( आदेश पारित द्वारा मा. सदस्या, श्रीमती गीता रा. बडवाईक)
-- निकालपत्र --
( पारित दि. 28 फेब्रुवारी, 2013)
तक्रारकर्तीने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 अंतर्गत दाखल केलेली आहे. तक्रारकर्तीची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणेः-
1. विरूध्द पक्ष 1 व्हिडिओकॉन कंपनीचे फ्रीज तयार करतात. तक्रारकर्तीने दिनांक 13/06/2007 ला मॉडेल नंबर एस-332 असलेला व्हिडिओकॉन कंपनीचा फ्रीज रू. 13,500/- इतक्या किमतीत विरूध्द पक्ष 2 यांच्याकडून खरेदी केला. सदर फ्रीज खरेदी करतेवेळी तक्रारकर्तीला Owner’s Manual व Warranty Card देण्यात आले, ज्यामध्ये फ्रीज ची वॉरन्टी ही 6 वर्षाची होती. तक्रारकर्तीने फ्रीज खरेदी केल्यापासून तो दिनांक 20/08/2010 पर्यंत सुरळित सुरू होता. त्यानंतर त्याचे कुलिंग बंद झाले. त्यामुळे तक्रारकर्तीने विरूध्द पक्ष 2 ला टेलिफोनद्वारे दिनांक 20/08/2010 ला सूचना दिली तसेच दिनांक 25/08/2010 ला विरूध्द पक्ष 1 यांच्याकडे तक्रार क्रमांक 156 अन्वये तक्रार नोंदविली.
2. विरूध्द पक्ष यांनी त्यांचे मेकॅनिक श्री. आरिफ भाई यांना पाठविले. त्यांनी कॉम्प्रेसरमध्ये गॅस भरून दिला व त्याबाबतचे रू. 2,000/- तक्रारकर्तीकडून घेतले. दिनांक 01/05/2011 ला परत फ्रीजमध्ये तोच दोष निर्माण झाला. त्यामुळे तक्रारकर्तीच्या पतीने विरूध्द पक्ष 1 यांच्याकडे दिनांक 02/05/2011 ला तक्रार नोंदविली. परंतु त्यांनी त्याबाबत कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे दिनांक 24/05/2011 ला वकिलामार्फत विरूध्द पक्ष यांना नोटीसेस पाठविल्या. विरूध्द पक्ष 1 यांनी नोटीस घेण्यास नकार दिला. तसेच विरूध्द पक्ष 2 ने नोटीस प्राप्त झाल्यावर तक्रारकर्तीला दूरध्वनीद्वारे सूचित केले की, विरूध्द पक्ष 1 चा मेकॅनिक हितेश परमार यांना पाठविण्यात येत आहे. सदर
मेकॅनिकने फ्रीजची तपासणी केल्यानंतर त्याने फ्रीज परत दुरूस्त करून गॅस भरून दिला व त्याबाबतचे रू. 1800/- तक्रारकर्तीकडून घेतले. परंतु फ्रीज सुरू झाला नाही. त्यामुळे तक्रारकर्तीच्या पतीने परत विरूध्द पक्ष 1 यांच्याकडे तक्रार क्रमांकः NAG 2704/12/0144 अन्वये तक्रार केल्यानंतर विरूध्द पक्ष 1 यांनी तक्रारकर्ती व तिच्या पतीच्या गैरहजेरीमध्ये मेकॅनिकला पाठविले. त्यावेळी तक्रारकर्तीची सून घरी हजर होती. सदर मेकॅनिकने तक्रारकर्तीच्या सूनेला ‘गॅस कीट बदलवावी लागेल’ असे सांगितले.
3. तक्रारकर्तीचे म्हणणे आहे की, त्यांनी स्वतःच्या सुविधेकरिता फ्रीज खरेदी केला. विरूध्द पक्ष यांनी 6 वर्षाची वॉरन्टी देऊनही फ्रीजमध्ये निर्मिती दोष फ्रीज खरेदी केल्यापासूनच निर्माण झालेला आहे तसेच 3 वर्षापासून सदर फ्रीज संपूर्णपणे बंद झालेला आहे. त्यांनी वारंवार विरूध्द पक्ष यांच्याकडे तक्रारी करून देखील विरूध्द पक्ष यांनी फ्रीजची समाधानकारक दुरूस्ती करून दिलेली नाही तसेच फ्रीज सुध्दा बदलवून दिला नाही. ही विरूध्द पक्ष यांची कृती त्यांच्या सेवेतील त्रुटी आहे. ज्यामुळे तक्रारकर्तीला फ्रीजचा उपभोग न घेता आल्यामुळे तिला शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला. विरूध्द पक्ष यांच्या सेवेतील त्रुटीबाबत तक्रारकर्तीने सदरची तक्रार दाखल केली असून तक्रारकर्तीची प्रार्थना आहे की, विरूध्द पक्ष यांनी सदोष फ्रीज पूर्णपणे बदलून नवीन दोषरहित फ्रीज द्यावा अथवा सदोष फ्रीजची रक्कम 18% व्याजासह परत करावी. तसेच झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासाची नुकसानभरपाई म्हणून रू. 10,000/- आणि तक्रारीचा खर्च म्हणून रू. 5,000/- देण्यात यावे. त्याचप्रमाणे विरूध्द पक्ष यांनी निर्मिती दोष असलेले फ्रीज ग्राहकांना विकू नयेत याबाबतही आदेश पारित करण्यात यावा.
