नि. १३
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा. अध्यक्ष - श्री अनिल य. गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. ५३/२०१०
-----------------------------------------------
तक्रार दाखल तारीखः - २६/२/२०१०
निकाल तारीखः - ०९/०८/२०११
-------------------------------------------
श्री फिरोज व्हलीउल्ला मुजावर
व.व.३८, धंदा – नोकरी
रा.रामानंदनगर ता.पलूस जि. सांगली ..... तक्रारदार
विरुध्द
विभागीय व्यवस्थापक
दि युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी
शाखा समरथ मॅनशन, वखार भाग, सांगली .........जाबदार
तक्रारदार तर्फे – +ìड.श्री एस.ए.पाटील
जाबदार – एकतर्फा
नि का ल प त्र
द्वारा- मा. सदस्या- गीता घाटगे.
तक्रारदारांच्या विमाकृत वाहनाचा अपघात झाला. या अपघाताच्या नुकसान भरपाईची मागणी तक्रारदारांनी जाबदार इन्शुरन्स कंपनीकडे केली. परंतु जाबदारांनी नुकसान भरपाई देण्याचे अयोग्य कारण सांगून टाळल्याने तक्रारदारांनी सदरहू तक्रारअर्ज दाखल केला आहे. याबाबत थोडक्यात हकीकत खालीलप्रमाणे -
१. तक्रारदारांची टाटा इंडिगो एलएक्स या प्रकारचे वाहन असून त्याचा क्रमांक एमएच ११/वाय ६९७१ असा आहे. या वाहनाचा विमा तक्रारदाराने जाबदार इन्शुरन्स कंपनीकडे उतरविला होता. त्याचा पॉलिसी क्रमांक १६१०००३००/३१/०८/०१/००००१२३१ असा आहे. दि.७/६/२००९ रोजी तक्रारदारांच्या या वाहनास अपघात झाला. अपघातसमयी सदरहू वाहन श्री जमाल कासम आवटी हे चालवत होते. अपघाताबाबत तक्रारदारांनी इन्शुरन्स कंपनीला कळविले. त्याप्रमाणे दि.१२/६/२००९ रोजी कंपनीमार्फत मान्यताप्राप्त सर्व्हेअरकडून सर्व्हे करण्यात आला असे तक्रारदारांचे कथन आहे. तक्रारदार पुढे असेही कथन करतात की, अपघातामुळे वाहनास जी नादुरुस्ती झाली होती त्याची दुरुस्ती तक्रारदारांनी पंडीत ऑटोमोटीव्ह प्रा.लि. यांचेकडून करुन घेतली. या दुरुस्तीस रक्कम रु.१,४०,०००/- इतका खर्च आला. तक्रारदारांनी जाबदार कंपनीकडे दि.१६/७/२००९ रोजी या रकमेची मागणी करणेकरिता क्लेम फॉर्म भरुन दिला परंतु जाबदार यांनी त्याची दखल घेतली नाही. मात्र दि.२०/८/२००९ रोजी अपघातसमयी ड्रायव्हरकडे ड्रायव्हींग लायसेन्स नव्हते या कारणावरुन जाबदार इन्शुरन्स कंपनीने तक्रारदारांचा क्लेम नाकारला. तक्रारदारांच्या मते जाबदार कंपनीने केवळ विमा रक्कम देण्याची टाळाटाळ करण्याच्या हेतूनेच तक्रारदारांचा क्लेम नाकारलेला आहे. वास्तविक तक्रारदारांनी विमा पॉलिसीच्या कोणत्याही अटी किंवा शर्तीचा भंग केलेला नाही. आणि तरीदेखील जाबदारांनी त्यांचा क्लेम नाकारुन तक्रारदारांना दूषित सेवा दिलेली आहे. आणि म्हणून तक्रारदारांनी नुकसान भरपाईपोटी क्लेमची रक्कम मिळावी याकरीता सदरहू तक्रारअर्ज दाखल केलेला आहे. तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारअर्जामध्ये त्यांनी गाडी दुरुस्तीसाठी केलेला खर्च तसेच जाबदारांनी दिलेल्या दूषित सेवेमुळे त्यांना जो मानसिक व आर्थिक त्रास झाला, त्याकरिता व तक्रारअर्जाच्या खर्चाकरिता म्हणून एकूण रक्कम रु.१,५५,०००/- ची मागणी केलेली आहे. तसेच या रकमेवर १२ टक्के व्याजाची मागणीही तक्रारदारांनी केली आहे. तक्रारअर्जाचे पृष्ठयर्थ तक्रारदाराने नि.३ अन्वये प्रतिज्ञापत्र व नि.५ अन्वये एकूण ४ कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
२. मंचाच्या नोटीशीची बजावणी जाबदार यांचेवर होवून देखील ते प्रस्तुत प्रकरणी हजर झाले नाहीत, सबब नि.१ वर त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश करणेत आले.
