श्री. एस. के. कापसे, मा. सदस्य यांचेनुसार
:- निकालपत्र :-
दिनांक 22 नोव्हेंबर 2011
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
1. तक्रारदारांनी जाबदेणार प्रोफेशनल कुरिअर्स कंपनीच्या शुक्रवार पेठ, पुणे शाखेद्वारे त्यांचा मुलगा चि. चैतन्य सुर्यकांत परांजपे, सिंधू हॉस्टेल, आय.आय.टी, चेन्नई येथे दिवाळीचा फराळ, मिठाई दिनांक 3/11/2010 रोजी एअरने कुरिअर केली. तक्रारदारांनी जाबदेणार यांना रुपये 500/- मोबदल्यापोटी अदा केले. जाबदेणार यांनी पावती सी नोट नं पी एनयू 5730882 दिनांक 3/11/2010 तक्रारदारांना दिली. एअरद्वारा कुरिअर केल्यास पार्सल/कुरिअर दिनांक 4/11/2010 रोजी रात्री पर्यन्त चेन्नईला पोहोचेल व अन्य मार्गाने पाठविले तर 10-12 दिवस लागतील असे तक्रारदारांना सांगण्यात आले होते. पार्सल लवकर पोहचावे म्हणून तक्रारदारांनी ते एअरद्वारा पाठविले होते. परंतू प्रत्यक्षात पार्सल दिनांक 4/11/2010 रोजी न मिळता दिनांक 12/11/2010 रोजी 19.14 वा. चि.चैतन्य परांजपे यांना प्राप्त झाले. पार्सल मिळाले त्यावेळी साजूक तुपातील लाडू, चकल्या, शंकरपाळी, चिवडा यांचा चक्काचूर झाला होता व त्या वस्तू खराब होऊन खाण्यालायकही राहिल्या नव्हत्या. तक्रारदारांनी जाबदेणार यांच्याकडे यासंदर्भात वारंवार तोंडी, लेखी, ई-मेलद्वारा चौकशी करुनही उपयोग झाला नाही. या सर्वांमुळे तक्रारदारांना शारिरीक, मानसिक, आर्थिक त्रास सहन करावा लागला, म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून नुकसान भरपाई पोटी रुपये 10,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 5,000/- मागतात. तक्रारदारांनी तक्रारीसोबत शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली आहेत.
2. जाबदेणार यांना मंचाची नोटिस प्राप्त होऊनही गैरहजर. म्हणून जाबदेणार यांच्याविरुध्द मा. मंचाने दिनांक 23/9/2011 रोजी एकतर्फा आदेश पारीत केला.
3. तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे मंचाने अवलोकन केले असता दिनांक 3/11/2010 रोजी तक्रारदारांनी त्यांच्या मुलाला एअर द्वारा पार्सल केले असल्याचे दाखल केलेली पावती नोट नं पी एनयू 5730882 दिनांक 3/11/2010 वरुन दिसून येते. एअरद्वारा पार्सल पोहचविण्यापोटी जाबदेणार यांनी तक्रारदारांकडून रुपये 500/- मोबदला स्विकारल्याचेही दाखल पावतीवरुन दिसून येते. एअरद्वारा कुरिअर/पार्सल दिनांक 4/11/2010 रोजी चेन्नई येथे पोहचविण्याचे मान्य करुनही प्रत्यक्षात जाबदेणारांनी दिनांक 12/11/2010 रोजी पार्सल पोहचविले, ही जाबदेणार यांच्या सेवेतील त्रुटी आहे. पार्सल चेन्नई येथे दिनांक 12/11/2010 रोजी प्राप्त झाले परंतू तोपर्यन्त त्यातील फराळाचे पदार्थ, मिठाई खराब झालेली होती. तक्रारदारांनी पार्सल संदर्भात वारंवार विचारणा करुनही जाबदेणार यांनी योग्य ती कार्यवाही केली नाही, ही जाबदेणार यांच्या सेवेतील त्रुटी आहे. जाबदेणार यांनी त्यांच्या अटी व शर्ती तक्रारदारांना अवगत करुन दिलेल्या नाहीत, त्या अटी व शर्तीं तक्रारदारांना अवगत करुन दिल्याबद्यल तक्रारदारांची कुठेही स्वाक्षरी घेतलेली नाही. जाबदेणार यांच्या सेवेतील त्रुटी मुळे तक्रारदारांना निश्चितच शारिरीक, मानसिक, आर्थिक त्रास सहन करावा लागला असणार असे मा. मंचाचे मत आहे. म्हणून तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत असे मा. मंचाचे मत आहे.
वरील सर्व विवेचनावरुन व कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो-
:- आदेश :-
[1] तक्रार अंशत: मान्य करण्यात येते.
[2] जाबदेणार यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाई व तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 10,000/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावी.
[3] आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.