तक्रारदार स्वत:
जाबदेणार क्र.1 एकतर्फा
सी अॅन्ड सी असोसिएट्स व अॅड प्रसन्न दराडे जाबदेणार क्र. 2 व 3 तर्फे
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
द्वारा- श्रीमती. अंजली देशमुख, मा. अध्यक्ष
निकालपत्र
दिनांक 22 जानेवारी 2013
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
1. तक्रारदार सोनी इरिक्सनचे दोन हॅन्डसेट गेल्या सहा वर्षापासून वापरत असल्यामुळे सोनी इरिक्सनचा हॅन्डसेट विकत घेण्याचे ठरविले. तक्रारदारांनी दिनांक 09/07/2011 रोजी जाबदेणार क्र.1 यांच्या मोबाईल स्टोअर मधून सोनी इरिक्सनचा हॅन्डसेट खरेदी केला. दोन वर्षांची वॉरंटी देण्यात आली होती. हॅन्डसेट खरेदी पासून एका महिन्यातच म्हणजेच दिनांक 29/08/2011 रोजी तक्रारदारांचा हॅन्डसेट बंद पडला. म्हणून तक्रारदारांची पत्नी सोनी इरिक्सनचे अधिकृत सर्व्हिस सेन्टर, अॅसेल केअर सेन्टर, शिवाजीनगर, पुणे 411005 येथे हॅन्डसेट घेऊन गेल्या असता हॅन्डसेटची तपासणी करण्यात आली. हॅन्डसेट मध्ये दुरुस्ती करावी लागेल परंतू ती दुरुस्ती तक्रारदारांनी बाहेरुन करुन आणल्यामुळे हॅन्डसेट टॅम्पर झाल्याचे सांगून जरी वॉरंटीचा कालावधी असला तरीही दुरुस्तीचा खर्च – मदरबोर्ड बदलणे आवश्यक आहे त्याचा अंदाजे खर्च रुपये 8400/- तक्रारदारांना करावा लागेल असे तक्रारदारांना सांगण्यात आले. त्यास तक्रारदारांनी सहमती दर्शविली नाही आणि बाहेरुन कुठूनही दुरुस्ती केलेली नसल्याचे सांगितले परंतू सर्व्हिस सेन्टर मध्ये तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले नाही. त्यानंतर तक्रारदार मोबाईल स्टोअर्स, जंगली महाराज रोड येथे हॅन्डसेट घेऊन गेले असता तेथेही त्यांना असेच सांगण्यात आले. तसेच पॅक बॉक्स उघडला की त्यांची जबाबदारी संपते त्यामुळे तक्रारदारांना सर्व्हिस सेन्टर मध्ये जाण्यास सांगण्यात आले. त्यानंतर तक्रारदारांनी सोनी इरिक्सन यांना लिहीलेले दिनांक 03/09/2011 रोजीचे पत्र सर्व्हिस सेन्टर येथे दिले. तक्रारदारांनी अनेक वेळा जाबदेणार यांना फोन केले, मेल पाठविले, प्रत्यक्ष भेटले परंतू तरीही तक्रारदारांचा हॅन्डसेट नि:शुल्क दुरुस्त दिला नाही. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार सर्व्हिस सेन्टर येथे दिनांक 3/11/2011 रोजी हॅन्डसेट नेला असता त्याच दिवशीची वर्क ऑर्डर क्र SE 31163013599 काढण्यात आली व हॅन्डसेट सर्व्हिस सेन्टर कडे देण्यात आला होता. परंतू तक्रारदारांना हॅन्डसेट दुरुस्त करुन परत मिळालेला नाही म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून सोनी इरिक्सनचा स्विडन येथे उत्पादित झालेला नवीन हॅन्डसेट दोन वर्षाच्या वॉरंटीसह मागतात. अथवा जाबदेणार यांनी तक्रारदारांचा हॅन्डसेट परत घ्याचा व हॅन्डसेट खरेदीची किंमत 18 टक्के व्याजासह परत मिळावी अशी मागणी करतात. तसेच नुकसान भरपाई पोटी रुपये 50,000/-, जाण्यायेण्याचा व दुरध्वनीचा खर्च रुपये 2,000/-, तक्रारीचा खर्च रुपये 5000/- तक्रारदार मागतात. तसेच चीन मध्ये उत्पादित होऊन भारतात विक्री केले जाणारे सर्व हॅन्डसेट जाबदेणार यांनी काढून घ्यावेत अशीही मागणी तक्रारदार करतात. तक्रारदारांनी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
2. जाबदेणार क्र.1 यांना मंचाची नोटीस लागूनही गैरहजर. म्हणून जाबदेणार क्र.1 यांच्याविरुध्द मंचाने दिनांक 28/3/2012 रोजी एकतर्फा आदेश पारीत केला.
3. जाबदेणार क्र.2 व 3 यांनी लेखी जबाब दाखल करुन तक्रारदारांच्या मागणीस विरोध दर्शविला. जाबदेणार क्र.2 व 3 यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदारांनी सप्टेंबर 2011 मध्ये हॅन्डसेट दुरुस्तीसाठी आणलेला होता. हॅन्डसेटची पाहणी केली असता तो टॅम्पर झाल्याचे दिसून आले. हॅन्डसेट टॅम्पर झाल्यामुळे दुरुस्तीचा खर्च तक्रारदारांना दयावा लागेल असे सांगण्यात आले होते. तक्रारदारांनी दुरुस्ती खर्चाचे जे एस्टिमेट दिले होते त्यास नकार दिला. हॅन्डसेट दुरुस्त न करताच तक्रारदारांना परत करण्यात आला. त्यावेळी जाबदेणार यांनी अॅथोराईज्ड सर्व्हिस सेन्टर येथे हॅन्डसेट घेऊन जाण्यास सांगितले. त्यानंतर दिनांक 3/11/2011 रोजी तक्रारदार अॅथोराईज्ड सर्व्हिस सेन्टर येथे हॅन्डसेट घेऊन गेले असता “can’t power on” ही समस्या होती. हॅन्डसेटची तपासणी केल्यानंतर जॉबशिट मध्ये “Scratches & Tempered PCB” असे नमूद करण्यात आले. जाबदेणार हॅन्डसेट दुरुस्तीसाठी तयार होते परंतू त्यासाठीचा येणा-या खर्चाची रक्कम तक्रारदार देण्यास तयार नसल्यामुळे हॅन्डसेट दुरुस्ती करण्यात आली नव्हती. त्यामुळे जाबदेणार यांच्या सेवेत त्रुटी नाही. तक्रारदारांनी हॅन्डसेट मध्ये उत्पादकीय दोष असल्या संदर्भात तज्ञाचा अहवाल दाखल केलेला नाही. वरील कारणांवरुन तक्रार नामंजुर करावी अशी मागणी जाबदेणार करतात. जाबदेणार यांनी लेखी जबाबामध्ये मा. वरिष्ठ न्यायालयांचे निवाडे नमूद केले. लेखी जबाबासोबत कागदपत्रे व शपथपत्राची छायांकीत प्रत दाखल केली.
4. तक्रारदारांनी पुराव्याचे शपथपत्र दाखल करुन जाबदेणार यांचा लेखी जबाब नाकारला.
5. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार त्यांच्याकडे प्रस्तूत तक्रारीत नमूद केलेला हॅन्डसेट खरेदी करण्यापूर्वी सोनी इरिक्सन कंपनीचेच दोन हॅन्डसेट होते. म्हणून त्यांनी सोनी इरिक्सनचाच हॅन्डसेट खरेदी करण्याचे ठरविले व दिनांक दिनांक 09/07/2011 रोजी जाबदेणार क्र.1 यांच्या मोबाईल स्टोअर मधून हॅन्डसेट खरेदी केला. हॅन्डसेट खरेदी केल्यापासून एका महिन्यातच म्हणजेच दिनांक 29/8/2011 रोजी तो नादुरुस्त झाला. तक्रारदारांनी जाबदेणार यांच्या अॅथोराईज्ड सर्व्हिस सेन्टर मध्ये हॅन्डसेट दुरुस्तीसाठी सप्टेंबर 2011 मध्ये दिलेला होता ही बाब जाबदेणार लेखी जबाबामध्ये मान्य करतात. जाबदेणारांच्या म्हणण्यानुसार हॅन्डसेट टॅम्पर झाला होता, तक्रारदारांनी हॅन्डसेट बाहेरुन दुरुस्त करुन आणलेला होता. परंतू यासंदर्भात जाबदेणार यांनी कुठलाही पुरावा – जॉबशिट दाखल केलेले नाही. जाबदेणार यांच्याकडे तज्ञ व्यक्ती असतात त्यांचे कुणाचेही शपथपत्र जाबदेणार यांनी दाखल केलेले नाही. तसेच हॅन्डसेट टॅम्पर झाला म्हणजे नेमके काय झाले होते, त्यामध्ये नेमकी कोणती दुरुस्ती करण्यात आली होती, ती दुरुस्ती कशा प्रकारे केली जाते याबद्यलचा कुठलाही पुरावा मंचात दाखल करण्यात आलेला नाही. जाबदेणार यांनी केवळ फोटो दाखल केलेले आहेत परंतू त्यावरुन वर नमूद केल्याप्रमाणे टॅम्परींबाबत स्पष्टीकरण दिले नाही. त्यामुळे मंचास टॅम्परींग बद्यलची माहिती कळू शकलेली नाही. हॅन्डसेट जर टॅम्पर्ड झालेला असेल तर वॉरंटी कालावधीत दुरुस्तीचा खर्च ग्राहकांनी – तक्रारदारांनी करावयाचा असतो असे जाबदेणार यांचे म्हणणे आहे. परंतू यासंदर्भात कुठल्याही अटी किंवा शर्ती जाबदेणार यांनी दाखल केलेल्या नाहीत. केवळ लेखी जबाबात नमूद करुन चालणारे नाही. तसेच सदरहू हॅन्डसेट तक्रारदारांना परत करण्यात आला होता असे जाबदेणार लेखी जबाबामध्ये नमूद करतात. परंतू त्यासंदर्भात कोणताही कागदोपत्री पुरावा जाबदेणार यांनी मंचासमोर दाखल केलेला नाही. वॉरंटी कालावधीतच हॅन्डसेट मध्ये दोष निर्माण झाल्यामुळे मंच जाबदेणार यांना असा आदेश देतो की त्यांनी तक्रारदारांचा हॅन्डसेट पुढील दोन वर्षांच्या वॉरंटी सह दुरुस्त करुन दयावा आणि तक्रारदारांना जो मानसिक, शारिरीक, आर्थिक त्रास सहन करावा लागला त्याबद्यल नुकसान भरपाई म्हणून रुपये 3,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1,000/- दयावा. तक्रारदारांनी जाबदेणार यांच्याकडून सोनी इरिक्सनचा स्विडन येथे उत्पादित झालेला नवीन हॅन्डसेट दोन वर्षाच्या वॉरंटीसह मिळावा किंवा हॅन्डसेटची खरेदीची किंमत 18 टक्के व्याजासह परत मिळावी अशी मागणी केलेली आहे. परंतू तक्रारदारांनी हॅन्डसेट मध्ये उत्पादकीय दोष होता याबद्यलचा पुरावा, तज्ञाचा अहवाल दाखल केलेला नाही. त्यामुळे तक्रारदारांची ही मागणी मंच नामंजुर करीत आहे. तसेच चीन मध्ये उत्पादित होऊन भारतात विक्री केले जाणारे सर्व हॅन्डसेट जाबदेणार यांनी काढून घ्यावेत अशीही मागणी तक्रारदार करतात. परंतू पुराव्या अभावी तक्रारदारांची ही मागणी मंच नामंजुर करीत आहे.
वर नमूद विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन खालील प्रमाणे आदेश देण्यात येत आहे.
:- आदेश :-
[1] तक्रार अंशत: मान्य करण्यात येत आहे.
[2] जाबदेणार क्र. 1 ते 3 यांनी वैयक्तिकरित्या आणि संयुक्तिकरित्या
तक्रारदारांचा हॅन्डसेट पुढील दोन वर्षांच्या वॉरंटी सह दुरुस्त करुन दयावा. आदेशाची पुर्तता आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत करावी.
[3] जाबदेणार क्र. 1 ते 3 यांनी वैयक्तिकरित्या आणि संयुक्तिकरित्या तक्रारदारांना नुकसान भरपाई म्हणून रुपये 3,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1,000/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावा.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.