निकालपत्र :- (दि.18/10/2010) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला त्यांचे वकीलांमार्फत हजर झाले. त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले. उभय पक्षांचा युक्तीवाद ऐकणेत आला. सदरची तक्रार तक्रारदाराचा न्याय्य व योग्य विमा दावा सामनेवाला विमा कंपनीने नाकारुन सेवा त्रुटी केल्यामुळे दाखल करणेत आली आहे. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:- अ) सामनेवाला विमा व्यवसाय करणारी वित्तीय संस्था असून तक्रारदाराचे पती मयत कृष्णात बापूसो पाटील यांचा श्री हनुमान नागरी सह.पत संस्था कुरुकली ता.करवीर जि.कोल्हापूर यांचेतर्फे ग्रुप जनता वैयक्तिक अपघात विमा उतरविलेला होता. सदर विमा पॉलीसीचा नंबर 160502/47/03/00374 असून विमा कालावधी सन2003-04 असा निश्चित केलेला होता. सदर कालावधीत दि.08/06/2004 रोजी अपघाती मृत्यू झाला. सदर दिवशी तक्रारदाराचे पती गगनबावडा ते वैभववाडी जाणा-या रोडवर करुळ घाटात कोल्हापूर जिल्हा हद्दीवर मैल दगड नं.115/71 चे जवळ घाटाचे संरक्षण कठडयाजवळ मृत अवस्थेत आढळून आले. त्यांचे डोक्यास जबर मार लागला होता. तसेच संरक्षण कठडा देखील तुटलेल्या अवस्थेत होता. तेथे गावठी बनावटीचे पिस्तुल(कट्टा) आढळून आले. योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता करुन क्लेम रक्कम रु.50,000/-ची मागणी करुनही सामनेवालांनी क्लेम देणेचे टाळले. याबाबत दि.22/06/2009 रोजी वकील नोटीस पाठवली. सदर नोटीसीस दि.24/06/2009 रोजी सामनेवाला यांनी उत्तर दिले. त्यानुसार तक्रारदाराचे पतीचा मृत्यू हा अपघाती नसुन ती आत्महत्या आहे असे चुकीचे कारण देऊन नाकारलेला आहे.त्यामुळे प्रस्तुतची तक्रार सदर मंचासमोर दाखल करणे भाग पडले. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह मंजूर होऊन सामनेवालांकडून क्लेम रक्कम रु.50,000/- दि.08/06/2004 पासून व्याजासहीत मंजूर होऊन मिळावेत. मानसिक त्रासापोटी रक्कम रु.25,000/-व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.1,000/-सामनेवाला यांचेकडून वसूल होऊन मिळावेत अशी विंनती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (3) तक्रारदाराने आपल्या तक्रारीचया पुष्टयर्थ सामनेवाला यांनी पाठविलेले पत्र,पोस्ट मार्टेम रिपोर्ट, अहवाल इत्यादी कागदपत्रांच्या सत्यप्रती तसेच रिजॉइन्डर दाखल केला आहे. (4) सामनेवालांनी दाखल केलेल्या लेखी म्हणणेनुसार तक्रारदाराची तक्रार नाकारलेली आहे. व सामनेवाला यांनी कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही. तक्रारदारचे पतीचा सामनेवालांकडे विमा उतरविलेला होता हे कथन मान्य केले आहे. तसेच सामनेवाला यांनी तक्रारदाराकडे क्लेम बाबतचया कागदपत्रांची वेळोवेळी मागणी करुनही तक्रारदाराने सदरची कागदपत्रे सामनेवाला कंपनीकडे दाखल केलेली नाहीत. त्यामुळे दि.05/01/2005 रोजी कागदपत्रांची पूर्तता न केलेने क्लेम नामंजूर केलेला आहे. वस्तुत: तक्रारदाराचा पती हा कर्जबाजारी होता. त्यामुळे त्यांने कर्जाला कंटाळून त्याने आपलेजवळील गावठी बनावटीचे पिस्तुल(कट्टा) मधून 12 बोअरने जिवंत काडतूस आपले डोकेमध्ये उडवून घेऊन आत्महत्या केली असावी असा वर्दी जबाब आहे.तक्रारदाराने दि.24/01/2005 रोजी सामनेवालांकडे पाठवलेल्या कागदपत्रांतील एफआयआर नुसार तक्रारदाराचे पतीचे उजवे मुठीमध्ये 12बोअरचे जिवंत काडतूस असलेचे व रस्त्यावर मोटरसायकल पडलेचे दिसत असून जवळच गावठी बनावटीचे पिस्तुल(कट्टा) पडलेचे दिसून येते. व ते खोलले असता त्यामध्ये एक काडतूस उडालेली दिसत आहे. यावरुन तक्रारदाराचे पतीने आत्महत्या केलेची वस्तुस्थिती दिसून येते.सबब आत्महत्या सदर पॉलीसीअंतर्गत ग्राहय धरता येत नाही.त्यामुळे तक्रारदाराचा क्लेम नाकारलेला आहे. तसेच तक्रारदाराने बॅलेस्टीक एक्सपोर्टचा रिपोर्टही सदर कामी दाखल करणेचे टाळलेले आहे. सबब तक्रारदारास सदर रिपोर्ट मे.मंचामध्ये हजर करणेबाबत आदेश व्हावेत असे प्रतिपादन केलेले आहे. सामनेवाला यांनी क्लेम नाकारुन कोणतीही सेवात्रुटी केली नसलेने तक्रारदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी तक्रारदाराने केलेल्या मागण्या नामंजूर करण्यात याव्यात. तसेच सामनेवाला यांना मानसिक त्रासापोटी तक्रारदाराकडून रकक्म रु.5,000/- देणेचा आदेश व्हावा अशी विनंती सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे. (5) सामनेवाला यांनी आपल्या लेखी म्हणणेसोबत वर्दी जबाब, इन्क्वेस्ट पंचनामा इत्यादीच्या सत्यप्रती दाखल केल्या आहेत. (6) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवाला यांचे लेखी म्हणणे व दाखल कागदपत्रे तसेच उभय पक्षांच्या वकीलांचा युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. 1. सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? --- होय. 2. तक्रारदार विमा रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? --- होय. 3. काय आदेश ? --- शेवटी दिलेप्रमाणे मुद्दा क्र.1 :- तक्रारदाराचे पती मयत कृष्णात बापूसो पाटील यांचा सामनेवाला विमा कंपनीकडे ग्रुप जनता वैयक्तिक अपघात विमा उतरविलेला होता. सदर विमा पॉलीसीचा नंबर 160502/47/03/00374 असून विमा कालावधी सन2003-04 असा निश्चित केलेला होता हे सामनेवाला यांनी मान्य केलेले आहे. तक्रारदाराने कागदपत्रे पाठवून रक्कम रु.50,000/- इतक्या क्लेम रक्कमेची मागणी केलेचे दिसून येते. दि.05/01/2005 रोजी प्रथमत: कागदपत्रांची पूर्तता केली नसलेने क्लेम नामंजूर केलेला आहे. तदनंतर तक्रारदाराने कागदपत्रे पाठवून दिले तदनंतर दि.24/06/2009 रोजी सामनेवाला यांनी तक्रारदाराचे वकीलांना पाठविलेल्या नोटीसीउत्तरीमध्ये एफआयआर वरुन तक्रारदाराचे पतीने आत्महत्या केलेचे दिसून येते त्यामुळे सदर मृत्यू हा पॉलीसीच्या कक्षेत येत नाही. तरीही बॅलेस्टिक एक्स्पोर्ट यांचा रिपोर्ट पाठवून दयावा असे नमूद केलेचे दिसून येते. वादाचा मुद्दा उपस्थित होतो तो तक्रारदारचे पतीचा मृत्यू हा अपघाती आहे की आत्महत्या ? सामनेवालाने दाखल केलेल्या वर्दी जबाबामध्ये गगनबावडा ते वैभववाडीकडे जाणा-या करुळ घाटात सार्वजनिक बांधकाम विभागाची हद्द दर्शविणारे बोर्डाजवळ एक मोटरसायकल व एक इसम पडलेला असून त्यांचे डोके फुटून त्यांचा मेंदू बाहेर पडलेला आहे. असा निनावी फोन आला. तदनंतर पोलीसांनी नमुद ठिकाणी जाऊन