निकालपत्र :- (दि.28.07.2010) (द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र.1 व 2 यांनी म्हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, दोन्ही बाजूंच्या वकिलांनी लेखी युक्तिवाद दाखल केले. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, तक्रारदार हे सामनेवाला क्र.1 हौसिंग सोसायटीचे सभासद आहेत. सदर संस्थेचा सि.स.नं.56-ब या मिळकतीवर पाडण्यात आलेल्या प्लॉटसमधील प्लॉट नं.122 हा हौसिंग सोसायटीने तक्रारदारांना अलॉट केलेला होता. त्याप्रमाणे दि.24.10.1976 रोजी ठरलेली किंमत रुपये 4,658.80 पैसे त्यापैकी रक्कम रुपये 3,250/-, शेअर्स रक्कम रुपये 250/- व प्रवेश फी रुपये 1/- सामनेवाला क्र.1 यांचेकडे भरणा करुन प्लॉट नं.122 बद्दलचे पैसे भरलेबाबतची पोचपावती घेतली. सदर प्लॉट अलॉट झालेनंतर सदर अर्बन लँड सिलींग कायद्यातून मुक्त झालेनंतर सदर प्लॉटची कब्जेपट्टी तक्रारदारांचे नांवे करणेचे आश्वासन सामनेवाला यांनी दिले. सन 1981 साली सामनेवाला गृहनिर्माण संस्थेने प्लॉटची उर्वरित रक्कम भरणेस सांगितली असता दि.27.06.1981 रोजी रक्कम रुपये 1,407.80 पैसे एवढी रक्कम भरणा करुन त्याची पावती घेतली. त्यामुळे तक्रारदार हे सदर प्लॉटचे मालक झाले आहेत. सन फेब्रुवारी 1989 साली सदर मिळकत अर्बन सिलींग कक्षेतून मुक्त झाली. परंतु, सामनेवाला गृहनिर्माण संस्था व सामनेवाला क्र.2 यांनी संगनमताने तक्रारदारांना कोणतीही कल्पना न देता सामनेवाला क्र.2 यांनी त्यांचे नातेवाईकाचे नांवे सदर मिळकत दि.13.06.1989 रोजी सिटी सर्व्हे कार्यालयात नोंद करुन घेतली. तत्कालिन चेअरमन यांनी तक्रारदारांना दुसरा प्लॉट सन 1994 साली देवून त्यांची दिशाभूल केली. सदर प्लॉट नं.130 मधील ½ भाग तक्रारदारांच्या नांवे करताना फसवणुक केली आहे. याबाबत सामनेवाला गृहनिर्माण संस्थेकडे दि.14.07.2008 रोजी सर्व कागदपत्रांसह अर्ज केला. परंतु, सामनेवाला गृहनिर्माया संस्थेने दि.30.12.2008 रोजी संस्थेच्या दृष्टीकोनातून सदर प्लॉटचा विषय निकाली झाला आहे असे लेखी कळविले आहे. सबब, सामनेवाला यांनी नुकसानी दाखल रुपये 19,53,000/- देणेचा आदेश व्हावा. तसेच, मानसिक त्रासापोटी रुपये 5,000/-, तक्रारीचा खर्च रुपये 2,000/-, नोटीस खर्च रुपये 1,000/- देणेबाबत आदेश व्हावेत अशी विनंती केली आहे. (3) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत दि.24.10.1976 रुपो रुपये 3,270/- व दि.27.06.1981 रोजी रुपये 1,407/- भरलेबाबतची पावती, दि.14.07.2008 रोजी सामनेवाला यांना दिलेला अर्ज, सामनेवाला यांचे दि.04.10.2008 रोजीचे पत्र, दि.22.10.2008 रोजीचे लेखी निवेदन, दि.10.11.2008 रोजीचे स्मरणपत्र, सामनेवाला संस्थेचे दि.30.12.2008 रोजीचे उत्तर, दि.07.02.2008 रोजी सामनेवाला यांना पाठविलेली नोटीस, सामनेवाला संस्थेचे दि.20.02.2009 रोजीचे पत्र, दि.05.04.1976 रोजीची बोगस पावती, दि.01.03.2008 रोजीचा सि.स.नं.56-ब मधील 122 व 130 या प्लॉट मिळकतींचे उतारे यांच्या छायाप्रती व शपथपत्र दाखल केले आहे. (4) सामनेवाला यांनी त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. त्यांनी त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांनी केलेले आरोप फेटाळलेले आहेत. त्यांनी त्यांच्या म्हणण्यामध्ये सदर तक्रारीस कारण हे 33 वर्षापूर्वी घडलेले आहे व प्रस्तुतची तक्रार दाखल केलेली आहे. सबब, तक्रारदारांची तक्रार फेटाळणेत यावी अशी विनंती केली आहे. (5) सामनेवाला यांनी त्यांच्या म्हणण्यासोबत दि.09.04.1994 रोजीच्या कार्यकारिणी सभेमधील ठराव, दि.06.10.1994 रोजी नगरभुमापन अधिकारी यांना दिलेले पत्र, तक्रारदारांनी भूमि अभिलेख तथा नगरभूमापन अधिकारी यांना दिलेले पत्र इत्यादीच्या प्रती दाखल केलेल्या आहेत. (6) या मंचाने तक्रारदारांची तक्रार, सामनेवाला यांचे म्हणणे, उपलब्ध कागदपत्रे यांचे अवलोकन केले आहे. तक्रारदारांच्या तक्रारीचे अवलोकन केले असता तक्रारीस प्रथम कारण दि.24.10.1976 रोजी सामनेवाला संस्थेकडे प्लॉटची रक्कम भरताना घडलेले आहे. तसेच, दि.27.06.1981 रोजी प्लॉटची उर्वरित रक्कम भरताना कारण घडलेले आहे. तसेच, तक्रारीत उल्लेख केलेला प्लॉट दि.16.03.1989 रोजी त्रयस्थ व्यक्तीच्या नांवावर केलेला आहे. याबाबतची तक्रार दाखल केली आहे, त्यावेळी तक्रारीस कारण घडलेचे दिसून येते. उपरोक्त संपूर्ण विवेचन विचारात घेता व ग्राहक संरक्षण कायदा, 1986 कलम 24 (अ) यातील तरतुद विचारात घेता प्रस्तुत तक्रारीस मुदतीचा बाध येत आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1. तक्रारदारांची तक्रार फेटाळणेत येते. 2. खर्चाबाबत आदेश नाहीत.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |