(आदेश पारित द्वारा मा. अध्यक्ष, श्री. अतुल दि. आळशी)
(पारित दि. 31 जुलै, 2014)
तक्रारकर्तीने स्वतः व तक्रारकर्ता क्र. 2, 3, व 4 तर्फे अज्ञान पालनकर्ता म्हणून तिच्या पतीच्या अपघाती मृत्युबद्दलचा विमा दावा विरूध्द पक्ष यांनी फेटाळल्यामुळे नुकसानभरपाई मिळण्याकरिता सदरहू तक्रार मंचात दाखल केली आहे. तक्रारकर्तीच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणेः-
2. तक्रारकर्तीच्या पतीच्या मालकीची शेती गाव महारीटोला, ता. आमगांव, जिल्हा गोंदीया येथे गट नंबर 13, भूमापन क्रमांक 215 एकूण क्षेत्रफळ 0.38 हे.आर. असल्यामुळे ते शेतकरी या व्याख्येमध्ये समाविष्ट होतात.
3. विरूध्द पक्ष 1 ही विमा कंपनी असून विरूध्द पक्ष 2 ही विमा सल्लागार कंपनी आहे. विरूध्द पक्ष 3 हे शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना राबविण्याचे काम करतात.
4. दिनांक 16/05/2010 रोजी तक्रारकर्तीचे पती गोंदीया ते आमगांव मोटरसायकलने जात असतांना मोटरसायकलचा अपघात होऊन तक्रारकर्तीच्या पतीच्या डोक्याला जबर दुखापत झाली. त्यामुळे त्यांना गोंदीया व नागपूर येथे उपचाराकरिता भरती करण्यात आले होते. परंतु दिनांक 11/07/2010 रोजी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला.
5. तक्रारकर्तीने विरूध्द पक्ष यांच्याकडे विमा दावा मिळण्यासाठी कागदपत्रांसह रितसर अर्ज केला. परंतु विरूध्द पक्ष 1 यांनी दिनांक 12/02/2012 रोजी तक्रारकर्तीने तिचा विमा दावा अर्ज विरूध्द पक्ष 3 यांच्याकडे 90 दिवसाच्या आंत दाखल न केल्यामुळे खारीज केला. त्यामुळे तक्रारकर्तीने शेतकरी जनता अपघात विमा योनजेचे रू. 1,00,000/- मिळण्यासाठी तसेच नुकसानभरपाई म्हणून रू. 5,000/- तक्रारीच्या खर्चासह मंजूर करण्यासाठी सदरहू प्रकरण दाखल केले आहे.
6. तक्रारकर्तीची तक्रार विद्यमान न्याय मंचाने दिनांक 23/04/2013 रोजी दाखल करून घेतल्यानंतर विरूध्द पक्ष यांना दिनांक 26/04/2013 रोजी मंचामार्फत नोटीसेस बजावण्यात आल्या. विरूध्द पक्ष यांना नोटीस प्राप्त झाल्यानंतर विरूध्द पक्ष 1, 2 व 3 यांनी हजर होऊन त्यांचे लेखी जबाब दाखल केले आहेत.
विरूध्द पक्ष 1 यांनी सदरहू प्रकरणात त्यांचा जबाब दिनांक 31/05/2013 रोजी दाखल केला. विरूध्द पक्ष 1 यांनी त्यांच्या जबाबात असे म्हटले आहे की, तक्रारकर्तीने विमा दावा 90 दिवसाच्या आंत दाखल न केल्यामुळे तो खारीज करण्यात आला. तसेच तक्रारकर्तीच्या पतीकडे वाहन चालविण्याचा अधिकृत परवाना नसल्यामुळे व मोटरसायकल चालवितांना हेल्मेट न घातल्यामुळे तो मोटर वाहन कायद्याच्या कलम 129 चा भंग आहे. त्यामुळे तक्रारकर्तीची तक्रार खारीज करण्यात यावी.
विरूध्द पक्ष 2 यांनी सदरहू प्रकरणात आपला जबाब दाखल केला असून तो पृष्ठ क्र. 44 वर आहे. विरूध्द पक्ष 2 यांनी त्यांच्या जबाबामध्ये असे म्हटले आहे की, विरूध्द पक्ष 2 ही सल्लागार कंपनी असून शासनाकडून कुठलाही मोबदला न घेता ते काम करतात. विरूध्द पक्ष 2 यांनी त्यांच्या जबाबातील परिच्छेद क्र. 4 मध्ये असे म्हटले आहे की, तक्रारकर्तीचा प्रस्ताव कबाल नागपूर मार्फत युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीला दिनांक 22/02/2012 ला पाठविला असता सदरील दावा अर्ज युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीने उशीरा प्राप्त झाल्याचे कारण नमूद करून दावा नामंजूर केला असून तसे वारसदारास दिनांक 12/03/2012 च्या पत्रान्वये कळविण्यात आले. करिता सदरहू प्रकरण त्यांच्याविरूध्द खारीज करण्यात यावे.
विरूध्द पक्ष 3 यांनी त्यांचा जबाब पोस्टाद्वारे दाखल केला असून त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, तक्रारकर्तीचे पती हे स्वतः शेतकरी होते व तक्रारीमध्ये दर्शविलेली शेती ही त्यांच्या मालकीची होती. तक्रारकर्तीने शेतकरी जनता अपघात विम्याचा प्रस्ताव तालुका कृषि अधिकारी, आमगाव येथे दाखल केला होता व तो विरूध्द पक्ष 2 यांच्याकडे पाठविण्यात आला होता. सदरहू प्रकरणात विरूध्द पक्ष 3 यांच्या सेवेतील त्रुटी नसल्यामुळे त्यांच्याविरूध्द कुठलाही आदेश पारित करण्यात येऊ नये.
7. तक्रारकर्तीने तक्रारीसोबत विमा दावा अर्ज पृष्ठ क्र. 21 वर दाखल केलेला असून फेरफाराची नोंद पृष्ठ क्र. 23 वर, घटनास्थळ पंचनामा पृष्ठ क्र. 24 वर, अपघात उतारा पृष्ठ क्र. 25 वर, विरूध्द पक्ष 1 यांनी तक्रारकर्तीचा दावा खारीज केल्याबाबतचे पत्र पृष्ठ क्र. 26 वर याप्रमाणे कागदपत्रे तक्रारीसोबत दाखल केलेली आहेत.
8. तक्रारकर्तीचे वकील ऍड. एस. व्ही. खान्तेड यांनी असा युक्तिवाद केला की, तक्रारकर्तीचे पती मोटरसायकलने गोंदीया येथून आमगांव येथे जात असतांना त्यांचा अपघात झाला त्यावेळेस त्यांच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना होता व तो सदरहू प्रकरणात दाखल केलेला आहे. तसेच तक्रारकर्ती ही अशिक्षित व घरातील एकमेव सज्ञान व्यक्ती असल्यामुळे तिला कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी लागलेला वेळ आणि त्यावेळेसची तिची मानसिक अवस्था विचारात घेता महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे विमा दावा 90 दिवसानंतर सुध्दा दाखल केल्या जाऊ शकतो. करिता विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर करून सेवेतील त्रुटी केली आहे. त्यामुळे त्यांच्याविरूध्द सदरहू प्रकरण मंजूर करण्यात यावे.
9. विरूध्द पक्ष 1 चे वकील ऍड. के. डी. देशपांडे यांनी लेखी युक्तिवाद दाखल केला असून तोंडी युक्तिवाद करावयाचा नाही अशी पुरसिस दाखल केली. विरूध्द पक्ष 1 यांचे लेखी युक्तिवादात असे म्हणणे आहे की, तक्रारकर्तीने 90 दिवसात दावा दाखल केला नसून तक्रारकर्तीच्या पतीकडे मोटरसायकल चालवितांना Valid Driving License नव्हते व त्यांनी हेल्मेट सुध्दा घातले नव्हते. त्यामुळे ही कृती विमा कराराच्या अटीचा भंग असल्यामुळे सदरहू प्रकरण खारीज करण्यात यावे.
10. तक्रारकर्तीचा तक्रारअर्ज, विरूध्द पक्ष यांचे लेखी जबाब, तक्रारकर्तीने तक्रारीसोबत दाखल केलेली कागदपत्रे तसेच दोन्ही पक्षांनी दाखल केलेला युक्तिवाद यावरून खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | निर्णय |
1. | तक्रारकर्तीची तक्रार मान्य होण्यास पात्र आहे काय? | होय |
2. | तक्रारकर्ती शेतकरी वैयक्तिक अपघात विम्याचे पैसे मिळण्यास पात्र आहे काय? | होय |
3. | या तक्रारीचा अंतिम आदेश काय? | कारणमिमांसेप्रमाणे |
- कारणमिमांसा –
11. तक्रारकर्तीने दाखल केलेली दिनांक 30/08/2002 रोजीची फेरफार नोंद जी तक्रारकर्तीच्या पतीच्या नावाने असून फेरफार क्रमांक 103 नुसार रूजू झालेली आहे त्यानुसार तक्रारकर्तीचे पती हे शेतकरी होते हे सिध्द होते. शेतक-याचा मृत्यु झाल्यास त्याचे वारस हे मृत्यु झाल्याच्या दिनांकापासून वारस या व्याख्येमध्ये समाविष्ट होतात. त्यांच्या नावाने तलाठ्याकडे किंवा इतर दप्तरी नोंद होणे म्हणजे तांत्रिक बाब होय. करिता तक्रारकर्ती ही वारस म्हणून नुकसानभरपाई मिळण्यास पात्र आहे.
12. तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु हा अपघाती मृत्यु आहे ही बाब पृष्ठ क्र. 24 व 25 वर दाखल केलेल्या घटनास्थळ पंचनामा व अपघात उतारा यावरून सिध्द होते.
13. तक्रारकर्तीने शपथपत्रावरील पुरावा दिनांक 03/07/2014 रोजी दाखल केला आहे. तक्रारकर्तीने पुराव्यात म्हटले आहे की, तिने विमा दावा सादर करतांना विरूध्द पक्ष यांना संपूर्ण कागदपत्रे दिली होती. तसेच तक्रारकर्तीने सदरहू प्रकरणात तिच्या पतीचा वाहन चालविण्याचा परवाना ज्याचा नंबर MH-35/38/04 असा आहे व सदरहू परवाना दिनांक 19/07/2004 पासून दिनांक 18/07/2024 पर्यंतच्या कालावधीकरिता Valid आहे असे म्हटल्यामुळे व सदरहू प्रकरणात वाहन परवाना दाखल केल्यामुळे तक्रारकर्तीच्या पतीजवळ अपघाताच्या वेळेस वाहन चालविण्याचा Valid & Proper परवाना होता हे सिध्द होते.
14. तक्रारकर्ती ही घरातील एकमेव कमावती व सज्ञान व्यक्ती असल्यामुळे तसेच ती अशिक्षित व एका लहान गावातील रहिवासी असल्यामुळे तिला कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी वेळ लागू शकणे संयुक्तिक आहे. तसेच त्यावेळची तिची मानसिक अवस्था विचारात घेता दावा दाखल करण्यास झालेल्या विलंबाचे कारण हे संयुक्तिक आहे. महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे 90 दिवसानंतर सुध्दा विमा दावा संयुक्तिक कारण असल्यास दाखल केल्या जाऊ शकतो व तो मंजूर होण्यास पात्र आहे. करिता विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर करून सेवेतील त्रुटी केली आहे असे मंचाचे मत आहे.
करिता खालील आदेश.
-// अंतिम आदेश //-
1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. विरूध्द पक्ष 1 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्तीला तिच्या मृतक पतीच्या अपघात विम्याची रक्कम रू. 1,00,000/- द्यावी. या रकमेवर तक्रारकर्तीच्या पतीच्या मृत्यु दिनांकापासून म्हणजेच दिनांक 10/07/2011 पासून ते संपूर्ण पैसे वसूल होईपर्यंत द. सा. द. शे. 7% दराने व्याज द्यावे.
3. विरूध्द पक्ष 1 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्तीला झालेल्या शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासाची नुकसानभरपाई म्हणून रू. 5,000/- तक्रारकर्तीला द्यावे.
4. विरूध्द पक्ष 1 यांना आदेश देण्यात येतो की, या तक्रारीचा खर्च म्हणून त्यांनी तक्रारकर्तीला रू. 3,000/- द्यावे.
5. विरूध्द पक्ष 1 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी या आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसांचे आंत करावे.
6. विरूध्द पक्ष 2 व 3 च्या विरोधात ही तक्रार खारीज करण्यात येते.