पाहणी केली असता सदर घाटातील संरक्षण कठडयालगत एक इसम बसलेला दिसला त्याचे डोकेस डावे बाजूस गंभीर मार लागून डोकीची कवटी फूटून मेंदू बाहेर आलेला दिसला व त्याचे उजवे हातास मुठीमध्ये 12 बोअरचे जिवंत काडतूस असलेचे दिसले. तसेच बाजूस मोटरसायकल नंबर MH-09-X-3101 चॉकलेटी रंगाची कॅलीबर कंपनीची डावे कुशीवर पडलेली दिसली व सदर मोटरसायकलचे पुढील हेडलाईट फूटून काचा जमीनीवर पडलेल्या दिसत आहेत व बाजूस रस्त्यावर गावठी बंदुकीचे पिस्तुल(कट्टा) पडलेचे दिसत असून ते खोलून पाहिले असता एक 12 बोअरचे काडतूस उडालेचे दिसून येते. यावरुन त्याने सदर पिस्तुलचा वापर करुन आत्महत्या केली असावी असे नमुद केले आहे. इन्क्वेस्ट पंचनाम्यामध्ये मयताचे डोकेस कपाळावर डावे साईटने वरील बाजूस डोकीत कवटी फुटून अंदाजे 6 इंच लांबीची उभी व आडवी जखम असून डोकीची कवटी उचकटून मेंदू बाहेर आलेला आहे. प्रेताचे दोन्ही डोळे मिटलेले असून नाकातून लालसर रंगाचा घट्ट द्रव बाहेर आलेला दिसतो. प्रेताचे तोंड बंद आहे. गळा शाबूत आहे इत्यादी वर्णन नमुद केलेले आहे. सदर माहितीचा आधार घेऊन सामनेवाला यांनी तक्रारदाराचे पतीने आत्महत्या केलेचा निष्कर्ष काढलेला आहे व आत्महत्या पॉलीसी अंतर्गत येत नसलेने क्लेम नाकारलेला आहे. तक्रारदाराने दाखल केलेल्या शवविच्छेदन अहवालाचे अवलोकन केले असता मृत्यूचे कारणे हे Cronio cerebral Injury मुळे झालेला आहे. तसेच व्हिसेरा नॉट प्रिझर्व ची नोंद आहे. नमुद अहवालामध्ये प्रेताचे डोळे बंद असून तोंड बंद आहे. तसेच डोकीची कवटी फुटून त्यातून मेंदू बाहेर आलेचे नमुद केले आहे. प्रस्तुत कागदपत्रांचे अवलोकन केले असता असे कुठेही आढळून येत नाही की तक्रारदारचे पतीचा मृत्यू हा आत्महत्या आहे. यासाठी तक्रारदाराने दाखल केलेल्या गगनबावडा पोलीस ठाणे गगनबावडा यांचा दि.16/08/2005 चा उपविभागीय दंडाधिकारी राधानगरी वनविभाग कोल्हापूर यांना पाठवलेल्या अहवालाचे अवलोकन केले असता सदर अहवालामध्ये वर नमुद केलेले सविस्तर वर्णन असून नमुद मोटरसायकलचेही हेडलाईट व काचा फुटून नुकसान झालेले आहे. तसेच सी.पी.आर.हॉस्पिटल येथील मेडिकल ऑफिसर यांनी Cronio cerebral Injury असे मत दिले असून मयत कृष्णा बापूसो पाटील यांनी बेकायदेशीर पिस्तुल वापरलेमुळे त्यांचेविरुध्द स्वतंत्रपणे गुन्हा दाखल करणेत आलेला आहे. तसेच त्यांचे नातेवाईकांकडे चौकशी केली असता मयत कृष्णात बापूसो यांचे कुणाबरोबरही दुश्मनी नव्हती. तसेच तो पिस्तुल बाळगत होता किंवा नाही याबाबत माहिती नाही. तो पैशाच्या अडचणीत होता हे ऐकूण माहित होते. मयत कृष्णात पाटील यांनी बेळणे ता.कणकवली गावी श्री गिरकर यांचे मालकीची शेतजमिन खंडाने कसणेसाठी घेतली होती व त्यासाठी तो नेहमी त्यांची स्वत:ची बजाज कंपनीची मोटरसायकल नंबर MH-09-X-3101 वरुन गगनबावडा करुळ घाटातून शेतीच्या कामासाठी नेहमी येतजात असे. मोटर सायकल दगडाला ठोकरल्यामुळे अपघात होऊन व त्याचे डोकीस टोकदार दगड लागून डोकीची कवटी फुटून मेंदू बाहेर आला व सदर अपघातामध्ये तो मयत झाला अशी हकीकत नमुद केली आहे. सी.पी.आर.