निकालपत्र
(पारित दिनांक 09-01-2009)
द्वारा. श्रीमती प्रतिभा बा. पोटदुखे ः
तक्रारकर्ता यांनी दाखल केलेल्या ग्राहक तक्रारीचा आशय असा की, ..........
1. तक्रारकर्ता क्र. 1 व 2 यांच्यात वडील व मुलगा असे नाते असून त्यांनी वि.प. यांच्याकडे जॉइंट सेव्हींग अकाउंट क्र. 11119432743 दि. 12/03/04 रोजी उघडले. तक्रारकर्ता क्र. 2 हे सैनिक असून त्यांची बदली ही देशाच्या सिमेवर कुठेही होत असल्यामुळे त्यांच्या सोईसाठी त्यांनी वि.प. यांच्याकडून ए.टी.एम. ची सेवासुध्दा घेतली. तक्रारकर्ता क्र. 1 यांच्या ए.टी.एम. चा कार्ड नंबर 6220180037600064358 असा होता तर तक्रारकर्ता क्र 2 यांचा ए.टी.एम. चा कार्ड नंबर 6220180037600102653 असा होता. तक्रारकर्ता क्र. 1 व 2 हे कायदेशीर अटींचे पालन करुन ए.टी.एम कार्डचा वापर करित होते.
2. दि. 30/04/08 रोजी तक्रारकर्ता यांचे ए.टी.एम. कार्ड क्र. 6220180037600102653 हे हरविले अथवा चोरी गेले. त्याचा रिपोर्ट दि. 02/05/08 रोजी पोलिस स्टेशन व वि.प. यांना देण्यात आला. तक्रारकर्ता यांनी वि.प. यांना या ए.टी.एम. कार्ड संबंधी सर्व सोयी थांबविण्याचे निर्देश दिले. वि.प. यांनी सुध्दा सदर ए.टी.एम. कार्डचा कोणी दुरुपयोग करु नये म्हणून त्या कार्डच्या सुविधा बंद करत असल्याचे सांगितले. दि. 09/05/08 रोजी वि.प. यांनी तक्रारकर्ता यांना नविन ए.टी.एम. कार्ड क्रं. 6220180037600145900 जारी केले.
3. दि. 29/07/08 रोजी तक्रारकर्ता हे ए.टी.एम. सेंटर येथे पैसे काढण्याकरिता गेले असता त्यांना असे आढळून आले की, त्यांच्या अकाऊट मधून रु. 1700/- काढण्यात आले आहे. तक्रारकर्ता यांनी ताबडतोब ही बाब वि.प. यांना सांगितली. दि. 02/08/08 रोजी तक्रारकर्ता यांनी परत वि.प. यांना या बाबीची माहिती दिली.
4. तक्रारकर्ता म्हणतात की, वि.प. यांच्या सेवेतील कमतरतेमुळे तक्रारकर्ता यांच्या खात्यातून रु. 1,01,700/- ही रक्कम तक्रारकर्ता यांच्या हरविलेल्या ए.टी.एम. कार्डचा उपयोग करुन अवैधरित्या काढण्यात आली आहे. तक्रारकर्ता यांनी मागणी केली आहे की, वि.प. यांच्या सेवेतील न्यूनतेमुळे तक्रारकर्ता यांचे रु. 1,01,700/- चे नुकसान झाले आहे असे घोषित करण्यात यावे, वि.प. यांच्याकडून रु. 1,00,000/- ही रक्कम नुकसान भरपाई म्हणून मिळावी, व दावा रकमेवर ग्राहक तक्रार दाखल झाल्यापासून ती रक्कम मिळेपर्यंत 24 टक्के व्याज मिळावे.
5. वि.प. यांनी त्यांचा लेखी जबाब नि.क्र. 11 वर दाखल केला आहे. वि.प. म्हणतात की, ए.टी.एम. कार्डसोबत गोपनीय वैयक्तिक ओळख क्र. (Personal Identification Number (known as PIN) हा बँकेतर्फे देण्यात येत असतो. ए.टी.एम. कार्ड हे तेव्हाच उपयोगात आणले जाऊ शकते जेव्हा मशीनद्वारा मागणी केल्यानंतर हा पीन नंबर टाकला जातो. पीन नंबर हा फक्त ग्राहकालाच माहित असतो. तक्रारकर्ता यांनी स्वतः कुणाजवळ हा पीन नंबर सांगितला असेल तेव्हाच दुस-या व्यक्तिद्वारा तक्रारकर्ता यांच्या खात्यातून रक्कम ही काढली गेली त्यामुळे याबाबत बँकेला जबाबदार ठरविता येणार नाही. ए.टी.एम.कार्ड. वर टोल फ्रि नबर 1800 11 2211 व दुरध्वनी क्र. 080-26599990 हा नमुद असतो. ग्राहकांना अश्या सुचना दिलेल्या असतात की, जर का ए.टी.एम. कार्ड हरविले तर या नंबर वर संपर्क साधून त्याची सुचना दयायला हवी. अशी सुचना मिळाल्यानंतर ''कॉन्टॅक्ट सेंटर'' हे ए.टी.एम. कार्डला हॉट लीस्टमध्ये टाकत असते. ग्राहकाचे ए.टी.एम. कार्ड हे हरविले अथवा चोरीला गेले तर त्याची सुचना ग्राहकाने प्रथम पोलिस स्टेशनला देवून प्रथम खबरी रिपोर्ट (एफ.आय.आर.) नोंदवावयाचा असतो व त्यांची प्रत ही बँकेला दयावयाची असते व त्यानंतरच बँक ही ते कार्ड ब्लॉक करु शकते. बँकेकडे ए.टी.एम. कार्ड हरविले असता भरुन देण्याचा एक नमुना अर्ज उपलब्ध असतो. तक्रारकर्ता यांनी या नमुन्याप्रमाणे वि.प. यांना ए.टी.एम. कार्ड हरविल्याबाबत माहिती दिली नाही. सदर प्रकरणात विस्तृत पुराव्याची गरज आहे जो की विद्यमान मंचाच्या संक्षीप्त कार्य पध्दतीद्वारा विचारात घेतला जाऊ शकत नाही. तक्रारकर्ता यांची तक्रार ही दिवाणी न्यायालयात दाखल करण्यात यावी अश्या स्वरुपाची आहे. तक्रारकर्ता यांनी दि. 25/08/08 रोजी टोल फ्रि नंबरचा वापर करुन हरविलेल्या ए.टी.एम. कार्डची सेवा थांबविली. तक्रारकर्ता हे पूर्वीसुध्दा या नंबरचा वापर करुन ही सेवा थांबवू शकत होते. तक्रारकर्ता यांची तक्रार ही खोटी व बनावट असल्यामुळे ती जास्तीत जास्त नुकसान भरपाईसह खारीज करण्यात यावी.
कारणे व निष्कर्ष
6. तक्रारकर्ता व वि.प. यांनी दाखल केलेली शपथपत्रे, दस्ताएवज, इतर पुरावा व केलेला युक्तिवाद यावरुन असे निदर्शनास येते की, तक्रारकर्ता यांनी त्यांच्या ग्राहक तक्रारीत ए.टी.एम कार्ड क्रमांक 6220180037600102653 हे हरविल्याची सुचना दि. 02/05/08 रोजी पोलीस स्टेशन व वि.प. यांना दिली असे त्यांच्या ग्राहक तक्रारीत म्हटले आहे. मात्र दि. 02/05/08 रोजी सिटी पोलीस स्टेशन, गोंदिया यांना तक्रारकर्ता यांनी कार्ड हरविल्याची सुचना दिल्याचे दिसते परंतू वि.प. यांना दि. 02/05/08 रोजी हरविलेल्या ए.टी.एम कार्ड बद्दल सुचना दिल्याचे कोणतेही पत्र रेकॉर्डवर नाही.
7. दि. 02/08/08 रोजी तक्रारकर्ता यांनी वि.प. यांना पत्र दिल्याचे म्हटले आहे. सदर पत्र पुढील प्रमाणे -
प्रति,
मा. शाखा व्यवस्थापक साहेब
भारतीय स्टेट बँक, शाखा गोंदिया.
विषय - खाते क्र. 11119432743 चे आपोआप विड्रॉल झाल्याबद्दल
महोदय
वरील विषयान्वये कळवितो की नामे भरतलाल बिसेन खाता क्रमांक 11119432743 असून हया खात्यातून दि. 17/07/08 रक्कम 1000/- जमा केले असता सदर रक्कम न काढलेली असून सदर रक्कम 17/07/08 ला विड्राल आपोआप झाला आहे. त्याअनुषंगाने आपण लवकरात लवकर चौकशी करुन आम्हाला न्याय देण्यात यावा ही विनंती.
आपला खातेदार
भरतलाल बिसेन
8. दि. 02/08/08 चे पत्र मिळाले अशी त्यावर नोंद नाही तसेच वि.प. यांचा शिक्का सुध्दा नाही. त्यावरील सही कुणाची आहे हे स्पष्ट होत नाही. सदर पत्रात ए.टी.एम. कार्ड क्र 6220180037600102653 चे ट्रान्झॅक्शन थांबवावे असा उल्लेख नाही.
9. दि. 28/08/08 रोजी तक्रारकर्ता यांनी पोलीस अधिकारी व वि.प. यांना ए.टी.एम. कार्ड क्रमांक 6220180037600102653 हरविल्याची लेखी सुचना दिल्याचे दिसते. या पत्रावर वि.प. यांना पत्र मिळाल्याबद्दल आवक क्रमांकासह नोंद आहे तसेच वि.प. यांचा शिक्का सुध्दा आहे. दि. 24/08/08 नंतर ए.टी.एम. कार्ड क्र. 6220180037600102653 चा वापर करुन पैसे काढण्यात आल्याचे दिसत नाही.
10. तक्रारकर्ता यांनी वि.प. यांना छापील फॉर्ममध्ये ए.टी.एम. कार्ड हरविल्याची सुचना दिल्याचे दिसत नाही. अथवा ए.टी.एम. कार्ड क्र. 6220180037600145900 हे ए.टी.एम. कर्ड क्र. 6220180037600102653 डिअक्टीव्हेट केल्यानंतर दिले असा पुरावा नाही.
11. तक्रारकर्ता यांच्या म्हणण्यानुसार ए.टी.एम. कार्ड क्र. 6220180037600102653 चा गैरवापर करुन रु. 1,01,720/- ही रक्कम दि. 30/06/08 ते 24/08/08 या कालावधीत काढण्यात आली. ए.टी.एम. च्या माध्यमातून पैसा हा संपूर्ण देश्यातून कुठूनही काढता येऊ शकतो. सदर रक्कम ही कोठून काढण्यात आली व कोणी काढली तसेच त्यासाठी वि.प. बँक जबाबदार आहे का? हे ठरविण्यासाठी सखोल पुराव्याची गरज आहे जे विद्यमान मंचाच्या संक्षिप्त कार्यपध्दतीद्वारा ठरविता येणे शक्य नाही.
12. तक्रारकर्ता यांनी त्यांच्या प्रतीउत्तरात म्हटले आहे की, ए.टी.एम. द्वारा एका दिवशी रु. 100/- पेक्षा कमी व रु. 25000/- पेक्षा जास्त रक्कम काढता येत नाही. परंतू दि. 30/06/08 रोजी रु. 20 तर दि. 23/08/08 रोजी रु. 40,000/- एकूण व दि. 24/08/08 रोजी रु. 35,000/- सदर ए.टी.एम. कार्डचा वापर करुन काढण्यात आले. ए.टी.एम. च्या सिस्टममध्ये काही बिघाड आहे का हे सुध्दा मंचाच्या कार्यपध्दतीद्वारा ठरविता येणे शक्य नाही.
असे तथ्य व परिस्थिती असताना सदर आदेश पारित करण्यात येत आहे.
आदेश
तक्रारकर्ता यांची तक्रार ही खारीज करण्यात येत आहे. मात्र तसा सल्ला मिळाल्यास तक्रारकर्ता हे दिवाणी न्यायालय अथवा सक्षम प्राधिकरणाकडे या संदर्भात दाद मागू शकतात.