द्वारा घोषित श्रीमती अंजली देशमुख, अध्यक्ष. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे. तक्रारदाराचे पती कृष्णराव जाधव हे शेतकरी व शेतकरी अपघात विमा योजनेचे लाभधारक होते. दिनांक 7/1/2007 रोजी वाहन अपघातात त्यांचे निधन झाले. एफआयआर व पीएम करण्यात आला. तक्रारदाराने दिनांक 18/1/2008रोजी सर्व कागदपत्रासहीत क्लेमफॉर्म तससिलदार सिल्लोड यांच्याकडे देण्यात आला. तहसिलदार यांनी गैरअर्जदार क्रमांक 3 कबाल इन्शुरन्स कडे तो पाठविला. क्लेमची रक्कम मिळाली नसल्यामुळे सदरील तक्रार. तक्रारदार गैरअर्जदाराकडून रु 1,00,000/- 10 टक्के व्याजासह, नुकसान भरपाईसाठी रु 5000/- मागतात. तक्रारदाराने कागदपत्रे व शपथपत्र दाखल केले आहे. गैरअर्जदार क्रमांक 1 यांना नोटीस मिळूनही गैरहजर म्हणून त्यांच्या विरुध्द एकतर्फा सुनावणीचा आदेश मंचाने पारित केला. गैरअर्जदार क्रमांक 2 विमा कंपनीने तक्रारदाराच्या तक्रारीस विरोध दर्शविला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदाराची तक्रार ही पूर्णपणे मुदतबाहय आहे. तक्रारदाराने क्लेमफॉर्मसोबत आवश्यक ती कागदपत्रे पाठविली नाहीत. तसेच पॉलिसीच्या शर्ती व अटींचे पालन केले नाही त्यामुळे तक्रारदाराची तक्रार अमान्य करावी अशी विनंती ते करतात. गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी शपथपत्र दाखल केले आहे. गैरअर्जदार क्रमांक 3 कबाल इन्शुरन्सने त्यांचे लेखी म्हणणे दाखल केले. त्यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदाराचा क्लेम त्यांना दिनांक 4/2/2008 रोजी प्राप्त झाला. एमओयू प्रमाणे अपघाताच्या नंतर 90 दिवसापर्यंत ही घटना गैरअर्जदार विमा कंपनीस कळवावयास पाहिजे होते. तसेच क्लेमफॉर्मसुध्दा त्याचवेळेस पाठवावयास पाहिजे होता. पॉलिसीचा कालावधी हा दिनांक 15/7/2006 ते 14/7/2007 असा होता. तक्रारदाराने त्यांचा क्लेम दिनांक 14/10/2007 पर्यंत दाखल करावयास हवा होता. परंतु तक्रारदाराचा क्लेम हा दिनांक 4/2/2008 रोजी त्यांना प्राप्त झाला आहे. म्हणून तो क्लेम त्यांनी न स्विकारता तहसिलदार यांच्याकडे परत पाठवून दिला. दोन्ही पक्षकांरानी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदाराच्या पतीचे दिनांक 7/1/2007 रोजी निधन झाले आहे. तक्रारदाराने दिनांक 4/2/2008 रोजी क्लेम तहसिलदार सिल्लोड यांच्याकडे पाठवून दिला.. पॉलिसीचा कालावधी हा दिनांक 15/7/2006 ते 14/7/2007 असा होता. या कालावधीत तक्रारदाराने त्यांचा क्लेम गैरअर्जदाराकडे पाठविला नाही. पॉलिसीच्या योजनेनुसार पॉलिसीचा कालावधी संपल्यानंतर 90 दिवसापर्यत म्हणजेच दिनांक 14/10/2007 पर्यंत क्लेम पाठविला असता तर तो विमा कंपनीने स्विकारला असता. तसेच त्यानंतरही 90 दिवस म्हणजे दिनांक 14/1/2008 पर्यंतही तो पाठविला असता तरी तो स्विकारला असता त्यासाठी त्यांना विलंबाचे योग्य ते कारण नमूद करावे लागले असते परंतु तक्रारदाराने दिनांक 4/2/2008 रोजी म्हणजे जवळ जवळ 180 दिवसांनी पाठविल्याचे दिसून येते. तक्रारदाराने विलंबाबाबत कुठलेही स्पष्टीकरण दिलेले नाही. म्हणून मंच तक्रारदाराची तक्रार नामंजूर करीत आहे. वरील विवेचनावरुन व कागदपत्रावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे. आदेश तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे. (श्रीमती रेखा कापडिया) (श्रीमती अंजली देशमुख) सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Smt. Anjali L. Deshmukh] PRESIDENT | |