(आदेश पारीत व्दारा - श्रीमती चंद्रिका किशोरसिंह बैस, मा.सदस्या)
(पारीत दिनांक : 17 मे, 2018)
1. तक्रारकर्तीने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केली असून, तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालील प्रमाणे आहे.
2. तक्रारकर्ती ही राह. पो. चिखली (मैना), ता. काटोल, जिल्हा – नागपुर येथील रहिवासी असून तक्रारकर्तीचा पती श्री राजकुमार महादेव गोंडाणे याच्या मालकीची मौजा – सोनोली, ता. काटोल, जिल्हा नागपुर येथे भुमापन क्रमांक 75 ही शेत जमीन आहे. तक्रारकर्तीचा पती हा शेतीचा व्यवसाय करीत होता व त्या शेतीच्या उत्पन्नावर तक्रारकर्तीचा पती आपल्या कुंटुबाचे पालन-पोषण करीत होता. विरुध्दपक्ष क्र.1 व 2 ही विमा कंपनी असून विरुध्दपक्ष क्र.3 हे विमा सल्लागार आहेत. शासनाच्या वतीने विरुध्दपक्ष क्र.4 हे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा दावे स्विकारतात. शासनाच्या वतीने विरुध्दपक्ष क्र.3 तर्फे सदर विमा योजने अंतर्गत तक्रारकर्ती महिलेच्या पतीचा रुपये 1,00,000/- चा विमा शासनाच्या वतीने उतरविला होता. सदर दाव्याचा प्रस्ताव विरुध्दपक्ष क्र.3 तर्फे सर्व कागदपत्रांची शहानिशा करुन व प्रस्ताव बरोबर आहे हे तपासून विरुध्दपक्ष क्र.2 ला दिला जातो व विरुध्दपक्ष क्र.1 ही सदर दाव्याचा भुगतान करतात. तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु दिनांक 22.5.2012 रोजी पाय घसरुन दगडावर पडल्याने जखमी होऊन झाला. तक्रारकर्तीच्या पतीचा शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा काढला असल्याने व तिच्या पतीचा अपघाती मृत्यु झाला असल्याने, तिने विरुध्दपक्ष क्र.3 कडे दिनांक 6.9.2012 रोजी रितसर अर्ज केला. तसेच, वेळोवेळी विरुध्दपक्षाने जे-जे दस्ताऐवज मागितले त्याची पुर्तता केली. तरी देखील विरुध्दपक्षाने तक्रारकर्तीच्या पतीचा दाव्याबाबत काहीही कळविले नाही, म्हणून तक्रारकर्तीने दिनांक 8.11.2016 रोजी आपल्या वकीला मार्फत माहिती अधिकार कायद्या खाली विरुध्दपक्ष क्र.4 कडे अर्ज केला असता, त्यांनी तिचा दावा जिल्हा अधिक्षक कृषि अधिका-यांकडे पाठविला आहे, एवढीच माहिती दिली. सदर दावा मंजुर अथवा नामंजुर केला की नाही, ही माहिती दिली नाही. तक्रारकर्तीच्या म्हणण्यानुसार विरुध्दपक्ष क्र.1 ने तक्रारकर्तीचा दावा अकारण प्रलंबित ठेवून तिची फसवणुक केली आहे व त्यांना पैसे देण्याची इच्छा नसल्याने ते असे करीत आहे. सदर दाव्याची रक्कम तक्रारकर्तीस मिळाली नसल्याने त्यामधील व्याजालाही तिला मुकावे लागत आहे. ज्या उद्देशाने शासनाने मृत शेतक-यांची पत्नी व मुलांसाठी ही योजना सुरु केली, त्या उद्देशालाच विरुध्दपक्ष हे तळा देत आहे. त्यामुळे विरुध्दपक्षाने आपल्या सेवेत त्रुटी केली आहे असे उघडपणे दिसून येत आहे.
3. विरुध्दपक्षाच्या या कृतीमुळे तक्रारकर्तीस अतिशय मानसिक त्रास झालेला आहे. त्यामुळे तिने खालील प्रमाणे प्रार्थना केली आहे.
1) विरुध्दपक्षाने तक्रारकर्तीस विमा दाव्याची रक्कम रुपये 1,00,000/- विरुध्दपक्षाकडे प्रस्ताव दिल्यापासून म्हणजे दिनांक 6.9.2012 पासून द.सा.द.शे 18 % व्याजाने देण्याचे आदेश द्यावे.
2) तक्रारकर्तीस झालेल्या मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रासापोटी रुपये 30,000/- द्यावे व तक्रारीचा खर्चापोटी रुपये 15,000/- देण्याचे आदेश पारीत व्हावे.
4. तक्रारकर्तीच्या तक्रारीला अनुसरुन विरुध्दपक्ष यांना मंचामार्फत नोटीस पाठविण्यात आली. त्यानुसार विरुध्दपक्ष क्र.1 व 2 तर्फे तक्रारकर्तीच्या तक्रारीस लेखीउत्तर दाखल केले. त्यांच्या म्हणण्यानुसार तक्रारकर्तीने दाखल केलेल्या दस्ताऐवजांवरुन असे दिसते की, तक्रारकर्ती ही मय्यत राजकुमार महादेव गोंडाणे याची पत्नी आहे. हे खरे आहे की, शासनाच्या वतीने विरुध्दपक्ष क्र.3 तर्फे सदर विमा योजने अंतर्गत तक्रारकर्तीच्या पतीचा रुपये 1,00,000/- चा विमा उतरविला होता. हे म्हणणे खरे आहे की, सदर दाव्याचा प्रस्ताव विरुध्दपक्ष क्र.3 तर्फे सर्व कागदपत्रांची शहानिशा करुन प्रस्ताव बरोबर आहे हे पाहून विरुध्दपक्ष क्र.2 यांचेकडे पाठविल्या जातो व विरुध्दपक्ष क्र.1 हे सदर दाव्याचा भुगतान करते.
5. तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु दिनांक 22.5.2012 रोजी पाय घसरुन दगडावर पडल्याने झाला. विरुध्दपक्ष क्र.1 व 2 येथे नमुद करतात की, तक्रारकर्तीने दाखल केलेला दस्ताऐवज मर्ग खबरीचे अवलोकन केले असता असे स्पष्ट होते की, मृतक राजकुमार गोंडाणे याचा दिनांक 22.5.2012 रोजी सायंकाळी अंदाजे 19-00 वाजता दारु पिऊन घरी आला, त्यावेळी मृतकाची पत्नी ही घरी होती आणि त्या दोंघामध्ये भांडण झाले. तक्रारकर्तीने मृतक घरी असतांना घराचा दरवाजा बाहेरुन लावून घेतले आणि ती घराच्या दुस-या माळ्याच्या स्लॅबवर झोपायला गेली व दुस-या दिवशी दिनांक 23.5.2013 रोजी सकाळी 8-00 वाजता तक्रारकर्ती ही झोपेतुन उठली असता, तिला मृतक राजकुमार गोंडाणे हा राहत्या घराच्या मागच्या बाजुस खाली कपडे धुण्याच्या दगडावर चीत पडलेला दिसला. यावरुन मृतकाचा मृत्यु हा आकस्मिक मृत्युच्या कक्षेत येत नाही, कारण तो आकस्मिक मृत्यु नाही आणि विमा पॉलिसीच्या अटींनुसार तक्रारकर्ती ही विमा रक्कम मिळण्यास पात्र नाही. तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु दिनांक 22.5.2012 रोजी झाला असून तिने विरुध्दपक्ष क्र.3 कडे विमा रक्कम मिळण्याकरीता अर्ज दिनांक 6.9.2012 रोजी दाखल केला, तो अर्ज विहित मुदतीत दाखल केला नसून तो अर्ज विहीत मुदतीत कां दाखल केला नाही, याबाबत सबळ कारण सुध्दा दाखल केले नाही. म्हणून तक्रारकर्तीचा विमा दावा मिळण्यासाठी दाखल केलेला अर्ज खारीज करण्यात आला. कारण, तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु हा आकस्मिक नसून ती दारुच्या नशेत केलेली आत्महत्या आहे, असे विरुध्दपक्षाचे म्हणणे आहे. त्यामुळे, विरुध्दपक्षाने मंचास आग्रह केलेला आहे की, तक्रारकर्तीची दाखल केलेली तक्रार खर्चासह नामंजुर करण्यात यावी.
6. विरुध्दपक्ष क्र.3 व 4 यांना मंचाचा नोटीस प्राप्त होऊनही ते मंचात उपस्थित झाले नाही, त्यामुळे विरुध्दपक्ष क्र.3 व 4 चे विरुध्द एकतर्फा आदेश दिनांक 29.7.2017 रोजी मंचाव्दारे पारीत करण्यात आला.
7. उभय पक्षाचे वकीलांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला. अभिलेखावर दाखल केलेली तक्रार, दस्ताऐवजाचे अवलोकन करण्यात आले व त्याचे आधारे खालील प्रमाणे निष्कर्ष देण्यात येते.
मुद्दे : निष्कर्ष
1) तक्रारकर्तीची तक्रार मंजूर होण्यास पाञ आहे काय ? : होय.
