(घोषित द्वारा श्रीमती ज्योती पत्की) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार खालीलप्रमाणे आहे तक्रारदार जेष्ठ नागरिक असून औरंगाबाद येथे राहतात. त्यांनी स्वत:चे व त्यांच्या 67 वर्ष वयाच्या पत्नीचे असे दोन रेल्वे तिकीट दिनांक 19/12/2009 रोजी दिनांक 23/12/2009 रोजीचे औरंगाबाद ते नवी दिल्ली आणि दिनांक 26/12/2009 रोजीचे नवी दिल्ली ते औरंगाबाद असे रिझर्व्हेशन केले. तिकीटांचा पीएनआर नंबर 1343916 व 1343916632 आणि 252-9993670 असा असून तिकीटांचा औरंगाबाद ते नवि दिल्ली वेटींग लिस्ट नंबर 22 व 23 आणि नवी दिल्ली ते औरंगाबाद प्रवासाचा वेटींग लिस्ट क्रमांक 33 व 34 असा होता. तक्रारदाराची तिकीटे प्रवासाच्या तारखेपर्यंत कन्फर्म झालेली नव्हती म्हणून त्यांनी व त्यांच्या पत्नीचे वय जास्त झालेले असल्यामुळे त्यांना रिझर्व्हेशन नसताना प्रवास करणे शक्य नसल्यामुळे त्यांनी प्रवास केला नाही. तक्रारदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 कडे दिनांक 3/1/2010 रोजी तिकीटांची रककम परत मिळावी अशी मागणी केली. परंतु संबंधित क्लार्कने त्यांची तिकीटे कम्प्युटर नेटवर्कवर अपडेटेड नसल्याचे सांगून थोडे दिवस थांबण्यास सांगितले. तक्रारदार पुन्हा दिनांक 12/1/2010 रोजी गैरअर्जदार कमांक 1 यांचेकडे गेले असता त्यांनी गैरअर्जदार क्रमांक 2 यांचेकडे तिकीटे पाठवण्याचे सांगितले. त्यानुसार तक्रारदाराने दिनांक 13/1/2010 रोजी त्यांची तिकीटे अर्जासह गेरअर्जदार क्रमांक 2 कडे पाठविली. गैरअर्जदार क्रमांक 2 ने दिनांक 8/2/2010 रोजी पत्र पाठवून ट्रेन सुटल्यानंतर 12 तासाचे आत प्रतिक्षा यादीतील अथवा न वापरण्यात आलेल्या तिकीटाची रक्कम परत मागण्याचा दावा करणे आवश्यक असताना तुम्ही नंतर तिकीट जमा केल्यामुळे तुम्हाला तिकीटाची रक्कम परत देता येणार नाही या कारणावरुन तक्रारदाराची मागणी फेटाळली. गैरअर्जदाराचे दिनांक 8/2/2010 रोजी पत्र तक्रारदारास दिनांक 3/3/2010 रोजी प्राप्त झाले. गैरअर्जदारानी तक्रारदाराचा तिकीटाची रक्कम परत मागण्याचा दावा विनाकारण फेटाळून त्यांना त्रुटीची सेवा दिलेली आहे. म्हणून तक्रारदाराने गेरअर्जदाराकडून तिकीटाची पूर्ण रक्कम रु 3,414/- मानसिक व शारीरिक त्रास आणि तक्रारीच्या खर्च मिळावा अशी विनंती केली आहे गैरअर्जदार क्रमांक 1 व2 यांनी एकत्रित लेखी निवेदन दाखल करुन तक्रारदाराची तक्रार या मंचात चालू शकत नाही असा आक्षेप घेतला आहे. तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार तिकीटाची रक्कम परत मागण्याच्या संदर्भातील असल्यामुळे कलम 13 आरसी टी अक्ट 1987 नुसार रेलेव क्लेम ट्रॅब्युनलकडे तक्रार दाखल करणे आवश्यक होते. गैरअर्जदारानी हे मान्य केले आहे की, तक्रारदाराने दिनांक 19/12/2009 रोजी 17-18 वाजेचे दरम्यान दिनांक 23/12/2009 रोजीचे औरंगाबाद ते नवी दिल्ली आणि दिनांक 16/12/2009 रोजीचे नवी दिल्ली ते औरंगाबाद अशी सेकंड एसी तिकीटे बुक केली आणि तिकीटे प्रतिक्षायादीत होती. प्रतिक्षा यादीतील प्रवाशांची तिकीटे जर कोणी आरक्षित केलेली तिकीट रद्द केली तर कन्फर्म होतात. परंतू प्रस्तूत प्रकरणात प्रवासाचे तारखेपर्यंत व ट्रेनचा चार्ट फायनल होईपर्यंत तक्रारदाराची तिकीटे कन्फर्म झालेली नव्हती. नियमानुसार ट्रेन सुटल्यानंतर 12 तासाचे आत प्रतिक्षा यादी अथवा न वापरलेल्या तिकीटांची रक्कम परत मागण्याचा दावा करणे आवश्यक होते किंवा विनायात्रा तिकीट रसीद प्रवास केला नाही हे स्टेशनवरुन घेणे आवश्यक होते. तक्रारदाराने तिकीटे रद्द करुन तिकीटाची रक्कम दिनांक 3/1/2010 रोजी म्हणजे 12 दिवस झाल्यावर गेरअर्जदार क्रमांक 1 कडे मागितली असता झोनल ऑफिसकडून रक्कम परत मागण्यास सांगितले. तक्रारदाराचा रक्कम मागणीचा दावा दिनांक 28/1/2010 रोजी गैरअर्जदार क्रमांक 2 यांना प्राप्त झाला. तक्रारदाराचा दावा रिफंड रुल नंबर 213.7 ऑफ आयआरए कोचींग टेरिफ 26 Part I Vol. 1 I नुसार दिनांक 8/2/2010 रोजी नामंजूर केला. गैरअर्जदारांनी तक्रारदाराचा दावा योग्य कारणावरुन नामंजूर केला असून तक्रारदारास कोणतीही त्रुटीची सेवा दिली नाही म्हणून तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यात यावी अशी विनंती गेरअर्जदारांनी केली आहे. मंचानी तक्रारदाराने दाखल केलेल्या तक्रारीचे, कागदपत्राचे, शपथपत्राचे व गैरअर्जदारानी दाखल केलेल्या लेखी निवेदनाचे अवलोकन केले. तक्रारदाराचा युक्तिवाद ऐकण्यात आला. गैरअर्जदार गैरहजर. गैरअर्जदारांनी तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार तिकीटाची रक्कम परत मागण्याच्या संदर्भातील असल्यामुळे या मंचात ही तक्रार चालू शकत नाही व तक्रारदाराने तक्रार आरसीटी अक्ट 1987 नुसार रेल्वे क्लेम ट्रायब्युनलकडे दाखल करणे आवश्यक आहे असा आक्षेप घेतला आहे. रेल्वे विभागाने त्रुटीची सेवा दिली असेल तर त्या संदर्भात ग्राहक संरक्षण कायदा 1986 मधील कलम 3 नुसार तक्रारदाराला ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे तक्रारदाखल करण्यासाठीची अतिरिक्त सुविधा आहे आणि सदर तक्रार ही गैरअर्जदारांच्या सेवेत त्रुटी असल्याच्या कारणावरुन दाखल केलेली असल्यामुळे या मंचात चालू शकते असे आमचे स्पष्ट मत आहे. तक्रारदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 यांचेकडून दिनांक 19/12/2009 रोजी दिनांक 23/12/2009 रोजीचे औरंगाबाद ते नवी दिल्ली पीएनआर नंबर 134-3916632 प्रतिक्षा यादीतील क्रमांक 22923 आणि दिनांक 26/12/2009 रोजीचे नवी दिल्ली ते औरंगाबाद पीएनआर नंबर 252-9993670 प्रतिक्षा यादीतील क्रमांक 33 व 34 अशी सेकंड क्लास एसीची तिकीटे बुक केली व सदरची तिकीटे प्रवासाच्या तारखेपर्यंत कन्फर्म झालेली नव्हती या बाबत दोन्ही पक्षामध्ये वाद नाही. तक्रारदाराने दाखल केलेल्या प्रवासाच्या तिकीटावरुन तक्रारदाराचे वय 74 वर्ष व त्यांच्या पत्नीचे वय 67 वर्ष असल्याचे दिसून येते आणि त्यांची तिकीटे प्रवासाचे तारखेपर्यंत कन्फर्म न झाल्यामुळे तक्रारदार व त्यांची पत्नी हे प्रवास करु शकलेले नाहीत. त्यांनी दिनांक 3/1/2010 रोजी गैरअर्जदार क्रमांक 1 कडे न वापरलेल्या तिकीटाची रककम मागण्या गेले असता त्याचवेळेस गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी तक्रारदारास विना यात्रा तिकीट रसीद देणे आवश्यक होते. परंतु ते न करता त्यांनी गैरअर्जदार क्रमांक 2 कडे तिकीटे जोडून दावा करण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारदाराने दिनांक 13/1/2010 रोजी गैरअर्जदार क्रमांक 2 कडे तिकीटे जोडून रक्कम परत मिळावी असे पत्र पाठवले. तसेच दिनांक 16/2/2010 रोजी परत पत्र पाठविले असे तक्रारदाराने दाखल केलेल्या कागदपत्रावरुन दिसून येते. गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी तक्रारदाराचे पत्र दिनांक 28/1/2010 रोजी प्राप्त झाले असे म्हटले आहे. परंतु त्याच वेळी त्यांनी तक्रारदारास न वापरलेल्या तिकीटाची रककम देणे आवश्यक होते. गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी तक्रारदाराचा दावा नामंजूर केल्याचे पत्र तक्रारदारास दिनांक 8/2/2010 रोजी पाठविले परंतु त्याचा दावा कोणत्या नियमानुसार नामंजूर केला याचा स्पष्ट उललेख पत्रामध्ये नमूद केला नाही. पत्रामध्ये केवळ तक्रारदाराचा रक्कम परत मागण्याचा दावा नियमानुसार ट्रेन सुटल्यानंतर 12 तासाचे आत प्रतिक्षा यादी अथवा न वापरण्यात आलेल्या तिकीटाची रक्कम परत मागण्याचा दावा करणे आवश्यक होते किंवा बिना यात्रा तिकीट रसीद आपण प्रवास केला नाही त्या स्टेशनवरुन घेणे आवश्यक होते या कारणावरुन नामंजूर केल्याचे दिसून येते. तक्रारदाराने प्रवासाचे तारखे दिवशी प्रवास केलेला नसल्यामुळे त्याने न वापरण्यात आलेल्या तिकीटांची रक्कम परत कधीपर्यंत परत मागावी असा उल्लेख रेल्वे तिकीटावर केलेला नाही त्यामुळे तक्रारदाराने रेल्वे सुटल्यावर 12 तासाचे आत न वापरण्यात आलेल्या तिकीटाची रक्कम परत मागणे अपेक्षित नाही. प्रवासी रेल्वेचे नियम खिशात घालून प्रवास करीत नसतात म्हणून सामान्य ग्राहकाला प्रवास न केलेल्या तिकीटाची रक्कम परत मागण्याचा नियम माहित असावयास पाहिजे असे अनुमान काढता येणार नाही . गैरअर्जदारांनी तिकीटाचा वापर न केल्यास कधीपर्यंत तिकीटाची रक्कम परत मागावी असा नियम दाखल केलेला नाही. तक्रारदाराने दिनांक 3/1/2010 रोजी म्हणजे लगेचच प्रवास न केल्याच्या तारखेपासून आठ दिवसाचे आत गैरअर्जदार क्रमांक 1 यांचेकडे रक्कम परत मिळावी अशी मागणी केली परंतु त्यांनी गैरअर्जदार क्रमांक 2 कडे अर्जासह तिकीटे पाठवावीत असे सांगितले. त्यामुळे तक्रारदाराने दिनांक 12/1/2010 रोजी लगेच अर्जासह तिकीटे गैरअर्जदार क्रमांक 2 कडे पाठविली परंतू त्यांनी तिकीटाची रक्कम दिली नाही आणि तक्रारदारास विलंबाने दावा नामंजूर केल्याचे पत्र पाठविले. गैरअर्जदारांनी तक्रारदारास प्रवास न केलेल्या तिकीटाची रक्कम मागणी करुनही परत न देऊन त्रुटीची सेवा दिलेली असल्याचे मंचाचे स्पष्ट मत आहे. तक्रारदारानी हप्रवासाचे तारखेदिवशी तिकीटे कन्फर्म नसल्यामुळे प्रवास केला नाही आणि त्या दिवशी रेल्वेचे बर्थ रिकामे राहिलेले नाहीत त्यामुळे गैरअर्जदारांचे कोणतेही नुकसान झालेले नाही असे मंचाचे मत आहे.म्हणून खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो. आदेश 1. तक्रारदाराचा तक्रार अर्ज अशंत: मंजूर करण्यात येत आहे. 2. गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी एकत्रित व संयुक्तरित्या तक्रारदारास तिकीटाची रक्कम रु 3,414/- दिनांक 13/1/2010 पासून पूर्ण रक्कम देईपर्यंत 9 टक्के व्याजदराने या आदेशाच्या प्राप्तीपासून 30 दिवसाचे आत द्यावेत. 3. गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी तक्रारदारास मानसिक व शारीरिक त्रासापोटी रक्कम रु 2000/- आणि तक्रारीच्या खर्चापोटी रु 1000/- असे एकूण रु 3000/- उपरोक्त आदेश मुदतीत द्यावेत. (श्रीमती ज्योती पत्की) (श्रीमती रेखा कापडिया) (श्रीमती अंजली देशमुख) सदस्य सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Smt. Anjali L. Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |