तक्रारकर्त्यातर्फे वकील ः- श्री. एस.बी.राजनकर
विरूध्द पक्ष क्र 1 तर्फे वकील ः- श्री. प्रकाश मुंदडा,
विरूध्द पक्ष क्र 2 व 3 तर्फे वकील ः- श्री. आय.आय होतचंदानी,
(युक्तीवादाच्या वेळेस)
निकालपत्रः-, कुमारी. सरीता ब. रायपुरे सदस्या, -ठिकाणः गोंदिया.
निकालपत्र
(दिनांक 29/03/2019 रोजी घोषीत )
1. तक्रारकर्ता यांनी ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये विरूध्द पक्ष क्र 2 यांनी मेडिक्लेम पॉलीसी नुतनीकरण न केल्याने, ही तक्रार या मंचात दाखल केलेली आहे.
2. तक्रारकर्त्याची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणेः-
तक्रारकर्ता हा रामनगर गोंदिया, ता. जि. गोंदिया येथील रहिवासी असून तक्रारकर्ता हा विरूध्द पक्ष क्र. 1 पंजाब नॅशनल बँकेचा खाताधारक आहे. तक्रारकर्त्याने दि. 08/03/2017 ला विरूध्द पक्ष क्र 1 च्या बँकेचा धनादेश देऊन एजंटकडून PNB Oriental Royal Mediclaim नावाची रू. 5,00,000/-,ची पॉलीसी खरेदी केली. सदर पॉलीसीची वैधता दि.17/03/2017 ते 16/03/2018 असून पॉलीसी नूतनीकरणाची तारीख 16/03/2018 आहे. तसेच या पॉलीसीनूसार तक्रारकर्ता व त्याची पत्नी या दोघाच्या जोखीमेचा भाग पूर्ण होत होता. तक्रारकर्त्याने सदर मेडिक्लेम पॉलीसी नूतनीकरण तारखेच्या अगोदर विरूध्दपक्ष क्र 1 च्या कार्यालयात जाऊन सदर पॉलीसी नूतनीकरण रू. 7,173/-,चा धनादेश क्र. 039839 दि. 22/02/2018 ला विरूध्द पक्ष क्र 1 कडे दिले. त्यासोबत पॉलीसीचे कागदपत्रे सुध्दा दिली. अशाप्रकारे तक्रारकर्त्याने सदर मेडिक्लेम पॉलीसी विरूध्द पक्ष क्र 2 व 3 कडून घेतली. विरूध्द पक्ष क्र 2 व 3 ने दि. 28/03/2018 रोजी पत्राद्वारे तक्रारकर्त्याला कळविले की, तुम्ही तुमच्या मेडिक्लेम पॉलीसीचे प्रिमीयम आणि मेडिक्लेम पॉलीसी नूतनीकरणाविषयी माहिती घ्या. कारण आमच्या कार्यांलयाकडे तुमच्या मेडिक्लेम पॉलीसी नूतनीकरणविषयी काही कागदपत्रे तसेच माहिती प्राप्त झालेली नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने तात्काळ विरूध्द पक्ष क्र.1 च्या कार्यालयाला भेटून सदर पॉलीसी नूतनीकरणाविषयी विचारणा केली. तेव्हा विरूध्द पक्ष क्र 1 ने तक्रारकर्त्याला म्हटले की, आम्ही तुमच्या पॉलीसीविषयी सर्व कागदपत्र आणि पॉलीसी प्रिमीयमचे धनादेश दि. 07/03/2018 ला विरूध्द पक्ष क्र 3 कडे पाठविले. फक्त पॉलीसीची रक्कम दिल्याची पावती आणि नूतणीकरण केलेली पॉलीसी यायची आहे. त्यानंतर तक्रारकर्त्याने दि. 25/04/2018 ला विरूध्द पक्ष क्र 3 ला रजिष्ट्रर पोस्टाद्वारे नोटीस पाठविला व त्या नोटीसची प्रत विरूध्द पक्ष क्र 1 व 2 ला रजिष्ट्रर पोस्टाद्वारे नोटीस पाठविला. दि. 02/05/2018 रोजी विरूध्द पक्ष क्र 2 ने तक्रारकर्त्याला पत्र पाठवून कळविले की, आम्ही आमच्या कार्यालयाचा अभिलेख पूर्ण बघितला. परंतू, तुमच्या पॉलीसी नूतनीकरणाचा धनादेश मिळाला नाही. तसेच तुमची पॉलीसी नूतनीकरण झालेली नाही. त्यामुळे तुम्ही 1 एप्रिल 2018 पासून पॉलीसी काढा आणि त्यासाठी लागणारी वाढलेले पॉलीसीचे प्रिमीयम रू. 19,587/-, भरा कारण तुम्हची मूळ पॉलीसी बंद झालेली आहे असे सांगीतले. यामध्ये तक्रारकर्त्याची काहीही चूक नाही तर विरूध्द पक्षाच्या सेवेतील त्रृटी आहे. तक्रारकर्त्याने दि. 17/05/2018 ला नोटीसद्वारे विरूध्द पक्ष क्र. 1,2 व 3 यांना कळविले की, तुम्हच्या सेवेतील त्रृटी आहे. त्यामुळे तुम्ही पॉलीसीचे नूतनीकरण करून दया परंतू विरूध्द पक्षाने पॉलीसीविषयी कोणतेही उत्तर दिले नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने पॉलीसी नं. 181100/48/2017/6453 हि दि. 16/03/2018 पासून नूतनीकरण करून दयावी तसेच प्रिन्टींग, पोस्ट, मजूरी यासाठी आलेला खर्च रू. 20,000/-, तसेच मानसिक, शारिरिक व आर्थिक खर्चापोटी रू. 50,000/-, विरूध्द पक्षाकडून मिळण्यासाठी मा. मंचात तक्रार दाखल केली.
3. विरूध्द पक्ष क्र 1,2 व 3 यांच्याविरूध्द मा. मंचातर्फे दि.03/08/2018 रोजी नोटीसेस बजावण्यात आल्या. नोटीस प्राप्त झाल्यानंतर, त्यांनी त्यांचा लेखीजबाब मंचात दाखल केला.
4. विरूध्द पक्ष क्र 1 ने आपला लेखीजबाब या मंचात दाखल करून असे म्हटले की, तक्रारकर्ता हा आम्हच्या बँकेचा खाताधारक आहे. तक्रारकर्त्याने दि. 08/03/2017 रोजी धनादेश क्र. 039839 द्वारे रू. 7,173/-पॉलीसीचे प्रिमीयम दिले हे विरूध्द पक्ष क्र 1 ने मान्य केले आणि तक्रारकर्त्याच्या तक्रारीचा उर्वरीत आशय मात्र अमान्य केला. तसेच विरूध्द पक्ष क्र 1 ने आपल्या लेखीजबाबात विशीष्ट कथन दिले त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, विरूध्द पक्ष क्र 1 हि Banking Company Act 1956 अनूसार नोंदणीकृत बँक आहे आणि ती फक्त ग्राहकांकडून पैशाची देवाण-घेवाण करण्याचा बँकींग व्यवसाय करते. तर ती कोणत्याही प्रकारचा इंन्शुरंन्सचा व्यवसाय करीत नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याचा धनादेश घेतलेला नाही. तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष क्र 2 व 3 कडून मेडिक्लेम पॉलीसी घेतली आणि त्यासाठी तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष क्र 1 च्या बँकेचा धनादेश खात्यात जमा केला आणि तो धनादेश विरूध्द पक्ष क्र 3 कडे पाठविला. यावरून विरूध्द पक्ष क्र 1 चे काम एवढेच आहे की, तक्रारकर्त्याचा धनादेश विरूध्द पक्ष क्र 2 व 3 इंन्शुरंन्स कंपनीकडे पाठविले. म्हणजेच विरूध्द पक्ष क्र 1 हि तक्रारकर्ता व विरूध्द पक्ष क्र 2 व 3 मधील एक एजंन्सी आहे. त्यामुळे विरूध्द पक्ष क्र 1 ने धनादेश पाठविण्याचे काम पूर्ण केले. यावरून विरूध्द पक्ष क्र 1 ने तक्रारकर्त्याला सेवा देण्यात काहीही चुक नाही त्यामुळे तक्रारकर्ता व विरूध्द पक्ष क्र 2 व 3 यांच्यामध्ये जो काही व्यवहार झाला त्यात विरूध्द पक्ष क्र 1 ची चुक नाही त्यामुळे तो जबाबदार नाही. विरूध्द पक्ष क्र 1 विरूध्द केलेली तक्रार खारीज करावी असे त्यांनी आपल्या लेखीजबाबात म्हटले.
5. विरूध्द पक्ष क्र 2 व 3 ने आपला लेखीजबाब या मंचात दाखल केला त्यात त्यांनी प्रथम आक्षेप घेतला सदर तक्रार हि मा. मंचाच्या अधिकार क्षेत्रात येत नाही. त्यामुळे सदर तक्रार खारीज करण्यात यावी. तक्रारकर्ता हा विरूध्द पक्ष क्र 1 चा बँकेचा खाताधारक आहे आणि तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष क्र 1 च्या बँकेचा धनादेश देऊन पॉलीसीचे प्रिमीयम दिले. त्यानूसार विरूध्द पक्षाने तक्रारकर्ता व त्याची पत्नी या दोघाच्या जोखीमेचा भाग पूर्ण होत होता. सदर पॉलीसीची वैधता दि. 17/03/2017 ते 16/03/2018 आहे हे विरूध्द पक्ष क्र 2 व 3 ने आपल्या लेखीजबाबात मान्य केले. तसेच त्यांनी आपल्या जबाबात म्हटले की, तक्रारकर्त्याने जेव्हा विरूध्द पक्ष क्र 2 ला पॉलीसी नूतणीकरणाविषयी विचारले तेव्हा विरूध्द पक्ष क्र 2 ने कार्यालयाचा अभिलेख तपासला परंतू कार्यालयामध्ये तक्रारकर्त्याच्या पॉलीसी नूतनीकरणाचा धनादेश सापडला नाही. त्यामुळे सदर पॉलीसी नूतनीकरण होऊ शकली नाही. त्यामुळे तुम्ही वाढलेल्या पॉलीसीचे प्रिमीयम रू. 19,587/-, 1 एप्रिल 2018 पासून भरावे. विरूध्द पक्ष क्र 2 व 3 यांनी आपल्या लेखीजबाबामध्ये विशिष्ट कथन देऊन आक्षेप घेतला की, सदर तक्रार हि मा. मंचाच्या अधिकार क्षेत्रात नाही त्यामुळे ती खारीज करण्यात यावी. विरूध्द पक्ष क्र 2 व 3 ला तक्रारकर्त्याकडून पॉलीसीचे प्रिमीयम प्राप्त झाले नाही. त्यामुळे विरूध्द पक्ष क्र. 2 पॉलीसी नूतनीकरण करू शकले नाही. तक्रारकर्त्याने नियमानूसार पॉलीसी नूतनीकरणासाठी लागणारी रक्कम दयावी आणि पॉलीसी मिळवावी. कारण यात विरूध्द पक्ष क्र 2 व 3 नी तक्रारकर्त्याला सेवा देण्यात कोणत्याही प्रकारची त्रृटी केली नाही त्यामुळे त्यांच्या विरूध्द दाखल केलेली सदरची तक्रार रकमेसह खारीज करावी.
