निकाल (घोषित द्वारा – श्री डी.एस.देशमुख, अध्यक्ष) गैरअर्जदार क्र 3 विमा कंपनीच्या सेवेत त्रुटी असल्याच्या आरोपावरुन ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. थोडक्यात तक्रारदाराची तक्रार अशी आहे की, त्याचे वडील उत्तम ढवळे हे शेतकरी होते. त्यांचे दिनांक 5/11/2006 रोजी दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत निधन झाले. त्यानंतर त्याने दिनांक 22/11/2006 रोजी गैरअर्जदार क्रमांक 1 तहसीलदार पैठण यांच्याकडे शेतकरी अपघात विमा योजनेनुसार नुकसान भरपाई मिळावी म्हणून अर्ज दिला. परंतु त्याच्या वडिलांच्या मृत्यूबाबत पोलीसांचा तपास सुरु असल्यामुळे त्यास कागदपत्रांची पूर्तता करता आली नाही. त्यानंतर दिनांक 10/1/2008 रोजी त्यास पोलीसांकडून कागदपत्रे मिळाल्यानंतर दिनांक 8/2/2008 रोजी त्याने प्रस्ताव दाखल केला. त्यानंतर त्याने वेळोवेळी तहसील कार्यालयाकडे चौकशी केली परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. कृषी आयुक्त पुणे यांनी कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हिसेस कडे त्याच्या विमा दाव्याबाबत चौकशी केली. परंतु कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हिसेस यांनी त्यांच्याकडे विमा प्रकरण नसल्याचे सांगितले. म्हणून त्याने तहसीलदार पैठण यांची भेट घेतली परंतु त्यांनी देखील त्याच्या प्रकरणात काहीच होऊ शकत नसल्याचे सांगितले. म्हणून तक्रारदाराने अशी मागणी केली आहे की, त्यास गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांच्याकडून विमा रक्कम रु 1,00,000/- मिळावेत. गैरअर्जदार क्रमांक 1 यांस नोटीस मिळूनही तो गैरहजर असल्यामुळे त्याचे विरुध्द ही तक्रार एकतर्फा चालविण्यात आली. गैरअर्जदार क्रमांक 2 कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हिसेस यांनी लेखी निवेदन दाखल केले. त्यांचे म्हणणे असे आहे की, त्यांना अद्याप उत्तम ढवळे यांच्या बाबतचा विमा दावा प्राप्त झालेला नाही. गैरअर्जदार क्रमांक 3 नॅशनल इन्शुरन्स कंपनीने लेखी निवेदन दाखल केले. त्यांचे म्हणणे असे आहे की, तक्रारदाराने त्याच्या वडिलांच्या मृत्यूबाबत तहसीलदाराकडे विमा दावा दाखल केल्याचे म्हणणे खोटे व चुकीचे आहे. तक्रारदाराने दिनांक 8/2/2008 रोजी विमा दावा दाखल केला नव्हता. तक्रारदाराने जो विमा दावा दाखल केल्याचे म्हटले आहे तो विमा दावा त्यांना प्राप्त झालेला नाही. म्हणून ही तक्रार फेटाळावी अशी मागणी विमा कंपनीने केली आहे. दोन्ही पक्षाच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तरे 1. गैरअर्जदार क्र 3 विमा कंपनीच्या सेवेत त्रुटी आहे काय? नाही. 2. आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मुद्दा क्र 1 :- तक्रारदार व गैरअर्जदार क्र 3 विमा कंपनीच्या वतीने युक्तीवाद करण्यात आला. तक्रारदाराने तहसीलदार पैठण यांच्याकडे त्याचे वडील उत्तम ढवळे यांच्या अपघाती मृत्युसंदर्भात शेतकरी अपघात विमा योजनुसार विमा रक्कम मिळावी म्हणून दिनांक 8/2/2008 रोजी विमा दावा दाखल केल्याबाबत तक्रारदाराने कोणताही पुरावा दिलेला नाही. तक्रारदाराने तहसीलदार पैठण यांच्याकडे विमा दावा दाखल केल्याबाबत दिनांक 8/2/2008 अशी तारीख असलेले पत्र दाखल केले आहे. परंतु सदर पत्र तहसीलदारास मिळाल्याबाबतची पोच पावती नाही. तसेच तक्रारदाराने जो विमा दावा तहसीलदाराकडे दाखल केला तो गैरअर्जदार क्रमांक 2 व 3 यांना मिळाल्याबाबतचा कोणताही पुरावा नाही. गैरअर्जदार क्रमांक 2 व 3 यांनी तक्रारदाराचा विमा दावा त्यांना मिळालेला नाही असे स्पष्ट म्हटलेले असल्यामुळे तक्रारदाराने त्याचा विमा दावा गैरअर्जदार क्रमांक 2 व 3 यांना मिळाला होता हे सिध्द करणे आवश्यक होते. गैरअर्जदार क्रमांक 2 व 3 यांना तक्रारदाराचा विमा दावा मिळाल्याबाबतचा कोणताही पुरावा आमच्यासमोर नाही. त्यामुळे गैरअर्जदार क्रमांक 2 व 3 यांनी तक्रारदाराला शेतकरी अपघात विमा योजनेनुसार नुकसान भरपाई देण्याचा प्रशनच निर्माण होत नाही व त्यामुळे त्यांच्या सेवेत कोणतीही त्रुटी असल्याचे सिध्द होत नाही. म्हणून मुद्दा क्र 1 चे उत्तर वरीलप्रमाणे देण्यात येते. म्हणून खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश 1. तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यात येते. 2. तक्रारीचा खर्च संबंधितांनी आपापला सोसावा. 3. संबंधितांना आदेश कळविण्यात यावा. (श्रीमती ज्योती पत्की) (श्रीमती रेखा कापडिया) (श्री डी.एस. देशमुख) सदस्य सदस्य अध्यक्ष UNK
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |