उपस्थिती – तक्रारदार हजर
विरुध्द पक्ष गैरहजर
आदेश
(दिः15/09/2011)
द्वारा श्री.एम.जी.रहाटगावकर - मा.अध्यक्ष
1. तक्रारदाराचे म्हणणे थोडक्यात खालील प्रमाणेः-
त्यांने दि.04/07/2010 रोजी रु.4,000/- या रकमेस विरुध्द पक्ष 3 ने उत्पादित केलेले मायक्रोमॅक्सचा भ्रमणध्वनी विरुध्द पक्ष 1 च्या दुकानातुन विकत घेतला सादर भ्रमणध्वनी संच हे अत्याधुनिक असल्याचे त्याला सांगण्यात आले याला दोन सिमकार्ड व 1 वर्षाची वॉरंटी होती. काही दिवसापर्यंत या संचाने व्यवस्थित काम केले मात्र त्यानंतर बोलणे सुरु असतांना मोबाईल खंडीत व्हायला लागला. विरुध्द पक्ष 1 कडे तक्रार केली असता त्यांनी विरुध्द पक्ष 3 चे अधिकृत सेवा केंद्राकडे संपर्क साधण्यास सांगितले.
.. 2 .. (तक्रार क्र.95/2011)
त्याचे पुढे म्हणणे असे की, दोषपुर्ण भ्रमणध्वनी विरुध्द पक्ष 2 ला दि.29/10/2010 ला दिला. त्यानंतर चौकशीसाठी त्याने अनेकवेळा चक्रा मारल्या परंतु विरुध्द पक्षाने तो दुरूस्त करुन त्याला परत केला नाही. प्रत्येक वेळेस त्याला बराच वेळापर्यंत विरुध्द पक्षाने वाट पहावयास लावली व शेवटी परत त्यानी नंतर यावे असे सांगण्यात येत असे. शेवटी कंटाळुन दि.24/10/2010 रोजी विरुध्द पक्षाला वकील नोटिस पाठवली व रकमेचा परतावा व्याजासह मागितला. त्यांनी त्याचप्रमाणे मागणी प्रार्थनेत नमुद केल्याप्रमाणे रु.4000/- परत मिळावे, नुकसान भरपाई तसेच न्यायिक खर्च मंचाने मंजुर करावा असे नमुद केले आहे.
निशाणी 2 अन्वये प्रतिज्ञापत्र, निशाणी 3.1 ते 3.4 अन्वये कागदपत्र दाखल करण्यात आले. त्यात दि.04/07/2010 ची मोबाईल विकत घेतल्याची पावती, दुरूस्तीसाठी विरुध्द पक्षाकडे दिल्याची जॉब कार्डची प्रत, वकीलामार्फत पाठवलेली नोटिस व विरुध्द पक्षाला नोटिस मिळाल्याची पोचपावती यांचा समावेश आहे.
2. मंचाने विरुध्द पक्ष 1 ते 3 यांनी निशाणी 4 अन्वये नोटिस जारी केली ज्याच्या पोचपावत्या निशाणी 5 व 6 अभिलेखात उपलब्ध असुन विरुध्द पक्ष 2 ने मंचाची नोटिस स्विकारण्यास इनकार केल्याने ‘Refused returned to the sender’ या शे-यासह नोटिस पाकीट बजावणी न होता परत आले. विरुध्द पक्ष 1 ते 3 यांतील कोणीही हजर झाले नाही अथवा त्यांनी जबाब दाखल केला नाही. मंचाने ग्राहक कायद्याचे कलम 13(2)ब(ii) अन्वये सदर प्रकरणी एकतर्फी सुनावणी घेण्याचे निश्चित केले.
3. तक्रादाराच्या पुराव्याचे, कागदपत्रांचे अवलोकन करण्यात आले, त्या आधारे खालील मुद्दाचा मंचाने विचार केला-
मुद्दा क्र. 1 – वादग्रस्त भ्रमणध्वनी संचामध्ये उत्पादनातील दोष आहे काय ?
उत्तर - होय.
मुद्दा क्र. 2 – तक्रारदार विरुध्द पक्षाकेडुन भ्रमणध्वनी संचाची रक्कम, नुकसान भरपाई तसेच न्यायिक खर्च मिळणेस पात्र आहे काय?