6. तक्रारकर्त्याने त्यांच्या तक्रारीसोबत मेडिक्लेम पॉलीसी, पोस्टाची पावती विरूध्द पक्ष क्र 2 व 3 ला पाठविलेले पत्र, नूतनीकरण पत्र, तसेच तक्रारीच्या कथनाच्या पृष्ठार्थ आपला पुराव्याचे शपथपत्र व लेखीयुक्तीवाद या मंचात दाखल केला आहे. विरूध्द पक्ष क्र 1,2 व 3 यांचा लेखीजबाब तसेच विरूध्द पक्ष क्र 1 यांनी त्यांचे पुराव्याचे शपथपत्र सादर केले नाही. विरूध्द पक्ष क्र 2 व 3 यांनी पुराव्याचे शपथपत्र तसेच विरूध्द पक्ष क्र 1,2 व 3 यांनी त्ंयाचा लेखीयुक्तीवाद दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षाचे विद्वान वकीलांनी आपआपला मौखीक युक्तीवाद केले. मंचापुढे मौखीक युक्तीवाद व सादर केलेल्या दस्ताऐवजाच्या आधारे कारणासंहित आमचे निःष्कर्ष खालीलप्रमाणे आहेतः-
:- निःष्कर्ष -:
7. तक्रारकर्ता हा विरूध्द पक्ष क्र 1 चा बँकेचा नियमीत खाताधारक आहे. दि. 08/03/2017 ला PNB Oriental Royal Mediclaim नावाची रू. 5,00,000/-,ची पॉलीसी खरेदी केली. सदर नावावरून स्पष्ट आहे की, ही विमा पॉलीसी बँक, विमा कंपनी आपसी करारा अनुसार झालेली आहे आणि पुन्हा PNB A/c Holder ला कमी प्रिमीयम वरती रू. 5,00,000/-,चा विमा विरूध्द पक्ष क्र 2 ने करून दिलेला आहे. सदर पॉलीसीचा वैधता दि. 17/03/2017 ते 16/03/2018 असून पॉलीसी नूतनीकरणाची तारीख 16/03/2018 असल्यामूळे तक्रारकर्त्याने सदर मेडिक्लेम पॉलीसी नूतनीकरण तारखेच्या अगोदर विरूध्द पक्ष क्र. 1 च्या कार्यालयात जाऊन पॉलीसी नूतनीकरण रू. 7,173/-,चा धनादेश क्र 039839 दि. 22/02/2018 विरूध्द पक्ष क्र 1 कडे दिले आणि त्यासोबत पॉलीसीची छायांकित प्रत दिली. त्यानंतर विरूध्द पक्ष क्र 2 व 3 ने पत्राद्वारे तक्रारकर्त्याला कळविले की, पॉलीसी नूतनीकरणाविषयी माहिती दया कारण आमच्या कार्यालयाला पॉलीसी नूतनीकरणाविषयी काहीही कागदपत्रे तसेच माहिती प्राप्त झालेली नाही. तेव्हा तक्रारकर्त्याने तात्काळ विरूध्द पक्ष क्र 1 च्या कार्यालयाला भेट देऊन विचारपूस केली तेव्हा विरूध्द पक्ष क्र 1 ने तक्रारकर्त्याला म्हटले की, आमही तुम्हच्या पॉलीसीचे कागदपत्र आणि पॉलीसी प्रिमीयमचा धनादेश दि. 07/03/2018 ला विरूध्द पक्ष क्र 3 कडे पाठविले. परंतू विरूध्द पक्ष क्र 1 ने जर विरूध्द पक्ष क्र 2 व 3 कडे सर्व कागदपत्र आणि पॉलीसीची प्रिमीयम पाठविले तर त्याविषयी विरूध्द पक्ष क्र 1 ने त्ंयाचा कार्यालयीन रेकार्ड, आवक-जावक नोदणी रजिष्ट्रर मा. मंचात दाखल करावयास पाहिजे होते. परंतू विरूध्द पक्ष क्र 1 ने त्यांनी पॉलीसीची प्रिमीयम विरूध्द पक्ष क्र 2 व 3 कडे पाठविल्याचा कोणताही पुरावा दिला नाही. यात विरूध्द पक्ष क्र 1 ने तक्रारकर्त्याला सेवा देण्यात कसुर केल्याचे स्पष्ट निदर्शनास येते. विरूध्द पक्ष क्र 2 व 3 यांच्या कार्यालयीन रेकॉर्ड अनुसार पॉलीसी नुतनीकरणासाठी एक महिन्याअगोदर नुतनीकरणाची तारीख येत आहे याची माहिती दयायला पाहिजे होती. परंतू त्यांनी तसे केले नाही. हि विरूध्द पक्ष क्र 2 व 3 यांची सेवा पुरविण्यात कमतरता आहे. तसेच यावरून हे सिध्द होते की, विरूध्द पक्ष क्र 1,2 व 3 ने तक्रारकर्त्याला सेवा देण्यात त्रृटी केली आहे तसेच विरूध्द पक्ष क्र 1 च्या चुकीमूळे तक्रारकर्त्याला विनाकारण नुकसान झाले. विरूध्द पक्ष क्र 1 ने मौखीक युक्तीवादाच्या वेळी मंचामध्ये हजर राहून आवश्यक कागदपत्र आणि शपथपत्र दाखल करण्यासाठी वेळ मागीतला. परंतू पुढील तारखेवरती विरूध्द पक्ष क्र 1 ने कोणत्याही प्रकारचे कागदपत्रे आणि शपथपत्र न दाखल करता, पुरसीस दाखल करून त्यात म्हटले की, विरूध्द पक्ष क्र 1 ने विरूध्द पक्ष क्र 2 ला पाठविण्यासाठी धनादेश क्र. 039839 दि. 22/02/2018 झोनल ऑफिस नागपुर येथे पाठविला. यावरून हे सिध्द होते की, तक्रारकर्त्याचा धनादेश हा विरूध्द पक्ष क्र 1 च्या झोनल ऑफिसला होता. म्हणजेच विरूध्द पक्ष क्र 1 ने तक्रारकर्त्याला सेवा देण्यात त्रृटी केल्याचे दिसून येते. तसेच विरूध्द पक्ष क्र 1 ने मंचामध्ये युक्तीवादाच्या वेळेस आवक-जावक रजिष्ट्रर नोंदणीची प्रत दाखविली परंतू ती दाखल केली नाही यावरून तो धनादेश PNB झोनल ऑफिसला पाठविल्याचे दिसून येते. पण तो दस्ताऐवज या मंचात दाखल न करता, तो दस्ताऐवज व शपथपत्र दि. 01/03/2019 ला दाखल करतो असे आश्वासन देऊन, सदरची तक्रार तहकुब करण्याची विनंती मंचाला केली आणि मंचाने ती विनंती मान्य करून तेा अर्ज तक्रार निकाली काढण्यासाठी विलंब होत असल्याने रू. 500/-,दंड लावून मान्य केला होता. परंतू पुढील तारखेला दि. 01/03/2019 रोजी रू. 500/-,दंडाची रक्कम तसेच दस्ताऐवज मंचात दाखल केले नाही. तर पुरसीस देऊन मंचाला असे कळविले की, तक्रारकर्त्याने दिलेला धनादेश विरूध्द पक्ष क्र 1 ने झोनल ऑफिस नागपुर येथे पाठविला आहे. तसेच पुढे असे नमूद केले की, तो धनादेश तक्रारकर्त्याच्या खात्यातुन वटविला गेला नाही आणि दि. 29/01/2018 पर्यंत तो धनादेश वटविला गेला किंवा नाही यावरून हे सिध्द होते की, विरूध्द पक्ष क्र 1 ने, विरूध्द पक्ष क्र 2 कडे धनादेश पाठविण्याचा सबळ पुरावा मंचात दाखल केला नाही. विरूध्द पक्ष क्र 1 च्या चुकीमूळे तक्रारकर्त्याला विरूध्द पक्ष क्र 2 ने मेडिक्लेम पॉलीसी नुतनीकरण करून दिली नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याला भरपूर मानसिक त्रास सोसावे लागले. तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचात दाखल केली तेव्हा तक्रारकर्ता हा 77 वर्षाचा जेष्ठ नागरीक आहे. आणि त्याच्या जिवाला काही अनर्थ झाला असता तर, तक्रारकर्त्याला त्या मेडिक्लेम पॉलीसीचा लाभ घेता आला नसता. कारण तक्रारकर्त्याने सदर पॉलीसी हि अचानकपणे एखादया बिमारीचे अचानक संकट आल्यास, मदत व्हावी या उद्देशाने काढली. तक्रारकर्त्याने सदर पॉलीसी नूतनीकरण दि. 16/03/2018 च्या अगोदर दि. 22/02/2018 ला विरूध्द पक्ष क्र 1 ला धनादेश दिला. या तक्रारकर्त्याची काहीही चुक नाही तर विरूध्द पक्ष क्र 1 ने सेवा देण्यात त्रृटी केली हे सिध्द होते. तसेच विरूध्द पक्ष क्र 1 ने मा. मंचाच्या आदेशाचे पालन केले नाही तसेच दंडाची रक्कम रू. 500/-,मंचात भरली नाही. त्यामुळे दि. 01/03/2019 च्या आदेशानूसार दंडाची रक्कम रू. 500/-, तक्रारकर्त्याला देण्यात यावे. तसेच विरूध्द पक्षाद्वारे अशाप्रकारची गंभीर चुक भविष्यात होऊ नये म्हणून विरूध्द पक्ष क्र 2 व 3 ने पॉलीसी नं. 181100/48/2017/6453 दि. 16/03/2018 ते 16/03/2019 हा एक वर्षाचा कालावधी संपल्यामूळे जुन्या ग्राहकाला विमा पॉलीसी रक्कम घेण्यात येते त्याच रकमेवर तक्रारकर्त्याला दि. 16/03/2019 पासून नुतनीकरण करून दयावी. तसेच पोस्टल, प्रिन्टींग व मजूरी खर्च रू. 2,000/-, मानसिक, शारिरिक व आर्थिक त्रासापोटी रू.25,000/-, तक्रारीचा खर्च रू. 5,000/-,तक्रारकर्त्याला दि. 28/06/2018 पासून दयावे.
वरील निष्कर्षास अनुसरून मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-// अंतिम आदेश //-
- तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरूध्द पक्ष क्र 1 ने प्रिमीयम जमा न केल्याचे तसेच विरूध्द पक्ष क्र 2 व 3 ने 30 दिवसाच्या अगोदर नेाटीस देऊन पॉलीसी नुतनीकरण करण्यासाठी न कळविल्याने ग्रा.सं.कायदयानूसार दोषी सिध्द करण्यात येते.
- विरूध्द पक्ष क्र 2 व 3 ने नियमीत पॉलीसी ग्राहय धरून दि. 16/03/2019 ते 16/03/2020 ची नियमीत पॉलीसी काढण्याकरीता तक्रारकर्त्याकडून जुन्या ग्राहकांप्रमाणे प्रिमीयमची रक्कम स्विकारून, पॉलीसी नं. 181100/48/2017/6453 दि. 16/03/2019 पासून नुतनीकरण करून दयावी.
- विरूध्द पक्ष क्र 1, 2 व 3 ने वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या पोस्टल, प्रिन्टींग व मजूरी खर्च रू. 2,000/-, मानसिक, शारिरिक व आर्थिक त्रासापोटी रू.25,000/-,तक्रारीचा खर्च रू.5,000/-, तक्रार दाखल दि. 28/06/2018 पासून दयावे. तसेच दि. 01/03/2013 च्या आदेशानूसार दंडाची रक्कम रू. 500/-,तक्रारकर्त्याला देण्यात यावे
- सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्र 1, 2 व 3 ने निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे. वरील आदेश क्र. 3 चे 30 दिवसांत पालन न केल्यास, त्या रकमेवर द.सा.द.शे 9 टक्के व्याज देय राहिल.
- आदेशाची प्रत उभय पक्षांना विनामूल्य पुरविण्यात यावी.
- प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ प्रत तक्रारकर्त्याला परत करावी.