जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,धुळे मा.अध्यक्षा- सौ.व्ही.व्ही.दाणी मा.सदस्य - श्री.एस.एस.जोशी ---------------------------------------- ग्राहक तक्रार क्रमांक – २५०/२०१० तक्रार दाखल दिनांक – १८/०८/२०१० तक्रार निकाली दिनांक – २५/०३/२०१४ श्री.मेहबुब शेख बबन ----- तक्रारदार उ.व. ३४ वर्ष, प्रो.सुरक्षा अॅग्रो राहणार महमंदीनगर,जुने डी.एस.पी. ऑफिसजवळ,देवपूर,धुळे,ता.जि.धुळे. विरुध्द (१)दि.न्यु इंडिया एशोरन्स कंपनी लि. ----- सामनेवाले नोटीसीची बजावणी, शाखाधिकारी दि न्यु इंडिया एशोरन्स कंपनी लि. यशोवल्लभ शॉपींग कॉम्प्लेक्स, महानगरपालीकेजवळ,धुळे ता.जि.धुळे यांचेवर व्हावी. (२)भारतीय स्टेट बॅंक नोटीसीची बजावणी-शाखाधिकारी भारतीय स्टेट बॅंक,जिल्हा परिषदेसमोर,धुळे ता.जि.धुळे यांचेवर व्हावी. न्यायासन (मा.अध्यक्षाः सौ.व्ही.व्ही.दाणी ) (मा.सदस्य: श्री.एस.एस.जोशी) उपस्थिती (तक्रारदारा तर्फे – वकिल श्री.डी.डी.जोशी) (सामनेवाले क्र.१ तर्फे – वकिल श्री.सी.पी.कुलकर्णी) (सामनेवाले क्र.२ तर्फे – वकिल श्री.एम.एस.पाटील) निकालपत्र (द्वाराः मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही.दाणी) तक्रारदार यांनी, सामनेवाले यांच्याकडून विमा पॉलिसीची रक्कम न दिल्याने नुकसान भरपाई मिळण्यासाठी सदर तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम १२ अन्वये या मंचात दाखल केला आहे. (१) तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की, तक्रारदार यांचे धुळे येथे सुरक्षा अॅग्रो या नावाने पेस्टीसाईड नीमतेल उत्पादन करण्याचा व्यवसाय आहे. सदर व्यवसायाचा म्हणजेच कारखाना दुकान त्यातील सामानाचा उत्पादनाचा उत्पादीत माल, साहित्य इत्यादीचा विमा सामनेवाले क्र.२ यांनी सामनेवाले क्र.१ यांचेकडे घेतला आहे. त्याचा कालावधी दि.३१-१२-२००७ ते दि.३१-१२-२००८ असा आहे. धुळे शहरात दि.०५-१०-२००८ रोजी झालेल्या दंगलीत तक्रारदारांचे दुकान-कारखाना हा आग लागून जळालेला आहे. त्यामुळे कारखान्याचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. त्या बाबत सामनेवाले यांना लेखी पत्राने कळविण्यात आले. त्यानंतर सामनेवाले क्र.१ यांनी त्याचा सर्व्हे केला आहे. तक्रारदारांनी सामनेवाले क्र.१ यांना विमा मंजूर करण्याबाबत विनंती केली होती. परंतु सामनेवाले क्र.१ यांनी क्लेम बाबत काहीच निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी सामनेवाले यांना नोटीस पाठविली. त्यास सामनेवाले यांनी खोटे उत्तर देऊन त्यामध्ये तक्रारदार यांनी युरिया व सिड्सचा विमा उतरविला आहे असे विधान केले व सर्व्हेअरचा रिपोर्ट आल्यानंतर कळविण्यात येईल असे कळविले होते. सामनेवाले क्र.१ यांनी क्लेम मंजूर करण्यासाठी विलंब लावलेला असल्याने तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.१ यांच्या विरुध्द या ग्राहक मंचात तक्रार अर्ज क्र.४४३/२००९ दाखल केला होता. त्या तक्रार अर्जाचा दि.०४-०५-२०१० रोजी मंचाने निकाल देऊन तक्रारदाराने १५ दिवसात आवश्यक ती कागदपत्रे सामनेवाले क्र.१ यांना पुरवावीत व सामनेवाले क्र.१ यांनी ३० दिवसात क्लेम निकाली काढावा असा आदेश दिला. या आदेशाप्रमाणे तक्रारदारांनी कागदपत्रांची पुर्तता केली, परंतु सामनेवाले क्र.१ यांनी दि.१८-०६-२०१० रोजीच्या पत्रान्वये क्लेम नामंजूर केला. त्यामुळे सदरचा तक्रार अर्ज तक्रारदारास दाखल करणे भाग पडले आहे. सदर पॉलिसी काढण्यात जी काही चुक झाली त्यात तक्रारदारांची काहीएक चुक नाही. तक्रारदारांनी सामनेवाले क्र.२ यांच्याकडून सन २००३ पासून पेस्टीसाईड नीमतेल उत्पादनासाठी कर्ज घेतलेले आहे, या बाबत तक्रारादारांनी सामनेवाले क्र.२ यांचेसोबत पत्रव्यवहार केलेला आहे. त्याचप्रमाणे सामनेवाले क्र.२ यांनी सामनेवाले क्र.१ यांना दि.११-११-२००८ रोजी दिलेल्या पत्रात बॅंकेच्या अधिका-यांची चुक झाली आहे, असे नमूद केले आहे. त्याचप्रमाणे सामनेवाले क्र.१ यांनी प्रत्यक्षपणे कारखान्याची जागा न पाहता सामनेवाले क्र.२ यांनी पाठविलेल्या कागदपत्रांच्या आधारे विमा पॉलिसी काढून चुक केली आहे. सदर चुकीबद्दल सामनेवाले क्र.१ व २ हे जबाबदार असून त्यांचे विरुध्द तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारदारांची अशी विनंती आहे की, सामनेवाले क्र.१ व २ यांनी वैयक्तिक किंवा संयुक्तिक रित्या रक्कम रु.६,१३,०००/- व्याजासह अदा करावेत. तसेच मानसिक व शारीरिक त्रासाकामी रु.१,००,०००/- व तक्रारीचा खर्च द्यावा. तक्रारदार यांनी नि.नं.३ वर शपथपत्र, नि.नं.५ वरील दस्तऐवज यादी सोबत विमा पॉलिसीची प्रत व सामनेवाले क्र.१ व २ यांचेशी केलेला प्रत्रव्यवहार तसेच क्लेम नामंजूर केल्याचे पत्र इ. कागदपत्रे छायांकीत स्वरुपात दाखल केली आहेत. (२) सामनेवाले क्र.१ यांनी नि.नं.१५ वर खुलासा दाखल केला आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की, सामनेवाले क्र.१ यांनी सेवेत कोणतीही त्रुटी केलेली नाही. तक्रारदारांनी शॉपकिपर्स इन्शुरन्स पॉलिसी घेतलेली होती. तक्रारदारांनी त्यांच्या दुकानातील बियाणे व युरिया यासाठी संरक्षण घेतलेले होते. परंतु नुकसान भरपाईची मागणी ही, पेस्टीसाईड मॅन्युफॅक्चरींग युनिटमधील मालाच्या नुकसान भरपाईसाठी केलेली आहे. सदर विमा पॉलिसीप्रमाणे विमा संरक्षण हे अग्नीउपद्रव व दंगल यामुळे होणा-या नुकसान भरपाईसाठी फक्त रु.३,००,०००/ चे संरक्षण घेतलेले आहे. त्यामुळे तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे रु.६,१३,०००/- चा विमा घेतलेला नाही. सदर संरक्षण हे दुकानातील युरिया व सिड्स स्टॉकसाठी आहे. प्रत्यक्ष आग मॅन्युफॅक्चरींग युनिटला लागलेली होती व तेथे सिड्स व युरियाचा कुठलाही स्टॉक नव्हता. त्यामुळे तक्रारदारांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे ती नुकसान भरपाईच्या विमा कक्षेत येत नाही. सबब सामनेवाले हे नुकसान भरपाई देण्यास जबाबदार नाहीत. तसेच तक्रारदार यांनी सर्व्हे करण्यासाठी कोणतेही सहकार्य केलेले नाही. कोणत्याही कागदपत्रांची पुर्तता न करता क्लेम सेटल करुन घेणे या हेतूने तक्रार अर्ज क्र.४४३/२००९ या मंचात दाखल केला होता. त्यामध्येही विमा पॉलिसीच्या संरक्षणाबद्दल सामनेवालेंचा मुख्य आक्षेप होता. तो दुर होऊ शकत नसल्याने त्या बाबत दि.१८-०६-२०१० रोजीच्या पत्राने तक्रारदारांचा क्लेम नाकारला असे कळविले आहे. सबब सदरचा अर्ज खर्चासह रद्द करण्याची विनंती केली आहे. (३) सामनेवाले क्र.