३. तक्रारदारांनी तक्रारअर्जामध्ये अपघातामुळे वाहनाचे जे नुकसान झाले त्याच्या दुरुस्तीकरिता म्हणून त्यांना रक्कम रु.१,४०,०००/- इतका खर्च आला असल्याचे कथन केले आहे. त्यांच्या या कथना पृष्ठयर्थ त्यांनी नि.५ अन्वये वाहनाच्या दुरुस्तीची बिलेही दाखल केलेली आहेत. परंतु या बाबतीत मंचास एक बाब अत्यंत प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारअर्जामध्ये अपघातग्रस्त वाहनाचा विमा नेमका किती रकमेचा होता याचा कुठेही उल्लेख केलेला नाही. तसेच त्यांनी पॉलिसीची प्रतही प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेली नाही. याबाबत तक्रारदारांच्या विधिज्ञांना विचारणा केली असता सदरहू पॉलिसीची प्रत जाबदार यांचे ताब्यात असलेकारणाने ती प्रस्तुत प्रकरणी दाखल करणेस विधिज्ञांनी असमर्थतता दर्शविली. सदरहू पॉलिसीची प्रत प्रस्तुत प्रकरणी जाबदारांमार्फत हजर करणेत यावी याकरिता तक्रारदारांनी कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत. प्रस्तुत प्रकरणी जाबदारही अनुपस्थित आहेत. त्यामुळे अपघातग्रस्त वाहनाचा विमा नेमका किती रकमेचा उतरविणेत आला होता याचा कोणताही बोध प्रस्तुत प्रकरणी होत नाही. अशा परिस्थितीत तक्रारदारांनी मागणी केलेली नुकसान भरपाईची रक्कम केवळ दुरुस्तीची तितक्या रकमेची बिले दाखल केली म्हणून व तक्रारदारांनी तितक्या रकमेची मागणी केली म्हणून त्यांना मंजूर करणे हे अत्यंत चुकीचे व अयोग्य ठरेल असे मंचास वाटते. त्यामुळे तक्रारदारांचा तक्रारअर्ज आवश्यक कागदपत्रांअभावी नामंजूर करण्यापेक्षा, तक्रारदारांना योग्य त्या कागदपत्रांसह पुन: तक्रारअर्ज दाखल करण्याची मुभा ठेवून तक्रारअर्ज काढून टाकणे योग्य व न्याय्य ठरेल असे मंचास वाटते. तक्रारअर्ज तक्रारदारांनी मुदतीत दाखल केलेला आहे. परंतु सदरहू निकालानंतर पुन: नव्याने तक्रारअर्ज दाखल करताना तक्रारदारांना मुदतीच्या कायद्याची बाधा येण्याची शक्यता आहे, त्यामुळे निकाल तारखेपासून दोन महिन्यात योग्य त्या कागदपत्रांसह तक्रारअर्ज दाखल करण्याची मुभा न्यायहितार्थ तक्रारदारांना देणेत येते.
सबब, मंचाचा आदेश की,
आ दे श
१. निकाल तारखेपासून दोन महिन्यात योग्य त्या कागदपत्रांसह तक्रारअर्ज दाखल करण्याची तक्रारदारांना मुभा देवून तक्रारअर्ज काढून टाकणेत येत आहे.
सांगली
दि.९/०८/२०१०
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.
प्रतः-
तक्रारदार यांना हात पोहोच/रजि ए.डी.ने दि. / /२०११
जाबदार यांना हात पोहोच/रजि ए.डी.ने दि. / /२०११