची किंमत रु.1140/- परत देण्यास तयार आहेत. त्यामुळे तक्रारदारांची तक्रार आवश्यक (Necessary party ) पार्टी बाबतच्या तांत्रिक कारणावरुन फेटाळणे उचित होणार नाही असे न्यायमंचाचे मत आहे.
तक्रारदारांना सदोष पेंडीची रक्कम न मिळाल्यामुळे निश्चितच मानसिक त्रास झाला तसेच सदरची तक्रार दाखल करावी लागली. त्यामुळे गैरअर्जदार यांनी तक्रारदारांना तक्रारीचा खर्च रु.500/- देणे उचित होईल असे न्यामंचाचे मत आहे.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. गैरअर्जदार यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना पेंडच्या पोत्याची किंमत रु.1140/- (अक्षरी अकराशे चाळीस फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रु.500/- (अक्षरी पाचशे फक्त) आदेश मिळाल्यापासून 30 दिवसांचे आंत दयावेत.
2. वरील आदेश क्र.1 मधील रक्कमा विहीत मुदतीत अदा न केल्यास
9 टक्के व्याजदरासहीत द्याव्यात.
. 3. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
श्रीमती माधूरी विश्वरुपे, श्रीमती नीलिमा संत,
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड