तक्रारकर्त्यातर्फे वकील :- ॲड. आर. एस. अग्रवाल
विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 2 तर्फे वकील :- ॲड. ए.के. सराग
विरुध्दपक्ष क्रमांक 3 तर्फे वकील :- ॲड. यु.बी. देशमुख
::: आ दे श प त्र :::
मा. अध्यक्षा, सौ. एस.एम. उंटवाले यांनी निकाल कथन केला :-
ग्राहक संरक्षण कायदयाचे कलम 12 अन्वये तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या तक्रारीचा सारांश येणेप्रमाणे :-
तक्रारकर्ते हे अकोला येथील कायमचे रहिवासी असून ते दिनांक 29-09-2014 रोजी नवजिवन एक्सप्रेसने सुरतला गेले होते. तसेच दिनांक 05-10-2014 रोजी परत अकोला येथे येण्यासाठी ते गांधीधाम ते विशाखापट्टनम एक्सप्रेस ट्रेन क्रमांक 18502 ने गांधीधाम वरुन बसून सेकंड एसी च्या डब्यामध्ये प्रवास करीत होते. सर्व तिकीट तक्रारकर्ता यांनी अकोला येथूनच दिनांक 06-08-2014 रोजी विरुध्दपक्ष क्रमांक 3 चे अधिकृत ई तिकीट विक्रेता श्री. अनिल देवानी अकोला यांचेकडून तक्रारकर्ता एकूण तीन लोकांसाठी सेकंड ए.सी. चे तिकीट विक्रेत्याला ₹ 5,572/- रक्कम देवून गांधीधाम ते अकोला प्रवासाची तिकीट विकत घेतले होते. तक्रारकर्ते हे नेहमीच ए.सी. कोचमध्ये प्रवास करतात. त्या ई-तिकीटचे पीएनआर क्रमांक 8126710086 असे असून ती तिकीट सेकंड ए.सी.च्या ए-1 या क्रमांकाच्या कोचमध्ये बर्थ क्रमांक 45, 43, 44 चे आरक्षण होते. प्रवासाचा दिनांक 05-10-2014 होता. तसेच सदरहू ट्रेन ही गांधीधाम स्टेशनवरुन रात्री 10.45 मिनिटाला सुटणार होती.
तक्रारकर्ते हे गांधीधाम रेल्वे स्टेशनवर गाडीतील बर्थवर बसले त्यावेळेस त्यांचे निदर्शनास आले की, सदरचा कोच हा फार जुना होता व त्या कंपार्टमेंटचा वरील सिलींग हा पूर्णपणे फाटलेला किड लागलेले होते व ए.सी. कोणत्याही प्रकारे व्यवस्थित चालू स्थितीत नसल्यामुळे तो कुलिंग करीत नव्हता. म्हणून तक्रारकर्त्याने सदरहू गाडी प्लॅटफॉर्मवरुन सुटण्याअगोदरच एसी अटेंन्डन्ट, स्टेशन मास्तर व सदरहू ट्रेनच्या टी.सी. ला सदरच्या गैरसोयीबाबत कळविले व सदरहू लोकांना तक्रारकर्त्याने ए.सी. लवकर दुरुस्त करण्याबाबत विनंती केली. परंतु, सदरहू अधिका-यांनी/कर्मचा-यांनी तक्रारकर्त्याच्या विनंतीची कोणतीही दखल घेतली नाही व तक्रारीचे निराकरण केले नाही. तक्रारकर्त्याने परत एक तासाने एसी टेक्नीशियन श्री. बी.सी. मौली व टीसी श्री. बोधईराम एल. जैसवार यांना वारंवार सांगून सुध्दा त्यांनी एसी दुरुस्त केला नाही. व तक्रारकर्त्याचे गैरसोयीचे निराकरण केले नाही व कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने सदरहू टीसी ला तक्रार करण्याकरिता तक्रारीपुस्तिकेची मागणी केली असता सुरुवातीला सदरहू टीसीने त्याचेकडे तक्रारपुस्तिका नाही असे उडवाउडवीची उत्तरे दिली व त्यानंतर सदरहू तक्रारपुस्तिका देण्यास टाळाटाळ केली.
तक्रारकर्त्याने रात्री 11.50 मिनीटाला तक्रार पुस्तकाच्या अनुक्रमांक 22 वर पश्चिम रेल्वेच्या तक्रारपुस्तिकेत दिनांक 05-10-2014 रोजी, सदरहू एसी नादुरुस्त आहे व सदरहू कोचमध्ये कोणतीही सोय नाही व कर्मचारी तक्रारकर्त्याच्या तक्रारीची कोणतीही दाखल घेत नाही अशाप्रकारची तक्रार त्या तक्रारपुस्तिकेमध्ये नोंदविली. तक्रारकर्त्यास असे आश्वासन देण्यात आले होते की, अहमदाबाद स्टेशन निघून गेल्यावर सदरहू एसी ठिक करण्यात येईल. परंतु, तो एसी त्यानंतरही दुरुस्त करण्यात आला नव्हता.
सदरची तक्रार दिल्यानंतर फार वेळाने सदरहू टीसी श्री. बालचंद्र नथ्थु काकडे यांने एसी कोच इन्चार्ज ला एसी दुरुस्त करण्यासाठी सांगितले असता त्या टेक्नीशियन ने सदरहू एसीला ठीक करण्याऐवजी त्याने त्या एसी चे कुलिंग हे पूर्ण वेगात चालू करुन दिले. त्यामुळे थंडीचे प्रमाण फार भयंकर वाढले. परंतु त्या टेक्नीशियनला त्या एसी ला व्यवस्थित प्रमाणावर करता आले नाही, त्यामुळे एसी च्या डक्टमधील पाईप मधून तक्रारकर्त्याच्या बर्थवर पाणी पडू लागले होते. त्यामुळे तक्रारकर्त्यांना रात्रभर त्यांच्या बर्थवर झोपता आलेले नव्हते व त्यांना रात्रभर जागे राहावे लागले. सदरचा एसी हा अकोला रेल्वे स्टेशन येईपर्यंत व तक्रारकर्त्याचा प्रवास संपेपर्यंत नादुरुस्त होता. त्यामुळे विरुध्दपक्षाच्या निष्काळजीपणा, हलगर्जीपणा व असहकार्यामुळे तक्रारकर्त्यांना बराच मानसिक, शारीरिक व आर्थिक नुकसान तसेच नाहक मनस्ताप व गैरसोय सदरच्या प्रवासामध्ये व त्यानंतर सुध्दा सहन करावा लागला. सबब, तक्रारकर्त्याची विनंती की, तक्रारकर्त्याची तक्रार संपूर्णपणे मंजूर करण्यात यावी. 1) तक्रारकर्ते यांना विरुध्दपक्ष यांनी सेवेत केलेल्या अक्षम्य हलगर्जीपणा, शारीरिक, आर्थिक व मानसिक त्रासाची नुकसान भरपाईपोटी प्रत्येकी रक्कम ₹ 25,000/- तसेच तिकीटाची रक्कम ₹ 5,572/- व सदरहू तक्रारीचा खर्च ₹ 5,000/- असे एकूण ₹ 85,572/- दर साल दर शेकडा 12 टक्के व्याजासहित दिनांक 06-08-2014 पासून रक्कम तक्रारकर्त्यास प्रत्यक्ष मिळेपर्यंत देण्याचा आदेश विरुध्दपक्ष यांच्या विरोधात पारित व्हावा.
सदर तक्रार शपथेवर दाखल केली असून त्यासोबत एकंदर 08 दस्तऐवज पुरावा म्हणून दाखल केलेले आहेत.
विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 2 चा लेखी जवाब :-
सदर तक्रारीची नोटीस मंचातर्फे मिळाल्यानंतर विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 2 यांनी लेखी जवाब दाखल करुन तक्रारीतील सर्व म्हणणे फेटाळले व जवाबात असे नमूद केले आहे की, सदरहू तक्रार अर्ज हा सपशेल खोटा असून तो चालू शकत नाही. येथे नमूद करण्यात येते की, ट्रेन नं. 18502 गांधीधाम ते विशाखापट्टनम श्री. बोधाईराम एल. जैस्वार हे डेप्युटी चिफ इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत होते व त्यांची डयुटी ही कोच क्रमांक ए-1, बी-1 व बी-2 वर होती व तक्रारकर्ते हे कोच क्रमांक ए-1 मधून प्रवास करत होते. तर परिस्थिती अशी आहे की, सदरहू गाडी सुरु झाल्यावर असे लक्षात आले की, सदरहू कोच मधील ए.सी. हा योग्यप्रकारे हवा थंड करीत नव्हता. तक्रारदार क्रमांक 1 हयांनी श्री जयस्वार हयांना अशी धमकी दिली की, सदरहू ए.सी. हा जर ध्रागध्रा रेल्वे स्टेशनपर्यंत दुरुस्त करण्यात आला नाही तर ते गाडीची साखळी ओढून गाडी थांबवतील. परंतु, सर्व प्रकारचे सदरहू ए.सी. दुरुस्त करण्याचे प्रयत्न करुनही मेकॅनिकला सदरहू ए.सी. दुरुस्त करता आला नाही व त्याला दुरुस्त करण्यात यश आले नाही.
हया ठिकाणी ही बाब नमूद करण्यात येते की, तक्रारकर्त्याला थोडा त्रास व गैरसोय विरमगांव स्टेशन पर्यंत सोसावी लागली. परंतु ही गैरसोय काही फार गंभीर स्वरुपाची नव्हती. वास्तविक एसी हा चालू होता जरी तो चांगल्याप्रकारे सेवा देत नव्हता. तरी कोणत्याही रेल्वे कर्मचा-याचा कोणताही दोष नव्हता. कारण एसी प्लॅन्ट ही एक मशिनरी आहे व कोणत्याही क्षणी योग्य काम देण्याचे बंद होऊ शकते. जर रेल्वे कर्मचा-यांनी सदरहू एसी दुरुस्त करण्याचे काहीचे प्रयत्न केले नसते तर त्यांनी सेवा देण्यात कसूर केला, असे म्हणता आले असते, हया प्रकरणात श्री. जयस्वार यांनी सूचना देताच दुरुस्ती काम हे ताबडतोब एसी मेकॅनिक हयानी हातात घेतले व विरमगांव स्टेशन येईपर्यंत सदरहू एसी हा दोषमुक्त होऊन काम देत होता. कारण त्यातील दोष हा पूर्णपणे निघाला होता व चांगल्याप्रकारे तो वातावरण थंड करु लागला होता.
ही गोष्ट खरी आहे की, बोगी ही जुनी होती, परंतु ती चांगल्या स्थितीत होती. त्याकरिता कोणत्याही परिस्थितीत रेल्वे प्रशासनाला जबाबदार धरता येऊ शकणार नाही. तक्रारकर्त्याला काही प्रमाणात गैरसोय सोसावी लागली असेल परंतु ही घटना रेल्वे प्रशासनाच्या नियंत्रणाबाहेरील आहे.
येथे नमूद करण्यात येते की, भालचंद्र नथ्थु काकडे हे टी.सी. नव्हते किंवा टीटीई ही म्हणून कामावर नव्हते. परंतु ते कोच अटेन्डंट म्हणून होते व त्यांनी देखील सदरहू एसी दोष निवारणार्थ मदत केली व ते एसी मधील दोष काढण्यात सहभागी होते. करिता तक्रारकर्त्याचा तक्रार अर्ज जबर दंड त्यांचेवर बसवून खारीज करण्यात यावी व त्यांचेकडून खोटी तक्रार दाखल केल्याबद्दल भरपाई वसूल करण्यात यावी.
विरुध्दपक्ष क्रमांक 3 चा लेखी जवाब :-
सदर तक्रारीची नोटीस मंचातर्फे मिळाल्यानंतर विरुध्दपक्ष क्रमांक 3 यांनी लेखी जवाब दाखल करुन तक्रारीतील सर्व म्हणणे फेटाळले व जवाबात असे नमूद केले आहे की, प्रवाशांच्या रेल्वे बोगीमध्ये कोणतेही तांत्रिक दोष असल्यास अथवा आढळल्यास या दोषाचे निराकरण करण्याची संपूर्ण जबाबदारी ही विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 2 यांची आहे. कारण विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 2 यांच्याकडे विशेष देखभाल विभाग आहे आणि या विभागात अभियंते कार्यरत असतात व हे अभियंते वरील तांत्रिक दोष दुरुस्त करण्यास जबाबदार असतात. विरुध्दपक्ष क्रमांक 3 यांचे कार्यक्षेत्र हे अत्यंत मर्यादित असून फक्त प्रवाशांना तिकीट देण्याचे आहे. वास्तविक पाहता विरुध्दपक्ष क्रमांक 3 तर्फे तक्रारकर्त्यांना सेवेत कुठलीही न्युनता दिलेली नाही. त्यामुळे विरुध्दपक्ष क्रमांक 3 च्या विरुध्द तक्रार खारीज करण्यात यावी.
का र णे व नि ष्क र्ष
या प्रकरणातील तक्रारकर्त्याची तक्रार, विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 2 यांचा संयुक्त लेखी जवाब, विरुध्दपक्ष क्रमांक 3 चा स्वतंत्र लेखी जवाब, उभयपक्षाने दाखल केलेले सर्व दस्तऐवज, तक्रारकर्त्याचे प्रतिउत्तर, पुरावा, उभयपक्षांचा तोंडी युक्तीवाद व तक्रारकर्ते यांनी दाखल केलेले न्यायनिवाडे यांचे काळजीपूर्वक अवलोकन केले व खालील निष्कर्ष कारणे देवून नमूद केला तो येणेप्रमाणे.
या प्रकरणात तक्रारकर्ते व विरुध्दपक्ष क्रमांक 1 ते 3 यांना मान्य असलेल्या बाबी अशा आहेत की, तक्रारकर्ते यांनी विरुध्दपक्ष क्रमांक 3 कडून अकोला येथून नवजिवन एक्सप्रेसचे तिकीट काढले होते व दिनांक 05-10-2014 रोजीचे परत अकोला येथे येण्याकरिता गांधीधाम ते विशाखापट्टनम एक्सप्रेस मध्ये सेकंड ए.सी. च्या ए-1 क्रमांकांच्या कोचमधील अकोल्यापर्यंतचे तिकीट एकूण तीन तक्रारकर्त्यांसाठी ₹ 5,572/- रक्कम देवून गांधीधाम ते अकोला प्रवासाची तिकीट विकत घेतले होते. त्यामुळे तक्रारकर्ता विरुध्दपक्षाचा ग्राहक होतो यात वाद नाही. तक्रारकर्ता व विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 2 यांना ही बाब देखील मान्य आहे की, सदर रेल्वेतील तक्रारकर्ता प्रवास करत असलेल्या कोचमधील एसी हा व्यवस्थित चालू स्थितीत नसल्यामुळे तो कुलिंग करत नव्हता व सदर बोगी ही जुनी होती. विरुध्दपक्ष क्रमांक 1 ते 2 यांनी जवाबात ही देखील कबुली दिली की, “ सदरहू एसी दुरुस्त करण्याचे प्रयत्न करुनही मेकॅनिकला एसी दुरुस्त करता आला नाही व यात रेल्वे कर्मचा-याची चूक नाही, कारण ती एक मशिनरी आहे. तक्रारकर्त्याला काही प्रमाणात गैरसोय सोसावी लागली. परंतु, ही घटना रेल्वे प्रशासनाच्या नियंत्रणाबाहेरील आहे. ”
तक्रारकर्त्याचे मते सदर एसी अकोला रेल्वे स्टेशन येईपर्यंतही नादुरुस्त होता व विरुध्दपक्षाच्या कर्मचा-यांनी याबाबत तोंडी तक्रार केल्यावर दाद दिली नाही तसेच लेखी तक्रार करणेसाठी तक्रारपुस्तिका ही लवकर उपलब्ध करुन दिली नाही. तक्रार नोंदविल्यावर देखील विरुध्दपक्षाचे कर्मचारी एसी दुरुस्त करण्यासाठी कोणतेही प्रयत्न करत नव्हते. उलट उध्द्टपणाने बोलले, टीसी श्री. बी.एल. जयस्वार यांनी अहमदाबाद रेल्वे स्टेशन मॅनेजर यांच्याशी सुध्दा चर्चा केली. परंतु, अहमदाबाद रेल्वे स्टेशनवर सुध्दा एसी सुरु झाला नव्हता. त्यानंतर टीसी. श्री. बालचंद्र नथ्थु काकडे यांनी टेक्निशियनला सांगितल्यावर त्यांनी एसीचे कुलिंग पूर्ण वेगात चालू करुन दिले त्यामुळे थंडीचे प्रमाण फार वाढले व एसीच्या डक्टपाईप मधून बर्थवर पाणी पडू लागले. त्यामुळे तक्रारकर्त्याला त्रास सहन करावा लागला. तक्रारकर्ते यांनी रेकॉर्डवर फोटोग्राफ्स व दस्तऐवज तसेच एकंदर 16 न्यायनिवाडे दाखल केले आहेत. याउलट विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 2 यांनी उपमुख्य तिकीट निरीक्षक, अहमदाबाद, पश्चिम रेल्वे बोधईराम एल जैस्वार व योगेशकुमार पाठक