::निकालपत्र::
(पारीत व्दारा- श्री शेखर प्रभाकर मुळे, मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक–17 एप्रिल, 2018)
01. उभय तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार अतिरिक्त ग्राहक मंचा समक्ष ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली विरुध्दपक्षां विरुध्द नात्याने अनुक्रमे त्यांचा मुलगा आणि भाऊ असलेला श्री भूषण मानमोडे, जो अविवाहित होता, त्याचे अपघाती मृत्यू संबधाने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा दावा मंजूर न केल्या संबधी सेवेतील कमतरता या आरोपा खाली दाखल केली आहे.
02. तक्रारदारांचे संक्षीप्त कथन खालील प्रमाणे-
उभय तक्रारदार यांचा नात्याने अनुक्रमे मुलगा आणि भाऊ असलेला श्री भूषण बबनराव मानमोडे याचे मालकीची मौजा कचारीसावंगा तालुका काटोल, जिल्हा नागपूर येथे शेती असून तिचा भूमापन क्रं-69/1 असा आहे. तक्रारकर्ता क्रं-1) यांचा मुलगा श्री भूषण हा शेतकरी होता व तो अविवाहित होता. विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) हे दि न्यु इंडीया एश्योरन्स कंपनीचे अनुक्रमे मुंबई आणि नागपूर येथील कार्यालय आहे आणि विरुध्दपक्ष क्रं-3) तालुका कृषी अधिकारी हे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत शासनाचे वतीने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा दावे स्विकारतात. महाराष्ट्र शासनाच्या वतीने शेतक-यांचा तसेच उभय तक्रारदारांचा नात्याने अनुक्रमे मुलगा आणि भाऊ असलेला भूषण बबनराव मानमोडे याचा शेतकरी अपघाती मृत्यू संबधाने रुपये-1,00,000/- रकमेचा विमा उतरविला होता. श्री भूषण याचा दिनांक-14/05/2013 रोजी विहिरित काम करण्यास उतरला असता विहिरीत बुडून झाला. श्री भूषण याच्या मृत्यू नंतर त्याचा भाऊ असलेला तक्रारकर्ता क्रं-2) श्री प्रविण मानमोडे याने दिनांक-11/07/2013 रोजी विरुध्दपक्ष क्रं-3) तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयात शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा दावा प्रस्ताव आवश्यक दस्तऐवजांसह सादर केला परंतु आज पर्यंत विरुध्दपक्षा तर्फे विमा दाव्या संबधी कुठलीही माहिती त्यांना मिळालेली नाही आणि विमा दावा प्रलंबित ठेऊन विरुध्दपक्षानीं सेवेत कमतरता ठेवली. विरुध्दपक्षांनी विमा दाव्या संबधाने काहीही निर्णय न घेतल्याने तक्रारदारांनी विरुध्दपक्ष क्रं-1) ते 3) यांना दिनांक-15/12/2016 रोजी कायदेशीर नोटीस पाठविली परंतु नोटीसला उत्तर दिले नाही वा विमा दाव्या बाबत आज पर्यंत काहीही कळविले नाही.
म्हणून उभय तक्रारदारांनी विरुध्दपक्षां विरुध्द तक्रार दाखल करुन नात्याने अनुक्रमे त्यांचा मुलगा आणि भाऊ असलेला श्री भूषण मानमोडे याचे अपघाती मृत्यू संबधाने विमा दाव्याची रक्कम रुपये-1,00,000/- व्याजासह विरुध्दपक्षां कडून मागितली असून त्यांना झालेल्या त्रासा बद्दल नुकसान भरपाई आणि तक्रारीचा खर्च मागितलेला आहे.
03. विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) विमा कंपनीने एकत्रित लेखी जबाब सादर करुन हे मान्य केले की, महाराष्ट्र शासनाच्या वतीने मृतकाचा शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा उतरविलेला होता. विमा कंपनी तर्फे पुढे असे नमुद करण्यात आले की, मृतकाचा मृत्यू हा विहिरीत बुडून झाला या संबधी स्पष्ट पुरावा नाही, कारण मृतकाचा व्हीसेरा रासायनिक प्रयोग शाळेत पाठविण्यात आला होता परंतु त्या संबधीचा अहवाल दाखल केलेला नाही. शव विच्छेदन अहवाला मध्ये सुध्दा मृतकाच्या मृत्यूचे नेमके कारण दिलेले नाही, त्यामुळे दाव्याची प्रक्रिया पूर्ण करता आली नाही, त्यामुळे त्यांच्या सेवेत कमतरता होती असे नाकबुल करुन तक्रार खारीज करण्याची विनंती करण्यात आली.
04. विरुध्दपक्ष क्रं-3) तालुका कृषी अधिकारी, काटोल यांना अतिरिक्त ग्राहक मंचा तर्फे रजिस्टर पोस्टाने पाठविलेली नोटीस तामील होऊनही कोणीही मंचा समक्ष उपस्थित झाले नाही वा लेखी निवेदन सादर केले नाही म्हणून विरुध्दपक्ष क्रं-3) विरुध्द तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश प्रकरणात दिनांक-24/07/2017 रोजी पारीत करण्यात आला.
