::: आदेश :::
( पारित दिनांक : 27/11/2017 )
माननिय अध्यक्षा, सौ. एस. एम. उंटवाले, यांचे अनुसार : -
1. तक्रारकर्ते यांनी सदरहू तक्रार, ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम 12 अन्वये, दोषपूर्ण सेवे संदर्भात विरुध्द पक्षाविरुध्द दाखल केली आहे.
तक्रारकर्ते यांची तक्रार, विरुध्द पक्षाचा लेखी जबाब, उभय पक्षाने दाखल केलेले सर्व दस्तऐवज, तक्रारकर्ते यांचे प्रतिऊत्तर व पुरसिस, विरुध्द पक्षाचा पुरावा, उभय पक्षाचा लेखी व तोंडी युक्तिवाद, यांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन खालीलप्रमाणे कारणे देवून निष्कर्ष नोंदविला.
2. सदर प्रकरणात तक्रारदार हे मयत विमाधारक शंकर सदाशीव धोटे यांचे वारसदार आहेत व मयत विमाधारक यांनी विरुध्द पक्षाकडून त्याच्या वाहनाची प्रायव्हेट कार पॅकेज पॉलिसी घेतली होती. ही बाब विरुध्द पक्षाला मान्य आहे, त्यामुळे तक्रारदार हे विरुध्द पक्षाचे ग्राहक आहे, या निष्कर्षाप्रत मंच आले आहे.
3. सदर प्रकरणात उभय पक्षात वाद नसलेल्या बाबी अशा आहेत की, मयत विमाधारक यांच्या विरुध्द पक्षाकडील विमाकृत वाहनाचा अपघात झाला व त्यात विमाधारकाचा मृत्यू झाला. तक्रारकर्ते यांनी विरुध्द पक्षाकडे सदर अपघात नुकसान भरपाई मिळण्याकरिता विमा दावा दाखल केला होता. विरुध्द पक्षाने विमाकृत वाहनाच्या दुरुस्तीसाठी लागलेला खर्च रुपये 3,95,000/- तक्रारकर्ते यांना दिनांक 06/08/2016 रोजी दिलेला आहे. तक्रारकर्ते यांचा युक्तिवाद असा आहे की, विरुध्द पक्षाच्या विमा पॉलिसीनुसार मयत विमाधारक शंकर सदाशीव धोटे यांची सुध्दा रिस्क कव्हर आहे. त्यामुळे तक्रारकर्ते यांनी त्याबद्दलची नुकसान भरपाई मिळण्याकरिता विरुध्द पक्षाकडे अर्ज केला असता, विरुध्द पक्षाने दिनांक 11/08/2016 रोजीचे पत्राअन्वये मयत विमाधारकाकडे वैध चालक परवाना नाही म्हणून तो फेटाळला, परंतु मयत विमाधारक हे त्यावेळेस वाहनात सहप्रवाशी म्हणून बसले होते, म्हणून विरुध्द पक्षाची ही कृती बेकायदेशीर आहे.
4. विरुध्द पक्षाने रेकॉर्डवर सदर पॉलिसी प्रत दाखल करुन, त्यांनी पॉलिसीच्या अटी-शर्तीनुसार तक्रारदारांचा विमा दावा नाकारला, त्यामुळे यात सेवा न्युनता नाही, असे कथन केले. विरुध्द पक्षाचा युक्तिवाद पुढे असा आहे की, त्यांनी सदर पॉलिसी शेडयुल मधील कलम-3 प्रमाणे { Personal Accident cover for Owner-Driver } { Proviso clause D sub clause C : The Owner-Driver holds an effective driving licence, in accordance with the provisions of Rules 3 of the Central Motor Vehicle Rules 1989 at the time of accident. } नुसार मालकाची जोखीम पॉलिसी अटी,शर्तीनुसार स्विकारली होती. त्यामुळे तक्रारदाराचा अर्ज प्राप्त झाल्यावर त्यांना पत्र देवून मृतकाचा वाहन चालविण्याचा परवाना मागीतला होता. परंतु तक्रारदारांनी त्याची पुर्तता केली नाही, त्यामुळे तक्रारकर्ते यांची तक्रार खारिज करावी.
5. अशाप्रकारे उभय पक्षांचा युक्तिवाद एैकल्यानंतर मंचाचे असे मत आहे की, मयत विमाधारक हे सदर वाहनाचे मालक होते पण अपघाताच्या वेळेस मयत विमाधारक हे त्या वाहनात सहप्रवाशी म्हणून प्रवास करत होते. विमा पॉलिसीच्या अटी-शर्तीनुसार चालकाजवळ गाडी चालविण्याचा परवाना होता. त्यामुळेच विरुध्द पक्षाने वाहनाच्या दुरुस्तीसाठीचा विमा दावा रक्कम अदा केली परंतु सदर पॉलिसीमध्ये, विरुध्द पक्षाने B. Liability मध्ये मयत विमाधारकाकडून Basic TP Cover व ADD : PA – Un-named – GR 3682 नुसार सुध्दा प्रिमीयम राशी स्विकारलेली आहे. मात्र त्याबद्दल नुकसान भरपाई देण्यासाठी पॉलिसी प्रतीत कोणताही क्लॉज नाही. तक्रारकर्ते यांचे असे म्हणणे आहे की, पॉलिसीमधील Liability नुसार, विरुध्द पक्षाने मयत विमाधारकाची सुध्दा वरीलप्रमाणे रिस्क कव्हर केली होती. त्यामुळे मयत विमाधारकाच्या मृत्यू नुकसानीची भरपाई देणे, हे विरुध्द पक्षाचे कर्तव्य आहे. परंतु यावर मंचाचे असे मत आहे की, सदर पॉलिसीमधील Liability Shedule of Premium नुसार, तक्रारकर्ते यांना मयत विमाधारक शंकर सदाशीव धोटे यांच्या मृत्यू नुकसानीची भरपाई ही Motor Vehicles Act मधील तरतुदीनुसार सक्षम न्यायालयात मिळू शकेल. त्याबद्दलची नुकसान भरपाई ठरवण्याचे कार्यक्षेत्र, ग्राहक संरक्षण कायद्यामधील संक्षिप्त कार्यवाहीत मंचाला उपलब्ध नाही, म्हणून तक्रारदार यांची प्रार्थना मंजूर करता येणार नाही.
सबब, अंतिम आदेश खालीलप्रमाणे पारित केला.
अंतिम आदेश
- तक्रारकर्ते यांची तक्रार खारिज करण्यांत येते.
- तक्रारकर्ते यांना आवश्यकता भासल्यास या वादासंबंधी योग्य त्या न्यायालयात दाद मागण्याची मुभा देण्यात येते.
- न्यायिक खर्चाबाबत कोणताही आदेश पारित करण्यात येत नाही.
- उभय पक्षांना या आदेशाच्या प्रती निशुल्क पुरवाव्या.
( श्री. कैलास वानखडे ) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.
svGiri