2) आदेश काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे
// निष्कर्ष //
8. सदर तक्रार विरुध्दपक्षाचे विरुध्द शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत दावा रक्कम रुपये 1,00,000/- मिळण्याकरीता दाखल केली आहे. सदरचा दावा विरुध्दपक्षाने मंजुर अथवा नामंजुर न केल्याने तक्रारकर्तीस हा दावा मंचात दाखल करावा लागला. विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांनी आपल्या दिलेल्या उत्तरात त्यांनी तक्रारकर्तीचा दावा फेटाळला आहे, असे नमूद केलेले नाही. यावरुन, तक्रारीचे कारण सतत सुरु आहे ( Continues Cause of Action) त्यामुळे सदरचा दावा मुदतबाह्य आहे असे म्हणता येणार नाही. निशाणी क्रमांक 3 नुसार दस्त क्र.3 सात-बाराचा उतारा लावलेला आहे. मर्ग खबरी अहवाल निशाणी क्र.3 नुसार दस्त क्र.4 वर लावली आहे, त्याचेनुसार दिनांक 22.5.2012 रोजी मृतक दारु पिऊन आला त्यामुळे तक्रारकर्ती व मृतकाचे भांडण झाले. तक्रारकर्ती वरच्या माळ्याच्या स्लॅबवर झोपायला गेली व दुस-या दिवशी सकाळी 8-00 वाजता तिला दिसले की, घराच्या मागील बाजुस खाली कपडे धुण्याच्या दगडावर तिचा पती चीत अवस्थेत पडलेला होता, त्याच्या डोक्यास मार लागुन जखम झाली होती व रक्कम निघत होते, तसेच हाता-पायाला खरचटून मार लागला होता. त्यानंतर तिने पतीस मेयो हॉस्पीटलमध्ये नेले, तेंव्हा डॉक्टरने त्याला मृत घोषीत केले. घटनास्थळाचा पंचनाम्याप्रमाणे मृतकाच्या डोक्याला मार लागल्यामुळे त्याचा मृत्यु झाला असे म्हटले आहे, त्यात तिच्या पतीने आत्महत्या केली असल्याचा काहीही उल्लेख नाही. निशाणी क्रमांक 3 वरील दाखल दस्ताऐवज पान क्र.23 नुसार मरोणोत्तर पंचनामा मध्ये सदर प्रेताच्या उजव्या कानामागे लांब खोल जखम व डाव्या भागांवर बेंड आलेला दिसला. हाता-पायावर खरचटलेले, कानातून व नाकातून रक्त आलेले दिसले असे म्हटले आहे. पतीचा मृत्यु कशामुळे झाला हे मृतकाच्या पत्नीला माहिती नाही असे तिने यात म्हटले आहे. विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांनी नमूद केल्याप्रमाणे मरोणोत्तर पंचनाम्यात मृतकाने आत्महत्या केल्याचा कुठेही उल्लेख नाही. त्यात म्हटल्याप्रमाणे मृतक कपडे धुण्याच्या दगडावर पाय घसरुन पडला त्यामुळे त्याच्या डोक्याला जबर जखम झाला व त्यातच त्याचा मृत्यु झाला. म्हणजेच तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु हा अपघाती असल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे विमा कंपनीने तक्रारकर्तीचा दावा मंजुर केला अथवा नामंजुर केला, यासंबंधी कुठलेही पत्र तक्रारकर्तीस दिले नाही. याचाच अर्थ तक्रारीचे कारण सतत घडत आहे ( Continues Cause of Action) त्यामुळे सदरचा दावा मुदतबाह्य होण्याचा प्रश्न उद्भवत नाही. विरुध्दपक्षाने आपल्या म्हणण्याला पुष्ठी देण्याकरीता काही निवाड्याचा आधार घेतला आहे.
- Praveen Shekh – Versus – LIC and anr., I(2006) CPJ 53 (NC)
- Bajaj Allianz General Insurance Co.Ltd. –Versus – Achala Rudranwas Marde, I(2015) CPJ 146 (NC)
- M. Sujatha –Versus – Bajaj Allianz General Insurance Co. Ltd., III(2015) CPJ 104 (NC)
9. सदर निवाड्यांमध्ये दिलेले मत हे हातातील प्रकारणाशी मिळते-जुळते नाही, त्यामुळे या निवाड्यांचा विचार करता येणार नाही. उपरोक्त निवाडा क्रमांक 2 मध्ये म्हटल्याप्रमाणे तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु मोटार बाईक अपघातात झाला होता, त्यामुळे याचा साधार्म सदरच्या प्रकरणात दगडावरुन पाय घसरुन पडून मृत्यु होणे यात दिसत नाही. करीता, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येते.
// अंतिम आदेश //
(1) तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजुर करण्यात येते.
(2) विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी वैयक्तीकरित्या व संयुक्तीकरित्या तक्रारकर्तीस विमा दाव्याची रक्कम रुपये 1,00,000/- विरुध्दपक्षाकडे विमा प्रस्ताव दिल्याचा दिनांक 6.9.2012 पासून द.सा.द.शे.12% व्याजदराने तक्रारकर्तीच्या हातात पडे पर्यंत द्यावे.
(3) तसेच, विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी वैयक्तीरित्या व संयुक्तीकरित्या तक्रारकर्तीस झालेल्या मानसिक, शारिरीक, आर्थिक त्रासापोटी रुपये 10,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 5,000/- द्यावे.
(4) विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांनी आदेशाची पुर्तता निकालपत्राची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत करावी.
(5) उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क पाठविण्यात यावी.
दिनांक :- 17/05/2018