4. तक्रारकर्तीने तक्रारीसोबत दस्तऐवज दाखल करण्याच्या यादीप्रमाणे एकूण 9 दस्त तक्रारीच्या अनुक्रमे पृष्ठ क्रमांक 12 ते 18 प्रमाणे दाखल केले आहेत.
5. मंचाची नोटीस दोन्ही विरूध्द पक्ष यांना प्राप्त झाल्यानंतरही ते हजर झाले नाहीत अथवा त्यांनी लेखी उत्तर सुध्दा दाखल केले नाही. त्यामुळे मंचाने दिनांक 20/11/2012 रोजी त्यांच्याविरूध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश पारित केला.
6. तक्रारकर्तीने दिनांक 16/01/2013 रोजी श्री. आरिफ खान, इलेक्ट्रीशियन यांचे प्रमाणपत्र दाखल केले आहे.
7. तक्रारकर्तीची तक्रार, दाखल केलेले दस्तऐवज तसेच लेखी युक्तिवाद यावरून मंचासमोर पुढील प्रश्न उपस्थित होतो.
तक्रारकर्तीची तक्रार मान्य होण्यास पात्र आहे काय ?
कारणमिमांसा
8. तक्रारकर्तीने विरूध्द पक्ष 2 यांच्याकडून दिनांक 13/06/2007 ला रू. 13,500/- इतक्या किमतीचा व्हिडिओकॉन कंपनीचा फ्रीज खरेदी केला याबाबतचा दस्त रेकॉर्डवर दाखल आहे. तसेच वॉरन्टी कार्ड सुध्दा रेकॉर्डवर दाखल आहे. त्यामध्ये, ‘The product (Excluding Compressor) is warranted against manufacturing defects of parts and components for a period of 12 (Twelve) months, and only Compressor of this set is warranted against manufacturing defects of parts and components for a period of 6 (Six) years from the date of its purchase from Dealer’ असे नमूद केलेले आहे.
9. तक्रारकर्तीच्या तक्रारीवरून ही बाब स्पष्ट होते की, तक्रारकर्तीच्या फ्रीजमधील कॉम्प्रेसरमध्ये दोष असल्यामुळे थंडपणा येत नाही. विरूध्द पक्ष यांनी दोन वेळा गॅस किट मध्ये गॅस भरून दिला तरी देखील फ्रीज पूर्ववत सुरू नाही. याबाबत तक्रारकर्तीने श्री. आरिफ खान, इलेक्ट्रीशियन यांचे प्रमाणपत्र दाखल केले आहे. सदर प्रमाणपत्रामध्ये, “The Compressor fitted is low capacity. Not perfectly cooling or functioning” असे नमूद केलेले आहे. वॉरन्टी कार्डचे वाचन केले असता त्यामध्ये फक्त कॉम्प्रेसरची 6 वर्षाची वॉरन्टी दिलेली असून फ्रीजच्या इतर भागांची वॉरन्टी दिलेली नाही. तक्रारकर्तीने नोटीस पाठवूनही विरूध्द पक्ष यांनी त्यास उत्तर दिले नाही. तसेच मंचाने नोटीस पाठविल्यानंतर देखील विरूध्द पक्ष गैरहजर राहिले व त्यांनी तक्रारीला उत्तर दिले नाही. त्यामुळे विरूध्द पक्ष यांना तक्रारकर्तीची तक्रार मान्य आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
10. तक्रारकर्तीच्या फ्रीजच्या कॉम्प्रेसरमध्ये वॉरन्टी कालावधीत दोष उत्पन्न झाला, जो पूर्णपणे दुरूस्त करून देण्याची जबाबदारी विरूध्द पक्ष यांची आहे. विरूध्द पक्ष यांनी आपली जबाबदारी योग्यरित्या पार पाडली नाही. ही त्यांच्या सेवेतील त्रुटी आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. त्यामुळे तक्रारकर्तीची तक्रार मान्य होण्यास पात्र आहे.
करिता आदेश
-// अंतिम आदेश //-
तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते.
1. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी एकल वा संयुक्तरित्या तक्रारकर्तीच्या फ्रीजमध्ये फ्रीजच्या क्षमतेनुसार नवीन कॉम्प्रेसर बदलून द्यावा व तक्रारकर्तीचा फ्रीज पूर्ववत सुरू करून द्यावा.
2. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी एकल वा संयुक्तरित्या तक्रारकर्तीला झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्हणून रू. 3,000/- द्यावे.
3. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी एकल वा संयुक्तरित्या प्रस्तुत तक्रारीच्या खर्चापोटी तक्रारकर्तीला रू. 2,000/- द्यावे.
4. विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांचे आंत करावी.