उत्तर - होय
स्पष्टिकरण मुद्दा क्र. 1 –
मुद्दा क्र 1 चे संदर्भात विचार केला असता असे निदर्शनास येते की, तक्रारदाराने रु.4,000/- या रकमेस दि.04/07/2010 रोजी विरुध्द पक्ष 3 उत्पादीत भ्रमणध्वनी विरुध्द पक्ष 1 या दुकानातुन विकत घेतला त्यात बिघाड आल्याने विरुध्द पक्ष 3 यांचेशी संपर्क साधण्यात आला. विरुध्द पक्ष 1 च्या निर्देशानुसार विरुध्द पक्ष 3 चे अधिकृत सेवा केंद्र विरुध्द पक्ष 2 याचेकडे त्यांनी दि.29/10/2010 यांचे कडे गेले. विकत घेतल्याची पावती व विरुध्द पक्ष 2 कडे भ्रमणध्वनी जमा केल्याची पावती, जॉब कार्ड तक्रारीसोबत जोडलेले आहे. या जॉब कार्ड वर Nature of complaint यांचे समोर Board shorted असे लिहिलेले आढळतो. वास्तविकतः हमी कालावधीत एवढया मोठया रक्कमेस विकत घेतलेला संच ताबडतोब दुरूस्त करण्याची जबाबदारी विरुध्द पक्षाची आहे तसे त्याने केले नाही या उलट तक्रारदाराने अनेकवेळा फे-या मारल्या पण विरुध्द पक्षाला हा संच दुरूस्त करता आला नाही. याचा स्पष्ट
.. 3 .. (तक्रार क्र.95/2011)
अर्थ असा होतो की वादग्रस्त भ्रमणध्वनी संचात उत्पदकीय दोष असल्याने हा संच व्यवस्थीत दुरुस्त करता आला नाही सबब ग्राहक कायद्याचे कलम 2(1)(फ) अन्वये उत्पादकीय दोष असलेला भ्रमणध्वनी संच तक्रारदाराला विकण्यासाठी विरुध्द पक्ष जबाबदार आहे.
स्पष्टिकरण मुद्दा क्र. 2 –
मुद्दा क्र. 2 चे संदर्भात असे स्पष्ट आहे की, रु.4,000/- रकमेस भ्रमणध्वनी विकत घेण्याचे काही दिवसात नादुरूस्त झाल्याने अधिकृत दुरूस्ती सेवा केंद्राकडे दिल्यानंतर त्याची दुरूस्ती होऊ शकली नाही. संच अद्यापर्यंत दुरूस्त करुन परत केलाला नाही. अशा स्थितीत उत्पादनातील दोष असलेली वस्तु तक्रारदाराच्या ताब्यात काहीही साध्य होणार नाही. न्यायाचे दृष्टिने विरुध्द पक्षानी त्याला रु.4,000/- ही रक्कम परत करणे योग्य ठरेल.
दोषपुर्ण वस्तु तक्रारदाराला विकल्याने त्याच्या अपेक्षेप्रमाणे कोणताही लाभ त्याला झाला नाही. रु.4,000/- एवढी मोठी रक्कम देऊन विकत घेतलेला भ्रमणध्वनी बोलत असतांना खंडीत होतो असा प्रकार वारंवार घडतो. फे-या मारुनही भ्रमणध्वनी परत देत नाही हा सर्व प्रकार तक्रारदाराला मनस्ताप देणारा आहे. न्यायाचे दृष्टिने विरुध्द पक्षाने तक्रारदाराला झालेल्या असुविधा व मनस्तापासाठी नुकसान भरपाई रु.2,000/- देणे आवश्यक आहे.
तक्रारदाराच्या योग्य मागणीची दखल विरुध्द पक्षाने घेतली नाही, त्यामुळे त्यांना सदर प्रकरण मंचासमक्ष दाखल करणे भाग पडले. मंचाच्या नोटिसीचीही दखल त्यांनी घेतली नाही. लेखी जबाब दाखल करण्याचे सौजन्य देखील दाखवले नाही, ही बाब येथे नोंदविणे आवश्यक ठरते. सबब विरुध्द पक्षानी तक्रारदारास न्यायिक खर्च रु.2,000/- देणे आवश्यक ठरते.
4. सबब आदेश पारित करण्यात येतो-
आदेश
1. तक्रार क्र.95/2011 अंशतः मंजुर करण्यात येते.
2.आदेश तारखेच्य दोन महिन्याचे आत विरुध्द पक्ष 2 ते 3 यांनी खालील प्रमाणे आदेशाची पुर्तता करावी-
अ) तक्रारदारास भ्रमणध्वनी संचाची किंमत रु.4,000/-(रु. चार हजर फक्त) परत द्यावी.
ब) तक्रारदारास नुकसान भरपाई रु.2,000/-(रु. दोन हजार फक्त) द्यावे.
क) तक्रारदारास न्यायिक खर्च रु.2,000/-(रु. दोन हजार फक्त) द्यावे.
3.विहित मुदतीत उपरोक्त आदेशाचे पालन विरुध्द पक्षाने न केल्यास तक्रारदार उपरोक्त संपुर्ण रक्कम रु.8,000/-(रु. आठ हजार फक्त) द.सा.द.शे 18% व्याजासह वसुल करण्यास पात्र राहील.