निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा *-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-* न्यायनिर्णय 1. सा.वाले क्र.1 हे स्टेट बँक ऑफ इंडीया, सांताक्रुझ (पश्चिम) येथे शाखा आहे तर सा.वाले क्र.2 हे आय.सी.आय.सी.आय. बँकेची मिरारोड (पूर्व) येथे शाखा आहे. तक्रारदारांचे सा.वाले क्र.1 बँकेमध्ये मागील 11 वर्षापासुन बचत खाते आहे. 2. तक्रारदारांचे तक्रारीतील कथनाप्रमाणे एक वाजीद नावाची व्यक्ती तक्रारदारांना भेटली व त्यांनी सा.वाले क्र.2 आय.सी.आय.सी.आय. बॅकेमध्ये बचत खाते उघडल्यास एटीएम कार्ड तसेच इतर काही सुविधा मिळतील असे सूचविले व तक्रारदारांकडून ओळखपत्राच्या प्रती व खाते उघडावयाचे को-या फॉर्मवर सहया घेतल्या. तसेच वाजीद यांनी तक्रारदाराकडून शेवटची चार अंक 9596 असलेला दिनांक 13.3.2004 चा रु.500/- चा धनादेश घेतला. 3. तक्रारदारांच्या तक्रारीतील कथनाप्रमाणे वाजीद यांनी त्या धनादेशामध्ये 500/- या आकडयाचे अलीकडे 55 असा आकडा टाकला व तो धनादेश 55,500/- येवढी रक्कम दाखवून सा.वाले क्र.2 यांचेकडे खाते उघडण्याचे अर्जाबरोबर दाखल केला. सा.वाले क्र.2 यांनी खाते उघडयाचे अर्जाचे तसेच धनादेशाचे कुठलीही पडताळणी न करता तो धनादेश सा.वाले क्र.1 यांचेकडे वठविणेकामी पाठविला व सा.वाले क्र.1 यांच्या कर्मचा-यांनी त्या धनादेशामध्ये असलेली खाडाखोड तसेच वाढलेले आकडे याकडे सोईस्कर दुर्लक्ष करुन निष्काळजीपणाने तो धनादेश पारीत केला. 4. त्यानंतर एका अन्य व्यक्तीने तक्रारदार असे भासवून सा.वाले क्र.2 बँकेकडून रु.42,500/- व रु.11,000/- असे एकूण रु.53,500/- धनादेशाव्दारे प्राप्त करुन घेतले. तक्रारदारांच्या तक्रारीतील कथनाप्रमाणे वाजीद यांचेकडे फक्त रु.500/- चा धनादेश दिला होता. तथापी त्यावर खाडोखोड करुन त्याचा आकडा बदलण्यात आला व त्याप्रमाणे तक्रारदारांच्या खात्यातुन अनाधिकाराने रक्कम काढण्यात आली. तक्रारदारांच्या तक्रारीतील कथनाप्रमाणे या सर्व प्रकारात सा.वाले क्र.1 व सा.वाले क्र.2 यांचे कर्मचारी जबाबदार असून त्यांच्या निष्काळजीपणामुळेच जास्तीच्या आकडयाचा धनादेश वटविण्यात आला. तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडून मुळची रक्कम 55 हजार व नुकसान भरपाई रुपये 1 लाख प्राप्त व्हावी याकामी प्रस्तुतची तक्रार दाखल केलेली आहे. 5. तक्रारदारांनी मुळची तक्रार ही फक्त सा.वाले क्र.1 यांचे विरुध्द दाखल केलेली होती. प्रस्तुत मंचाने दिनांक 4.5.2007 असा आदेश लिा की, तक्रारदारांनी आय.सी.आय.सी.आय. बँक मिरारोड (पूर्व) शाखा यांना पक्षकार करुन नविन तक्रार दाखल करावी व त्याप्रमाणे प्रस्तुतची तक्रार निकाली केली. त्यानंतर तक्रारदारांनी दोन्ही बँकेच्या शाखांना पक्षकार करुन प्रस्तुतची तक्रार दाखल केली. 6. सा.वाले क्र.1 यांनी आपली कैफीयत दाखल केली. व त्यामध्ये असे कथन केले की, तक्रारदारांचा धनादेश हा आय.सी.आय.सी.आय. बँक मिरारोड (पूर्व) शाखा म्हणजे सा.वाले क्र.2 यांचेकडून वटविण्याकामी आला होता व त्या धनादेशावर दुरुस्ती असलेल्या ठिकाणी सही केलेली होती. सबब योग्य व दक्षता घेऊन, पडताळणी करुन तो धनादेश पारीत करण्यात आला. सा.वाले क्र.1 यांनी तक्रारदारांना त्या धनादेशाचे संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यास कसुर केलेली आहे किंवा सा.वाले क्र.1 यांचे कर्मचा-यांचा निष्काळजीपणा झालेला आहे या कथनास नकार दिला. 7. सा.वाले क्र.2 यांनी आपली वेगळी कैफीयत दाखल केली व त्यात असे कथन केले की, तक्रारदारांनी दिनांक 20.3.2004 रोजी बचत खाते उघडण्याचा अर्ज भरुन दिला व त्याच्यासोबत धनादेश दिला होता, तो सा.वाले क्र.2 शाखेने सा.वाले क्र.1 यांचेकडे वटविणेकामी पाठविला व त्यानंतर तक्रारदारांना शेवटचे चार अंक 4165 असलेले बचत खाते देण्यात आले. त्यानंतर तक्रारदारांच्या खात्यातून धनादेशाव्दारे ज्यावर वाजीद यांचे नांव प्राप्तकर्ता असे होते. त्या दोन धनादेशाव्दारे रु.42,500/- व रु.11,000/- अशी रक्कम काढून घेण्यात आली. सा.वाले क्र.2 यांनी तक्रारदारांचे खात्याचे संदर्भात किंवा धनादेशाचे संदर्भात कुठलाही गैरप्रकार झालेला आहे किंवा निष्काळजीपणा झालेला आहे या तक्रारदारांच्या कथनास नकार दिला व नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी फेटाळली. 8. तक्रारदारांनी आपले पुराव्याचे शपथपत्र दाखल केले. दोन्ही बाजुंनी कागदपत्र, तसेच लेखी युक्तीवाद दाखल केला. तक्रारदारांनी सांताक्रुझ पोलीस स्टेशन येथे फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला होता व जो मुळचा धनादेश जप्त करण्यात आला होता तो मुळचा धनादेश पोलीस स्टेशनकडून पडताळणीकामी मागविण्यात आला होता व तो प्राप्त झाला. तसेच सा.वाले क्र.2 यांनी खाते उघडण्याचे अर्ज व त्या सोबतची कागदपत्र दाखल केली. आम्ही दोन्ही बाजुचा युक्तीवाद ऐकला. त्यावरुन तक्रारीच्या निकालीकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात. .क्र. | मुद्दे | उत्तर | 1 | तक्रारदारांनी त्यांच्या बचत खात्याचा धनादेश 9596 यामध्ये खाडाखोड असताना व बराच फेरबदल असताना तो सा.वाले क्र.1 यांच्या कर्मचा-याच्या निष्काळजीपणाने पारीत केला व तक्रारदारांना सेवा सुविधा देण्यास कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | होय. | 2 | सा.वाले क्र.2 यांचे कर्मचा-यांनी तक्रारदाराचे बचत खाते उघडण्याचे संदर्भात तसेच तक्रारदारांनी दिलेला धनादेश 9596 हा पारीत करण्याचे कामी सा.वाले क्र.1 यांचेकडून पाठविताना निष्काळजीपणा तक्रारदारांना दाखवून योग्य ती दक्षता घेतली नाही व तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यास कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | होय. | 3 | तक्रारदार सा.वाले यांचेकडून मुळ रक्कम तसेच तसेच नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत काय ? | होय- सा.वाले क्र.1 यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाई दाखल रु.50,000/-अदा करावेत, तर सा.वाले क्र.2 यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाई दाखल रु.50,000/-अदा करावेत. | 4. | अंतीम आदेश | तक्रार रद्द करण्यात येते. |
कारण मिमांसा 9. तक्रारदार सा.वाले क्र.1 सांताक्रुझ (पश्चिम) येथे मागील 11 वर्षापासुन खाते आहे ही बाब सा.वाले क्र.1 यांनी नाकारली नाही. त्या खात्यातुन व्यवहार झालेला असल्याने व तक्रारदारांनी मुळ 500/- रुपयाचा धनादेश सा.वाले यांचेकडे बचत खात्यावर दिलेला असल्याने तक्रारदार हे सा.वाले क्र.1 यांचे ग्राहक होतात. त्याचप्रमाणे सा.वाले क्र.2 यांनी तक्रारदारांचे नांवे मिरारोड (पूर्व) येथील शाखेमध्ये खाते उघडून त्यांचेकडून धनादेश स्विकारुन तो सा.वाले क्र.1 यांचेकडे पाठविला असल्याने व तक्रारदारांचे नविन उघडलेले खाते 4165 या मधूनच अंतीमतः रक्कम अदा झाल्याने तक्रारदार हे सा.वाले क्र.2 यांचेपण ग्राहक होतात. तक्रारदारांनी केवळ पोलीसांकडे तक्रार दिली आहे व फौजदारी प्रकरण दाखल केले आहे यावरुन ग्राहक मंचाचे कार्यक्षेत्रास बाधा पोहचत नाही. तपासाअंती संबंधित पोलीस ठाणे योग्य ती कार्यवाही करेल परंतु केवळ फौजदारी तक्रार दाखल आहे यावरुन ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल होऊ शक्त नाही असे म्हणता येत नाही. 10. तक्रारदारांच्या कथनाप्रमाणे वाजीद नावाचे व्यक्तींनी त्यांनी असे भासविले की, तो बँकेचा (सा.वाले क्र.2) यांचा कर्मचारी असून वाजीद यांनी तक्रारदाराचे सा.वाले क्र.2 यांचेकडे खाते उघडण्याचे व सुविधाबद्दल महत्व पटवून दिले व तक्रारदाराकडून खाते उघडण्याच्या को-या अर्जावर सही घेतली तसेच ओळखपत्राचे कागदपत्र घेतले व रु.500/- चा धनादेश घेतला. तक्रारदारांच्या कथनाप्रमाणे त्या वाजीद नावाचे व्यक्तीने नंतर त्या 500/- रुपयाचे धनादेशामध्ये खाडाखोड केली नंतर 55 आकडा 500/- रुपयाचे अलीकडे लिहीला व तो त्यांनी रु.55,500/- येवढया रक्कमेचा भासविला. तक्रारदारांच्या तक्रारीतील कथनाप्रमाणे 28 मार्च, 2004 रोजी म्हणजे साधारणतः तक्रारदारांनी वाजीद यांचेकडे फॉर्म व चेक दिल्यानंतर 15 दिवसांनी तक्रादारांकडे सा.वाले क्र.2 यांचेकडून एक धनादेश जो मर्कन्टाईल बँकेवर होता तो तक्रारदारांचे खाते बंद झाल्याने परत आला होता व त्यावरुन तक्रारदार सा.वाले क्र.2 यांचे शाखेत गेले व त्यांना त्यांचे खात्यातून दोन धनादेश देय झाल्याचे समजले, व त्यानंतर तक्रारदार सा.वाले क्र.1 यांचेकडे गेले व तेथे त्यांना रु.500/- ऐवजी रु.55,500/- चा धनादेश खाते उघडणेकामी प्राप्त झाला होता असे समजले. त्यानंतर तक्रारदारांनी सांताक्रुझ पोलीस स्टेशनमध्ये वाजीद नावाचे व्यक्तीविरुध्द तक्रार दिली. चौकशीअंती तक्रारदारांना असे समजले की, सदर वाजीद नावाची व्यक्ती सा.वाले क्र.2 यांचे कर्मचारी नव्हते. सा.वाले क्र.2 यांनीदेखील आपल्या कैफीयतीमध्ये वाजीद नावाची व्यक्ती त्यांची कधीच कर्मचारी नव्हती असे कथन केलेले आहे. 11. तक्रारदारांची सर्व कथने ही मुळचा धनादेश क्रमांक 9596 यावर असलेल्या खाडाखोडीचे संदर्भात असल्याने सांताक्रुझ पोलीस स्टेशन यांचेकडे पत्रव्यवहार करुन प्रस्तुत मंचाने तो मुळचा धनादेश निरीक्षणकामी मागविला व तो प्राप्त झाला. प्रस्तुत मंचाने त्या मुळचे धनादेशाचे काळजीपूर्वक निरीक्षण केले, त्यावर उजव्या बाजूस दिनांक 13.3.2004 अशी तारीख आहे. त्यानंतर इंग्रजीमध्ये Pay या शब्दाचेपुढे आय.सी.आय.सी.आय.बँक (युसुफ एन अन्सारी) असे लिहिले आहे. दुस-या ओळीमध्ये धनादेशाचा आकडा अक्षरी नंबर लिहील्याचे स्पष्टपणे दिसून येते. त्यातील शब्दाची शाई व मुळचे 500/- रुपये या शब्दाची शाई वेगवेगळी आहे. त्यानंतर अंकी धनादेशाची रक्कम लिहिणेकामी जो चौकोण आहे त्यामध्ये 500/- रुपयाचेपूर्वी लगत 55 आकडा लिहिल्याचे स्पष्ट दिसते. वरील धनादेशामध्ये ज्या चौकोनातील 500/- या अंकानंतर बरीच जागा रिकामी असताना छापील अक्षरी रुपये यावर 55 लिहिल्याचे दिसून येते. सर्वसाधारण परिस्थितीत तक्रारदारांनी जर रु.55,500/- या रक्कमेचा धनादेशाचा आकडा अंकी रक्कम लिहून चौकोनामध्ये रु.55,500/- हे सर्व अंक लिहिले असते तर ते व्यवस्थित लिहिले असते. परंतु मुळचे धनादेशाचे निरिक्षण केले असता असे दिसून येते की, 500/- या अंकाचे लगद अलीकडे 55 हा आकडा घुसविण्यात आला. तसेच मुळ धनादेशामध्ये अक्षरी रक्कम रुपयाचे जागी रुपयाचे समोर 500/- रुपये फक्त असे मुळ लिहिले होते. परंतु त्या ओळीचेवर 55 हजार इंग्रजी मध्ये लिहिण्यात आले म्हणजे असे भासविण्यात आले की, तो धनादेश रु.55,500/- रुपयाचा दिलेला होता. 12. सर्वसाधारण परिस्थितीमध्ये बचत खाते उघडण्याच्या अर्जासोबत अर्जदार व्यक्ती ही कमीत कमी रु. 500/-किंवा 1000/- येवढे देते व सर्वसाधारण परिस्थितीमध्ये नविन खाते उघडणारी व्यक्ती खाते उघडण्याचे अर्जासोबत रु.55,500/- येवढी मोठी रक्कम धनादेशाव्दारे देणार नाही. ही बाबसुध्दा तक्रारदारांचे कथनास पुष्टी देते. 13. सा.वाले क्र.1 यांनी आपल्या कैफीयतीमध्ये व लेखी युक्तीवादामध्ये असे कथन केले की, धनादेशावर जेथे कोठे दुरुस्ती होते त्या ठिकाणी धनादेश देणा-यांनी सही केलेली दिसून आली, तथापी मुळचे धनादेशाचे निरीक्षण केले असताना त्यातील खाडाखोड,फेरबदल, व मागाऊन लिहीलेला भाग स्पष्टपणे लिहिला आहे हे केवळ धनादेश देणा-याची सही तेथे आहे यावरुन सा.वाले क्र.1 यांचे कर्मचा-यांनी तो धनादेश वटविण्याची गरजच नव्हती. तक्रारदारांची सही अतिशय साधी व सोपी व कमी लांबीची असल्याने ती गिरवून त्याप्रमाणे सही करणे एखाद्या व्यक्तीस सहज शक्य होते. वरील फेरफार जी व्यक्ती तक्रारदारांकडे खाते उघडण्याचा अर्ज घेऊन आली त्याच व्यक्तीने केली असावी याबद्दल शंका नाही. तथापी सा.वाले क्र.1 यांचे कर्मचा-यांनी प्रस्तुतचा धनादेश हा तक्रारदारांच्या आय.सी.आय.सी.आय. बँकेच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार आहे असा समज करवून घेऊन निष्काळजीपणाने पारीत करणे योग्य नव्हते. धनादेशामध्ये असलेली खाडाखोड व फेरबदल सुस्पष्टपणे दिसत असताना सा.वाले क्र.1 यांचे कर्मचा-यांनी त्याबद्दल आक्षेप घेऊ नये ही बाब अनाकलनीय वाटते. 14. सा.वाले क्र.1 यांचे वकीलांनी धनादेश पारीत करण्याचे संदर्भात सा.वाले क्र. 1 यांचे कर्मचा-यांनी योग्य ती काळजी घेतली होती असे कथन करुन राष्ट्रीय आयोगाच्या युनायटेड कमर्शियल बँक विरुध्द महेंद्रा पोपटलाल व्होरा I (1995) CPJ 83 (NC) दिनांक 15.11.1994 हया न्यायनिर्णयाचा आधार घेतला. त्यामध्ये धनादेश पारीत करीत असताना बँक कर्मचा-यांनी हस्ताक्षर तज्ञाचे मत घेणे अपेक्षित नाही किंवा सखोल निरीक्षण करणे हे अपेक्षीत नाही, तर किमान दक्षता घेतली तरी पुरेसी आहे असा अभिप्राय नोंदविला आहे. प्रस्तुतच्या प्रकरणातील घटना व या प्रकरणातील घटना या वेग वेगळया होत्या. प्रस्तुतच्या प्रकरणामध्ये धनादेशामध्ये करण्यात आलेली खाडाखोड व फेरफार हे स्पष्ट आहेत. तरीदेखील सा.वाले क्र.1 यांच्या कर्मचा-यांनी त्याकडे दुर्लक्ष करुन केवळ तो धनादेश आय.सी.आय.सी.आय. सा.वाले क्र.2 यांच्या शाखेत धनादेश देणा-यांचे खात्यात जमा होत आहे या वरुन या बाबीकडे दुर्लक्ष केले असे दिसून येते. प्रथमदर्शनी व केवळ एकदा पाहिल्यानंतरही प्रस्तुतच्या धनादेशामध्ये खाडाखोड व फेरफार स्पष्टपणे जाणवतात. तरीदेखील तो धनादेश सा.वाले क्र.1 यांच्या कर्मचा-यांनी पारीत केला. यावरुन सा.वाले क्र.1 यांच्या कर्मचा-यांनी धनादेश पारीत करण्याच्या बाबतीत किमान दक्षता घेतली नाही असे दिसून येते. सबब सा.वाले क्र.1 यांनी तक्रारदारांना त्यांचे बचत खाते क्रमांक 5546 या खात्यावर दिलेला धनादेश 9596 या संदर्भात तो पारीत करण्याच्या संदर्भात निष्काळजीपणा केला व सेवा सुविधा पुरविण्यास कसुर केली ही बाब सिध्द होते. 15. प्रकरणातील कागदपत्रावरुन असे दिसून येते की, तक्रारदारांचे सा.वाले क्र.2 यांचेकडे उघडलेले नविन खाते क्रमांक 4165 मध्ये राधा नावाच्या व्यक्तीने दिनांक 23.3.2004 रोजी धनादेश रु.85,000/- जमा केलेला होता. तो धनादेश खाते बंद झालेले आहे म्हणून तक्रारदाराकडे दिनांक 25.3.2004 रोजी सूचना पत्रासह पाठविण्यात आला. तो मुळचा धनादेश त्या बद्दलची स्लीप तक्रारदाराने आपल्या पुराव्याचे शपथपत्रासह दाखल केलेली आहे. त्यानंतर तक्रारदार गोंधळले व सा.वाले क्र.2 शाखेमध्ये चौकशी केली व त्यांना असे समजले की, त्यांचे सा.वाले क्र.2 कडील खात्यामध्ये सा.वाले क्र.1 यांचेकडून रु.55,500/- जमा करण्यात आले व त्यानंतर त्यांना असे दिसून आले की, वाजीद नावाचे व्यक्तीने त्यांना फसविले. त्यानंतर तक्रारदारांनी काशिमिरा पोलीस स्टेशन येथे वाजीद विरुध्द आपली तक्रार दाखल केली. त्या तक्रारीची प्रत तक्रारदारांनी आपल्या शपथपत्रासह दाखल केलेली आहे. यावरुन हे स्पष्ट होते की, तक्रारदार व वाजीद नावाची व्यक्ती यांचे आपसात संगनमत नव्हते व या संपूर्ण प्रकारात त्या वाजीद नावाचे व्यक्तीने तक्रारदाराकडून रु.500/- चा धनादेश घेऊन त्यावर खाडाखोड करुन त्यातील रक्कम रु.55,000/- वाढवून तो जमा केला व सा.वाले क्र.1 यांचे अधिका-यांनी निष्काळजीपणे तो पारीत केला. सा.वाले क्र.2 यांचे संदर्भात असे दिसून येते की, सा.वाले क्र.2 हे मिरारोड(पूर्व) येथील शाखा आहे. सा.वाले क्र.2 यांनी खाते उघडण्याचा अर्ज त्यासोबत मुळचा धनादेशाची छायाप्रत तसेच अर्जासोबत प्राप्त झालेल्या ओळखपत्राच्या प्रती इ. हजर केल्या. त्या अर्जावरील सहया तक्रारदार मान्य करतात. कारण तक्रारदारांच्या कथनाप्रमाणे वाजीद नावाचे व्यक्तीने खाते उघडण्याचे अर्जावर आवश्यक त्या ठिकाणी तक्रारदारांची सही घेतली होती. तथापी तक्रारदारांनी आपल्या तक्रारीमध्ये त्यांचे पुराव्याचे शपथपत्रात असे स्पष्टपणे कथन केले आहे की, ते मिरारोड, सा.वाले क्र.2 यांचे शाखेत कधीही गेलेले नाहीत. तथापी त्यांचे नांवाचे खाते वाजीद नावाचे व्यक्तींनी ते सा.वाले क्र.2 यांचे कर्मचारी भासऊन खाते उघडण्याच्या को-या अर्जावर सही घेतली व त्या अर्जावरुन व 500/- रुपयाचे धनादेशावरुन सा.वाले क्र.2 यांच्या कर्मचा-याच्या मदतीने खाते उघडण्याची प्रक्रिया पार पाडली. 16. प्रस्तुतच्या मंचाने खाते उघडण्याचा मुळचा अर्ज त्यावर असलेले शिक्के, व नोंदी ईत्यादीचे काळजीपूर्वक व बारकाईने वाचन केले, तक्रारदारांचा पत्ता हा अर्जामध्ये रुम क्र.14, दत्तात्रय भवन, सांताक्रुझ (पश्चिम) असा दिलेला आहे. अर्जावर साक्षीदार म्हणून गुरुविंदरसिंग या व्यक्तीने सही केलेली आहे. तक्रारदारांच्या ओळखपत्राखाली गुरुविंदरसिंग यांनी ओळखपत्राचे कागदपत्र तपासले असा शेरा मारलेला आहे. यावरुन असे दिसते की, श्री.गुरुविंदरसिंग हे सा.वाले क्र.2 यांचे मिरारोड येथील शाखेमध्ये कर्मचारी होते. अर्जातील शेवटच्या पानावर म्हणजे संचीकेच्या पृष्ट 10 वर सदरहू गुरुविंदरसिंग कर्मचा-यांनी ते तक्रारदार यांना वैयक्तिकरित्या भेटले व त्यांनी अर्जाची तपासणी केली असा स्पष्ट शेरा मारलेला आहे. तक्रारदारांची तक्रारीतील कथने व पुराव्याचे शपथपत्र यावरुन हे र्निविवादपणे स्पष्ट होते की, तक्रारदार सा.वाले क्र.2 यांच्या शाखेमध्ये खाते उघडण्याकामी कधीच गेलेले नव्हते. सा.वाले क्र.2 यांनी दाखल केलेल्या आपल्या कैफीयतीमध्ये असे कधीही कथन केले नाही की, तक्रारदार हे स्वतः खाते उघडण्याकामी मिरारोड शाखेमध्ये आले होते व त्यांनीच म्हणजे तक्रारदारांनी खाते उघडण्याचा अर्ज भरुन दिला व त्याची पडताळणी सा.वाले क्र.2 यांच्या कर्मचा-यांनी केली. सा.वाले क्र.2 यांचे तसे कथन नसल्याने व तक्रारदारांचे स्पष्ट कथन की, ते सा.वाले क्र.2 शाखेमध्ये स्वतःहून कधीच गेले नाहीत यावरुन ही बाब सिध्द आहे की, वाजीद नावाची व्यक्ती यांनी गुरुविंदरसिंग या कर्मचा-याशी हातमिळवणी करुन खाते उघडण्याचा अर्ज व कागदपत्र सुपूर्द केली व त्यानंतर तो धनादेश सा.वाले क्र.1 शाखेकडे पाठविण्यात आला. येथे एक बाब नमुद करणे आवश्यक आहे की, खाते उघडण्याचे अर्जामध्ये धनादेशाची रक्कम 55,500/- टाकण्यात आली होती. म्हणजे सा.वाले क्र.2 यांचे कर्मचा-यांला अर्जासोबत तो खाडाखोड असलेला धनादेश प्राप्त झाला होता. तरीदेखील सा.वाले क्र.2 यांचे कर्मचा-यांने त्या मुळचे धनादेशावर असलेले फेरबदल व खाडाखोड याच्याकडे दुर्लक्ष करुन तो धनादेश वटविणेकामी सा.वाले क्र.1 यांचेकडे पाठविला. 17. या संदर्भात एक निरीक्षण येथे नोदवावेसे वाटते की, तक्रारदारांचे निवासस्थान सांताक्रुझ (पश्चिम) येथे आहे. तक्रारदारांच्या पुराव्याच्या शपथपत्राप्रमाणे तक्रारदार त्यांचा व्यवसाय माहीम येथे करतात व सांताक्रुझ (पश्चिम) येथे मागील 11 वर्षापासुन आहेत. तक्रारदारांना जर आय.सी.आय.सी.आय. बँकेमध्ये खाते उघडावयाचे असते तर ते खाते सांताक्रुझ पश्चिम शाखेमध्ये उघडले असते. तक्रारदार हे सांताक्रुझ (पश्चिम) येथे राहातात. पश्चिम रेल्वेने प्रवास करणा-या व्यक्तीस सांताक्रुझ नंतर अंधेरी हे उपनगर लागते. तेथे देखील आय.सी.आय.सी.आय बँकेच्या शाखा आहेत. त्यानंतर अंधेरी ते बोरीवली ही दोन उपनगरे जी पश्चिम रेल्वेने जोडलेली आहेत तेथे देखील आय.सी.आय.सी.आय च्या शाखा आहेत. बोरीवली येथे देखील आय.सी.आय.सी.आय ची शाखा आहे. बोरीवली नंतर उत्तरेकडील उपनगर दहीसर येथे देखील आय.सी.आय.सी.आय ची शाखा आहे. तथापी येवढी सगळी उपनगरे ओलांडून मिरारोड (पूर्व) येथील शाखेमध्ये खाते उघडणेकामी तक्रारदार जाईल ही शक्यता दिसत नाही. सा.वाले क्र.2 यांच्या कैफियतीमध्ये तक्रारदारांना मिरारोड शाखेमध्ये खाते उघडण्याचे काही खास कारण होते असेही दिसत नाही. यावरुन असा निष्कर्ष काढावा लागतो की, तक्रारदारांच्या कथनाप्रमाणे वाजीद या व्यक्तीने ते सा.वाले क्र.2 यांचे कर्मयचारी आहेत असे भासवून तक्रारदारांच्या खाते उघडण्याच्या अर्जावर सहया घेतल्या व तो अर्ज व ओळखपत्र व खाडाखोड केलेला धनादेश सा.वाला क्र.2 यांचे कर्मचा-याकडे सुपुर्द केला. तक्रारदार कधीही खाते उघडणेकामी स्वतः आलेले नसताना किंवा त्यांच्या ओळखपत्राची छाननी न करता व सोबतच्या धनादेशावरील नोंदी संशयास्पद असताना सा.वाले क्र.2 यांच्या कर्मचा-यांनी ते खाते उघडण्याची प्रक्रिया पार पाडली. खाडाखोड असलेला धनादेश हा सा.वाले क्र.2 यांचेकडे प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या अधिका-यांनी किमान दक्षता घेतली असती तर पुढील अनर्थ टळला असता. त्यांनी खाते उघडण्याचे बाबतीत व त्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया पार पाडण्याचे बाबतीत किमान दक्षता घेतली घेतली असती तर पुढील अनर्थ टळला असता व तक्रारदारांचे नुकसान झाले नसते. अंतीमतः सा.वाले क्र.2 यांच्याकडे उघडलेल्या खात्यातील धनादेश पुस्तक याच वाजीद नावाचे व्यक्तीने प्राप्त करुन घेतलेले दिसते व त्यावर तक्रारदारांच्या सही सारख्या सहया करुन स्वतःचे नांव टाकून रु.42,500/- + रु.11,000/- खात्यामधून काढले गेले. सा.वाले क्र.2 यांच्या वकीलांनी तो मुळचा धनादेश हजर करण्याकामी ब-याच मुदती घेतल्या तथापी सा.वाले क्र.2 तो धनादेश हजर करु शकले नाहीत. परंतु त्यांच्या कैफीयतीमध्ये वाजीद यांचे नांव रक्कम प्राप्त करणारा ( Payee ) असे त्या धनादेशावर लिहीले होते असे मान्य केलेले आहे. यावरुन वाजीद नावाची व्यक्ती व सा.वाले क्र.2 मिरारोड (पूर्व) येथील शाखेतील कर्मचारी यानी एकत्रितपणे तक्रारदारांचे सा.वाले क्र. 2 यांचेकडे उघडलेल्या खात्यामधुन रक्कम उचलण्याची कार्यवाही केली हे दिसून येते. याप्रमाणे सा.वाले क्र.2 यांचा देखील निष्काळजीपणा व तक्रारदारांना सेवा पुरविण्यास कसुर केली हे सिध्द होते. 18. तक्रारदारांनी मुळची रक्कम रु.55,000/- सा.वाले यांचेकडून वसुल व्हावी, तसेच त्यावर 18 टक्के व्याज व 1 लाख रुपये नुकसान भरपाई अशी मागणी केलेली आहे. प्रत्यक्षात तक्रारदाराचे रु.42,500/- व रु.11,000/- असे एकूण रु.53,500/- येवढे नुकसान झालेले आहे. ती रक्कम मार्च, 2004 मध्ये तक्रारदारांच्या खात्यातुन उचलण्यात आली. तक्रारीत निकाल लागण्यास मार्च, 2001 उचाडला. म्हणजे 7 वर्षे होऊन गेलेली आहेत. वरील परिस्थितीत तक्रारदारांची मुळची रक्कम व नुकसान भरपाई असे मिळून एकत्रितपणे 1 लाख सा.वाले यांनी तक्रारदारांना अदा करावेत असा आदेश देणे योग्य व सयूक्तीक आहे असे मंचाचे मत झालेले आहे. 19. वर चर्चा केल्याप्रमाणे सा.वाले क्र.1 यांचे कर्मचा-याचा मुळ धनादेश क्र.9596 पारीत करण्यात निष्काळजीपणा होता व सा.वाले क्र.1 यांनी सेवा सुविधा पुरविण्यास कसुर केली ही बाब सिध्द झालेली आहे. सा.वाले क्र.2 यांचे कर्मचा-यांचा देखील या प्रकरणात समावेश होता व त्यांनी देखील निष्काळजीपणा केलेला आहे व तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यास कसुर केलेली आहे हे सिध्द झालेले आहे. सबब सा.वाले क्र.1 यांनी तकारदारांना नुकसान भरपाई दाखल रु.50,000/- व सा.वाले क्र.2 यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाई दाखल रु.50,000/- अदा करावेत असा आदेश देणे उचित राहील असे प्रस्तुतच्या मंचाचे मत झालेले आहे. 20. मुळचा धनादेश 9596 हा सांताक्रुझ पोलीस स्टेशन यांचेकडून प्राप्त झालेला आहे. प्रकरणाचा अद्याप तपास चालु आहे. मुळचा धनादेश प्रकरणात ठेऊन घेतल्यास फौजदारी गुन्हयाचे तपासकाम ठप्प होईल. सबब मुळचा धनादेशाची छायांकित प्रत या न्यायनिर्णयासोबत ठेवून घेण्यात येते व मुळचा धनादेश पोलीस स्टेशन सांताक्रुझ यांचेकडे पाठविण्यात यावा असा आदेश देणे योग्य राहील. 21. वरील परिस्थितीत पुढील आदेश करण्यात येतो. आदेश 1. तक्रार क्रमांक 296/2007 अंशतः मंजूर करण्यात येते. 2. सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाई दाखल रु.50,000/- अदा करावेत, तर सा.वाले क्र.2 यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाई दाखल रु.50,000/- अदा करावेत. 3. सामनेवाले यांनी वरील आदेशाची पुर्तता 8 आठवडयाचे आत करावी. 4. सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी तक्रारदारांना खर्चाबद्दल प्रत्येकी रु.5000/- अदा करावेत. 5. मुळचा धनादेश क्र.9596 सांताक्रुझ पोलीस स्टेशन यांचेकडे रजिस्टर पोस्टाने अथवा खास दुतामार्फत पाठवावा व त्याची छायांकित प्रत प्रस्तुतचे न्यायनिर्णयाचे सोबत ठेवण्यात यावी. 6. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.
| [HONABLE MRS. Mrs.DEEPA BIDNURKAR] Member[HONABLE MR. Mr. J. L. Deshpande] PRESIDENT[HONABLE MR. MR.V.G.JOSHI] Member | |