निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 21/02/2011
तक्रार नोदणी दिनांकः- 09/03/2011
तक्रार निकाल दिनांकः- 20/06/2013
कालावधी 02 वर्ष. 03 महिने. 11 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्य
श्री.आर.एच.बिलोलीकर.B.Tech, MBA, DCM, LLB.
------------------------------------------------------------------------------------------------------------
सरस्वती भ्र.भास्कर लंगोटे. अर्जदार
वय 45 वर्षे. धंदा.घरकाम व व्यापार. अड.डी.यु.दराडे.
रा.गुलशन बाग दादाराव प्लॉट.परभणी.
ता.जि.परभणी
विरुध्द
दि सांगली अर्बन को.ऑप.बँक लि. गैरअर्जदार.
तर्फे शाखा व्यवस्थापक. अड.एस.एन.वेलणकर.
शाखा परभणी ता.जि.परभणी.
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) श्री.आर.एच.बिलोलीकर सदस्य.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.आर.एच.बिलोलीकर. सदस्य)
अर्जदाराची तक्रार अशी आहे की, गैरअर्जदाराने अर्जदारास मंजूर केलेले 3,00,000/- रुपये कर्ज वितरीत करण्याचा आदेश व्हावा.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदार ही परभणी येथील रहिवासी असून ती स्वंयरोजगारासाठी बिअर शॉपी चालवते. सदरची बिअर शॉपी गुलशन बाग परभणी येथे आहे व ती सदरची शॉपी अर्जदार स्वतः चालवते दुकानात नोकर वगैरे कोणीही नाही अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, सदरची बिअर शॉपीच्या भांडवल वाढीसाठी बँकेकडून अर्थसहाय्य घेण्याचे ठरविले होते, अर्जदाराचे चालू खाते हे गैरअर्जदार यांच्या बँकेत असून त्याचा क्रमांक 1723 आहे व तसेच अर्जदाराचे पतीचे देखील बचत खाते गैरअर्जदार यांच्या बँकेत आहे. ज्याचा क्रमांक 32017 आहे व अर्जदार ही गैरअर्जदाराची ब-यात दिवसापासून ग्राहक आहे. अर्जदाराचे असे म्हणणे आहे की,अर्जदाराच्या पतीने या पूर्वी गैरअर्जदार बँकेकडून वाहन कर्ज घेतले होते त्याची संपूर्ण परतफेड केली आहे. म्हणून अर्जदाराचा गैरअर्जदारावर संपूर्ण भरोसा आहे व त्यामुळे अर्जदाराने गैरअर्जदार बँकेकडे भांडवल वाढीसाठी अर्ज केला होता, अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, गैरअर्जदार बँकेने अर्जदाराचे श्री निवास बिअर शॉपीचे सर्व कागदपत्रे बॅलेन्सशीट, इन्कमटॅक्स रिटर्न्स इत्यादी सर्व गोष्टीची शहानिशा केल्यानंतर अर्जदारास 3,00,000/- रुपयांचे कर्ज मंजूर केले व अर्जदारास जामिनदार व त्याचे पगारपत्रक आणण्यास सांगीतले, दरम्यान गैरअर्जदार यांनी सदर कर्जाची मंजुरी व वितरणासाठी प्रोसेस फी म्हणून 4321/- रुपये अर्जदाराच्या खात्यातुन गैरअर्जदाराने वसुल केले तसेच अर्जदारास त्याने आणलेल्या जामिनदाराचे बँकेत खाते उघडण्यास सांगीतले. त्यानुसार अर्जदाराने जामिनदार क्रमांक 1 नामे डॉ. राजेश्वर देविदास कदम व जामिनदार क्रमांक 2 डॉ. शिवाजीराव त्र्यंबकराव बुचाले यांचे बचत खाते उघडले त्यानंतर अर्जदाराने गैरअर्जदार बँकेत जावुन बाकीची प्रक्रिया पूर्ण करुन कर्ज रक्कम वितरीत करावी अशी विनंती केली, परंतु गैरअर्जदार बँकेने टाळाटाळ चालू केली, त्यानंतर अर्जदाराने ऑक्टोबर 2010 मध्ये सर्व कागदपत्रांची पुर्तता केली होती, परंतु गैरअर्जदार बँकेने कर्ज वितरण करण्यास विलंब करीत होते म्हणून दिनांक 30/12/2010 रोजी गैरअर्जदार बँकेत प्रत्यक्ष जावून विचारणा केली असता संबंधीत बॅंकेतील अधिका-याने कळविले की, आपले बिअर शॉपी व्यवसायास कर्ज देता येत नाही. त्यावेळी अर्जदाराने असे सांगीतले की, सदर व्यवसाय हा शासनाच्या परवानगीने चालू आहे व आपण संपूर्ण कागदपत्रांची पुर्तता करुन घेतली आहे तसेच प्रक्रिया शुल्क भरुन घेतले तेव्हा आता कर्ज देता येणार नाही असे म्हणणे चुक ठरेल. तक्रारदाराने त्याच दिवशी लेखी अर्ज देवुन सामनेवाला यांना कर्ज कोणत्या कारणामुळे देता येत नाही तसा नियम दाखवा अशी विचारणा केली, परंतु गैरअर्जदाराने अर्जदारास कोणतेही उत्तर दिले नाही. अर्जदाराने मोठया आशेने गैरअर्जदार बँकेकडे अर्थसहाय्यासाठी प्रस्ताव सादर केला गैरअर्जदार यांनी सर्व सोपास्कार करुन प्रक्रिया शुल्क भरुन घेतले व त्यानंतर कर्ज वितरण करण्यास नकार दिल्यामुळे अर्जदारास मानसिकत्रास झाला आहे. अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, गैरअर्जदार बँकेने मंजूर केलेले 3,00,000/- रुपये कर्ज रक्कम देण्याचे टाळून सेवेत त्रुटी दिली आहे. म्हणून मंचास विनंती केली आहे की, सदरचा अर्ज मंजूर करुन गैरअर्जदारास असा आदेश द्यावा की, त्यांनी अर्जदारास 3,00,000/- रुपये कर्जाचे वितरण करावे व तसेच मानसिकत्रासापोटी 20,000/- रुपये व तक्रारीचा खर्च म्हणून 5,000/- रुपये नुकसान भरपाई म्हणून द्यावी,अशी विनंती केली आहे.
अर्जदाराने तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ आपले शपथपत्र नि.क्रमांक 2 वर दाखल केलेले आहे.तसेच नि.क्रमांक 3 वर एकुण 5 कागदपत्राच्या यादीसह 5 कागदपत्रे दाखल केलेली आहेत. ज्यामध्ये नि.क्रमांक 3/1 वर दिनांक 04/10/2010 रोजी गैरअर्जदार बँकेने अर्जदारास लिहिलेले पत्र, 3/2 वर अर्जदाराने दिनांक 30/12/2010 रोजी गैरअर्जदार बँकेस लोन मिळणे बाबतचा अर्ज, 3/3 वर राजेश्वर कदम यांचे वेतन प्रमाणपत्र, 3/4 वर शिवाजीराव बुचाले यांचे वेतन प्रमाणपत्र, 3/5 वर अर्जदाराचे गैरअर्जदार बँकेत असलेले खाते संबंधीचे विवरणपत्र कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
तक्रार अर्जावर आपले लेखी जबाब दाखल करण्यासाठी गैरअर्जदाराना मंचातर्फे नोटीसा पाठविण्यात आल्या त्यानुसार गैरअर्जदार वकिला मार्फत मंचासमोर हजर, गैरअर्जदाराने नि.क्रमांक 11 वर आपला लेखी जबाब दाखल केलेला आहे व त्यात त्याचे असे म्हणणे आहे की, गैरअर्जदार ही एक सहकारी संस्था आहे, व अर्जदाराने दाखल केलेली तक्रार अर्जासंबंधी असून बँकेने अर्जदारास कर्ज वितरीत करावे अशी मागणी केलेली आहे. बँकेने कोणास कर्ज द्यायचे किंवा नाही हे ठरविण्याचा संपूर्ण अधिकार बँकेस आहे व त्याकरीता कर्ज नाकारण्याचे कारण देणे देखील बंधनकारक नाही व तसेच अर्जदारास ग्राहक या नात्याने विद्यमान मंचासमोर सदरची तक्रार दाखल करता येणार नाही व विद्यमान मंचास तक्रार ठरवुन कर्ज वितरीत करण्याचे आदेश देण्याचा अधिकार पोंहचत नाही, म्हणून सदरची तक्रार फेटाळाणे योग्य आहे व तसेच त्याचे म्हणणे असे की, अर्जदाराने बँकेची सभासद म्हणून ही तक्रार केलेली आहे व हा वाद बँकेच्या व्यवसायाशी संबंधीत असल्याने महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह सोसायटी अक्ट 1956 च्या कलम 91 अन्वये अशा प्रकारचा वाद सोडवण्याचा केवळ सहकार न्यायालयाचा आहे, व विद्यमान मंचास कायद्याची तरतूद नसून असा वाद निकाली काढण्याचा कोणताही अधिकार प्राप्त होत नाही म्हणून सदरची तक्रार फेटाळण्यात यावी व तसेच गैरअर्जदाराने हे मान्य केले आहे की, अर्जदाराची श्री निवास बिअर शॉपी या नावाने ते दुकान आहे, परंतु स्वंयरोजगरासाठी अर्जदार हा स्वतः दुकान चालवतो व त्याच्या दुकानात नोकर नाही ही बाब अमान्य केली आहे. वस्तुतः अर्जदाराचा व्यवसाय व्यापारी तत्वावर असल्याने ग्राहक या नात्याने दाद मागण्याचा कोणताही अधिकार नाही व गैरअर्जदाराने हे देखील मान्य केले आहे की, अर्जदाराच्या पतीने व गैरअर्जदार बँकेकडून वाहन कर्ज घेतले होते व त्याची परतफेड केली आहे व तसेच गैरअर्जदाराचे हे म्हणणे आहे की, अर्जदाराने गैरअर्जदार बँकेकडे सदर बिअर शॉपीचा व्यवसाय जो 14/06/2010 रोजी नोंदवला होता व त्याचे लायसेंस 22/04/2010 रोजी घेतलेले होते त्याकरीता 3,00,000/- रुपये कर्ज मिळावे म्हणून लगेच 21/07/2010 रोजी गैरअर्जदार बँकेकडे अर्ज केला होता तसेच गैरअर्जदाराचे हे म्हणणे आहे की, गैरअर्जदार बँकेने अर्जदारास कोणत्याही प्रकारे 3,00,000/- कर्ज मंजूर केलेले नव्हते व त्या प्रमाणे तक्रारदारास जामिनदाराचे पगार पत्रक आणण्यास सांगीतले नव्हते व तसेच गैरअर्जदार सदर बॅकेचे परभणी शाखेचे व्यवस्थापक असून सदर प्रकरण सर्व कागदपत्रासह बँकेच्या सांगली येथील मुख्य शाखा कार्यलयास पाठविल्यावर ते कर्ज मंजूर अथवा नामंजूर करण्याचा सर्व अधिकार हा बँकेच्या व्यवस्थापक मंडळ / कार्यकारी समिती, कर्ज विभाग प्रमुख व कर्ज समितीस यांना असतो म्हणून गैरअर्जदाराने अर्जदाराना 3,00,000/- रुपये कर्ज मंजूर केले होते हे पूर्णपणे खोटे आहे वस्तुतः अर्जदाराने 3,00,000/- रुपये कर्ज घ्यायचे आहे असा मागणी प्रमाणे गैरअर्जदाराने नियम व पध्दती प्रमाणे सर्व आवश्यक ती कागदपत्रे जोडण्यास सांगीतले तसेच गैरअर्जदाराचे म्हणणे आहे की, अर्जदारास अर्ज छाननी फी फक्त 432/- रुपये भरावयास सांगीतले होते व त्या प्रमाणे अर्जदाराने भरली होती, परंतु कर्ज वितरणा संबंधी प्रोसेस फी व मंजुरीसाठी फी वसूली केली हे म्हणणे खोटे आहे व तसेच दोन्ही जामिनदाराना नाम मात्र सभासद फी म्हणून प्रत्येकी 25/- रुपये प्रमाणे दोघांचे 50/- रुपये जमा करुन घेतले. अर्जदाराने कागदपत्रांची पुर्तता केल्यावर गैरअर्जदाराने कर्ज प्रकरण पुढील निर्णयासाठी मुख्य कार्यालय सांगली येथे पाठविले होते. व 29/10/2010 च्या कर्ज समिती बैठकीत ते ठेवले होते, परंतु कर्ज समिती ठराव क्रमांक 3/3 (5) अन्वये तो नामंजूर करण्यात आला मुख्य कार्यालयाने परभणी शाखेस तसे कळविल्यावर गैरअर्जदाराने अर्जदारास लगेच यांची कल्पना प्रत्यक्ष दिली होती गैरअर्जदाराने बिअर शॉपीस कर्ज देता येत नाही असे सांगीतले नव्हते तर आपले कर्ज मुख्य कार्यालयाने नामंजूर केलेले आहे एवढेच सांगीतलते होते, व त्या प्रमाणे गैरअर्जदाराचे असे म्हणणे आहे की, बँक कर्ज नामंजूर केल्याचे देखील अर्जदारास लगेच सांगीतले होते व कोणताही टाळाटाळ केलेली नाही, त्यामुळे कोणतीही त्रुटीची सेवा व मानसिकत्रास दिलेला नाही तसेच गैरअर्जदाराचे हे म्हणणे आहे की, अर्जदाराने स्वंयरोजगारासाठी बिअर शॉपीचा व्यवसाय करते असे म्हंटले आहे, परंतु अर्जदाराने कर्ज प्रकरणा संबंधी जोडलेली कागदपत्रे पाहिले असता “ लंगोटे लेडीज वेयर अँड पिकोफॉल – प्रो.प्रा. सरस्वती भास्कर लंगोटे ” या दुकानाची दिनांक 01/04/2009 ते 31/03/2010 चे टॅक्स कन्सलटंट श्री.घोडके यांचे इन्कम व एक्सपेडीचर अकाउंट सादर केलेले आहे म्हणजेच अर्जदाराचा स्वंयरोजगाराचा हा व्यवसाय आधीच होता नंतर पुन्हा बिअर शॉपी सुरु केली सदर उता-यात बॅलेन्सशिट मध्ये बिअर शॉपीची फर्निचर करता व लायसेंस एक्सपेन्सेस बाबत 1,25,600/- रुपये खर्च दाखवला आहे या दुकानाच्या व्यवसायाचा उल्लेख अर्जदाराने कोठेच केलेला नाही व तसेच त्याच उता-यात कॅपिटल इन्कममध्ये नेट अग्रीकलचर इन्कममध्ये नेट इनकम 45630/- दाखविलेले आहे व 7/12 पण जोडली आहे तसेच रेंट रिसिव्हड मध्ये 46,000/- रुपये दाखवले आहे. म्हणजेच अर्जदाराचा शेतीचा व्यवसाय आहे.लेडीज वेअरचा व्यवसाय इ.होते व बिअर शॉपीचा व्यवसाय सुरु केला हे कमर्शियल पर्पज दिसून येते व त्याच प्रमाणे गैरअर्जदाराचे असे म्हणणे आहे की, अर्जदार दुकान स्वतः चालवतो व तेथे नोकर नाही असे म्हंटले आहे पण अर्जदाराने दिनांक 01/04/2010 ते 15/07/2010 या साडेतीन महीन्याच्या श्री.निवास बिअर शॉपीच्या ट्रेडींग अकाऊंट मध्ये सॅलेरीपेड 3,000/- रुपये दाखवले आहे तसेच नेट इन्कम 35476/- दाखवले आहे असेटमध्ये फर्निचर व लायसेंस बाबत 45680/-रुपये व 1,26,600/- अशा रक्कम दाखवलेल्या आहेत या सर्व गोष्टीवरुन स्पष्ट दिसून येते की, अर्जदाराचा लंगोटे लेडीज वेयर व शेतीचा व्यवसाय आहे.दोन्ही व्यवसायात चांगले उत्पन्न आहे व अर्जदाराचे बिअर शॉपीचा व्यवसाय हा कमर्शियल अक्टीवीटी दाखवतो म्हणून गैरअर्जदाराने मंचास विनंती केली आहे की, गैरअर्जदाराने अर्जदारास कोणत्याही प्रकारची त्रुटीची सेवा दिलेली नाही म्हणून सदरचा तक्रार अर्ज फेटाळण्यात यावा व 10,000/- कॉम्पेन्सेटरीकॉस्ट गैरअर्जदारास देण्याचा आदेश व्हावा अशी विनंती केली आहे.
गैरअर्जदाराने नि.क्रमांक 12 वर आपले शपत्रपत्र दाखल केलेले आहे व तसेच नि.क्रमांक 14 वर एकुण 6 कागदपत्रांच्या यादीसह गैरअर्जदाराने 6 कागदपत्रे दाखल केलेली आहेत ज्यामध्ये 14/1 वर अर्जदाराचा दिनांक 21/07/2010 रोजीचा गैरअर्जदारास केलेला कर्ज मागणीचा अर्ज, 14/2 वर आयकर खात्याची अर्जदाराचे रिटर्न्स, 14/3 वर लंगोटे लेडीज वेअर अँड पिको फॉल दुकानाचे इन्कमटॅक्सला दाखल केलेले अकाऊंट, 14/4 वर श्री.निवास बिअर शॉपीची आयकर खाखात्यास दिलेले ट्रेडींग अकाऊंट, 14/5 वर श्री.निवास बिअर शॉपीची आयकर खात्यास दिलेले ट्रेडींग अकाऊंट, 14/6 वर मौजे नांदखेडा येथील गट क्रमांक 33 चा 7/12 उतारा. इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
दोन्ही बाजुंच्या कैफियतीवरुन निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे उत्तर
1 अर्जदारने, गैरअर्जदाराने त्यास 3,00,000/- रुपयेचे कर्ज
मंजूर केले होते ही बाब सिध्द केली आहे काय ? नाही.
2 गैरअर्जदार बँकेने अर्जदारास 3,00,000/- रुपयेचे कर्ज
देण्याचे नाकारुन सेवेत त्रुटी दिली आहे काय ? नाही.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे
मुद्दा क्रमांक 1 व 2
अर्जदार ही गैरअर्जदार बँकेची ग्राहक आहे ही बाब त्याने दाखल केलेल्या नि.क्रमांक 3/5 वरील गैरअर्जदार बँकेच्या विवरणपत्रावरुन सिध्द केलेली आहे व ही बाब गैरअर्जदार बँकेने देखील मान्य केलेली आहे व तसेच अर्जदाराने गैरअर्जदार बँकेकडे कर्जाची मागणी केली होती ही बाब नि.क्रमांक 3/2 वरील कागदपत्रावरुन सिध्द होते व तसेच अर्जदाराने गैरअर्जदार बँकेकडे श्री.राजेश्वर देविदास कदम यांचे पगारपत्रक दाखल केले होते ही बाब नि.क्रमाक 3/3 वरील कागदपत्रावरुन सिध्द होते व तसेच डॉ. शिवाजीराव बुचाले यांचे पगारपत्रक दाखल केलेले होते ही बाब नि.क्रमांक 3/4 वरील कागदपत्रावरुन सिध्द होते, परंतु गैरअर्जदार बँकेने अर्जदारास 3,00,000/- रुपयांचे कर्ज श्री. निवास बिअर शॉपीच्या व्यवसायासाठी मंजूर केले होते ही बाब अर्जदाराने सिध्द केली नाही व याबाबतचा कागदोपत्री पुरावा मंचासमोर आलेला नाही व तसेच गैरअर्जदार बँकेने दिनांक 04/10/10 रोजीचा अर्जदार यास पाठविलेल्या पत्रावरुन हे सिध्द होते की, अर्जदाराने दिलेल्या कर्ज मागणीचा अर्ज खालील कारणास्तव परत आलेला आहे त्यामध्ये 1) आपला व्यवसाय बिअर शॉपीचा असल्याने अन्न व औषध प्रशासनाचे परवाना व एक्साईज खात्याचा परवाना आवश्यक आहे 2) जामिनदाराचे पगारपत्रक बँक नमुन्यात आवश्यक आहे. 3) सदर कर्जासाठी स्थावर मिळकत जादा तारण आवश्यक आहे.यावरील गोष्टींची पुर्तता करुन दिल्यानंतर आपल्या कर्ज मागणीचा विचार केला जाईल. असे कळविले होते, परंतु अर्जदाराने बँकेच्या दिनांक 04/10/2010 च्या पत्रामधील 1 क्रमांकाच्या अटी मधील पुर्तता अर्जदाराने केलेली नसल्याचे सिध्द होते व त्याबाबत अर्जदाराने सर्व अटींची पुर्तता केल्याबाबतचा पुरावा मंचासमोर आणलेला नाही व तसेच अर्जदाराने गैरअर्जदार बँकेकडे प्रोसेस फी म्हणून 4321/- रुपये अर्जदाराच्या खात्यातून वसुल केली ही बाब अर्जदाराने दाखल केलेल्या नि.क्रमांक 3/5 वरील कागदपत्रावरुन सिध्द होते, परंतु सदरची ही रक्कम गैरअर्जदाराने सिध्द केलेली आहे की, अर्जदाराच्या नावे सभासद फी पोटी 1,000/- रुपये फोटो फी 20/- रुपये व छाननी फी 2250/- रुपये भरले आहे ही बाब नि.क्रमाक 18/1, 18/2, 18/3, व 18/4 या कागदपत्रावरुन सिध्द होते यावरुन हे सिध्द होते की, अर्जदाराकडून प्रोसेस फी 4321/- रुपये वसुल केले नव्हते. अर्जदाराने ही बाब सिध्द केले नाही की, गैरअर्जदार बँकेने अर्जदाराचा कर्ज प्रस्ताव लेखी स्वरुपात मंजूर करुन त्याच्याकडून प्रोसेस फी वसुल करुन रक्कम वितरीत करण्याचे नाकारले. बँकेचे कर्ज कोणाला द्यायचे व कोणाला नाही हा अधिकार संपूर्ण बँकेचाच आहे म्हणून यावरुन हे सिध्द होते की, गैरअर्जदार बँकेने अर्जदाराचे 3,00,000/- रुपये कर्ज देण्याचे नाकारुन सेवेत कोणत्याही प्रकारची त्रुटी दिलेली नाही, असे मंचास वाटते, म्हणून मुद्दा क्रमांक 1 व 2 चे नकारार्थी उत्तर देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
2 तक्रारीचा खर्च ज्याचा त्यांनी सोसावा.
3 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
श्री.आर.एच.बिलोलीकर. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्य मा.अध्यक्ष