(आदेश पारीत व्दारा - श्री नितीन मा. घरडे, मा.सदस्य)
(पारीत दिनांक : 20 जानेवारी 2017)
1. तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केली असून तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालील प्रमाणे.
2. तक्रारकर्ता हा शेतकरी असून आधुनिक शेती करण्याचे उद्देशाने तक्रारकर्त्याने ट्रॅक्टर खरेदी करण्याची इच्छा विरुध्दपक्ष क्र.4 यांचेकडे व्यक्त केली. त्याअनुषंगाने विरुध्दपक्ष क्र.2 महिंद्रा अॅण्ड महिंद्रा ट्रॅक्टर कंपनी, हिंगणा रोड यांचेकडे ट्रॅक्टर विकत घेण्याकरीता गेले होते. विरुध्दपक्ष क्र.3 ही ट्रॅक्टर खरेदीकरीता फायनान्स करणारी कंपनी नामे महिंद्रा अॅण्ड महिंद्रा फायनांशियल सर्वीस कंपनी लिमिटेड असून विरुध्दपक्ष क्र.4 हा विरुध्दपक्ष क्र.1 ते 3 चा एजंट आहे. तक्रारकर्ता यांनी सन 2009 मध्ये विरुध्दपक्ष क्र.1 कडून महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीचे ट्रॅक्टर खरेदी केले. त्याचा रजिस्ट्रेशन क्रमांक एमएच-40 -एल - 2499 असून विरुध्दपक्ष क्र.3 कडून फायनान्स करण्याचा करार केला. तक्रारकर्त्याने तानाजी इस्तारी भुजाडे यांची शेती विरुध्दपक्ष क्र.3 कडे गहाण केली व स्वतःचे नावे असलेली शेती सुध्दा विरुध्दपक्ष क्र.3 कडे गहाण ठेवून फायनान्सवर ट्रॅक्टर खरेदी केले. त्याचे मासीक हप्ते सुध्दा विरुध्दपक्ष क्र.3 कडे निममीतपणे भरणे चालु केले. विरुध्दपक्ष क्र.1 कडे ट्रॅक्टर उपलब्ध नसल्या कारणास्तव 8 ते 10 दिवसानंतर ट्रॅक्टर देण्याचे सांगितले. विरुध्दपक्ष क्र.2 कंपनीचा डिलर असून त्याचेकडून ट्रॅक्टर मागविण्यात आले. सदरचा ट्रॅक्टर 11/2000 मध्ये उत्पादीत करण्यात आला होता, ट्रॅक्टरला 4 सिलेंडर, चेसीस नं.एनएपीयु 870, इंजिन नं.एनएपीयु 870, फ्युल- डिझेल, हॉर्सपॉवर बीएचपी 42 एच.पी., मेकर्स क्लासीफीकेशन एमएएच 445 डी, सिटींग कॅपॅसिटी 1 ड्रायव्हरसह, ज्याचे वजन 2021 कि.ग्रॅ. असून रंग लाल होता. सदरच्या स्वरुपाचा ट्रॅक्टर विरुध्दपक्ष क्र.1 ने तक्रारकर्त्याला दिनांक 7.10.2009 रोजी दिला. परंतु, तक्रारकर्त्याच्या लक्षात आले की, सदरचा ट्रॅक्टर हा 2000 सालचा उत्पादीत असून विरुध्दपक्ष क्र.1 ते 4 यांनी 2009 मध्ये हा ट्रॅक्टर सोपविला व तक्रारकर्त्याची फसवणूक केली. जेंव्हा तक्रारकर्ता दिनांक 10.6.2012 रोजी उन्नती मोटर्स प्रा.लि., नागपूर येथे दुरुस्तीकरीता घेवून गेले असता संपूर्ण कागदपञाची पडताळणी केल्यावर त्याने सांगितले की, सदरचा ट्रॅक्टर हा 2000 मध्ये तयार झाला असून तो मला 2009 मध्ये देण्यात आला व तक्रारकर्त्याची झालेली फसवणूक ही पक्की झाली. तक्रारकर्ता पुढे असे नमूद करतो की, तक्रारकर्त्याला 8 वर्ष जुना असलेला ट्रॅक्टर विरुध्दपक्ष क्र.1 ते 4 यांनी जुन्या ट्रॅक्टरला पेंटींग करुन तक्रारकर्त्याला दिला व तक्रारकर्त्याकडून 2009 च्या नवीन उत्पादीत किंमतीप्रमाणे पैसे घेण्यात आले, त्यामुळे तक्रारकर्त्याची मोठी फसवणूक केली. तक्रारकर्ता आतापर्यंत विरुध्दपक्ष क्र.3 यांचेकडे रुपये 2,60,000/- भरुन पावले होते व जेंव्हा तक्रारकर्ता ट्रॅक्टरची दुरुस्ती करण्याकरीता गेला असता, ट्रॅक्टर मध्ये तांञिक बिघाड असून 8 वर्ष जुना ट्रॅक्टर असल्या कारणास्तव अतिशय खर्च येईल असे उन्नती मोटर्स यांनी दुरुस्ती दरम्यान सांगितले व त्याप्रमाणे तक्रारकर्ता यांना ट्रॅक्टर दुरुस्ती करण्याकरीता रुपये 50,000/- चा खर्च आला. सदरची बाब तक्रारकर्ता यांनी विरुध्दपक्ष क्र.1 ते 4 यांना भेटून सांगितले असता, त्यांनी कुठल्याही प्रकारची मदत केली नाही व प्रतिसाद दिला नाही.
3. तक्रारकर्ता पुढे असे नमूद करतो की, तक्रारकर्त्याचे संपूर्ण कुंटूंब हे ट्रॅक्टरच्या उत्पन्नावर अवलंबून असून तक्रारकर्त्याची कोरडवाहू शेती नापिकी झाल्यामुळे तक्रारकर्त्याला अतिशय आर्थिक ञास सोसावा लागला व त्याचबरोबर तक्रारकर्त्याचा ट्रॅक्टर जुना असल्याने अतिशय खर्च असल्या कारणास्तव तक्रारकर्ता ट्रॅक्टरची किस्त भरण्यास असमर्थ होता. अशापरिस्थितीमध्ये दिनांक 12.12.2013 रोजी तक्रारकर्त्याला धमकी देवून कोणतीही पूर्व सुचना न देता तक्रारकर्त्याचा ट्रॅक्टर जप्त करुन नागपूर येथे नेण्यात आले. तक्रारकर्ता विरुध्दपक्ष क्र.3 यांचेकडे आपल्या पैशातून पैसे जमवून विरुध्दपक्ष क्र.3 कडे हप्ते भरीत होते. परंतु, ट्रॅक्टर जप्त झाल्यामुळे तक्रारकर्त्याला अतिशय शारिरीक, मानसिक व आर्थिक ञास सहन करावा लागला. सदरची प्रतिकृती ही विरुध्दपक्ष क्रि.1 ते 4 यांची अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करणारी असून सेवेत ञुटी करणारी आहे. त्याकरीता, विरुध्दपक्ष क्र.1 ते 4 यांना तक्रारकर्त्याने दिनांक 27,6,2012, 18.7.2012, व 4.7.2012 रोजी वेगवेगळी नोटीस वकीला मार्फत पाठविले. परंतु, विरुध्दपक्ष यांनी सदरच्या नोटीसला लबाडीचे उत्तर दिले व तक्रारकर्त्याचा ट्रॅक्टर सुध्दा परत केला नाही. या कारणास्तव सरते शेवटी नाईलाजास्तव तक्रारकर्त्याने मंचासमक्ष सदरची तक्रार दाखल करुन खालील प्रमाणे मागणी केली आहे.
1) विरुध्दपक्ष क्र.1 यांनी महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कपंनीचा सदरचा ट्रॅक्टर ज्याची उत्पादन 2000 साली झाले असून तो जुना ट्रॅक्टर तक्रारकर्त्याला सन 2009 मध्ये नवीन ट्रॅक्टर आहे असे सांगून विकलेला आहे व तो लवकरच नादुरुस्त झाला त्यामुळे विरुध्दपक्ष क्र. 1 तक्रारकर्त्याला ट्रॅक्टर बदलवनू नवीन ट्रॅक्टर देण्याचे आदेशीत व्हावे.
2) तसेच, तक्रारकर्त्याला झालेल्या आर्थिक नुकसानीपोटी भरपाई म्हणून रुपये 5,00,000/- विरुध्दपक्ष क्र.1 कडून देण्याचे आदेशीत व्हावे.
3) तक्रारकर्त्याला झालेल्या शारिरीक व मानसिक ञासापोटी रुपये 50,000/-, व तक्रार खर्च म्हणून रुपये 25,000/- असे एकूण रुपये 75,000/- देण्याचे आदेशीत व्हावे.
4. तक्रारकर्त्याच्या तक्रारीला अनुसरुन विरुध्दपक्ष क्र.1 ते 4 यांना मंचा मार्फत नोटीस बजावण्यात आली. विरुध्दपक्ष क्र.2 यांनी तक्रारीला आपले उत्तर सादर करुन त्यात नमूद केले की, तक्रारकर्ता व विरुध्दपक्ष क्र.1 यांच्यात ट्रॅक्टर खरेदी करण्याबाबत करारनामा झाला. विरुध्दपक्ष क्र.2 ही एक उत्पादक कंपनी आहे, त्यामुळे विरुध्दपक्ष क्र.2 यांचे फक्त महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीचे ट्रॅक्टर उत्पादीत करते व त्याचा संबंध तक्रारकर्त्याशी झाला नाही. तक्रारकर्त्याने विनाकारण पार्टी केले असून त्याचेविरुध्द कोणतीही मागणी केलेली नाही, करीता तक्रारकर्त्याची तक्रार विरुध्दपक्ष क्र.2 विरुध्द खारीज होण्यास पाञ आहे. तसेच, त्यांनी पुढे असे नमूद केले की, तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीत असे नमूद केले आहे की, तक्रारकर्त्याला 8 वर्ष जुन ट्रॅक्टर 2009 मध्ये देण्यात आला व त्यामुळे तक्रारकर्त्याला ट्रॅक्टर दुरुस्ती करण्याचे दरम्यान अतिशय खर्च आला. परंतु, आर.टी.ओ. कार्यालयाने तक्रारकर्त्याचे ट्रॅक्टरचे रजिस्ट्रेशन करतेवेळी ट्रॅक्टरचे उत्पादन वर्ष चुकीने 2009 ऐवजी 2000 वर्ष नमूद केले, त्यामुळे या सर्व घटनेला विरुध्दपक्ष जबाबदार नाही. तक्रारकर्त्याची तक्रार तथ्यहीन असून खारीज होण्यास पाञ आहे.
5. विरुध्दपक्ष क्र.1, 3 व 4 यांनी तक्रारकर्त्याचे संपूर्ण आरोप व प्रतयारोप आपल्या तक्रारीत खोडून काढले. तसेच, तक्रारकर्त्याने ट्रॅक्टरचे मासीक हप्ते सुरळीत न भरल्याचे कारणास्तव तक्रारकर्त्याचा ट्रॅक्टर दिनांक 12.12.2013 रोजी ट्रॅक्टर सुचना देवून जप्त करण्यात आले. तक्रारकर्त्याचे खरेदी केलेले ट्रॅक्टर याचे उत्पादन 2009 सालचे असून आर.टी.ओ. कार्यालयात नोंद करतेवेळी चुकीने उत्पादन वर्ष 2000 नमूद करण्यात आले होते. तक्रारकर्त्याने सदरचा ट्रॅक्टर 2009 पासून 2012 पर्यंत सुरळीत वापरलेला होता, त्या दरम्यान तक्रारकर्त्याची ट्रॅक्टरमध्ये तांञिक बिघाड असल्याबाबतची कोणतीही तक्रार तक्रारकर्त्याकडून प्राप्त झाली नव्हती. तसेच ट्रॅक्टर दुरुस्ती करण्याकरीता उन्नती मोटर्स यांचेकडे गेले असता, त्यांनी कागदपञांची पाहणी करुन चुकीने नमूद केलेल्या वर्षाचा उत्पादीत ट्रॅक्टर आहे असे तक्रारकर्त्याला कळवीले. याबाबत फक्त तोंडी सांगण्यात आले असून त्याबाबतचा कोणताही पुरावा तक्रारकर्त्याने अभिलेखावर दाखल केलेला नाही. त्यामुळे, तक्रारकर्त्याची तक्रार ही बिनबुडाची असून ती खारीज होण्यास पाञ आहे, तसेच तक्रारकर्त्याचा गॅरंटी, वॉरंटीचा पिरेड व अवधी सुध्दा संपल्या कारणास्तव तक्रारकर्ता खोटी तक्रार मंचात दाखल करीत आहे.
6. तक्रारकर्त्याने सदरच्या तक्रारी बरोबर 1 ते 30 दस्ताऐवज दाखल करुन त्यात प्रामुख्याने डिलीवरी मेमो, सर्टीफीकेट ऑफ रजिस्ट्रेशन ट्रॅक्टर, जनरल इंशुरन्स, तसेच हप्ते भरल्याबाबतचे पावत्या, अधिवक्ता मार्फत पाठविलेले नोटीसची प्रत व त्याच्या पोहच पावत्या इत्यादी दस्ताऐवज दाखल केले. विरुध्दपक्ष यांनी आपल्या उत्तराबरोबर 1 ते 15 दस्ताऐवज दाखल करुन त्यात प्रामुख्याने लोन करारनाम्याची प्रत, ट्रॅक्टर जप्त करण्याबाबतची प्रत, पोलीस स्टेशनला सुचना दिल्या बाबतचे पञ, ट्रॅक्टर लिलावात विकण्याबाबत तक्रारकर्त्यास दिलेले पञ व त्याच्या पोहच पावत्या, तसेच आरबीट्रेशन पार पाडून त्यावर झालेला आदेशाची प्रत तक्रारकर्त्याला दिल्याबाबतच्या पोष्टाच्या पावत्या इत्यादी दस्ताऐवज दाखल केलेल्या आहेत.
7. तक्रारकर्ता यांनी सदर प्रकरणात लेखी युक्तीवाद सादर केले. विरुध्दपक्ष क्र.1 ते 4 यांनी सुध्दा लेखी युक्तीवाद सादर केला. तसेच दोन्ही पक्षांचा मंचासमक्ष मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला व अभिलेखावर दाखल केलेल्या दस्ताऐवजाचे अवलोकन करण्यात आले, त्याप्रमाणे खालील प्रमाणे मुद्दे व निष्कर्ष देण्यात येते.
मुद्दे : निष्कर्ष
1) तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष यांचा ग्राहक होतो काय ? : होय
2) विरुध्दपक्ष यांचेकडून तक्रारकर्त्याचे सेवेत ञुटी किंवा : नाही
अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब झाल्याचे दिसून येते काय ?
3) आदेश काय ? : खालील प्रमाणे
// निष्कर्ष //
8. तक्रारकर्त्याची सदची तक्रार थोडक्यात अशी आहे की, तक्रारकर्त्याला आधुनिक शेती करण्याकरीता एका ट्रॅक्टरची आवश्यकता होती व तक्रारकर्ता हा मुळात शेतकरी असून शेती हाच त्याचा व्यवसाय होता. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र.4 एजंटच्या साह्याने विरुध्दपक्ष क्र.1 यांचेकडून ट्रॅक्टर विकत घेण्याचा निर्णय घेतला व ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी फायनान्स कंपनी विरुध्दपक्ष क्र.3 यांचेकडून फायनान्स घेवून 2009 मध्ये ट्रॅक्टर विकत घेतला गेला. तक्रारकर्ताने जेंव्हा ट्रॅक्टरमध्ये बिघाड निर्माण झाला होता, त्यादरम्यान त्याने उन्नती मोटर्स सर्वीस सेंटर येथे दाखविले असता त्याला अतिशय खर्च लागला व सर्विर्सींग सेंटरमध्ये पहिल्यांदा तक्रारकर्त्याला माहीत पडले की, तक्रारकर्त्याला पुरविलेला ट्रॅक्टर हा 2000 चे उत्पादीत प्रोडक्ट असून तो तक्रारकर्त्याला 2009 मध्ये नवीन ट्रॅक्टर म्हणून 2009 च्या किंमतीप्रमाणे तक्रारकर्त्यास विरुध्दपक्षाने विकला होता, ही बाब विरुध्दपक्षाला कळवीले असता त्यांनी टाळाटाळ केली.
9. विरुध्दपक्ष यांनी आपल्या उत्तरात तक्रारकर्त्याची संपूर्ण बाब नाकारली व त्याने याबाबत खुलासा देत नमूद केले की, त्यांनी तक्रारकर्त्यास विकत दिलेला ट्रॅक्टर हा मुळातच 2009 चे उत्पादीत असून आर.टी.ओ. रजिस्ट्रेशन कार्यालयाने चुकीने उत्पादीत वर्ष 2009 नमूद केले, त्या पृष्ठ्यर्थ त्यांनी आर.टी.ओ. कार्यालयातून वाहनाचे रजिस्ट्रेशनची प्रमाणीत प्रत दाखल केली. विरुध्दपक्ष क्र.3 हे फायनान्स कंपनी असून त्यांनी आपल्या उत्तरात असे नमूद केले आहे की, तक्रारकर्त्याने ट्रॅक्टर 2009 पासून तर 2012 पर्यंत सुरळीत चालविले व त्याचे हप्त भरले. परंतु, 2009 नंतर तक्रारकर्ता सुरळीत हप्ते भरु शकला नाही, त्यामुळे विनाकारण खोटी तक्रार दाखल केली आहे. तसेच, विरुध्दपक्ष क्र.3 यांनी आपल्या उत्तराबरोबर दस्ताऐवज दाखल केलेले असून सदरच्या दस्ताऐवजाचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, तक्रारकर्ता मासीक किस्त भरण्यास असमर्थ असल्यास तक्रारकर्त्याचा ट्रॅक्टर तक्रारकर्त्याला सुचना देवून जप्त केला व त्यानंतर आरबीट्रेशन प्रक्रीया तक्रारकर्ता विरुध्द सुरु करुन तक्रारकर्ता विरुध्द आरबीट्रेशन आदेश दिनांक 21.7.2011 रोजी प्राप्त झाल्यानंतर सुध्दा समोरची कायदेशिर प्रक्रीया केली नाही. तसेच सदर बाबत तक्रारकर्ता याला माहीती दिली नाही व याबाबत मंचात प्रकरण चालु असतांना माहीती मिळाली असे तक्रारकर्त्याचे अधिवक्त्याने आपल्या तोंडी युक्तीवादात सांगितले. यावरुन मंचाचे असे मत आहे की, तक्रारकर्ता याला आरबीट्रेशन आदेशाची माहिती मिळाली त्यादरम्यान आदेशाविरुध्द अपील दाखल करण्याची संधी होती, तरी तक्रारदाराने त्याचेविरुध्द झालेल्या आबीट्रेशन अवॉर्ड विरुध्द योग्य त्या न्यायालयात अपील दाखल करुन निराकरण करावे. परंतु, विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्याचा ट्रॅक्टर आरबीट्रेशन आदेशाप्रमाणे विलेवाट लावून त्याची रक्कम लोन खात्यात समावीष्ट केली. त्यामुळे विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्याशी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केले असे दिसून येत नाही. करीता तक्रारकर्त्याची तक्रार खारीज होण्यास पाञ आहे असे मंचाला वाटते.
करीता, सबब खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येते.
// अंतिम आदेश //
(1) तक्रारकर्त्यांची तक्रार खारीज करण्यात येते.
(2) दोन्ही पक्षकारांनी आप-आपला तक्रारीचा खर्च सहन करावा.
(3) उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क पाठविण्यात यावी.
नागपूर.
दिनांक :- 20/01/2017