05. तक्रारदारांची तक्रार, दाखल दस्तऐवजांच्या प्रती, विरुध्दपक्षांचे लेखी जबाब यांचे अवलोकन करण्यात आले तसेच तक्रारदारां तर्फे वकील श्री क्षिरसागर तर विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) विमा कंपनी तर्फे वकील सौ.तामगाडगे यांचा मौखीक युक्तीवाद ऐकल्या नंतर मंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे देण्यात येतो.
::निष्कर्ष::
06. या प्रकरणात मृतक श्री भूषण बबनराव मानमोडे याच्या मृत्यूचे नेमके कारण काय होते हा एकच वादातीत मुद्दा आहे. शासनाचे वतीने काढलेलया विमा योजने अंतर्गत संबधीत शेतक-याचा मृत्यू जर नैसर्गिकरित्या किंवा आत्महत्ये मुळे झालेला असेल तर त्याच्या कुटूंबाला योजनेचा लाभ मिळत नाही. शव विच्छेदन अहवाला मध्ये असे नमुद आहे की, मृतक हा विहिरी मध्ये साफसफाईचे काम करीत असताना डिझेल इंजिनचा गॅस नाकातोंडातून शरीरात शिरल्यामुळे तो बेशुध्द झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला परंतु मृत्यूचे नेमके कारण....... या वरील अभिप्राय राखून ठेवण्यात आलेला आहे. व्हीसेरा जरी रासायनिक प्रयोगशाळेत पाठविण्यात आला होता तरी त्याचा अहवाल दोन्ही पक्षां तर्फे दाखल करण्यात आलेला नाही, त्यामुळे मयताच्या मृत्यूचे नेमके काय कारण होते याचा दस्तऐवजी पुरावा उपलब्ध नाही.
07. विरुध्दपक्ष विमा कंपनीच्या वकीलांनी आपल्या युक्तीवादात मयताचा मृत्यू अपघातामुळे झाला ही बाब पूर्णपणे नाकारली कारण वकीलांच्या मते मयताच्या आंगावर काही जखमा आढळून आल्या होत्या, ज्याचा उल्लेख शवविच्छेदन अहवाला मध्ये आहे. त्याच प्रमाणे या घटने संबधी पोलीसानीं काही आरोपीं विरुध्द एफ.आय.आर. दाखल केला होता आणि भारतीय दंड विधानाच्या कलम-304 खाली गुन्हा दाखल केला होता. एफ.आय.आर. नुसार मयत आणि इतर काही ईसम एका विहिरी मध्ये मृत आढळून आलेले होते, त्यामुळे विरुध्दपक्ष विमा कंपनीच्या वकीलांचे असे म्हणणे आहे की, या पोलीस कागदपत्रांवरुन असे दिसून येते की, मयताचा मृत्यू अपघाती नसून त्याला जाणुनबुजून मारण्यात आले आहे किंवा त्याच्या मृत्यूला आरोपी कारणीभूत आहेत, त्यामुळे अशा परिस्थितीत तक्रारकर्त्यांना मयताच्या मृत्यूसाठी विमा दावा मागण्याचा अधिकार मिळत नाही.
08. विरुध्दपक्ष विमा कंपनीने अशा प्रकारे आपली जबाबदारी 02 कारणास्तव नाकारलेली आहे, त्यातील पहिले कारण म्हणजे मयताचा मृत्यू हा अपघाती होता हे सिध्द झालेले नाही आणि मयताच्या मृत्यूला तिसरी व्यक्ती जबाबदार होती.
09. तक्रारकर्तीच्या वकीलांनी हा युक्तीवाद खोडून काढताना काही मा.वरिष्ठ न्यायालयाच्या निवाडयांचा आधार घेतला-
(1) “New India Assurance Company-Versus-Jaiwantibai Vishwakarma”- II (2016) CPJ-99 (NC) या प्रकरणा मध्ये मयत ईसमाचा मृत्यू रेल्वे अपघाता मध्ये झाला होता आणि त्याचा मृत्यू आत्महत्या केल्याने झाला होता हे कारण दर्शवून विमा कंपनीने विमा दावा नाकारलेला होता. मा.राष्ट्रीय ग्राहक आयोगाने सदर निवाडयात असे नमुद केले आहे की, मयताचे शरिरावर ज्या जखमा आढळलेल्या आहेत, त्या संबधाने तज्ञांचा अहवाल उपलब्ध नाही, ज्यावरुन हे म्हणता आले असते की, त्या जखमा केवळ आत्महत्या केल्यामुळेच झाल्या असाव्यात. जखमे संबधी पोलीसानीं आणि पंचानीं दिलेले मत हे सिध्द करु शकत नाही की, ती आत्महत्या होती.
(2) I.D.B.I. Federal Life Insurance Company-Verusus-Anuva Ghosal- II (2015) CPJ-503 (NC) या प्रकरणात शवविच्छेदन अहवाल तसेच अंतिम अहवाल न्यायदंडाधिका-यां पुढे ठेवण्यात आला नव्हता, त्यामुळे मयताने आत्महत्या केली केवळ एवढे म्हणणे विमा दावा खारीज करण्यास पुरेसे नाही.
(3) Oriental Insurace Company-Verusus- Smt. Nandabai Gaikwad” First Appeal No.-A/11/5, Order Date-17/01/2014 Maharashtra State Consumer Commission Circuit Bench, Nagpur-
या प्रकरणा मध्ये मयत ईसम विहिरीत पडून मृत्यू पावला आणि अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली परंतु ती आत्महत्या होती हे कारण देऊन विमा कंपनी तर्फे विमा दावा फेटाळण्यात आला होता कारण घटनेच्या नंतर मयताच्या मुलीने पोलीसांना असे बयान दिले होते की, मयत ईसम हा तणावाखाली होता आणि त्याने आत्महत्या केली असावी. परंतु या संबधी ठोस पुरावा उपलब्ध नसल्याने आत्महत्येचे दिलेले कारण फेटाळण्यात आले आणि तक्रार मंजूर करण्यात आली. पोलीस चौकशी मध्ये जे बयान पोलीस घेतात त्याचा उपयोग फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम-162 नुसारच करता येतो आणि इतर कुठल्याही कारणासाठी करता येत नाही.
10. हातातील प्रकरणा मध्ये मयताचा मृत्यू विहिरीत बुडून अपघातामुळे झाला असे गृहीत धरण्यास पुरेसा पुरावा आहे. जरी मृत्यूचे नेमके कारण डॉक्टरांनी दिलेले नसेल, तरी विरुध्दपक्ष विमा कंपनी तर्फे सुध्दा मयाताच्या मृत्यूचे नेमके कारण काय होते किंवा तो अपघाती मृत्यू नव्हता हे सिध्द करण्या ईतपत पुरावा सादर करण्यात आलेला नाही. जरी असे गृहीत धरले की, मयताच्या मृत्यूला आरोपी जबाबदार होते तरी सुध्दा या प्रकरणात मयताचे कुटूंबाला विमा योजने अंतर्गत लाभ मिळू शकतो, त्यामुळे आमच्या मते विरुध्दपक्ष विमा कंपनीने विमा दाव्यावर कुठलाही निर्णय न घेऊन सेवेत कमतरता ठेवली आणि मयताचा मृत्यू अपघातामुळे झालेला नव्हता ही बाब ते सिध्द न करु शकल्यामुळे आम्ही ही तक्रार मंजूर करुन त्यात खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-
::आदेश::
1) उभय तक्रारदार अनुक्रमे क्रं-(1) श्री बबनराव विठोबाजी मानमोडे आणि क्रं-(2) श्री प्रविण बबनराव मानमोडे यांची तक्रार विरुध्दपक्ष दि न्यु इंडीया एश्योरन्स कंपनी लिमिटेड तर्फे विरुध्दपक्ष क्रं-1) विभागीय व्यवस्थापक, विभागीय कार्यालय, मुंबई आणि विरुध्दपक्ष क्रं-2) क्षेत्रीय व्यवस्थापक, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर यांचे विरुध्द वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्यात येते.
(02) विरुध्दपक्ष क्रं-(1) आणि क्रं-(2) विमा कंपनी तर्फे अनुक्रमे विभागीय व्यवस्थापक आणि क्षेत्रीय व्यवस्थापक यांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी उभय तक्रारदार यांचा नात्याने अनुक्रमे मुलगा आणि भाऊ असलेला श्री भूषण याचे अपघाती मृत्यू संबधाने शेतकरी जनता अपघात विमा योजने अंतर्गत देय विमा रक्कम रुपये-1,00,000/- (अक्षरी रुपये एक लक्ष फक्त) सर्व प्रथम तालुका कृषी अधिका-यांकडे विमा दावा दाखल केल्याचा दिनांक-11/07/2013 नंतर विमा दावा मंजूरीच्या प्रक्रियेसाठी लागणारा कालावधी तीन महिने सोडून म्हणजे दिनांक-11.01.2013 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-12% दराने व्याजासह येणारी रक्कम उभय तक्रारदारांना अदा करावी.
(03) विरुध्दपक्ष क्रं-(1) आणि क्रं-(2) विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे उभय तक्रारदारांना झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) विरुध्दपक्ष क्रं-(1) आणि क्रं-(2) विमा कंपनी तर्फे उभय तक्रारदारांना देण्यात यावेत.
(04) विरुध्दपक्ष क्रं-(3) तालुका कृषी अधिकारी यांचे विरुध्द कोणतेही आदेश नाहीत, त्यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
(05) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष दि न्यु इंडीया एश्योरन्स कंपनी लिमिटेड तर्फे विरुध्दपक्ष क्रं-1) विभागीय व्यवस्थापक, विभागीय कार्यालय, मुंबई आणि विरुध्दपक्ष क्रं-2) क्षेत्रीय व्यवस्थापक, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत करावे.
(06) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.