उप मुख्य तिकीट निरीक्षक अहमदाबाद यांचे विधान, प्रतिज्ञालेख रेकॉर्डवर दाखल करुन असा युक्तीवाद केला की, सदर एसी दुरुस्त करण्याबाबतचे निर्देश श्री. जैस्वार यांनी एसी मेकॅनिकला दिले होते. परंतु, तक्रारदाराने अशी धमकी दिली होती की, सदर एसी जर ध्रागध्रा रेल्वे स्टेशनपर्यंत दुरुस्त न झाल्यास ते गाडीची साखळी ओढतील व गाडी थांबवतील. परंतु, विरुध्दपक्षाच्या कर्मचा-यांनी एसी हा विक्रमगड स्टेशन येईपर्यंत सुरु करुन दिला होता. त्यामुळे, तकारकर्त्याला थोडीफार गैरसोय व त्रास विरमगांव स्टेशनपर्यंत सोसावा लागला व ही गैरसोय फार गंभीर स्वरुपाची नव्हती.
उभयपक्षाच्या युक्तीवादावरुन व ज्या बाबी उभयपक्षांना मान्य आहेत त्यावरुन मंचाचे असे मत आहे की, तक्रारकर्त्याने गांधीधाम ते अकोला या प्रवासासाठी भरमसाठ रक्कम ₹ 5,572/- रोख देवून आरक्षण केले होते. त्यामुळे विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 2 यांनी त्याप्रमाणे सेवा, सुविधा तक्रारकर्त्याला प्रवासात उपलब्ध करुन दयायला पाहिजे होत्या. परंतु, विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 2 यांनी ही कबुली दिली की, तक्रारकर्त्याच्या कोच मधील एसी नादुरुस्त होता व बोगी जुनी होती. तक्रारकर्त्याच्या मते तक्रार देवूनही विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 2 च्या कर्मचा-यांनी सदर एसी अकोला रेल्वे स्टेशन येईपर्यंतही चालू करुन दिला नाही. याउलट, विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 2 च्या मते सदर एसी विक्रमगड स्टेशन येईपर्यंत सुरु देखील करुन दिला, त्यामुळे थोडा-फार त्रास, गैरसोय विरमगांव स्टेशन पर्यंत सोसावा लागला. परंतु श्री. जैस्वार यांचे विधानानुसार असे आहे की, सदर कोच च्या मेकॅनिकने एसी हा विरमगाव स्टेशनला दुरुस्त केला होता. त्यामुळे अहमदाबाद रेल्वे स्टेशनवर जो ईतर रेल्वे कर्मचारीवृंद एसी दुरुस्तीसाठी आला होता, तरी एसी हा त्याआधीच सुरु झाला होता व त्यांची डयुटी अहमदाबाद स्टेशनवर पूर्ण झाली होती. श्री पाठक यांच्या विधानामध्ये असे आहे की, अहमदाबाद ते सुरत सदर एसी ठीक होता म्हणजे विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 2 च्या जवाबात व श्री. जैस्वार यांच्या विधानामध्ये थोडीफार विसंगती आढळते. शिवाय कोणत्या एसी मेकॅनिकने एसी दुरुस्त केला, त्याचे नाव व प्रतिज्ञालेख विरुध्दपक्षाने रेकॉर्डवर दाखल केलेले नाही. शिवाय तक्रारकर्त्याचे असे म्हणणे आहे की, अहमदाबाद स्टेशन निघून गेल्यावर टीसी श्री. बालचंद्र नथ्थु काकडे यांनी एसी कोच इन्चार्ज ला एसी दुरुस्त करण्यासाठी सांगितले असता, त्या टेक्निशियनने सदरहू एसी ला ठिक करण्याऐवजी, एसीचे कुलिंग पूर्ण वेगात चालू केले, त्यामुळे थंडीचे प्रमाण वाढले व डक्टमधून पाणी पडू लागले. तसेच तक्रारकर्त्याचे असे म्हणणे आहे की, श्री. काकडे हे अहमदाबाद ते भुसावळ पर्यंत कार्यरत होते. मात्र यावर विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 2 यांनी श्री. काकडे यांचे कोणतेही विधान अथवा प्रतिज्ञालेख रेकॉर्डवर दाखल केले नाही. उलट बचावाच्या कथनात अशी कबुली दिली की, श्री. काकडे हे कोच अडेन्डट होते व त्यांनी देखील एसी दोष निवारणार्थ मदत केली म्हणजे तक्रारकर्त्याच्या कथनाला की, श्री. काकडे हे अहमदाबाद ते भुसावळ पर्यंत कार्यरत होते, याला पुष्ठी मिळते तसेच यावर विरुध्दपक्षाचे कुठलेही नकारार्थी कथन अगर श्री. काकडे यांचे विधान उपलब्ध नाही, त्यामुळे सदर एसी हा भुसावळपर्यंतही ठिक झाला नव्हता असे अनुमान निघते.
श्री. बालचंद्र नथ्थु काकडे हे मुख्य रेल्वे तिकीट परीक्षक होते असे तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या ओळखपत्र फोटोवरुन दिसून येते. परंतु, श्री. काकडे यांचे कोणतेही नकारार्थी स्पष्टीकरण रेकॉर्डवर उपलब्ध नाही तसेच विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 2 यांनी तक्रारकर्त्याच्या तक्रारीसंबंधी केलेल्या पुर्ततेचा अहवाल रेकॉर्डवर दाखल केला नाही. उलट जवाबात दिलेल्या काही कबुली कथनावरुन मंच या निष्कर्षाप्रत आले आहे की, विरुध्दपक्षाच्या कर्मचा-यांनी अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला आहे व ते विरुध्दपक्षाचे कर्मचारी असल्यामुळे विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 2 या न्युनतेबद्दल जबाबदार धरले जातात. म्हणून त्यांनी तक्रारकर्त्यास तिकीटाची रक्कम सव्याज व ईतर नुकसान भरपाई प्रकरणाच्या न्यायिक खर्चासह दिल्यास ते न्यायोचित होईल या निष्कर्षाप्रत मंच आले आहे.
या संपूर्ण प्रकरणात विरुध्दपक्ष क्रमांक 3 यांची कोणतीही सेवा न्युनता न आढळल्याने त्यांचेवर कोणतीही जबाबदारी मंचाने टाकलेली नाही. तक्रारकर्ते यांनी सेवेतील न्युनतेबाबत जे वरिष्ठ न्यायालयांचे न्यायनिवाडे दाखल केले आहेत. त्यावर मंचाने देखील आदर राखत भिस्त ठेवली आहे. सबब, अंतिम आदेश पारित केला तो येणेप्रमाणे.
अं ति म आ दे श
1) तक्रारकर्ते यांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2) विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 2 यांनी संयुक्तरित्या वा वेगवेगळेपणे सेवेतील न्युनतेबद्दल तक्रारकर्ते यांना तिकीट रक्कम ₹ 5,572/- ( अक्षरी रुपये पाच हजार पाचशे बाहत्तर फक्त ) दर साल दर शेकडा 8 टक्के व्याज दराने दिनांक 05-10-2014 पासून तर प्रत्यक्ष रक्कम अदाईपर्यंत व्याजासहित दयावी तसेच शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी नुकसान भरपाईपोटी ₹ 7,000/- ( अक्षरी रुपये सात हजार फक्त ) व प्रकरणाचा न्यायिक खर्च ₹ 3,000/- ( अक्षरी रुपये तीन हजार फक्त ) दयावा.
3) विरुध्दपक्ष क्रमांक 3 विरुध्द तक्रार खारीज करण्यात येते.
4) विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 2 यांनी वरील आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाचे आंत करावे.
5) उभयपक्षकारांना आदेशाची प्रमाणित प्रत विनामुल्य देण्यात यावी.