पारित द्वारा मा. अध्यक्ष, श्री. अतुल दि. आळशी
तक्रारकर्तीने तिचे मयत पती श्री. तुळशीराम शिवनकर यांच्या अपघाती मृत्युबद्दल शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत नुकसानभरपाई मिळण्यासाठी सदरहू तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारकर्तीच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणेः-
2. तक्रारकर्तीचे पती हे शेतकरी होते. त्यांच्या नावाने मौजे रिसामा, ता. आमगांव, जिल्हा गोंदीया येथे भूमापन क्रमांक 378, क्षेत्रफळ एकूण 0.25 हे. आर. शेत जमीन आहे. दिनांक 27/07/2011 रोजी तक्रारकर्तीचे पती श्री. तुळशीराम शिवनकर हे एस.टी. बसमध्ये प्रवास करीत असतांना सदर बस ही मोठ्या खड्डयात पडून त्यांच्या डोक्याला इजा झाली व घटनास्थळीच त्यांचा मृत्यु झाला. तक्रारकर्तीने विरूध्द पक्ष यांच्याकडे विम्याची रक्कम मिळण्यासाठी अर्ज व कागदपत्रे सादर केली. परंतु कागदपत्रे 90 दिवसांच्या आंत मिळाली नाहीत म्हणून विरूध्द पक्ष 1 यांनी दिनांक 25/05/2012 रोजी तक्रारकर्तीचा नुकसानभरपाई मिळण्याबाबतचा क्लेम खारीज केला. त्यामुळे तक्रारकर्तीने सदरहू दावा दिनांक 25/05/2012 रोजी विरूध्द पक्ष 1 यांनी
नामंजूर केल्याच्या दिनांकापासून उद्भवलेल्या Cause of Action नुसार मुदतीत दाखल केला असून तक्रारकर्तीस शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेअंतर्गत रू. 1,00,000/- नुकसानभरपाई व्याजासह मिळण्यासाठी तसेच शारीरिक व मानसिक त्रासापोटी रू. 5,000/- मिळण्यासाठी सदरहू तक्रार दिनांक 21/11/2012 रोजी विद्यमान मंचासमक्ष दाखल केली.
3. तक्रारकर्तीने सदरहू तक्रारीमध्ये विरूध्द पक्ष 1 यांचे दिनांक 25/05/2012 रोजीचे Repudiation Letter दाखल केले असून पृष्ठ क्र. 18 व 19 वर फेरफार च्या प्रती दाखल केल्या आहेत. तसेच विमा कंपनीस सादर केलेला क्लेम फॉर्म पृष्ठ क्र. 20, एफ.आय.आर. पृष्ठ क्र. 21, पोस्ट मार्टेम रिपोर्ट पृष्ठ क्र. 23, गाव नमुना 7-अ व 12 पृष्ठ क्र. 27 वर दाखल केले आहेत.
4. तक्रारकर्तीची तक्रार मंचाने दाखल करून घेतल्यानंतर विरूध्द पक्ष यांना मंचामार्फत नोटीसेस बजावण्यात आल्या. विरूध्द पक्ष यांना नोटीस प्राप्त झाल्यानंतर त्यांनी हजर होऊन त्यांचे लेखी जबाब दाखल केले आहेत.
विरूध्द पक्ष 1 यांनी आपला जबाब दिनांक 01/01/2013 रोजी दाखल केला. विरूध्द पक्ष 1 यांनी आपल्या जबाबामध्ये असे म्हटले आहे की, मृतकाच्या मृत्युनंतर अर्जदाराने विमा दावा हा 90 दिवसांच्या आंत दाखल करावयास पाहिजे होता. परंतु तक्रारकर्तीने सदर दावा विहित मुदतीच्या आंत सादर केला नाही. तसेच अर्जदाराने दावा पेपर्स दिनांक 18/10/2011 रोजी विरूध्द पक्ष 3 यांच्याकडे सादर केल्यामुळे ते विमा पॉलीसीच्या अटी व शर्तींचे उल्लंघन असल्याने तक्रारकर्तीचा सदरहू दावा हा नियमबाह्य ठरतो आणि त्यामुळे तो खारीज करण्यात यावा. विरूध्द पक्ष 1 यांनी तक्रारकर्तीच्या तक्रारीमधील इतर सर्व मजकुराचे खंडन केले आहे.
विरूध्द पक्ष क्र. 2 यांनी आपला जबाब दाखल केला असून त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, विरूध्द पक्ष 2 हे सल्लागार म्हणून सेवा देतात व त्यासाठी कुठलाही
मोबदला ते घेत नसल्यामुळे त्यांना सदरहू तक्रारीमधून वगळण्यात यावे.
विरूध्द पक्ष 3 यांनी त्यांचा जबाब दिनांक 14/01/2013 रोजी दाखल केला आहे. त्यांच्या जबाबात त्यांनी मृतक तुळशीराम हे शेतकरी असून त्यांच्या नांवावर दर्शविलेली शेत जमीन ही त्यांच्याच मालकीची आहे व त्यांचा दिनांक 27/07/2011 रोजी बस अपघातामध्ये मृत्यु झाल्याची बाब कबूल केली आहे. तसेच त्यांच्या जबाबातील परिच्छेद क्र. 5 मध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, तक्रारकर्तीने योग्य ती कागदपत्रे विरूध्द पक्ष 3 यांच्या कार्यालयात आमगांव येथे सादर केलेली आहेत.
5. तक्रारकर्तीचे वकील ऍड. खान्तेड यांनी असा युक्तिवाद केला की, तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु हा दिनांक 27/07/2011 रोजी म्हणजेच विमा पॉलीसीच्या कालावधीत (15/08/2010 ते 14/08/2011) झालेला आहे. तसेच ही अपघात विमा पॉलीसी त्रिपक्षीय करार असल्यामुळे यामधील विरूध्द पक्ष हे अपघात विम्याचे पैसे सर्व मिळून देण्यास जबाबदार आहेत. तक्रारकर्तीच्या वकिलांनी असाही युक्तिवाद केला की, तक्रारकर्तीने दाव्यासंबंधी लागणा-या सर्व कागदपत्रांची वेळोवेळी विरूध्द पक्ष यांच्याकडे पूर्तता केलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे 90 दिवसाच्या नंतर सुध्दा दावा व कागदपत्रे दिल्या जाऊ शकतात. त्यामुळे तक्रारकर्तीचा दावा फेटाळणे ही विरूध्द पक्ष यांच्या कर्तव्यात चूक ठरते.
6. विरूध्द पक्ष 1 चे वकील ऍड. के. डी. देशपांडे यांनी असा युक्तिवाद केला की, तक्रारकर्तीने दावा विरूध्द पक्ष 3 यांच्याकडे उशीरा दाखल केल्याबाबतचे कुठलेही संयुक्तिक कारण सांगितलेले नाही. तसेच विरूध्द पक्ष 2 यांनी विरूध्द पक्ष 1 यांच्याकडेक तक्रारकर्तीचा दावा उशीरा पाठविल्याबद्दल सदर प्रकरणामध्ये त्यांना जबाबदार धरण्यात यावे व विरूध्द पक्ष 1 यांच्याविरूध्द तक्रारकर्तीची तक्रार खारीज करण्यात यावी.
7. तक्रारकर्तीने दाखल केलेली तक्रार, विरूध्द पक्ष यांचे जबाब तसेच तक्रारीमधील कागदपत्रे व वकिलांचा तोंडी युक्तिवाद यावरून खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | निर्णय |
1. | तकारकर्तीचे पती हे शेतकरी होते काय? | होय |
2. | तक्रारकर्ती शेतकरी वैयक्तिक अपघात विम्याचे पैसे मिळण्यास पात्र आहे काय? | होय |
3. | या तक्रारीचा अंतिम आदेश काय? | कारणमिमांसेप्रमाणे |
- कारणमिमांसा –
8. तक्रारकर्तीने तक्रार दाखल करतांना फेरफार नोंद उतारा दाखल केलेला आहे. सदरहू उता-यामध्ये तक्रारकर्तीचे पती हे शेतकरी असल्याबद्दलची नोंद आहे. तसेच विरूध्द पक्ष 3 यांनी त्यांच्या जबाबात मान्य केले आहे की, तक्रारकर्तीचे पती हे शेतकरी असून ते स्वतः कुटुंबासोबत शेत जमिनीची मशागत करतात व त्यांच्या नावावर मौजे रिसामा, ता. आमगांव, जिल्हा गोंदीया येथे भूमापन क्र. 378, क्षेत्रफळ 0.25 हे.आर. अशी शेत जमीन आहे. वरील लेखी पुरावा तसेच विरूध्द पक्ष 3 यांनी त्यांच्या लेखी जबाबामध्ये मान्य केलेले विधान यावरून हे सिध्द होते की, तक्रारकर्तीचे पती हे शेतकरी होते.
9. तक्रारकर्तीच्या वकिलांच्या युक्तिवादानुसार तक्रारकर्ती ही अशिक्षित असून संपूर्ण कुटुंबाच्या पालनपोषणाची जबाबदारी ती पार पाडत आलेली आहे. तक्रारकर्तीने दावा अर्ज विरूध्द पक्ष 3 यांच्याकडे संपूर्ण कागदपत्रांसह दिलेला होता. तक्रारकर्तीस कागदपत्र मिळण्यास झालेला विलंब तसेच पोलीस स्टेशन मधील एफ.आय.आर. व पोस्ट मार्टेम रिपोर्ट इत्यादी मिळण्यासाठी लागलेला वेळ यामुळे तक्रारकर्तीस दावा
दाखल करण्यासाठी अल्पसा अवधी जास्त लागल्यामुळे दावा विलंबाने दाखल करण्याचे ते संयुक्तिक कारण असूनही विरूध्द पक्ष 1 यांनी तक्रारकर्तीचा दावा नामंजूर करणे
म्हणजे ही त्यांच्या सेवेतील त्रुटी ठरते या तक्रारकर्तीच्या वकिलांच्या युक्तिवादाला मंचाची सहमती आहे.
10. महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार 90 दिवसानंतर सुध्दा दावा दाखल केल्या जाऊ शकतो व कागदपत्रांची पूर्तता ही विहित कालावधीनंतर सुध्दा केल्या जाऊ शकते. त्यामुळे सदरहू विलंब हा किरकोळ विलंब असल्यामुळे तो दावा नामंजूर करण्यास संयुक्तिक वाटत नाही. तक्रारकर्तीचा दावा हा केवळ तांत्रिक मुद्दयावरून फेटाळण्यात आलेला आहे. तक्रारकर्तीने दाखल केलेला एफ.आय.आर. व घटनास्थळ पंचनामा तसेच पोस्ट मार्टेम रिपोर्ट यावरून असे सिध्द होते की, तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु हा अपघाती मृत्यु आहे. मृतकाचे वारस हे कायद्याने वारस असल्यामुळे व शेतक-याचा मृत्यु झाल्यावर लगेचच ते वारस या संज्ञेमध्ये येत असल्यामुळे शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्याचे पैसे मिळण्यास ते पात्र ठरतात. एकदा जर तक्रारकर्तीने विरूध्द पक्ष 3 यांना क्लेम पेपर्स दिले तर ते विरूध्द पक्ष 1 यांना मिळाले असतील असे गृहित धरल्या जाते.
11. तक्रारकर्तीने दाखल केलेली तक्रार व त्यासाठी झालेल्या विलंबाचे कारण हे मंचास संयुक्तिक वाटते. तक्रारकर्तीचा दावा विरूध्द पक्ष 1 यांनी मंजूर न करणे म्हणजे ही त्यांच्या सेवेतील त्रुटी होय असे मंचाचे मत आहे. त्यामुळे तक्रारकर्तीची तक्रार मंजूर करण्यात येत असून विरूध्द पक्ष 1 यांनी तक्रारकर्तीस शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेअंतर्गत रू. 1,00,000/- द्यावे व या रकमेवर मृतकाच्या मृत्युच्या दिनांकापासून म्हणजेच दिनांक 27/07/2011 पासून ते संपूर्ण पैसे मिळेपर्यंत द.सा.द.शे. 10% दराने व्याज द्यावे. तसेच शारीरिक व मानसिक त्रासापोटी नुकसान
भरपाई म्हणून रू. 5,000/- विरूध्द पक्ष 1 यांनी तक्रारकर्तीला द्यावे असे देखील मंचाचे मत आहे.
करिता खालील आदेश.
-// अंतिम आदेश //-
1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. विरूध्द पक्ष 1 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्तीला तिच्या मृतक पतीच्या शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्याची रक्कम रू. 1,00,000/- द्यावी. या रकमेवर मृतकाच्या मृत्युच्या दिनांकापासून म्हणजेच दिनांक 27.07.2011 पासून ते संपूर्ण पैसे वसूल होईपर्यंत द. सा. द. शे. 10% दराने व्याज द्यावे.
3. विरूध्द पक्ष 1 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्तीला झालेल्या शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासाची नुकसानभरपाई म्हणून रू. 5,000/- तक्रारकर्तीला द्यावे.
4. विरूध्द पक्ष 1 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी या आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसांचे आंत करावे.
5. विरूध्द पक्ष 2 व 3 च्या विरोधात ही तक्रार खारीज करण्यात येते.