हॉस्पिटल,कोल्हापूर यांना रिपोर्ट पाठवून अभिप्राय मागितला असता मेडिकल ऑफिसर यांनी मयतास डोकीस झालेल्या जखमीमध्ये काडतूसाचे छरे वगैरे मिळालेले नाहीत त्यामुळे सदरची जखमी ही बंदूकीची गोळी लागून होऊ शकत नाही. फुटलेल्या कवटीच्या हाडाच्या तुकडयामुळे मेंदूस मार लागला असावा तसेच जोरात डोके आपटल्यामुळे मार लागला असावा. मयताचे पोट रिकामे होते. अल्कोहोलचा वास नव्हता असे स्पष्ट मत सी.पी.आर. हॉस्पिटल यांनी दिलेले आहे. तसेच मयताविरुध्द स्वतंत्रपणे हत्या जवळ बाळगलेबाबतचा गुन्हा नोंद केला असून हत्यार तपासणी कामी बॅलेस्टिक एक्सर्पट मुंबई यांचेकडील वैज्ञानिक प्रयोगशाळेत पाठवले होते. त्याचा अभिप्राय आला असून तो मूळ कामात सामील केला आहे. सबब सदर मयताचे कामी तपास पूर्ण झालेने मा. विशेष सहायक सरकारी अभियोक्ता कोर्ट क्र.4 कोल्हापूर यांचेकडे चौकशीचे कागदपत्रे पाठवून अभिप्राय मिळणेबाबत जावक क्र.946/05 दि.05/07/2005 अन्वये प्रकरण पाठवून दिले असता सरकारी अभियोक्ता यांनी जावक क्र.4905 दि.10/08/2005 अन्वये अभिप्राय दिलेला आहे. सदर तपासात मयत कृष्णासो बापूसो पाटील यांचा अपघाती मृत्यू झालेचे तपासात निष्पन्न होत असलेने अ.म.र. नं.6/04 सी.आर.पी.सी.174 प्रमाणे मयताचे अपघाती मृत्यू अशी समरी मंजूर होऊन मिळणेबाबत विनंती केली आहे. वरील वस्तुस्थितीचा विचार करता पोलीसांकडे बॅलेस्टिक रिपोर्ट आलेला आहे व त्यानुसार पोलीसांनी पुढील तपास करुन तपासाअंती तक्रारदारचे पतीचा मृत्यू हा अपघाती झालेबाबत स्पष्टपणे अहवाल दिलेला दिसून येतो. सदरचा अहवाल हा तक्रारदाराचे पती मयत झालेचे ठिकाण व तेथील वस्तुस्थिती नातेवाईकांनी दिलेली माहिती, सी.पी.आर.हॉस्पिटल येथील मेडिकल ऑफिसर यांनी दिलेले वैद्यकीय मत, शवविच्छेदन अहवालातील मृत्यूचे कारणे, वर्दी जबाब, मृत्यूतर पंचनामा इतयादीचा सविस्तर सखोल अभ्यास करुन दिलेला आहे. सबब तक्रारदाराचे पतीचा मृत्यू हा आत्महत्या नसून अपघात होता ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे. सबब सामनेवाला यांनी तक्रारदाराचा न्याय व योग्य क्लेम नाकारुन सेवा त्रुटी केली असलेचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मुद्दा क्र. 2 :- मुद्दा क्र. 1 मधील विस्तृत विवेचनानुसार तक्रारदारचे पतीचा अपघाती मृत्यू झालेमुळे तक्रारीतील नमुद पॉलीसीप्रमाणे रक्कम रु.50,000/- व्याजासह मिळणेस पात्र आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मुद्दा क्र.3:- तक्रारदार हया विधवा असून सामनेवाला यांनी केलेल्या सेवा त्रुटी मुळे झालेल्या मानसिक त्रासापोटी व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश (1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते. (2) सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारास विमा रक्कम रु.50,000/-(रु.पन्नास हजार फक्त) अदा करावेत. सदर रक्कमेवर दि.24/06/2009 पासून ते संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याज अदा करावे. (3) सामनेवाला यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.2,000/-(रु.दोन हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) अदा करावेत.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |