उपस्थिती तक्रारकर्त्या तर्फे अधिवक्ता दुर्गा डोये व ऍड.दिक्षित
विरुध्द पक्षा तर्फे अधिवक्ता एस.व्ही. खान्तेड
( आदेश पारित द्वारा मा. अध्यक्षा, श्रीमती आर.डी.कुंडले)
-- निकालपत्र --
( पारित दि. 18 नोव्हेबंर 2011)
तक्रार क्रमांक 33/2011
1 तक्रारकर्ता तर्फे ऍड. दुर्गा डोये व ऍड. दिक्षित यांनी युक्तिवाद केला. विरुध्द पक्ष 1 व 2 तर्फे ऍड. एस.व्ही. खान्तेड यांनी युक्तिवाद केला.
2 तक्रार थोडक्यात–
तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष 1 एस.बी.आय. लाईफ इन्श्युरन्स कंपनी यांच्याकडे युनिट व बॉन्ड याच्याशी सलंग्न अशा पॉलिसी मध्ये गुंतविलेली रक्कम परत मिळण्यासाठी तक्रार दाखल केली आहे. पॉलिसीचा तपशील खालीलप्रमाणे
पॉलिसी क्रं. अवधी हप्ता एक मुश्त
25003262101 दि.12.12.2006 ते 11.12.2011 रु. 50,000/-
3 ही पॉलिसी विरुध्द पक्ष 2 , जे विरुध्द पक्ष 1 चे अधिकृत एजंट आहेत त्यांच्या माध्यमातून घेतली (CIF Code No. 390565). विरुध्द पक्ष 2 एजंट यांनी तक्रारकर्त्याशी संपर्क साधून सांगितले की, पॉलिसी अस्तित्वात असतांना (परिपक्वते पूर्वी) जर पॉलिसी धारकाचा मृत्यु झाला तर त्याच्या कुटुंबाला रु.3,12,000/-(Death Benefit) मिळतील किंवा खुद्द धारकाला परिपक्वतेनंतर रु.1,20,000/- मिळतील. उपरोक्त पॉलिसी मध्ये मृत्यु लाभासह अनेक फायदे असल्याने रक्कम रुपये 50,000/- गुंतविण्याचा सल्ला दिला व त्याप्रमाणे तक्रारकर्त्याने रक्कम गुंतविली.
4 पॉलिसी दि. 11.12.2011 रोजी परिपक्व होणार असल्याने तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष 2 एजंट यांना प्रत्यक्ष भेटून परिपक्व रक्कम प्राप्त करण्यासाठी काय कारावे लागते, पॉलिसी डाक्युमेंट केव्हा व कोणाकडे द्यावयाचे (Surrender) इत्यादी कायदेशीर प्रक्रियेबद्दल विचारणा केली. विरुध्द पक्ष 2 याबद्दल माहिती देऊ शकले नाही म्हणून दि. 09.05.2011 रोजी विरुध्द पक्ष 1 यांना पत्र पाठवून विचारणा केली. पत्र प्राप्त होताच विरुध्द पक्ष 1 यांनी दि. 12.05.2011 रोजी तक्रारकर्त्याला रुपये 20,161.46 पैसे मिळतील असे नमूद करुन सरेन्डर कोटेशन, सरेन्डर डिसचार्ज , सरेन्डर अप्लीकेशन फॉर्म पाठविले.
5 तक्रारकर्त्याची पॉलिसी युनिट व बॉन्ड याच्याशी संलग्न आहे. खरेदी केल्या पेक्षा युनिट व बॉन्डची संख्या खूप कमी झाल्याचे निष्पन्न दि. 12.05.2011 च्या पत्रावरुन झाल्याने तक्रारकर्त्याला धक्का बसला व फसविल्या गेल्याचे जाणविले.
6 विरुध्द पक्ष 1 व 2 चे म्हणणे आहे की, दि. 12.05.2011 रोजीचे बाजारातील युनिट व बॉन्ड मधील चढ-उताराच्या हिशोबाने पॉलिसी रक्कम रु.20,161.46/- एवढीच येते. म्हणून तक्रारकर्त्याने 5 वर्षापूर्वी जरी रु.50,000/- गुंतविले असले तरी या घटकेला फक्त रुपये 20,161.46/- एवढीच रक्कम दि. 12.05.2011 रोजी देय ठरते.
7 दोन्ही पक्षांच्या वकिलांचा संपूर्ण तक्रारीवर युक्तिवाद ऐकला
मंचाचे निरीक्षण व निष्कर्ष
8 दोन्ही पक्षांच्या तक्रारी, उत्तर, युक्तिवाद, दस्ताऐवज इत्यादी संपूर्ण तपासले. त्यातील वस्तुस्थितीबद्दलच्या अन्य तपशिलासंबंधी आता या घटकेला मंचाला विचार करण्याची गरज वाटत नाही. कारण तक्रारकर्त्याच्या पॉलिसीची मुदत दि. 11.12.2011 रोजी संपते. तक्रारकर्त्याचे दि. 09.05.2011 च्या पत्रावरुन हे स्पष्ट होते की, तक्रारकर्त्याला मुदती पूर्वी पॉलिसी सरेन्डर करायची नसून मुदत पूर्ण झाल्यानंतर सरेन्डर करायची आहे. मुदत पूर्ण झाल्या नंतर काय करावे लागेल याबद्दल तक्रारकर्त्याने फक्त कारवाई काय व कशी करावी लागते याबद्दल विचारणा केली आहे असे निष्पन्न या पत्रावरुन होते.
9 विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याचे दि. 09.05.2011 च्या पत्राला दि. 12.05.2011 रोजी उत्तर देतांना हे गृहीत धरले की, तक्रारकर्त्याला मुदतीपुर्वी पॉलिसी सरेन्डर करावयाची आहे. म्हणून मुदतीपुर्वीची युनिट व बॉन्डची संख्या व बाजार भाव गृहीत धरुन तक्रारकर्त्याला त्याप्रमाणे रक्कम रुपये 20,161.46/- कळविण्यात आले.
10 मंचाचा निष्कर्ष आहे की, तक्रारकर्त्याला पॉलिसी परिपक्व झाल्यानंतरच सरेन्डर करावयाची आहे मुदती पूर्वी नाही. त्यामुळे तक्रारीस कारण ( Cause of Action ) अद्याप घडलेले नसल्याने ही तक्रार आजच्या घटकेला अपरिपक्व ठरते. म्हणून तक्रारीच्या अन्य तपशिलात न जाता सदर तक्रार, कुणाच्याही बाजुने अथवा विरोधात मत प्रदर्शन न करता निकाली काढण्यात येते. परिपक्वतेच्या दिनांका नंतर तक्रारकर्ता पुन्हा तक्रार दाखल करु शकतील.
सबब आदेश
अंतिम आदेश
1 तक्रार निकाली काढण्यात येते.
2 खर्चाबद्दल कोणताही आदेश नाही.