(द्वारा- श्रीमती रेखा कापडिया, सदस्य) अर्जदाराचे दुचाकी वाहन चोरीस गेल्यानंतर त्यांनी एजंट मार्फत गैरअर्जदार यांच्याकडे विमा रकमेची मागणी केली. गैरअर्जदार यांनी ती न दिल्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांनी एम.एच.20 एक्यू 2009 या क्रमांकाच्या मोटर सायकलचा विमा गैरअर्जदार क्र.1 यांच्याकडून घेतला असून, गैरअर्जदार क्र.2 व 3 हे विमा कंपनीचे एजंट आहेत. अर्जदाराचे सदरील दुचाकी वाहन चोरीस गेल्यामुळे त्यांनी दि.31.12.2007 रोजी संबंधित पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली. गैरअर्जदार क्र.2 व 3 यांनी अर्जदाराकडून क्लेम फॉर्म भरुन घेतला व वाहन चोरीची तक्रार इत्यादी कागदपत्रे त्यांच्याकडून घेऊन सदरील क्लेम फॉर्म विमा कंपनीत दाखल करण्याचे आश्वासन दिले. विम्याचे पैसे न मिळाल्यामुळे अर्जदाराने गैरअर्जदार क्र.1 यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांच्याकडे क्लेम फॉर्म दाखल झाला नसल्याचे समजले. अर्जदार नवीन क्लेम फॉर्म दाखल करण्यात गेले असता, गैरअर्जदार क्र.1 यांनी तो स्विकारला नाही. त्यामुळे अर्जदाराने तो रजिस्टर पोस्ट द्वारे गैरअर्जदार क्र.1 यांना पाठविला. अर्जदाराने गैरअर्जदार क्र.2 व 3 यांना या प्रकरणी विचारणा केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली असल्याचे अर्जदाराचे म्हणणे आहे. वाहनाची किंमत तसेच नुकसान भरपाईची मागणी अर्जदाराने केली आहे. गैरअर्जदार क्र.1 यांनी दाखल केलेल्या जवाबानुसार अर्जदाराच्या वाहनाची चोरी दि.16.12.2007 रोजी झाली, पण अर्जदाराने याबाबतची तक्रार, संबंधित पोलीस ठाण्यात दि.31.12.2007 रोजी केली आहे. त्याचप्रमाणे वाहन चोरी झाल्यानंतर 48 तासात त्यांच्याकडे सुचना देणे हे नियमाप्रमाणे बंधनकारक आहे. पण अर्जदाराने वरीलप्रमाणे सुचना न देता, सहा महिन्यानंतर त्यांच्याकडे क्लेम फॉर्म, वाहन चोरी झाल्याबाबतची सुचना त्यांच्याकडे दिली नसल्याचे सांगून तक्रार खारीज करण्याची विनंती मंचास केली आहे. गैरअर्जदार क्र.2 यांनी दाखल केलेल्या जवाबानुसार त्यांनी अर्जदारास, वाहनाची विमा पॉलीसी काढण्यात मदत केली, पण वाहनाची चोरी झाल्याबाबत त्यांना (3) त.क्र.724/09 कळविलेले नाही. अर्जदाराने त्यांना विनाकारण प्रतिवादी केल्याचे सांगून तक्रार खारीज करण्याची विनंती केली आहे. गैरअर्जदार क्र.3 यांना मंचाची नोटीस प्राप्त होऊनही गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्या विरुध्द एकतर्फा सुनावणीचा आदेश पारित करण्यात आला. अर्जदार व गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन व सुनावणीवरुन मंचास असे आढळून येते की, अर्जदाराचा एम.एच.20 एक्यू 2009 या मोटर सायकलचा विमा गैरअर्जदार क्र.1 यांच्याकडून घेतला असून, विमा मुदत दि.26.07.2007 ते 25.07.2008 अशी आहे. अर्जदाराने, वाहन चोरी झाल्याची तक्रार दि.31.12.2007 रोजी संबंधित पोलीस स्टेशनमध्ये केली असल्याचे दिसून येते. एफ.आर.आर. चे निरीक्षण केल्यावर दि.16.12.2007 रोजी सदरील वाहन चोरीस गेल्याचे त्यात नमुद केलेले दिसून येते. अर्जदाराने गैरअर्जदार क्र.2 व 3 यांच्या मार्फत क्लेम फॉर्म दाखल केला असल्याचे म्हटले असले तरी, याबाबत कोणताही लेखी पुरावा किंवा कागदपत्रे मंचात दाखल केलेली नाहीत. विमा कंपनीच्या नियमाप्रमाणे वाहनास अपघात झाल्यास, किंवा वाहन चोरीला गेल्यास त्याची सूचना विमा कंपनीस 48 तासात देणे बंधनकारक आहे. अर्जदाराने अशा प्रकारची कोणतीही सूचना गैरअर्जदार क्र.1 यांना दिली असल्याचे दिसून येत नाही. अर्जदाराने दि.26.06.2009 रोजी गैरअर्जदार क्र.1 यांच्याकडे क्लेम फॉर्म पाठविला, जो गैरअर्जदार क्र.1 यांनी मुदतीच्या बाहेर असल्याचे सांगून फेटाळून लावला व विमा रक्कम देण्याचे नाकारले. गैरअर्जदार क्र.1 यांनी केलेली कृती विमा कंपनीच्या नियमानुसार आहे. वरील सर्व निरीक्षणावरुन अर्जदाराने केलेली तक्रार मंच मान्य करीत नाही. आदेश 1) अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात येत आहे. श्रीमती ज्योती पत्की श्रीमती रेखा कापडिया श्री.डी.एस.देशमुख सदस्य सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |