निकालपत्र :- (दि.13/12/2010) ( सौ. प्रतिभा जे. करमरकर,सदस्या) (1) तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी :- तक्रारदाराचे पती मयत गणपती रामचंद्र कानडे हे स्टेट बॅंक ऑफ इंडिया(शाखा-गारगोटी) येथे हेड वॉचमन म्हणून काम करीत होते. त्यांनी सामनेवाला क्र.2 क्रेडीट सोसायटी मार्फत सामनेवाला क्र.1 यांच्याकडून ‘’ जनता व्यक्तीगत दुर्घटना विमा’’ या समूह विमा योजनेअंतर्गत विमा पॉलीसी दि.15/10/1997 रोजी उतरवली होती. सदर पॉलीसीचा कालावधी दि.15/10/1997 ते 14/10/2007 पर्यंत होता व पॉलीसीचा क्र.160503/47/61/772/97 असा होता. तक्रारदाराने सामनेवाला क्र.2 यांना आवश्यक पक्षकार म्हणून सदर तक्रारीत अंतर्भूत घेतले आहे. परंतु त्यांच्याविरुध्द तक्रारदाराची कुठलीही मागणी नाही. (02) तक्रारदार आपल्या तक्रारीत पुढे सांगतात,यातील विमाधारक मयत गणपती कानडे हे माजी सैनिक होते व ते स्टेट बँक ऑफ इंडिया,शाखा-गारगोटी येथे वॉचमन म्हणून काम करीत होते. ते दौलतवाडी ता.कागल येथे रहात होते. तेथे त्यांचे मोठे घर व 10 एकर शेती असून त्यांचे कुटूंब समाधानात रहात होते. त्यांना शिकारीची आवड होती व त्यांच्याकडे लायसन्स असलेली 12 बोअर एकनाळ बंदूक होती. दि.12/11/2001 रोजी रात्री त्यांचे प्रेत शेताजवळील ओढयाच्या पात्राच्या वरील बाजूस पडलेले त्यांचा मुलगा राजकुमार याला आढळले. या घटनेबाबत मयताचे मोठे भाऊ श्री मारुती रामचंद्र कानडे यांनी मुरगुड पोलीसांकडे वर्दी दिली. त्याची नोंद अ.म.र.नं.28/2001 दि.12/11/001 अशी आहे. याबाबत पोलीसांनी चौकशी केलेली आहे. सदरचे पेपर्स कामी हजर केलेले आहेत. या कामी पोलीस, वैद्यकीय निष्कर्षावरुन मयत यांचा मृत्यू अपघाती मृत्यू असा आलेला आहे. सदरचे घटनेमध्ये मयत गणपती रामचंद्र कानडे यांचा केवळ अपघाती मृत्यू झालेला होता. त्यांनी आत्महत्या केलेली नव्हती व कोणताही घातपाताचा प्रकारही नव्हता व नाही व तसे असण्याचे कोणतेही कारण घडलेले नव्हते व नाही. या अपघाती मृत्यूबाबत तक्रारदाराने सामनेवाला विमा कंपनीकडे सव्र कागदपत्रांसह क्लेम दाखल केला. सामनेवाला विमा कंपनीने दि.04/09/2002 रोजी तक्रारदारांना पत्र पाठवून वरील दाव्यासंबंधी सादर केलेल्या कागदपत्रांवरुन प्रामुख्याने मयताचे बंधू यांचे जबाबावरुन सदर केस ही आत्महत्या असल्याचे स्पष्ट होते.’’ असे कारण सांगून सामनेवाला विमा कंपनीने सदर क्लेम नामंजूर केला. सामनेवाला क्र.1 विमा कंपनीचे दि.04/8/2002, 19/03/2003 व 22/03/2003 या 3 ही पत्रामध्ये विमा कंपनीने केवळ श्री मारुती रामचंद्र कानडे यांचे वर्दी जबाबावरच भर देऊन सदर मयत गणपती रामचंद्र कानडे यांचा अपघाती मृत्यू हा आत्महत्या ठरविलेला आहे. त्यानंतरही तक्रारदार क्र.1 यांनी सामनेवाला क्र.1 विमा कंपनीकडे पोलीस स्टेशनचा फायनल इन्व्हेस्टीगेशन रिपोर्ट व सब डिव्ही. मॅजिस्ट्रेटची समरी या कागदपत्रांचे प्रती दि.17/07/2003 रोजी प्रत्यक्ष सादर केल्या ज्या प्रती तक्रारदार क्र.1 यांना दि.12/06/2003 रोजी मिळालेल्या होत्या. यातील तक्रारदार क्र.1 यांनी सामनेवाला क्र.1 विमा कंपनीकडे या दाव्याबाबत संबंधीत अधिक-यांकडे अनेकवेळा विचारणा केली, हेलपाटे मारले. सर्वात शेवटी दि.04/05/2004 रोजीच्या व दि.21/05/2004 चे रजि.ए.डी.