( आदेश पारित द्वारा : श्री. विजयसिंह ना. राणे, अध्यक्ष )
आ दे श
( पारित दिनांक : 9 डिसेंबर 2011 )
यातील तक्रारदार श्री विपुल शर्मा यांची गैरअर्जदाराविरुध्द थोडक्यात तक्रार अशी आहे की, गैरअर्जदार ही व्यवस्थापन क्षेत्रातील अभ्यासक्रम शिकविणारी शैक्षणीक संस्था आहे व 2008-2009 या सत्राकरिता एम बी ए च्या प्रथम वर्षाकरिता इच्छुक विद्यार्थ्यांना जाहिरातीच्या माध्यमातुन आमंत्रीत केले. तक्रारदाराने जाहिरातीचे अनुषंगाने एम बी ए करावयाचे असल्याने प्रथम वर्षाच्या प्रवेशाबाबत चौकशी केली असता, सदर अभ्यासक्रम टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे यांच्या मान्यतेवरुन शिकवित असल्याचे गैरअर्जदारांनी सांगीतले. तक्रारदाराने अभ्यासक्रम पुस्तिकेची मागणी केली असता प्रवेश अर्ज निश्चीत केल्यानंतर अभ्यासक्रम पुस्तिका देण्यात येईल असे सांगीतले. गैरअर्जदारावर विश्वास ठेवुन तकारदाराने प्रवेश अर्जाचे रुपये 5000/- रोख जमा केले. गैरअर्जदाराने त्याची पावती दिली व पुढे एम बी ए कोर्स पुर्ण करण्यासाठी एकुण फी रुपये 1,10,000/- आहे. त्यामधे प्रवेश अर्जाचे रुपये 5000/- समाविष्ट असल्याचे सांगीतले. सदर रक्कम दोन टप्प्यामधे भरावी लागेल. प्रथम किस्त रुपये 56,000/-व डिसेबर मधे दुसरी किस्त रुपये 49,000/- भरावे लागतील असे गैरअर्जदाराने सांगीतले म्हणुन तक्रारदाराने रुपये 56,000/- जमा केले व त्याबद्दल संस्थेने दिनांक 23/7/2008 रोजी दोन पावत्या दिल्या पहिली पावती रुपये 25,000/- व दुसरी पावती रुपये 31,000/-रक्कमेची दिली.
गैरअर्जदाराने फी प्राप्त झाल्यावर नियमित अभ्यासक्रम पूर्ण करण्याकरिता शिकवणी वर्ग घेण्यास सुरुवात केली परंतु अभ्यासक्रम पुस्तिकेची मागणी करुनसुध्दा ती पुरविली नाही. पुढे गैरअर्जदाराने दुसरी किस्त जी डिसेंबर मधे भरावयाची होती ती प्रवेश घेतानांच मागणी केली व तक्रारदाराव दडपण आणले म्हणुन दुसरी किस्त रुपये 49,000/-, दिनांक 23/10/2008 रोजी भरली त्याची पावती तक्रारदारास देण्यात आली. सदर पावतीवर कॉम्पुटींग अॅण्ड टी फॅसिलीटीज फी असे नमूद करण्यात आले आहे.
पुढे परिक्षेचा फार्म भरतांना तक्रारदाराचे असे लक्षात आले की, गैरअर्जदार संस्था शिकवीत असलेला कोर्स हा नियमित एम बी ए कोर्स नसुन डिस्टंन्स कोर्स आहे. गैरअर्जदार संस्थेला याबाबत विचारण केली असता सदरचा कोर्स हा नियमित एम बी ए कोर्स असल्याचे पटवुन देण्याचा प्रयत्न केला. परंतू सत्यपरिस्थिती जाणुन घेण्याचा प्रयत्न केला असता गैरअर्जदार संस्थेने तो डिस्टंन्ट लर्निंग एम बी ए कोर्स असल्याचे कबुल केले व इच्छुक विद्यार्थी प्रवेश रद्द करु शकतील व गैरअर्जदार संपूर्ण रक्कम रुपये 1,10,000/- परत करेन असे अभिवचन दिले. सदर अभिवचनावर विश्वास ठेवून तक्रारदाराने दिनांक 3.12.2008 रोजी अर्जाद्वारे प्रवेश रद्द करुन जमा केलेली फि रुपये 1,10,000/- परत मिळण्याबाबत विनंती केली. गैरअर्जदाराने सदर अर्ज मिळाल्यावर तोडी प्रवेश रद्द झाल्याचे सांगीतले परंतू फि ची रक्कम परत केली नाही म्हणुन तक्रारदाराने ही तक्रार दाखल करुन एम बी ए करिता भरलेली फी रुपये 1,10,000/- द.सा.द.शे. 18 टक्के व्याजासह परत करावी. आर्थिक व शारिरिक, मानसिक नुकसानी पोटी रुपये 1,00,000/-, न्यायालयीन खर्चापोटी रुपये 10,000/- मिळावे अशी मागणी केली.
सदर प्रकरणात गैरअर्जदार यांना नोंदणीकृत डाकेद्वारे नोटीस पाठविण्यात आली. नोटीस प्राप्त होऊन गैरअर्जदार हजर झाले व त्यांनी आपला लेखी जवाब दाखल केला.
गैरअर्जदाराने आपला लेखी जवाबात तक्रारदाराची सर्व विपरित विधाने नाकबुल केली आणि असा आक्षेप घेतला की, मा.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शैक्षणीक सस्थेमध्ये किंवा संलग्न असणा-या शिक्षण संस्थेमध्ये असलेल्या स्कीम मध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी हे ग्राहक या व्याख्येत येत नाही. म्हणुन सदरची तक्रार या मंचासमोर चालण्यास पात्र नाही म्हणुन खारीज करावी अशी विनंती केली.
गैरअर्जदार पुढे असे नमुद करतात की, गैरअर्जदाराची संस्था ही टीळक महाराष्ट्र विद्यापिठ पूणे यांचेशी संलग्न असल्याने गैरअर्जदाराने हा कोर्स सुरु केला. डिस्टंन्स एज्युकेशन हा कोर्स टीळक महाराष्ट्र विद्यापिठ पूणे यांनी दोघांमध्ये झालेल्या मेमोरॅडम आफ अंडरस्टँडींग या करारानुसार अधिकार दिलेला आहे. व तक्रारदाराने टीळक महाराष्ट्र विद्यापिठ पूणे यांना पक्षकार न केल्यामुळे सदर तक्रार खारीज करावी असा उजर घेतला. तक्रारदाराने जाहिरात व माहितीपत्रक वाचुन व अटी समजुन कार्स करिता आवेदन पत्र भरलेले आहे. त्यामुळे सदचा कोर्स हा डिस्टंस कोर्स आहे हे तक्रारदारास आवेदन करतेवेळीच माहित होते. प्रवेश अर्जामध्ये सर्व अटी व शर्ती स्पष्टपणे दिलेल्या होत्या ती सर्व माहिती वाचुन समजुन तक्रारदाराने आवेदन व फी भरलेली आहे व त्याप्रमाणे तक्रारदारास रसिद देण्यात आल्या आहेत. माहिती पुस्तीकेमध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे की हा कार्स/ अभ्याक्रम हा प्रोग्राम इन डीस्टन्स एज्युकेशन आहे. तक्रारदाराने कोर्सकरिता प्रवेश घेतला व वर्षेभर अभ्यासक्रमाचे फायदे घेवुन तक्रारदारास जर परिक्षा द्यायची नसेल तर त्यास गैरअर्जदार जबाबदार नाहीत व त्याकरिता गैरअर्जदार तक्रारदारास फी परत करुन आपले नुकसान करुन घेवु शकत नाही. तक्रारदाराने एक जागा वर्षेभर पकडुन ठेवल्याने इतर गरजु विद्यार्थ्याना ज्यांना खरोखर हा अभ्यासक्रमात प्रवेश घ्यावयाचा होता त्यांचे अर्जदारामुळे नुकसान झाले आहे. तक्रारदारास अभ्यासक्रम पुर्ण करुनही परिक्षा द्यावयाची नाही. त्याकरिता गैरअर्जदार जबाबदार नाही. गैरअर्जदाराने आपले सेवेत कुठलीही कमतरता ठेवलेली नाही म्हणुन सदर तक्रार खारीज करण्यात यावी. अशी विनंती केली.
तक्रारदाराने आपली तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली असुन, दस्तऐवज यादीनुसार 4 कागदपत्रे दाखल केलीत. गैरअर्जदार यांनी आपला लेखी जवाब शपथपत्रावर दाखल केला व दस्तऐवज यादीनुसार 9 दस्तऐवज दाखल केले. तक्रारदाराने प्रतिउत्तर दाखल केले.
#####- का र ण मि मां सा -#####
गैरअर्जदारांचा प्राथमिक आक्षेप हा त्यांचा व्यवसाय व याप्रकरणातील वस्तुस्थीती पाहता निरर्थक आहे. यातील गैरअर्जदाराने तक्रारदारांना माहिती पुस्तीका दिली नव्हती असे तक्रारदाराचे निवेदन आहे आणि वस्तुतः तक्रारदाराने स्वतःची माहिती पुस्तीका तक्रारीत दाखल केलेली आहे. जी मध्ये एम बी ए अभ्यासक्रम दुरशिक्षण पध्दतीचा आहे असे स्पष्टपणे दिसुन येत नाही. वरील माहिती पत्रकाचे अवलोकन केले असता असे दिसते की, गैरअर्जदार त्यातुन स्वतः एम बी ए चे शिक्षण देत आहे, स्वतः हा अभ्यासक्रम राबवित आहे असा भास होतो. वास्तविक परिस्थिती वेगळी असुन गैरअर्जदारांनी आपल्या जाहिरातीत व माहितीपत्रकात हा अभ्यासक्रम दुर शिक्षण पध्दतीचा आहे असे ठळकपणे दर्शविणे गरजेचे होते व ते गैरअर्जदाराचे कर्तव्य होते कारण त्यावर टिळक विद्यापीठाचे माहितीपत्रकांत हा दुरशिक्षण पध्दतीचा अभ्यासक्रम आहे याची ठळक नोंद आहे. तक्रारदारास दिलेल्या पावतीमधे यासंबंधी उल्लेख नाही. वास्तविक गैरअर्जदाराने जी जाहिरात दिलेली होती त्या जाहिरातीचे काळजीपुर्वक अवलोकन केले असता त्यावरुन सुध्दा सदरचा अभ्यासक्रम जणुकाही गैरअर्जदार राबवीत आहे असे ठळकपणे नजरेस येते. मात्र त्यात बारीक अक्षरात संबंधीत विद्यापीठाची माहिती दिलेली आहे. त्यात केवळ Faculty of Distance Education असे बारीक अक्षरात नमुद केले आहे. जेव्हा की गैरअर्जदाराने या जाहिरातीत अगदी ठळकपणे दुरशिक्षण पध्दतीचा कार्यक्रम आहे हे नमुद करणे गरजेचे होते.
यातील टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे जे माहितीपत्रक आहे त्यामध्ये एम बी ए च्या पहिल्या वर्षाकरिता जे शुल्क नमुद करण्यात आलेले आहे ते एकुण रुपये 25,000/- एवढे आहे. जेव्हा की तक्रारदाराजवळुन गैरअर्जदाराने 1,10,000/- एवढे शुल्क आहे असे सांगीतले आणि ते वसुल केले. यामध्ये टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे आणि गैरअर्जदार यांचेमधे झालेल्या उभयपक्ष करारामध्ये परिच्छेद 9 मध्ये स्पष्टपणे तरतुद आहे की, केवळ विद्यापीठाने ठरवुन दिलेले शुल्कच गैरअर्जदारास घेता येणे शक्य होते त्या तरतुदीत “ The party of the second part shall not charge any additional fees beyond the prescribed fees of University ” असे स्पष्टपणे नमुद केलेले आहे व त्यापेक्षा जास्त शुल्क घेणे हे उघडपणे गैरअर्जदार व संबंधीत विद्यापीठात झालेल्या कराराचे उल्लघन आहे. त्यावरुनच गैरअर्जदार यांचा या प्रकारे तक्रारदाराकडुन आपलाच अभ्यासक्रम आहे असा भास निर्माण करुन तक्रारदारास चुकीची माहिती देऊन जास्तीचे पैसे उकळण्याचा स्पष्ट हेतु दिसतो आणि हा अत्यंत अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब आहे व सेवेतील त्रुटी आहे यास्तव आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहोत.
-// अं ति म आ दे श //-
1. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. गैरअर्जदाराने रुपये 1,10,000/- वजा 25,000/- = 85,000/-रुपये तक्रारदारास परत करावी. त्यावर गैरअर्जदारांना रक्कम प्राप्त झाल्यापासुन द.सा.द.शे. 12टक्के व्याजासह येणारी रक्कम , रक्कमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो परत करावी.
3. गैरअर्जदाराने तक्रारदारास मानसिक , शारिरिक, व आर्थिक त्रासापोटी रुपये 25,000/- (केवळ पंचवीस हजार रुपये) आणि तक्रारीचा खर्च म्हणुन रुपये 2,000/- (केवळ दोन हजार रुपये) असे एकुण 27,000/-रुपये द्यावे.
वरील आदेशाचे पालन गैरअर्जदार यांनी आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासुन 30 दिवसांचे आत करावे न पेक्षा 12 टक्के ऐवजी 15 टक्के व्याज देय ठरतील.