२ यांनी नि.नं.२१ वर खुलासा दाखल केला आहे. त्यात सदर अर्ज नाकारला असून त्यांचे असे म्हणणे आहे की, तक्रारदारांनी काढलेल्या पॉलिसीमध्ये काहीही चुक आढळल्यास त्यास वैयक्तिक रित्या तक्रारदार हेच जबाबदार आहेत. पॉलिसी काढतांना त्यातील मजकूर योग्य आहे किंवा नाही हे बघण्याची जबाबदारी तक्रारदारांची असून, ती जबाबदारी सामनेवाले क्र.२ यांच्यावर ढकलून त्याचा तक्रारदार हे फायदा घेऊ पाहत आहेत. तक्रारदार यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यास सामनेवाले हे कायद्याने बांधील नाहीत. सबब सामनेवाले क्र.२ यांचे विरुध्दचा अर्ज खर्चासह रद् करण्याची विनंती केली आहे. सामनेवाले क्र.१ व २ यांनी अनुक्रमे नि.नं. १६ व नि.नं. २२ वर शपथपत्र दाखल केले आहे. तसेच सामनेवाले क्र.१ यांनी नि.नं.२७ वरील दस्तऐवज यादी सोबत एकूण दहा कागदपत्रे साक्षांकीत सत्यप्रत स्वरुपात दाखल केली आहेत. त्यात तक्रारदारांची विमा पॉलिसी, प्रपोजल फॉर्म, सर्व्हेअरचे पत्र, इ.चा समावेश आहे. (४) तक्रारदार व सामनेवाले यांनी दाखल केलेली कागदपत्रे व सामनेवाले क्र.१ यांचा लेखी युक्तिवाद पाहता तसेच, उभयपक्षांच्या विद्वान वकीलांनी केलेला युक्तिवाद ऐकल्यानंतर आमच्यासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत. मुद्देः | निष्कर्षः | (अ) तक्रारदार हे सामनेवालेंचे ग्राहक आहेत काय ? | : होय | (ब) सामनेवाले यांच्या सेवेत त्रुटी स्पष्ट होते काय ? | : नाही | (क) आदेश काय ? | : अंतिम आदेशा प्रमाणे |
विवेचन (५) मुद्दा क्र. ‘‘अ’’ – तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.२ तर्फे सामनेवाले क्र.१ यांचेकडून विमा पॉलिसी घेतली आहे, ती नि.नं. ५/१ वर दाखल आहे. सदर पॉलिसी सामनेवाले यांनी मान्य केली असून त्याबाबत वाद नाही. याचा विचार होता, तक्रारदार हे सामनेवाले यांचे “ग्राहक” होत असल्याचे स्पष्ट होते. म्हणून मुद्दा क्र. ‘‘अ’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत. (६) मुद्दा क्र. ‘‘ब’’ – तक्रारदार यांनी सदर तक्रार अर्जामध्ये विमा पॉलिसीचा नंबर हा १६०८००-४८-०७-३४-०००००६८७ असा नमूद केला असून याचा कालावधी दि.३१-१२-२००७ ते दि.३१-१२-२००८ एवढीचा माहिती नमूद केलेली आहे. सदर पॉलिसी कोणती व कोणत्या घटनांच्या संरक्षणासाठी घेतलेली आहे हे नमूद केलेले नाही. सदर विमा पॉलिसीची प्रत नि.नं.५/१ वर दाखल आहे. तिचे अवलोकन केले असता सुरक्षा अॅग्रो प्रोप्रायटर मेहेबुब शेख बबन या नावाने व्यवसाय/दुकान या करिता शॉपकिपर्स इन्शुरन्स या कामी पॉलिसी सामनेवाले यांनी दिलेली आहे. यामध्ये विम्याच्या संरक्षणामध्ये समाविष्ठ असलेल्या बाबीमध्ये ... 1. Fire & Allied Perils : Contents,Excluding Money & Valuables,but including Furniture Fixture Fittings and Stock in trade. : Rs .3,00,000/- 2. Burglary,Housebreaking : Rs.3,00,000/- 3. B.Money Insurance : In safe Rs.10,000/- 4. Baggage Insurance : Rs.3,300/- असे नमूद केलेले आहे. या विमा पॉलिसीवरुन असे दिसते की, या वेगवेगळया कारणा करिता होणा-या नुकसान भरपाईकामी सदर विमा पॉलिसीद्वारे विमा संरक्षण दिलेले आहे. तक्रारदार यांनी उपरोक्त नंबरच्या विमा पॉलिसीद्वारे बियाणे व युरिया या दुकानाच्या संरक्षणा करिता शॉपकिपर्स इन्शुरन्स ही पॉलिसी घेतलेली आहे. या पॉलिसीमध्ये संरक्षणाच्या नमुद केलेल्या बाबी क्र.१ ते ४ करिता नुकसान भरपाई ही त्या-त्या रकमेकरीता मर्यादीत आहे असे स्पष्ट होते. (७) तक्रारदारांचे असे म्हणणे आहे की, तक्रारदार यांच्या “सुरक्षा अॅग्रो” या नावाने पेस्टीसाईड नीमतेल उत्पादीत करण्याच्या कारखान्यात दि.०५-१०-२००८ रोजीच्या दंगलीत आग लागून तो पूर्णपणे जळालेला आहे व त्याकामी विनंती कलमानुसार रक्कम रु.६,१३,०००/- नुकसान भरपाईची मागणी करीत आहेत. तसेच “पॉलिसी काढतांना जी काही चुक झाली यामध्ये तक्रारदार यांची चुक नाही, तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.२ कडून कर्ज घेतलेले आहे व ते कर्ज पेस्टीसाईड व नीमतेल या उत्पादनासाठी घेतलेले आहे. त्याबाबत दि.११-११-२००८ रोजीच्या पत्राने सामनेवाले क्र.२ बॅंकेचे अधिका-यांची चुक झालेली आहे”, असे नमूद केलेले आहे. या बाबत दि.११-११-२००८ रोजीचे पत्र नि.नं.५/८ वर दाखल केलेले आहे. या पत्राप्रमाणे बॅंकेच्या संबंधित अधिका-याकडून नजरचुकीने शॉपकिपर्स पॉलिसीचा फॉर्म भरला गेला आहे व त्यात नजरचुकीने स्टॉक सिड्स आणि युरिया असे नमूद करण्यात आले आहे. तक्रारदाराचा तो व्यवसाय नाही. त्याचा व्यवसाय पेस्टीसाईड मॅन्युफॅक्चरींग करण्याचा आहे. तसेच तक्रारदाराचे कुठेही दुकान नाही, असे नमूद करुन पत्राने विमा कंपनीस कळविलेले आहे. या पत्राप्रमाणे असे दिसते की, सामनेवाले क्र.२ बॅंक यांनी सामनेवाले क्र.१ यांना त्यांच्याकडून नजर चुकीने शॉपकिपर्स पॉलिसी काढली गेली व नजरचुकीने स्टॉक सिड्स आणि युरिया हे नमूद केले गेलेले आहे. तसेच तक्रारदार यांचा कोणताही व्यवसाय किंवा दुकान नाही. या बाबतची सर्व माहिती ही नजरचुकीने प्रपोजल फॉर्ममध्ये नमूद केलेली आहे, असे कळविण्याचा प्रयत्न केलेला आहे असे दिसते. या बाबत सामनेवाले विमा कंपनी यांनी प्रप्रोजल फॉर्म व विमा पॉलिसीची साक्षांकीत सत्यप्रत दाखल केलेली आहे. या कागदपत्रांमधील प्रप्रोजल फॉर्मचा विचार करता, तक्रारदार यांनी शॉपकिपर्स इन्शुरन्स पॉलिसी या करिता प्रप्रोजल फॉर्म भरलेला असून तो नि.नं.२७/१ वर दाखल आहे. यामध्ये नमूद केलेली माहिती बिझनेस/ट्रेड यामध्ये सिड्स/युरिया असे नमूद केलेले आहे. तसेच स्टॉक इन ट्रेड कन्सीसटींग यामध्ये मालमत्तेचे वर्णन यामध्ये सिड्स/युरिया असे नमूद करुन विमा संरक्षण रु.३,००,०००/- या कामी विमा हप्ता रु.६७५/- असा नमूद केलेला आहे. तसेच या विमा पॉलिसीची साक्षांकीत सत्यप्रत नि.नं. २७/४ वर दाखल केलेली आहे. त्याचे अवलोकन केले असता यामध्ये तक्रारदारांच्या नावाने शॉपकिपर्स इन्शुरन्स पॉलिसी दिलेली असून, त्यामध्ये बिझनेस शॉप नमूद केलेला असून, त्यात फायर अलाईड या कामी होणा-या नुकसान भरपाईस रक्कम रु.३,००,०००/- विमा संरक्षण दिलेले आहे असे दिसते. या दोन्ही कागदपत्रांप्रामणे असे स्पष्ट होते की, तक्रारदार यांनी शॉपकिपर्स इन्शुरन्स पॉलिसी घेतलेली असून त्यामध्ये संरक्षणाच्या बाबी नमूद क्र. १ ते ४ याकरिता वेगवेगळया रकमेस संरक्षण दिलेले आहे. (८) या बाबत तक्रारदारांचे असे म्हणणे आहे की, प्रप्रोजल फॉर्मवर पॉलिसी घेतांना नजर चुकीने सदर पॉलिसी ही शॉपकिपर्स पॉलिसी व स्टॉक युरिया सिड्स या बाबत माहिती नमूद केली गेली आहे. परंतु हे म्हणणे योग्य नाही. कारण कोणत्याही नजरचुकीने नमूद केलेल्या मजकूराबाबतची चुक ही एकदाच होऊ शकते. सदरचा मजकूर हा पुन्हा-पुन्हा नमूद केला गेला आहे. या दोन्ही कागदपत्रांमध्ये जो मजकूर नमूद केला आहे तो पूर्णपणे योग्य व बरोबर आहे. तो नजरचुकीने नमूद केला गेला आहे असे म्हणणे योग्य होणार नाही. त्यामुळे या दोन्ही कागदपत्रांचा विचार करता, तक्रारदारांनी शॉपकिपर्स पॉलिसी घेतली आहे हे स्पष्ट होते. (९) या कागदपत्रांमध्ये सामनेवाले क्र.२ बॅंकेने नजरचुकीने विमा पॉलिसीत मजकूर नमूद केला गेला आहे असे म्हटले आहे. परंतु ते योग्य नाही. कारण सदर पॉलिसी ही तक्रारदारांनी सामनेवाले क्र.१ यांच्याकडून घेतलेली आहे. त्यामुळे सदर विमा पॉलिसीचा करार हा तक्रारदार व सामनेवाले क्र.१ विमा कंपनी यांचमध्ये झालेला आहे. त्यामुळे त्यामध्ये माहिती देण्याची जबाबदारी ही तक्रारदारांची आहे. त्यामुळे ती योग्य आहे किंवा नाही हे पडताळून पाहण्याची जबाबदारी ही तक्रारदार यांचीच आहे. जर त्यामध्ये चुक झाली असल्यास त्यास बॅंकेला जबाबदार धरता येणार नाही. पॉलिसीची माहिती देणे ही तक्रारदाराची जबाबदारी आहे. तसेच सदर पॉलिसीप्रमाणे पॉलिसीची नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी सामनेवाले विमा कंपनीची आहे. सदर पॉलिसी ही तक्रारदारांच्या नांवे दिलेली असून, त्याकामी आवश्यक असलेला विमा हप्ता हा तक्रारदार यांनी भरलेला आहे. त्यामुळे सदर पॉलिसीमध्ये असलेला मजकूर किंवा नमूद असलेल्या बाबी या तक्रारदार यांच्यावर बांधील आहेत. त्यास सामनेवाले क्र.२ बॅंक ही जबाबदार होऊ शकत नाही. तक्रारदारास ही चुक सामनेवाले बॅंकेवर लादता येणार नाही, असे या मंचाचे मत आहे. सदर पॉलिसी घेतांना चुक झालेली आहे हे तक्रारदारांनी सदर अर्जामध्ये मान्य केलेले आहे. परंतु तक्रारदार हे केवळ बॅंकेचे दि.११-११-२००८ रोजीच्या पत्राचा आधार घेऊन सामनेवाले यांच्यावर जबाबदारी लादण्याचा प्रयत्न करीत आहेत असे दिसते, ते योग्य व रास्त नाही असे आमचेमत आहे. (१०) वरील सर्व कागदपत्रांप्रमाणे तक्रारदारांनी शॉपकिपर्स इन्शुरन्स पॉलिसी घेतलेली असून तक्रारदारांच्या दुकानाचे नुकसान झालेले नाही. त्यामुळे शॉपकीपर्स इन्शुरन्स पॉलिसी प्रमाणे त्या बाबत नुकसान भरपाई देण्यास विमा कंपनी जबबादार होऊ शकत नाही. त्यामुळे सामनेवालेंच्या सेवेत त्रुटी नाही या निष्कर्षास आम्ही आलो आहोत. म्हणून मुद्दा क्र. ‘‘ब’’ चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत. (११) मुद्दा क्र. ‘‘क’’ – वरील सर्व बाबीचा विचार होता खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येत आहे. आदेश (१) तक्रारदारांचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे. (२) तक्रार अर्जाचे खर्चाबाबत कोणताही आदेश नाही. धुळे. दिनांक २५/०३/२०१४ (श्री.एस.एस.जोशी) (सौ.व्ही.व्ही.दाणी) सदस्य अध्यक्षा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे. (महाराष्ट्र राज्य) |