-निकालपत्र–
(पारित व्दारा- श्री शेखर प्रभाकर मुळे, मा.अध्यक्ष)
( पारित दिनांक-05 जुलै, 2016)
01. उभय तक्रारदारांनी ही तक्रार, विरुध्दपक्ष रेल्वे प्रशासना विरुध्द, रेल्वेच्या राखीव कोच मधून प्रवास करताना झुरळांचे झालेल्या त्रासामुळे नुकसान भरपाई मिळावी यासाठी ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली दाखल केली आहे.
02. तक्रारीचे स्वरुप थोडक्यात खालील प्रमाणे-
तक्रारकर्ता व त्यांची पत्नी हे तामीलनाडू एक्सप्रेसने ए.सी.टू टायरने चेन्नई ते नागपूर हा प्रवास दिनांक-27/09/2012 ला करीत होते, त्यांचा कोच क्रं-A-3 असा होता व बर्थ क्रं-4 व 5 देण्यात आला होता. प्रवासा दरम्यान त्यांना त्यांच्या डब्यात झुरळ वावरत असल्याचे दिसले. झुरळांमुळे त्यांना व डब्यातील इतर प्रवाश्यानां प्रवासा दरम्यान बराच त्रास झाला व ते निट झोपू पण शकले नाही. प्रवासा दरम्यान प्रत्येक स्टेशनवर त्यांनी ट्रेन मधील स्टॉफला या बद्दल तक्रारी केल्यात तसेच एक लिखित तक्रार कम्प्लेंट बॉक्स मध्ये सुध्दा टाकली. परंतु रेल्वेच्या कुठल्याही अधिका-याने किंवा कर्मचा-याने त्यावर काहीही कारवाई केली नाही, ही रेल्वेच्या सेवेतील कमतरता होती. त्यानंतर त्यांनी, विरुध्दपक्षानां कायदेशीर नोटीस पाठवून, त्याव्दारे तिकिटाचे पैसे आणि नुकसान भरपाई म्हणून प्रत्येकी रुपये-25,000/- द्दावेत अशी मागणी केली.
परंतु नोटीस मिळूनही विरुध्दपक्षाने त्याची पुर्तता केली नाही, म्हणून या तक्रारीव्दारे त्यांनी तिकिटाचे पैसे रुपये-3050/- तसेच झालेल्या असुविधे बद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-50,000/- व तक्रारखर्च म्हणून रुपये-15,000/- विरुध्दपक्षाकडून मिळावेत अशी मागणी केली.
03. विरुध्दपक्षाने आपले लेखी उत्तर नि.क्रं-11 खाली सादर केले. त्यांचे लेखी उत्तरा नुसार ट्रेन मधील डब्यांमध्ये झुरळे ही प्रवासी लोकांच्या सामानाव्दारे येतात, त्यासाठी वेळोवेळी पेस्ट कंट्रोलची (Pest control) कारवाई केली जाते. ज्या गाडीतून तक्रारदार प्रवास करीत होते, त्यातील डब्यांची दिनांक-22/09/2012 रोजी एका बाहेरच्या एजन्सी मार्फत जंतु विरहित (disinfestations treatment) प्रक्रियेची कार्यवाही केलेली होती. दिनांक-27/09/2012 ला त्या डब्यात झुरळांचा त्रास होता, अशी तक्रार इतर प्रवाश्यांकडून त्यांना प्राप्त झालेली नव्हती. परंतु जंतु विरहित प्रक्रिया पार पाडल्या नंरतही काही प्रवासी लोक डब्यात खानपान करतात व तेंव्हा अन्नाचे कण खाली पडतात, त्यामुळे झुरळ पुन्हा येऊ शकतात. त्याशिवाय झुरळांवर काही अंशी नियंत्रण करता येते परंतु त्यांचा संपूर्णपणे नायनाट करता येत नाही. गाडीतील प्रत्येक डबा हा स्वच्छ व किटकां पासून मुक्त राहावा यासाठी रेल्वे प्रशासन आवश्यक ती कारवाई करीत असते, परंतु काही निष्काळजी प्रवाश्यांमुळे, जसा फायद्दा व्हावयास हवा, तसा तो होत नाही, अशा प्रवाश्यांवर रेल्वेला नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही. अशाप्रकारे तक्रारीतील मजकूर अमान्य करुन, तक्रारदारांची नुकसान भरपाईची मागणी नाकबुल करुन तक्रार खारीज करण्याची विनंती करण्यात आली.
04. तक्रारदारांचे वकीलांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला. विरुध्दपक्षाचे वकीलांनी लेखी युक्तीवाद दाखल केला परंतु मौखीक युक्तीवाद केला नाही. तसेच तक्रारदारांनी दाखल केलेल्या दस्तऐवजांचे अवलोकन करण्यात आले, त्यावरुन मंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे देण्यात येतो-
::निष्कर्ष ::
05. विरुध्दपक्षा तर्फे दाखल लेखी उत्तरावरुन, उभय तक्रारदार हे एक्सप्रेस ट्रेनच्या डब्यातून प्रवास करीत होते या बद्दल वाद उत्पन्न होत नाही. रेल्वे प्रशासनाची ही जबाबदार ठरते की, त्यांनी त्यांच्या प्रवाश्यानां सुरक्षीत प्रवास आणि प्रवासा दरम्यान आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत. उभय तक्रारदारांचा असा आरोप आहे की, प्रवासा दरम्यान त्यांना व इतर प्रवाश्यानां ते प्रवास करीत असलेल्या डब्यांमध्ये झुरळांचा त्रास सहन करावा लागला आणि त्यामुळे प्रवासा दरम्यान ते शांतपणे प्रवास करु शकले नाही. मौखीक तक्रारी व लेखी तक्रार करुनही रेल्वे प्रशासनाकडून त्यावर काहीही कारवाई करण्यात आली नाही. विरुध्दपक्षाने गाडीतील झुरळांचे त्रासा बद्दलची तक्रारदारांची विधाने नाकारलेली नाहीत. या त्रासामागे बरीच कारणे असू शकतात, ही बाब पण सत्य आहे की, झुरळांचा पूर्णपणे नायनाट झालेला नाही.
06. घटने बद्दल बोलावयाचे झाले तर, असे दिसून येईल की, तक्रारदारांनी लेखी तक्रार कम्प्लेंट बॉक्स मध्ये टाकली होती, त्याची प्रत त्यांनी अभिलेखावर दाखल केली आहे. याशिवाय तक्रारकर्ता क्रं-1) यांनी तक्रारीचे समर्थनार्थ त्यांची साक्ष प्रतिज्ञापत्राव्दारे दिलेली आहे. विरुध्दपक्षाने असा कुठलाही पुरावा दाखल केलेला नाही, ज्यावरुन असे म्हणता येईल की, तक्रारदार प्रवास करीत असलेल्या त्या डब्याची योग्य ती साफ-सफाई आणि व्यवस्था केलेली होती. ती गाडी प्रवासाला निघण्यापूर्वी तिच्या डब्यांमध्ये जंतुविरहित प्रक्रियेची कारवाई (disinfestations treatment) केली होती, हे विरुध्दपक्ष दाखवू शकले असते. विरुध्दपक्षाचे लेखी उत्तरा वरुन असे दिसून येते की, या झुरळांचे त्रासा बद्दलची जबाबदारी ते प्रवाश्यांवर ढकलीत आहेत. आम्ही, काही अंशी विरुध्दपक्षाच्या या म्हणण्याशी सहमत आहोत की, काही निष्काळजी प्रवाश्यांच्या वागण्यामुळे गाडीतील डब्यांमध्ये बरीच घाण होते व त्यामुळे किटक व जंतु डब्यांमध्ये पसरतात परंतु केवळ त्या कारणांमुळे विरुध्दपक्ष हे आपली जबाबदारी झटकू शकत नाही. विरुध्दपक्ष हे दाखविण्यास असमर्थ ठरले की, त्यांनी तक्रारदारांच्या लेखी तक्रारीवर कोणती कारवाई केली, त्यांनी तक्रारदारांच्या नोटीसला उत्तर पण दिले नाही, ज्यावरुन असे दिसते की, ते प्रवाश्यांच्या अडी-अडचणी व असुविधांकडे दुर्लक्ष्य करीत आहेत.
07. आमच्या मते, तक्रारदार हे विरुध्दपक्षाच्या सेवेतील या कमतरतेमुळे नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत. परंतु उभय तक्रारदरांना प्रवासाचे भाडे परत मिळण्याचा हक्क आहे याचेशी आम्ही सहमत नाही कारण त्यांनी त्या गाडीतून प्रवास केलेला आहे. नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करता उभय तक्रारदारांची विरुध्दपक्षा विरुध्दची तक्रार मंजूर होण्यास पात्र आहे, त्यावरुन आम्ही तक्रारीत पुढील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-
::आदेश ::
(1) उभय तक्रारदारांची तक्रार विरुध्दपक्ष क्रं-(1) ते क्रं-(3) विरुध्द “वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या” (Jointly & severally) अंशतः मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्दपक्षांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी उभय तक्रारदारांना त्यांच्या प्रवासा दरम्यान झालेल्या त्रासा बद्दल प्रत्येकी रुपये-10,000/- (अक्षरी प्रत्येकी रुपये दहा हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-5000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्त) तक्रारदारांना द्दावेत.
(3) उभय तक्रारदारांची प्रवास तिकिटाचे पैसे परत मिळण्याची मागणी नामंजूर करण्यात येते.
(4) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं-(1) ते (3) यांनी “वैयक्तिक आणि संयुक्तिक स्वरुपात” निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्या पासून तीस दिवसांचे आत करावे.
(5) प्रस्तुत निकालपत्राच्या प्रमाणित प्रती उभय पक्षांना निःशुल्क उपलब्ध करुन
देण्यात याव्यात.