(आदेश पारीत व्दारा - श्री शेखर प्र. मुळे, मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक : 20 जुन, 2017)
1. तक्रारकर्त्याने ही तक्रार भारतीय रेल्वे प्रवाशांना देण्यात येणा-या सुरक्षितेमध्ये हलगर्जीपणा केला या आरोपावरुन विरुध्दपक्षांचे विरुध्द दाखल केली आहे. तक्रारकर्त्याची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे.
2. विरुध्दपक्ष हे साऊथ इस्टर्न सेंट्रल रेल्वे नागपुर आणि बिलासपुर येथील डिव्हीजीलन मॅनेजर व इतर पदाधिका-याविरुध्द आहे. दिनांक 1.12.2012 ला तक्रारकर्ता हा त्याची पत्नी व मुलींसह गितांजली एक्सप्रेस, ट्रेन नंबर 12860 ने रायगड वरुन नागपुरला प्रवास करीत होते. तक्रारकर्ता व त्याचे कुंटूंब रायगडला समारंभासाठी गेले होते. तक्रारकर्त्याने सदरहू ट्रेनमध्ये व्दीतीय श्रेणीचे कोच नं.एस-4 मध्ये आसन आरक्षित केले होते, परंतु त्या कोचमध्ये जेंव्हा तो चढला त्यावेळी त्या कोचमध्ये अनावश्यक लोकांची गर्दी होती आणि त्याच्या आरक्षित केलेल्या आसनावर सुध्दा काही लोकांनी कब्जा केला होता आणि विनंती करुन सुध्दा त्यांनी त्याला त्याचे आरक्षित आसन ग्रहण करु दिले नाही. तक्रारकर्त्याने मोबाईल फोनवरुन आर.पी.एफ. बिलासपुर येथे सदरहू घटनेबाबतची तक्रार देण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यानंतर, त्याने त्या कोचमधील T.T.E. (Ticket examiner) शी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु तो आढळून आला नाही. त्यामुळे, त्याला उभ्यानेच प्रवास करावा लागला. दुर्ग येथे ती ट्रेन पोहचल्यावर त्याचे कोचमधील अनआरक्षित इसम उतरले तेंव्हा कुठे त्याला बसायला मिळाले. बसल्यानंतर त्याला लक्षात आले की, त्याचा एक हॅन्डबॅग गायब झाला आहे. ज्यामध्ये रुपये 60,000/- किंमतीचे सोन्याचे दागिणे आणि रुपये 15,000/- नगदी रक्कम असे एकूण रुपये 75,000/- चे मौल्यवान चीज वस्तु होत्या. त्यावेळी तेथे आर.पी.एफ. चा स्टाफ नव्हता ज्याला तक्रार देता आली असती. दुर्ग रेल्वे स्टेशनला T.T.E. त्याच्या कोचमध्ये चढला, परंतु त्याने तक्रारकर्त्याला त्याबाबत कुठलेही सहकार्य केले नाही. त्यानंतर, तक्रारकर्त्याने Conductor कडे झालेल्या प्रकाराची रितसर तक्रार दिली. त्याने दिलेल्या तक्रारीवरुन Conductor ने जी नोट लिहिली त्यावरुन त्याला असे समजले की, आर.आर.बी. परिक्षेसाठी बरेच विद्यार्थी त्यांच्या कोचमध्ये आणि कोच नं.एस-8 ते एस-10 मध्ये आरक्षित नसतांना सुध्दा शिरले होते. Conductor ने त्याला नागपुर येथील रेल्वे पोलीस स्टेशनला तक्रार देण्यास सांगितले, त्याप्रमाणे त्याने नागपुरला आल्यावर तशी तक्रार दिली. तक्रारकर्त्याचा असा आरोप आहे की, झालेला प्रकार हा T.T.E. च्या हलगर्जीपणामुळे आणि दुर्लक्षतेमुळे घडला आणि T.T.E. ने आपली जबाबदारी नीट पारपाडली नाही, जी रेल्वेच्या सेवेतील कमतरता ठरते. त्यानंतर, त्याने विरुध्दपक्षाला नुकसान भरपाई मिळण्यासाठी नोटीस पाठविला, परंतु त्याचा उपयोग झाला नाही. म्हणून या तक्रारीव्दारे त्याने 75,000/- रुपये 18 % व्याजाने विरुध्दपक्षाकडून मागितले असून नुकसान भरपाई म्हणून रुपये 2,50,000/- विरुध्दपक्षाकडून मागितले आहे.
