तक्रारदारासाठी वकील श्रीमती वारुंजीकर. गैर अर्जदारासाठी वकील श्री.गंडभीर. मा.अध्यक्षानुसार दिलेले निकालपत्र. तक्रारदाराची थोडक्यात तक्रार खालील प्रमाणे. 1. तक्रारदाराने सा.वाले क्र.1 यांनी तयार केलेली स्कोडा एल.अन्ड.के. ही कार त्यांचे डिलर डी.एम.डी. यांचेकडून दिनांक 04/01/2007 रोजी विकत घेतली. त्या गाडीचा रजिस्ट्रेशन क्रमांक एम.एच.03-ए.एफ-3794 असा आहे. सा.वाले क्र.2 हे सा.वाले क्र.1 यांनी बनविलेल्या गाडयांचे सेवा देणारे /विक्रेते आहेत. जानेवारी 2007 ते डिसेंबर, 2007 पर्यत तक्रारदाराची ही कार 32000 किलो मिटर धावली होती. गाडीत ब-याच समस्या होत्या. ती गाडी हमी कालावधीत असताना त्या गाडीच्या नियमित व इतर आवश्यक कामासाठी तक्रारदाराने सा.वाले क्र.2 कडे संपर्क साधला. त्यांचे प्रतिनिधी दिनांक 06/12/2008 रोजी येवून त्यांनी गाडीची पाहणी केली, व गाडीच्या कामाला बराच वेळ लागेल म्हणून ते गाडी सा.वाले क्र.2 च्या वर्कशॉपमध्ये घेवून जात होते. परंतु गाडीची क्लचप्लेट खराब झाल्याने रस्त्यातच गाडी खराब (ब्रेकडाऊन) झाली. म्हणून तक्रारदाराने सांगीतल्यावरुन गाडी दुरुस्तीसाठी ओढून (टोईंग करुन) घेऊन गेले. 2. सा.वाले क्र.2 यांनी गाडी दुरुस्त केली व दिनांक 08/12/2007 चे रुपये 50,059/- दुरुस्तीचे बिल दिले. कारण त्यावेळी गाडी वॉरंटीत आहे किंवा नाही हे त्यांना माहिती नव्हते. हमी कालावधीची खात्री झाल्यानंतर पैसे परत करण्याच्या अटीवर तक्रारदाराने बिलाची पूर्ण रक्कम दिली व गाडी घेवून गेला. त्यानंतर तक्रारदाराने पैसे परत मिळण्यासाठी सा.वाले यांचेकडे पाठपुरावा केला. सा.वाले क्र.1 यांनी तक्रारदाराला ई-मेल पाठवून कळविले की, त्यांनी सा.वाले क्र.2 यांना फ्लॉयव्हिलची रक्कम परत करण्यास सांगीतले आहे. त्यानंतर सा.वाले क्र.2 यांनी रु.32,900/- दिनांक 18/01/2008 च्या धनादेशाने तक्रारदारास परत केले. बाकी राहीलेली रक्कम रु. 17,159/- साठी तक्रारदाराने बराच पाठपुरावा केला. परंतु सा.वाले यांनी ही रक्कम परत केली नाही. 3. तक्रारदाराने सा.वाले क्र.1 च्या दुस-या डिलर/सर्व्हिस एजंट गाडी नेली. त्यांनी गाडीची पहाणी केली व तोंडी सांगीतले की, गाडीत पुन्हा क्लचप्लेटची समस्या आहे. त्यांनी ती दुरुस्त करण्याबाबत रु.27,000/- चे एस्टीमेट दिले. तसेच त्यांनी सांगीतले की, डिसेंबर, 2007 मध्ये गाडीची दुरुस्ती करताना क्लचप्लेटचे मटेरीयल कमी दर्जाचे वापरले आहे. म्हणून तक्रारदाराने श्री.जगदिश ममदापुर या तज्ञाचे त्या बाबत मत घेतले. त्यांनी सांगीतले की, या गाडीची क्लचप्लेट योग्य नाही. त्याबद्दल श्री.ममदापुरे यांनी त्यांचे शपथपत्र दिले आहे. तक्रारदाराचे म्हणणे की, गाडीत उत्पादन दोष आहे व सा.वाले यांनी वरीलप्रमाणे सेवेत न्यूनता केली आहे. म्हणून त्याने सदरची तक्रार दाखल केली. तक्रारदाराच्या खालील मागण्या आहेत. अ) सा.वाले यांनी रक्कम रु.17,159/- परत करावी. ब) सा.वाले यांनी तक्रारदाराच्या गाडीतील दोष दूर करावा किंवा तो दूर करण्यासाठी लागणारा खर्च द्यावा. क) सा.वाले यांनी तक्रारदाराला रु. 2 लाख नुकसान भरपाई द्यावी व या तक्रारीचा खर्च रु.20,000/- द्यावा. 4. सा.वाले क्र.1 व 2 यांनी त्यांची वेगवेगळी कैफीयत देवून तक्रारदाराचे आरोप नाकारले. त्यांनी जरी वेगवेगळी कैफीयत दिली असली तरी दोघांतील मजकूर सारखाच आहे. त्यांचे म्हणणे की, हमी कालावधीत तक्रारदाराची गाडी जेव्हा जेव्हा किरकोळ दुरुस्तीसाठी आणली तेव्हा तेव्हा त्यांच्या कुशल कारागिरांनी तिची पहाणी करुन गाडी दुरुस्त करुन दिली व तक्रारदारांनी गाडी चालवून त्याचे समाधान झाल्यावरच गाडी ताब्यात घेतली. गाडीची क्लचप्लेट खराब झाल्यानंतर त्यांचे माणसांनी गाडी टोईंग करुन वर्कशॉपमध्ये आणली. गाडी तक्रारदाराने दिनांक 04/01/2007 रोजी विकत घेतली होती व जवळ जवळ 1 वर्षाने म्हणजे दिनांक 07/12/2007 रोजी क्लचप्लेट नादुरुस्त झाली म्हणून गाडी वर्कशॉपमध्ये आणली. त्यांच्या माणसांनी गाडी दुरुस्त करुन लगेच दुस-या दिवशी गाडी चांगल्या स्थितीत तक्रारदराच्या ताब्यात दिली. 5. सा.वाले यांचे म्हणणे की, सा.वाले क्र.2 यांनी सुरवातीला रु.50,059/- चे बिल दिले, नंतर ते बिल कमी करुन सुधारीत बिल रु.17,159/- चे दिले. कारण गाडी हमीकालावधीत असल्याने लेबर चार्जेस वगळले व फ्लायव्हिलची रक्कम तक्रारदाराला परत केली. फक्त क्लचप्लेट व प्रेशर प्लेट, ज्याची वापरल्यामुळे झिज व हानी झालेली होती, त्यांच्या किंमती व गाडी वर्कशॉपमध्ये आणण्यासाठी लागलेला खर्च धरुन सुधारीत बिल दिले. परंतु तक्रारदार हा सारखा क्लचप्लेट व प्रेशरप्लेटची लावलेली रक्कमही परत मागत होता. सा.वाले यांचे म्हणणे की, कोणतीही उत्पादक कंपनी गाडी वापरल्यामुळे गाडीचे जे भाग झिजतात किंवा ज्यांची हानी होते असे भाग निशुल्क बदलून देण्याची हमी देत नाही. तक्रारदाराने क्लचची पुर्वीसारखीच समस्या कधी झाली व दुस-या डिलरकडे त्याने गाडी कधी नेली या बद्दल काही सांगीतले नाही. त्यांनी कमी दर्जाचे क्लचचे मटेरीयल वापरले नाही. गाडी चालविणा-याला गाडी चालविण्याचे व क्लच हाताळण्याचे ज्ञान नसल्यामुळे किंवा तो त्यात कुशल नसल्यामुळे क्लचला नुकसान झाले. त्याला ते जबाबदार नाही. श्री.ममदापुर यांनी त्यांचे शपथपत्र पूर्वग्रहदूषीत मनाने केलेले आहे. ते विश्वासार्ह नाही. गाडीत कोणताही उत्पादन दोष नाही. त्यांची सेवेत न्यूनता नाही. सदरची तक्रार रद्द करण्यात यावी व त्यांचा खर्च देववावा. 6. आम्ही तक्रारदारातर्फे वकील श्रीमती वारुंजीकर व सा.वाले यांचे तर्फे वकील श्री.गंडभीर यांचा युक्तीवाद ऐकला व कागदपत्रं वाचली. दिनांक 08/12/2007 च्या इनव्हाईस वरुन असे दिसते की, दिनांक 07/12/2007 ला गाडी सा.वाले क्र.2 च्या वर्कशॉपमध्ये आणली. त्यावेळी गाडीचे फ्लायव्हिल बदलले व क्चचचे काम केले. सा.वाले क्र.2 यांनी रु.50,059/- चे बिल दिले. परंतु गाडी हमी कालावधीत आहे हे सा.वाले क्र.2 यांना नंतर कळल्यानंतर त्यांनी फ्लायव्हिलची लावलेली किंमत रु.38,968/- दिनांक 18/01/2008 च्या धनादेशाने तक्रारदाराला परत केली. त्यावेळी त्यांनी दिनांक 8/12/2007 चे दुरुस्तीचे सुधारीत बिल रु.17,159/- चे दिले. पहिल्या इनव्हाईसवरुन असे दिसते की, सा.वाले क्र.2 यांनी दिनांक 22/12/2007 रोजी फ्लायव्हिल बदलण्याचे लेबर चार्जेस रु.2000/- गाडी वॉरंटीत असल्यामुळे कमी केले. मात्र हे रु.2000/- सा.वाले क्र.2 यांनी तक्रारदाराला परत केले नाही. फक्त फ्लायव्हिलची रक्कम परत केली. मंचाच्या मते ही रक्कम रु.2000/- सा.वाले यांनी तक्रारदाराला परत करावयास पाहिजे होती. ती केली नाही ही सा.वाले यांच्या सेवेत न्यूनता आहे. 7. तक्रारदाराने पहिल्या बिलाची रक्कम रु.50,059/- ही दिनांक 08/12/2007 रोजीच सा.वाले क्र.2 यांना दिली. सुधारीत बिलामध्ये सा.वाले क्र.2 यांनी प्रेशर प्लेट E.U.III याची रक्कम रु.5,897.40 व क्लचप्लेट D.S.L. E.U.III याची रक्कम रु.5,823.91 या रकमा समाविष्ट केलेल्या आहेत. मात्र या रकमा सुरवातीच्या रु. 50,059/- च्या बिलामध्ये दिलेल्या नाहीत. दिनांक 08/12/2007 नंतर गाडी पुन्हा सा.वाले यांनी दुरुस्त केली असे कुठेही नमुद केलेले नाही. त्यामुळे या वरील रकमा सुधारीत बिलामध्ये कशा आल्या या बद्दल सा.वाले यांनी काहीही स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे या सुधारीत बिलाबद्दल शंका येते. मंचाच्या मते पहिल्या बिलात नमुद केलेले लेबर चार्जेस रु.2000/- हे सा.वाले यांचेकडेकडून तक्रारदाराचे घेणे आहे. 8. तक्रारदाराचा आरोप असा आहे की, क्लचप्लेटमध्ये उत्पादन दोष आहे. परंतु गाडी एक वर्ष चालली त्यावेळी क्लचप्लेटचा काही प्रॉब्लेम आला अशी तक्रारदाराची तक्रार नाही. श्री.जगदिश ममदापुर या तज्ञांनी त्यांच्या शपथपत्रात म्हटले आहे की, गाडीत क्लचप्लेटचा दोष आहे. त्यामुळे क्लचपेडल कठीण ( Hard ) झालेले आहे. त्यासाठी नेमका काय दोष आहे हे समजण्यासाठी गियरबॉक्स उघडून पहावा लागेल. श्री.ममदापुर यांनी गियरबॉक्स उघडून पाहिलेला नाही. त्यांनी मत व्यक्त केले आहे की, अशी समस्या ज्या दर्जाचे मटेरीयल व पार्ट वापरले तर निर्माण होते. क्लचप्लेटमध्ये कमी दर्जाचे मटेरीयल व पार्ट वापरले आहे असे खात्रीशीर मत तज्ञाने दिलेले नाही. मात्र क्लचप्लेट कठीण झाली आहे,ती कशामुळे झाली यासाठी गियरबॉक्स उघडून तो दोष काढून टाकणे व नेमके कारण जाणून घेऊन तो दोष दूर करणे ही सा.वाले यांची जबाबदारी आहे. कारण त्यावेळी गाडी हमी कालावधीत होती. 9. वरील विवेचनावरुन मंचाचे असे मत आहे की, सा.वाले यांची सेवेत न्यूनता आहे, हे तक्रारदाराने सिध्द केले आहे. सदरच्या तक्रारीमध्ये तथ्य आहे असे वाटते. म्हणून मंच खालील आदेश करीत आहे. आदेश 1. तक्रार क्र. 106/2010 पुर्विची तक्रार क्र. 50/2008 अंशतः मंजूर करण्यात येते. 2. सा.वाले क्र. 1 व 2 यांनी तक्रारदाराची गाडी स्कोडा एल.अन्ड.के. रजिस्ट्रेशन क्रमांक एम.एच.03-ए.एफ-3794 मधील श्री.ममदापुर यांनी त्यांच्या शपथपत्रात नमुद केलेला दोष दूर करुन द्यावा. 3. सा.वाले क्र.1 व 2 यांनी संयुक्तीकरित्या व एकत्रितरित्या तक्रारदाराला रु.5000/- नुकसान भरपाई द्यावी व रु.5000/- या तक्रारीचा खर्च द्यावा. 4. सा.वाले यांनी सदरच्या आदेशाची प्रमाणित प्रत मिळाल्यानंतर दोन महिन्याचे आत या आदेशाची पुर्तता करावी. अन्यथा तक्रारदाराला विलंबापोटी आदेशीत रक्कम रु.12000/- वर द.सा.द.शे.9 दराने व्याज द्यावे, व गाडीतील दोष 2 महिन्याच्या मुदतीत दूर न केल्यास त्या विलंबापोटी प्रत्येक दिवसाला रु.50/- प्रमाणे दंड द्यावा. 5. आदेशाच्या प्रमाणित प्रती दोन्ही पक्षकारांना विनामूल्य पाठविण्यात याव्या.
| [HONORABLE G L Chavan] Member[HONABLE MRS. JUSTICE S P Mahajan] PRESIDENT | |