रिमाईन्डर पत्राव्दारे सदर दाव्याचे कामी सादर केलेली कागदपत्रे विचारात घेऊन दावा लवकरात लवकर सेटल करणेची विनंती केली. मात्र सामनेवाला क्र.1 विमा कंपनीने अदयापही काहीही कळविलेले नाही. तक्रारदाराने सामनेवाला क्र.1 विमा कंपनीकडे सादर केलेल्या कागदपत्रांवरुन मयत गणपती रामचंद्र कानडे यांचा दि.12/11/001 रोजी सदर घटनेमध्ये अपघाती मृत्यू झाल्याचे स्पष्टपणे दिसून येते. सदर कागदपत्रे विचारात न घेता विमा कंपनीने केवळ श्री मारुती रामचंद्र कानडे यांचे वर्दी जबाबावरच भर देऊन मयत गणपती रामचंद्र कानडे यांचा अपघात मृत्यू हा आत्महत्या ठरविलेला आहे व तक्रारदाराचा कायदेशीर व योग्य असणारा क्लेम पुर्णपणे बेकायदेशीर, खोटे, चुकीचे, अयोग्य व कायदोपत्री पुराव्याचा विचार न करता नाकारला आहे. ही सामनेवालांच्या सेवेतील गंभीर त्रुटी आहे. म्हणून त्याविरुध्द दाद मागण्यासाठी तक्रारदाराने प्रस्तुत मंचाचा दरवाजा ठोठावला आहे व आपल्या पुढीलप्रमाणे मागण्या मान्य व्हाव्यात म्हणून विनंती केली आहे. नुकसान भरपाईची रक्कम रु.1,15,000/-, मानसिक त्रासापोटी रक्कम रु.25,000/-, प्रवास खर्च व पोस्टेज, असुविधा इत्यादीकरिता रक्कम रु.15,000/-, तक्रारीचा खर्च रु.5,000/- सामनेवाला यांचेकडून वसुल होऊन मिळावेत अशी विनंती सदर मंचास तक्रारदाराने केली आहे. (03) तक्रारदाराने आपल्या तक्रारीसोबत श्री मारुती कानडे यांचा वर्दी जबाब, इन्क्वेस्ट पंचनामा, बंदूकीचा पंचनामा, घटनास्थळाचा पंचनामा, राजकुमार कानडे यांचे व इतर 6 जणांचे पोलीस तपास टिपण, श्री मारुती कानडे यांचा पुरवणी जबाब, डिएसओ यांचेकडे पोलीसांनी सादर केलेला अंतीम अहवाल, मयताचे पोस्ट मार्टेमची कागदपत्रे, मयताचा मृत्यू दाखला, पॉलीसी, सामनेवाला क्र.2 यांचे पत्र, पेपर कटींग, सामनेवाला क्र.1 यांचे पत्र, मयताचा बंदूकीचा परवाना, तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.1 यांना दिलेले पत्र, डिएमओ करवीर यांचा आदेश, एलआयसी यांचे पत्र व चेकची झेरॉक्स इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (04) सामनेवाला कंपनीने आपल्या कथनात तक्रारदाराची विमा पॉलीसी मान्य केली आहे. परंतु तक्रारदाराच्या इतर सर्व कथनाला तीव्र आक्षेप घेतला आहे. सामनेवाला आपल्या म्हणणेत पुढे असे कथन करतात की, तक्रारदाराचा क्लेम नामंजूर करण्यापूर्वीही म्हणजे दि.15/04/2002, 04/09/2002 व दि.19/03/2003 रोजी तक्रारदारांना पत्र पाठवून आवश्यक कागदपत्रे पाठवून देण्याविषयी कळवले होते. परंतु तक्रारदाराने सदर कागदपत्रे पाठवली नाहीत. यातील मयत गणपती कानडे हे दि.12/11/2001 रोजी संध्याकाळी डयूटीवर जाणार होते. ते दुपारी 3.00 चे सुमारास बंदूक घेऊन शेताकडे गेले. संध्याकाळी 6 वाजून गेले तरी ते आले नाहीत म्हणून त्यांची शोधाशोध सुरु झाली. रात्री सुमारे 8.00 वाजणेच्या सुमारास त्यांचे प्रेत शेताकडील बांधाजवळ जखमी अवस्थेत सापडले. प्रेताजवळ त्यांची बंदूक होती मयत गणपती कानडे यांचे मोठे भाऊ मारुती रामचंद्र कानडे यांनी रात्री सदर प्रेत बघून पोलीस स्टेशनमध्ये वर्दीजबाब दिला आहे. सदर जबाबात ते स्पष्टपणे म्हणतात की,’’ दुपारी 3 ते 6 या मुदतीत गणपती कानडे यांनी आपले शेतात बंदूकीची गोळी स्वत:हून घालून घेऊन जखमी होऊन मयत झाले आहे. त्यांचे मृत्यूचे कारणाबाबत संशय नाही.’’ मारुती कानडे यांनी दिलेल्या या वर्दी जबाबावरुन हे स्पष्ट होत आहे की मयत गणपती कानडे यांनी स्वत:ला गोळी मारुन घेऊन आत्महत्या केली आहे. त्याचा मृत्यू हा अपघाताने झालेला नाही. विमा पॉलीसीच्या नियमाप्रमाणे विमाधारकाचा मृत्यू हा अपघात नसून आत्महत्येने झालेला असल्यामुळे विमा पॉलीसीतील अटी व शर्तीप्रमाणे पूर्ण विचार करुन व योग्य कारणानेच तक्रारदाराचा क्लेम नामंजूर केला आहे व त्यामध्ये सामनेवालांची कुठलीही सेवात्रुटी नाही. पूर्ण जबाबदारीने घेतलेला सदर निर्णय सामनेवाला यांनी तक्रारदाराला दि.22/03/2003 रोजीच कळवला आहे. त्यामुळे तक्रारदाराची तक्रार ही चुकीच्या कारणाने केली आहे. सबब प्रस्तुत तक्रार खर्चासह काढून टाकावी अशी मागणी सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे. (05) सामनेवाला यांनी आपल्या लेखी म्हणणेसोबत कोणतेही कागदपत्रे दाखल केलेली नाहीत. (06) सामनेवाला क्र. 3, 4 व 5 यांनी आपल्या लेखी म्हणणेमध्ये तक्रारदाराची तक्रार मान्य केली आहे. ते आपल्या तक्रारीत पुढे सांगतात, सामनेवाला क्र.3 हे मयत गणपती कानडे यांचा मुलगा असून सामनेवाला क्र.4 व 5 हया त्यांच्या मुली आहेत. तक्रारदारांनी तक्रारीत नमुद केलेला सर्व मजकूर खरा व बरोबर असून तो मान्य आहे. (07) सामनेवाला क्र. 3 ते 5 यांनी आपल्या लेखी म्हणणेसोबत कोणतेही कागदपत्र दाखल केलेले नाहीत. (08) या मंचाने दोन्ही बाजूंच्या वकीलांनी केलेले युक्तीवाद ऐकले. तसेच त्यांनी दाखल केलेले कागदपत्रे तपासले. सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदाराची पॉलीसी मान्य केली आहे. त्यामुळे तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत हे निर्विवाद आहे. मारुती कानडे मयत गणपती कानडेचा मोठा भाऊ असून त्यांचा वर्दीजबाब विचारात घेऊन मयत गणपतीने आत्महत्या केल्यामुळे सामनेवालाने तक्रारदाराचा विमा क्लेम नामंजूर केला आहे. (09) याबाबतीत एक गोष्ट स्वयंस्पष्ट आहे की मयत गणपती कानडे याचा मृत्यू बंदूकीची गोळी लागून झाला याबाबतीत वाद नसला तरी सदर घटना अपघात होता किंवा आत्महत्या हे पाहणारा कुणीही प्रत्यक्ष साक्षीदार नाही ज्या मारुती कानडे यांच्या वर्दीजबाबावर आधारुन सामनेवालाने तक्रारदाराचा विमा क्लेम नामंजूर केला आहे त्या मारुती कानडेसुध्दा घटना घडल्यानंतर 3 ते 4 तासांनी मयत गणपती कानडेचे प्रेत पाहून पोलीस वर्दी दिली आहे. मारुती कानडे यानेही नंतर अॅफिडेव्हीट करुन सदर घटना ही आत्महत्या नसून अपघात असल्याचे कथन केले आहे. त्यावेळी मारुती कानडे व्यतिरिक्त मयत गणपती कानडेचा मुलगा, पत्नी, भाऊ व अन्य काही नातेवाईकांचे जबाब दाखल केले आहेत. त्यानुसार मयत गणपती कानडेचा मृत्यू अपघाताने गोळी उडून झाला असल्याचे म्हटले आहे. पोस्ट मार्टेम रिपोर्टमध्येही गोळीच्या जखमे व्यतिरिक्त बांधावरुन चालताना पाय घसरून पडल्यामुळे शेतातील लाकूड छातीत(फुफ्फुसात) घुसले व त्यामुळे रक्तस्त्राव होऊन मृत्यू झाला असे वर्णन आले आहे. मयत गणपतीच्या चेह-यावर, छातीवर, अंगावर इतरत्र जखमांच्या वर्णनावरुनही मयत गणपती शेताकडील बांधावरुन घसरुन पडल्यामुळे मृत्यू आल्याच्या तक्रारदाराच्या कथनाला पुष्टी मिळते. सामनेवाला यांना मयत गणपती कानडेचा मृत्यू आत्महत्येनेच झाला असे निसंदिग्धपणे सिध्द करता आलेले नाही. त्यामुळे मयत गणपती कानडेच्या मृत्यूबाबत अपघाताचे कारण हे मंच ग्राहय धरत आहे व पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते. 2) सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारास पॉलीसी क्लेमप्रमाणे रक्कम रु.1,15,000/- (रु. एक लाख पंधरा हजार फक्त) नुकसानभरपाई दि.23/03/2003 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह दयावी. 3) सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.2,000/-(रु.दोन हजार फक्त) व तक्रारीचा खर्च रक्कम रु.2,000/-(रु. दोन हजार फक्त) दयावा.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |