श्री. एस.के.कापसे, मा. सदस्य यांचेनुसार
:- निकालपत्र :-
दिनांक 30 नोव्हेंबर 2011
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
1. तक्रारदार स्वत:चा जीवनचरितार्थ चालविण्यासाठी दुधाचा व्यवसाय करतात. तक्रारदारांनी त्यांच्याकडील काळया रंगाची पांढ-या रेषा असलेल्या गायीचा जाबदेणार यांच्याकडून विमा उतरविला होता. विम्याची रक्कम रुपये 30,000/- व विमा कालावधी दिनांक 22/12/2006 ते 21/12/2009 असा होता. विम्याचा हप्ता रुपये 2088/- तक्रारदार नियमित भरत असत. एक महिना आजारी पडल्यानंतर तक्रारदारांकडील गाय दिनांक 1/6/2008 रोजी मेली. दिनांक 2/6/2008 रोजी तक्रारदारांनी जाबदेणार यांना गाय मेल्याची सुचना दिली व दिनांक 27/6/2008 रोजी क्लेम फॉर्म व आवश्यक कागदपत्रे जाबदेणारांकडे पाठविली. जाबदेणार यांनी विम्याची रक्कम तक्रारदारांना दिली नाही म्हणून दिनांक 15/10/2008 रोजी तक्रारदारांनी जाबदेणार यांना नोटीस पाठविली परंतू जाबदेणार यांनी त्याची दखल घेतली नाही. म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून विम्याची रक्कम रुपये 30,000/- 18 टक्के व्याजासह तसेच नुकसान भरपाई पोटी रुपये 25,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 5000/- मागतात. तक्रारदारांनी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
2. जाबदेणार यांनी लेखी जबाब दाखल करुन तक्रारदारांच्या मागणीस विरोध दर्शविला. तक्रारदारांनी गायीचा विमा जाबदेणांकडून उतरविला होता हे जाबदेणार यांना मान्य आहे. दिनांक 1/6/2008 रोजी एक महिना गाय आजारी असल्यामुळे मेली व तसे तक्रारदारांनी जाबदेणार यांना दिनांक 27/6/2008 रोजी कळविले होते हे जाबदेणार अमान्य करतात. मालकाबरोबर मृत गायीचा फोटो व टॅग इनटॅक्ट तक्रारदारांनी क्लेम बरोबर सादर केला नव्हता. तक्रारदारांनी आवश्यक पुर्तता न केल्यामुळे तक्रारदारांची क्लेम फाईल नस्तीबध्द करण्यात आलेली होती. जाबदेणार यांच्या सेवेत त्रुटी नाही. म्हणून तक्रार नामंजुर करण्यात यावी अशी विनंती जाबदेणार करतात. जाबदेणार यांनी शपथपत्र दाखल केले.
3. उभय पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचानी पाहणी केली. तक्रारदारांनी त्यांच्या गायीचा – Female Black & White Face white HFX विमा जाबदेणार यांच्याकडून दिनांक 22/12/2006 ते 21/12/2009 या कालावधीसाठी उतरविला होता, विम्याची रक्कम रुपये 30,000/- टॅग नं 27.301 होता हे तक्रारदारांनी दाखल केलेल्या सर्टिफिकीट ऑफ इन्श्युरन्स वरुन दिसून येते. तक्रारदारांची दाखल केलेल्या पंचनाम्याचे अवलोकन केले असता, गाय दिनांक 1/6/2008 रोजी पहाटे 4 वा. मेली व तिचा पंचांसमक्ष पंचनामा दिनांक 1/6/2008 रोजी करण्यात आला होता, सदरहू पंचनाम्यावर पंचांच्या सहया असल्याचे दिसून येते. तक्रारदारांनी तक्रारीसोबत क्लेम फॉर्म, व्हेर्टेनरी सर्टिफिकीट दिनांक 1/6/2008, पोस्ट मार्टेम रिपोर्ट, डॉ.जी.एम.मडले – LM, Stock Development Officer, B.V.Sc & A.H Reg. No.2646 यांनी दिलेले “Opinion As to The Cause of Death” दाखल केलेले आहेत. तसेच सिध्दकला मेडिकल अॅन्ड जनरल स्टोअर्स लक्ष्मी कॉम्प्लेक्स, तांदुळवाडी वेस चौक बारामती यांनी तक्रारदारांना दिलेले कॅश मेमो दिनांक 14/5/2008, 3/5/2008, 10/5/2008, 30/4/2008, 21/5/2008 वरुन देखील तक्रारदारांनी गायीच्या औषोधोपचारासाठी खर्च केलेला होता हे निदर्शनास येते. त्यामुळे तक्रारदारांची गाय दिनांक 1/6/2008 रोजी मेली होती, तत्पुर्वी ती आजारी होते हे स्पष्ट होते. विमा कालावधीत गायीचा मृत्यू झाल्यानंतर जाबदेणार यांच्याकडे कागदपत्रांसह क्लेम दाखल केल्यानंतरही जाबदेणार यांनी तक्रारदारांनी आवश्यक पुर्तता न केल्यामुळे तक्रारदारांची क्लेम फाईल नस्तीबध्द करण्यात आलेली होती या कारणावरुन तक्रारदारांना विम्याची रक्कम दिली नाही. तक्रारदारांनी आवश्यक ती पुर्तता जर केली नव्हती तर तसे जाबदेणार यांनी तक्रारदारांना कळवावयास हवे होते, परंतू जाबदेणार यांनी तसे केल्याचे दिसून येत नाही. ही जाबदेणार यांच्या सेवेतील त्रुटी आहे असे मंचाचे मत आहे. म्हणून जाबदेणार यांनी तक्रारदारांना मृत गायीच्या विम्याची रक्कम रुपये 30,000/- दयावेत असा आदेश देण्यात येत आहे. तक्रारदारांचा दुधाचा व्यवसाय होता, त्यांचा जीवनचरितार्थ गायीवर चालत होता, ती गाय मृत्यू पावल्यानंतर जाबदेणार यांना कळवूनही जाबदेणार यांनी विम्याची रक्कम तक्रारदारांना न दिल्यामुळे तक्रारदारांना निश्चितच शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला असणार असे मंचाचे मत आहे. म्हणून जाबदेणार यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाई व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रुपये 3000/- दयावेत असा आदेश जाबदेणार यांना देण्यात येत आहे.
वर नमूद विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे-
:- आदेश :-
1. तक्रार अंशत: मान्य करण्यात येत आहे.
2. जाबदेणार यांनी तक्रारदारांना रक्कम रुपये 30,000/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावी.
3. जाबदेणार यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाई पोटी व तक्रारीच्या खर्चापोटी रक्क्म रुपये 3000/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावी.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.