निकालपत्र (दि.30/04/2014)व्दाराः- मा. अध्यक्ष – श्री संजय पी.बोरवाल
1. प्रस्तुतची तक्रार सामनेवाला बँकेने सेवेत त्रुटी ठेवलेमुळे नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केलेली आहे.
2. तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी :- तक्रारदार यांनी सामनेवाला बॅंकेकडून स्वत:चे घर बांधणेसाठी सन-2003 मध्ये गृहकर्ज घेतले होते. त्यावेळी सदर कर्जाचा व्याजाचा दर हा 10.5%इतका होता. त्यानंतर सामनेवाला यांनी प्रोसेसिंग चार्जेस रु.5,180/- भरुन व्याजाचा दर कमी करुन 8.75% इतका लागू केला. दि.25/7/07 रोजी सामनेवाला यांनी अचानक तक्रारदार यांना कोणतीही लेखी अथवा तोंडी सुचना न देता तक्रारदार यांचे कर्ज खातेवर रक्कम रु.25,596/-‘ टू लिकेज ऑफ इन्कम डयु टू चेंज इन इंटरेस्ट रेट’ या सदराखाली नांवे टाकली. त्यामुळे तक्रारदार यांनी सामनेवाला यांना प्रत्यक्ष भेटून अथवा लेखी कळवूनदेखील त्यांनी काहीही प्रतिसाद न दिलेने मे. मंचात तक्रार अर्ज क्र.93/2010 दाखल केला होता. सदरचा तक्रार अर्ज मंजूर करणेत आला तरीसुध्दा सामनेवाला यांनी त्याची दखल घेतली नाही. शेवटी तक्रारदार यांनी वसुली अर्ज क्र.78/11 दाखल केला त्यावेळी सामनेवाला यांनी तक्रारदाराचे खाती ती रक्कम जमा केली. परंतु सामनेवाला यांनी व्याजदरामध्ये कोणताही बदल केला नाही. व्याजाचा दर हा पुर्वीप्रमाणेच 10.50% कायम ठेवून व्याजाची आकारणी केली आहे. सदर बाबत तक्रारदार यांनी सामनेवाला यांना दि.25/05/11 रोजी वकीलांमार्फत नोटीस पाठवून तसे कळवले. परंतु सदर नोटीस मिळूनही सामनेवाला यांनी त्यास उत्तर दिले नाही किंवा व्याजदरामध्ये बदलही केला नाही. म्हणून प्रस्तुतचा तक्रार अर्ज मे. मंचात दाखल करणे भाग पडले आहे. सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज मंजूर करुन तक्रारदाराचे कर्ज खातेस पूर्ववत द.सा.द.शे.9.25%व्याजदर आकारणी करणेबाबत सामनेवाला यांना आदेश व्हावा तसेच रक्कम रु.5,000/- मानसिक त्रासापोटी व रु.700/- टायपिंग,झेरॉक्स व इतर खर्च असे एकूण रक्कम रु.5,700/- सामनेवालाकडून व्याजासह वसूल होऊन मिळावेत अशी विनंती तक्रारदार यांनी सदर मंचास केली आहे.
3. तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत दाखल केलेल्या कागदपत्रातील अ.क्र.1 वर तक्रारदार यांचे कर्जाचा खातेउतारा, अ.क्र.2 वर तक्रार अर्ज क्र.93/2010 चे निकालपत्र, अ.क्र.3 वर तक्रारदाराने सामनेवाला यांना वकीलामार्फत पाठविलेली नोटीस व त्याची पोस्टाची पावती, अ.क्र.4 वर सदर नोटीस सामनेवाला यांना पोहोचलेची पोस्टाची पोहोच पावती इत्यादी कागदपत्रे तक्रारदाराने दाखल केलेली आहेत. तसेच दि.05/12/2011 रोजी तक्रारदाराने अॅफिडेव्हीट दाखल केलेले आहे.
4. सामनेवाला यांनी दि.09/11/2011 रोजी म्हणणे दाखल केलेले असून तक्रारदारांची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारलेली आहे. सामनेवाला त्यांचे म्हणणेमध्ये पुढे सांगतात की, वस्तुत: यातील तक्रारदार यांनी सामनेवाला विरुध्द तक्रार अर्ज क्र.93/2010 दाखल केला होता. तो दि.25/11/10 रोजी मे. मंचाने मंजूर केलेला होता. सदर निकालाप्रमाणे व तक्रारदाराचा वसुली अर्ज क्र.78/11 मध्ये डीडी क्र.750535 दि.18/04/11 अन्वये रक्कम जमा केली होती व तक्रारदाराचा खाते नंबर 321406510109055 वर रक्कम रु.25,496/-(अंडर प्रोटेस्ट) जमा केलेले होते. तक्रारदार यांनी सदरची बाब पूर्वीच्या तक्रार अर्ज क्र.93/2010 मध्ये मे. मंचासमोर मांडलेली नव्हती व नाही. त्यामुळे त्याच कर्ज खातेसंदर्भाने पुन्हा दुसरा वाद उपस्थित करुन वेगळी दाद मे. मंचाकडून मागणेचा कोणताही, कसलाही कायदेशीर हक्क, संबंध, अधिकार प्रस्तुत तक्रारदार यांना नाही. त्यामुळे प्रस्तुत अर्जास ऑर्डर 2 रुल 2 या तत्वाची बाधा येते. सदरची बॅक ही राष्ट्रीयकृत बॅंक असून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घालून दिलेल्या नियमानुसारच चालते. त्यामुळे बँकेने केलेली व्याजाची आकारणी ही अत्यंत योग्य व कायदेशीर आहे. सदर कामातील पक्षकारांदरम्यान महाराष्ट्र राज्य आयोग, मुंबई येथे सामनेवाला यांनी अपील क्र.978/2011 दाखल केलेले आहे. ते अपील न्यायप्रविष्ठ आहे. सध्याचा सामनेवाला बँकेच व्याजाचा दर 14.75% इतका असून सदर सर्क्यूलर व्दारे सध्याचा गृहतारण कर्ज व्याजदर 12.75% इतका आहे. सदर सामनेवाला बँक ही तक्रारदार यांच्या गृहतारण कर्जास 10.50%इतका दर मंजूर अटीप्रमाणे लावलेला आहे. सदर तक्रारदार यांना बँकेने बदललेल्या व्याजदराप्रमाणे व्याज देणे भाग आहे. तसेच सर्क्यूलर क्र.6805दि.29/01/04 अन्वये सामनेवाला बँकेने त्यांच्या प्रचलित ग्राहकांना सुट दिलेली असून प्रचलीत व्याजाचा फ्लोटींग दर दिलेला आहे. सदर तक्रारदार यांना 10.75% व्याजदर होता. सदर 9.25% व्याजदर हा ज्या ग्राहकांनी फिक्सड रेट ऑफ इंटरेस्ट घेतलेला आहे त्यांना हा बेनिफीट/सुविधा घेता येणार नाही. त्यामुळे तक्रारदार यांचा तक्रार अर्ज खर्चासह नामंजूर करणेत यावा व सामनेवाला यांना नाहक त्रास दिलेबद्दल तक्रारदारांना रक्कम रु.10,000/-चा दंड करणेत यावा अशी विनंती सामनेवाला यांनी सदर मंचास केली
आहे.
सामनेवाला यांनी दि.02/02/12 रोजी त्यांचे सर्क्यूलर क्र.6805 ची प्रत दाखल केली आहे. तसेच पुराव्याचे शपथपत्र दि.18/01/12 रोजी दाखल केले आहे.
5. तक्रारदार यांची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवाला यांचे लेखी म्हणणे, दाखल कागदपत्रे व उभय पक्षांच्या वकीलांचा तोंडी युक्तीवाद याचे बारकाईने अवलोकन केले असता सदर गृहकर्जासंदर्भात तक्रारदार यांनी या मंचाकडे तक्रार अर्ज क्र.93/2010 करुन दाद मागितली होती. सदर तक्रार अर्ज मंजूर होऊन त्यामध्ये दि.25/11/2010 रोजी निकाल पारीत करणेत आला. सदर निकालाप्रमाणे सामनेवाला यांनी वसुली अर्ज क्र.78/2011मध्ये डीडी क्र.750535 दि.18/04/11अन्वये मानसिक व शारिरीक त्रासापोटीची व तक्रार अर्जाचे खर्चाची रक्कम अदा केलेली असून तक्रारदाराचे कर्ज खाते क्र.321406510109055 या अकौन्टवर रक्कम रु.25,496/-अंडरप्रोटेस्ट जमा केलेली आहे व मा. राज्य आयोग, मुंबई यांचेकडे अपील क्र.978/11 अन्वये अपीलदेखील केलेले असून सदरचे अपील न्यायप्रविष्ठ आहे असे दिसून येते.
6. तक्रारदार यांनी तक्रार अर्ज क्र.93/10चे निकालाप्रमाणे सामनेवाला यांनी सर्व आदेशाची पूर्तता केली असलेचे प्रस्तुत तक्रारीत नमुद केले आहे. तरी त्याच मुद्दयावर तक्रारदाराने पुन्हा प्रस्तुतचा अर्ज दाखल केला आहे. यापूर्वीच्या तक्रार अर्ज क्र.93/10 मध्ये तक्रारदारांनी व्याजाच्या फिक्स रेटचा मुद्दा उपस्थित केलेला होता व मंचाने त्याची दखल घेऊन सदर तक्रार अर्जामध्ये गुणदोषावर निकाल पारीत केलेला आहे. त्यामुळे त्याच मुद्दयावर पुन्हा दाद मागणेचा कायदेशीर हक्क तक्रारदारास नाही. तसेच मा. राज्य आयोग, मुंबई यांचेकडे सामनेवाला यांनी अपील क्र.978/11 अन्वये अपीलदेखील केलेले न्यायप्रविष्ठ तसेच तक्रारदाराचे सदरच्या अर्जास C.P.C.section-11 ची बाधा येते. सबब तक्रारदाराचा सदर तक्रार अर्ज नामंजूर करणेस पात्र आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत आहे.
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येतो.
2. खर्चाबाबत काही आदेश नाही.
3. आदेशाच्या प्रमाणित प्रतीं उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.