3. तक्रारकर्त्याच्या तक्रारीला अनुसरुन विरुध्दपक्ष यांना मंचाची नोटीस बजावण्यात आली, त्यानुसार विरुध्दपक्षांनी प्रकरणात हजर होऊन संयुक्तीक लेखी जबाब सादर करुन तक्रारीतील मजकुर नाकबूल केले आहे आणि ही तक्रार खोटी व काल्पनिक असून विरुध्दपक्षाकडून पैसे उकडण्यासाठी दाखल केली असल्याचे म्हटले आहे. विरुध्दपक्षाने हे स्पष्टपणे नाकबूल केले आहे की, दिनांक 1.12.2012 ला सदरहू ट्रेनच्या एस-4 कोचमध्ये अनआरक्षित लोकांची गर्दी होती, ज्यामुळे तक्रारकर्त्याला त्याच्या आरक्षित आसनावर ग्रहण करता आले नाही. तसेच, हे सुध्दा नाकबूल केले आहे की, त्यावेळी त्या कोचमध्ये T.T.E. किंवा Conductor नव्हता. पुढे हे सुध्दा नाकबूल केले आहे की, तक्रारकर्त्याच्या हॅन्डबॅग चोरीला गेले, ज्यामध्ये रुपये 60,000/- चे सोन्याचे दागिणे व रुपये 15,000/- कॅश होती. मात्र, विरुध्दपक्षाने हे नमूद केले आहे की, त्यादिवशी आर.आर.बी. परिक्षेसाठी बरेच विद्यार्थी सदरहू ट्रेनने प्रवास करीत होते. परंतु, रेल्वे प्रशासनाने आरक्षित कोचमधून अनआरक्षित लोकांना काढण्यासाठी योग्य ती पाऊले उचलली होती. ज्यावेळी, तक्रारकर्त्याने तक्रार दाखल करण्यासाठी T.T.E. ला म्हटले त्यावेळी T.T.E. ने त्याला सर्वोतोपरी मदत केली होती आणि त्याला तक्रार पुस्तिका सुध्दा देण्यात आली होती. विरुध्दपक्षाच्या म्हणण्यानुसार कुठलाही सुज्ञ इसम हॅन्डबॅगमध्ये मौल्यवान चीज वस्तु व कॅश घेऊन प्रवास करणार नाही, त्यामुळे तक्रारकर्त्याची ही तक्रार बिनबुडाची आहे. तक्रारकर्ता स्वतः सामानाची काळजी घेण्यास हलगर्जीपणा दाखविला. त्या कोचमधील इतर कुठल्याही प्रवाशांनी कुठलिही तक्रार केली नव्हती. अशाप्रकारे, रेल्वे प्रशासनाची कुठल्याहीप्रकारे सेवेत कमतरता नव्हती किंवा हलगर्जीपणा नव्हता. सबब, ही तक्रार खारीज करण्याची विनंती करण्यात आली.
4. दोन्ही पक्षांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला. दोन्ही पक्षानी अभिलेखावर दाखल केलेले दस्ताऐवज व लेखी युक्तीवादाचे अवलोकन करण्यात आले, त्याप्रमाणे खालील प्रमाणे निष्कर्ष देण्यात येते.
// निष्कर्ष //
5. विरुध्दपक्षाने जरी तक्रारीतील सर्व मजकुर नाकबूल केला असला तरी कागदपत्रावरुन ही बाब सिध्द होते की, दिनांक 1.12.2012 ला तक्रारकर्ता गिंताजली एक्सप्रेसने रायगड ते नागपुर असा प्रवास करीत होते. तक्रारकर्त्याने काढलेल्या टिकीटाच्या प्रती दाखल केलेल्या आहेत. त्याशिवाय, विरुध्दपक्षाने आपल्या जबाबात असे नमूद केले आहे की, घटनेच्या दिवशी ट्रेनमध्ये तक्रारकर्त्याला T.T.E. ने तक्रार पुस्तिका दिली होती यावरुन हे स्पष्ट होते की, घटनेच्या दिवशी तक्रारकर्ता हा त्या ट्रेनमधून प्रवास करीत होता आणि ही बाब विरुध्दपक्षाने सुध्दा स्पष्टपणे नाकबूल केली नाही.
6. या तक्रारीतील वादातीत मुद्दा एवढाच आहे की, तक्रारकर्त्याच्या हॅन्डबॅगची चोरी झाली होती किंवा नाही आणि त्या हॅन्डबॅगमध्ये तक्रारकर्ता म्हणतो त्याप्रमाणे रुपये 75,000/- चे मौल्यवान चीज वस्तु होत्या किंवा नाही. विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याचा हा आरोप स्पष्टपणे नाकबूल केला आहे आणि त्यांच्या वकीलांनी युक्तीवादात सांगितले की, या आरोपाच्या पृष्ठ्यर्थ तक्रारकर्त्याने कुठलाही दस्ताऐवज किंवा पुरावा दाखल केला नाही. तक्रारीसोबत तक्रारकर्त्याने कोचमधील Conductor कडे दिलेल्या तक्रारीची प्रत दाखल केली आहे. जर त्या तक्रारीचे अवलोकन केलेतर असे दिसून येते की, तक्रारकर्त्याने खालीलप्रमाणे तक्रार त्यावेळी केली होती.
1) त्याच्या कोचमध्ये अनआरक्षित लोकांची गर्दी होती.
2) त्याला त्याच्या आरक्षित आसनावर दुर्गपर्यंत बसायला मिळाले नाही.
3) दुर्ग पर्यंत कोणीही T.T.E. किंवा आर.पी.एफ. स्टॉफमधील त्या कोचमध्ये नव्हता.
4) बिलासपुर येथील आर.पी.एफ. स्टॉफने कुठलेही सहाकार्य केले नाही.
5) त्या गर्दीमध्ये त्याची एक हॅन्डबॅग चोरी झाली होती.
6) गाडी दुर्ग येथे पोहचल्यावर T.T.E. ने त्याला हवे ते सहाकार्य केले नाही.
7. तक्रारीमधील मुद्दे वाचल्यावर हे लक्षात घेणे जरुरी आहे की, त्यावेळी तक्रारकर्त्याने त्याचे सोन्याचे दागिणे, नगदी रक्कम चोरी झाल्याचा कुठलाही उल्लेख केला नव्हता किंवा असा सुध्दा उल्लेख केला नव्हता की, चोरी झालेल्या बॅगमध्ये काही मौल्यवान चीज वस्तु किंवा नगदी रक्कम होती. त्या तक्रारीत मौल्यवान चीज वस्तु चोरी झाल्याचा उल्लेख नसणे तक्रारकर्त्याच्या तक्रारीला काही अंशाने कमजोर करते. कारण, कुठलाही सुज्ञ इसम जर त्याची मौल्यवान चीज वस्तु चोरी झाली असेल तर तक्रार देतांना ती बाब कधीच विसरणार नाही. तक्रारकर्त्याने सर्वात प्रथम त्याच्या बॅगमध्ये नगदी आणि मौल्यवान वस्तुची चोरी झाल्या संबंधीचा उल्लेख नागपुरच्या रेल्वे पोलीस स्टेशन येथे दिनांक 3.12.2012 ला दिलेल्या तक्रारीत केला आहे. म्हणून, आम्हांला त्याच्या या आरोपा बद्दल की त्याच्या हॅन्डबॅगेतून रुपये 75,000/- किंमतीचे मौल्यवान चीज वस्तु चोरी गेले होते याबाबत शंका वाटते. परंतु, ही बाब सुध्दा नाकारता येणार नाही की, ट्रेनमध्ये प्रवासी त्यांच्या मौल्यवान चीज वस्तु आणि पैसे हॅन्डबॅगमध्ये ठेवतात. तक्रारकर्त्याने नागपूर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीमध्ये बॅगमध्ये मौल्यवान चीज वस्तु असल्याचा उल्लेख केला आहे. जर असे गृहीत धरले की, त्याच्या बॅगमध्ये तो म्हणतो त्याप्रमाणे रुपये 75,000/- किंमतीचे चीज वस्तु नव्हत्या, तरी काही चीज वस्तु किंवा पैसे बॅगमध्ये असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
8. तक्रारकर्त्याच्या वकीलांनी खालील न्यायनिवाड्याचा आधार घेतला आहे.
1) Divisional Railway Manger, Central Railway Bhusawal & Ors. –Vs.- Ashok Kumar Gangaram Ranglani, II CPJ (2010) 612 (Maharashtra Sate Commission)
2) Union of India & Ors. -Vs.- J.S. Kunwar, I (2010) CPJ 90 (NC)
3) G.M., South Central Railway –Vs.- R.V. Kumar & Anr., IV (2005) CPJ 57 (NC)
4) Union of India -Vs.- Dr. Shobha Agarwal, III (2013) CPJ 469 (NC)
5) Divisional Railway Manager & Anr. –Vs.- Abhishankar Adhikari, IV (2005) CPJ 79 (NC)
वरील सर्व प्रकरणांमध्ये ट्रेनमधून प्रवास करीत असलेल्या प्रवशांची मौल्यवान चीज वस्तु चोरी झाल्यासंबंधीचा सबळ पुरावा दाखल करण्यात आला होता, त्यामुळे त्या घटनेसाठी रेल्वे प्रशासन जबाबदार आहे असे ठरविण्यात आले. रेल्वेच्या राखीव कोचमध्ये अनारक्षित लोकांनी चढू नये याची दक्षता घेण्याची जबाबदारी ही T.T.E. ची असते. जर अनआरक्षित प्रवाशी आरक्षित कोचमध्ये घुसत असतील आणि प्रवाशांचे आरक्षित आसनावर कब्जा करीत असेलतर तो T.T.E. च्या कामातील हलगर्जीपणा ठरतो आणि त्यावेळी जर एखाद्या प्रवाशाचे नुकसान झाले असल्यास किंवा त्याला आरक्षित स्थान मिळाले नसल्यास रेल्वे त्याची नुकसान भरपाई देणे लागते, हे वरील न्यायनिवाड्यात सांगितले.
9. हातातील प्रकरणांमध्ये ही वस्तुस्थिती आहे जी नाकारता येणार नाही की, तक्रारकर्त्याचा आरक्षित कोचमध्ये त्यावेळी अनआरक्षित लोकांची गर्दी होती आणि त्यांनी तक्रारकर्त्याच्या आरक्षित आसनावर कब्जा केला होता. यासंबंधीची लेखी तक्रार तक्रारकर्त्याने कोच कंडक्टरकडे केली दिली होती, ज्याची प्रत अभिलेखावर दाखल आहे. याशिवाय, ही बाब विरुध्दपक्षाने सुध्दा आपल्या लेखी जबाबामध्ये नाकबूल केली नाही, जरी त्यांनी असे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की, आरक्षित कोचमधून अनआरक्षित लोकांना बाहेर काढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात आले होते. परंतु, विरुध्दपक्षाच्या या म्हणण्याला कुठेही पुष्टी मिळत नाही, अन्यथा तक्रारकर्त्याने तशी तक्रार केली नसती. पूर्वी सांगितल्याप्रमाणे अनआरक्षित प्रवासी जर आरक्षित कोचमध्ये शिरुन इतर प्रवाशांचे आरक्षित आसनावर कब्जा करीत असतील तर ती रेल्वे प्रशासनाच्या सेवेतील कमतरता ठरते. तक्रारकर्ता तर्फे दाखल करण्यात आलेल्या न्यायनिवाड्याच्या आधारावर ही तक्रार मंजूर करण्या लायक आहे. विरुध्दपक्षाच्या वकीलांनी आपल्या युक्तीवादात असे सांगण्याचा प्रयत्न केला की, तक्रारकर्त्याशिवाय इतर कोणत्याही प्रवाशांनी तक्रार केली नव्हती आणि म्हणून तक्रारकर्त्याची तक्रार ग्राह्य धरता येणार नाही. परंतु, या युक्तीवादाशी आम्हीं सहमत नाही, कारण तक्रारकर्त्यासोबत त्याची पत्नी व मुलीं होत्या आणि त्यांना दुर्ग स्टेशन येईपर्यंत बसायला देखील मिळाले नव्हते, कोच कंडक्टर कडे दिलेल्या तक्रारीत हे नमुद आहे. त्यामुळे सहाजिकच त्यांना शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागला. केवळ, इतर प्रवाशांनी तक्रार केली नाही म्हणून तक्रारकर्त्याची तक्रार खोटी आहे असे ठरविणे चुकीचे ठरेल. सबब, सर्व वस्तुस्थितीचा विचार करता आम्हीं तक्रार अंशतः मंजूर करीत आहोत. करीता, खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येते.
// अंतिम आदेश //
(1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्दपक्षाला आदेशीत करण्यात येते की, त्यांनी संयुक्तीकरित्या आणि वैयक्तीकरित्या तक्रारकर्त्याला त्याच्या बॅगमधील मौल्यवान चीज वस्तुची चोरी झाल्या संबंधी रुपये 20,000/- (रुपये वीस हजार फक्त) द्यावे.
(3) विरुध्दपक्षाला असे निर्देशीत करण्यात येते की, त्यांनी संयुक्तीकरित्या आणि वैयक्तीकरित्या तक्रारकर्त्याला झालेल्या मानसिक, शारीरीक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रुपये 5,000/- (रुपये पाच हजार फक्त) व तक्रारीचा खर्च रुपये 3,000/- (रुपये तीन हजार फक्त) द्यावे.
(4) विरुध्दपक्षांनी आदेशाची पुर्तता निकालपत्राची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसांचे आत करावे.
(5) उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क पाठविण्यात यावी.
नागपूर.
दिनांक :- 20/06/2017