अॅड निलेश भंडारी तक्रारदारांतर्फे
अॅड अरुंधती मंडलिक जाबदेणारांतर्फे
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
द्वारा- श्रीमती. अंजली देशमुख, मा. अध्यक्ष
निकालपत्र
दिनांक 22 जानेवारी 2013
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
1. तक्रारदारांनी त्यांच्या मुलासाठी जाबदेणार यांच्या शाळेमध्ये इयत्ता दुसरी साठी दिनांक 26/3/2011 रोजी प्रवेश घेतला. त्यावेळी तक्रारदारांना सांगण्यात आले की शाळेतील वर्ग जून 2011 मध्ये सुरु होणार आहे. तक्रारदारांच्या वैयक्तिक कारणामुळे [change in circumstances] प्रवेश घेतल्याच्या एक महिन्यानंतर दिनांक 30/4/2011 रोजी त्यांनी जाबदेणारांकडे जाऊन प्रवेश रद्य करावयाचे सांगितले आणि त्याचवेळी शुल्क [फी] म्हणून भरलेली रक्कम रुपये 43,000/- अधिक कॉशन मनी डिपॉझिट रुपये 10,000/- परत मागितले. तक्रारदारांनी ही रक्कम प्रवेशाच्या वेळी भरलेली होती. त्याचवेळी शाळेतील स्टाफनी तक्रारदारांना फक्त कॉशन मनी डिपॉझिटची रक्कम रुपये 10,000/- च परत मिळू शकेल असे सांगितले. उर्वरित रकमेचा परतावा मिळणार नाही असे सांगितले. त्यासाठी म्हणून तक्रारदारांनी दिनांक 30/4/2011 रोजी अर्ज दाखल केला आणि प्रिन्सीपॉल यांना भेटण्याची विनंती केली. दिनांक 3 मे रोजी तक्रारदारांची प्रिन्सीपॉलशी भेट झाली व तक्रारदारांनी रुपये 43,000/- परत मिळण्याची विनंती केली असता ही रक्कम तक्रारदारांना परत मिळणार नाही, फक्त रुपये 10,000/- परत मिळतील असे तक्रारदारांना सांगण्यात आले. अकांउंटंट रजेवर गेले असल्यामुळे ही रक्कमही दिनांक 20/5/2011 नंतर परत मिळेल असे तक्रारदारांना सांगण्यात आले होते. परंतू तक्रारदारांनी रुपये 10,000/- लगेचच परत मिळण्याचा आग्रह धरल्यामुळे तक्रारदारांना रुपये 10,000/- परत करण्यात आले. तक्रारदारांनी दिनांक 18/5/2011 रोजी रुपये 43,000/- परत मिळण्यासाठी पत्र पाठविले. तरीदेखील जाबदेणार यांनी रक्कम परत केली नाही म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून रुपये 43,000/- 18 टक्के व्याजासह परत मागतात. तसेच नुकसान भरपाई पोटी रुपये 25,000/-, तक्रारीचा खर्च रुपये 7000/- व इतर दिलासा मागतात. तक्रारदारांनी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
2. जाबदेणार यांनी लेखी जबाब दाखल करुन तक्रारदारांच्या मागणीस विरोध दर्शविला. जाबदेणार यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदारांनी दिनांक 26/3/2011 रोजी त्यांच्या मुलासाठी जाबदेणार यांच्या शाळेत प्रवेश घेतला होता. जून 2011 मध्ये वर्ग सुरु होणार होते. जाबदेणार यांनी शाळेचा प्रवेश अर्ज पालकांना दिला होता त्याचवेळी अटी व शर्ती पालकांना समजावून सांगितल्या होत्या. त्या अटी व शर्ती त्यांच्यावर बंधनकारक आहे. त्याचवेळी शाळेत एकदा प्रवेश घेतल्यानंतर रद्य करता येत नाही आणि शुल्क [फी] चा परतावा दिला जाणार नाही असेही तक्रारदारांना सांगण्यात आले होते. शाळेचे नियम व प्रोसिजर समजून घेतल्यानंतरच तक्रारदारांनी त्यांच्या मुलाचा प्रवेश जाबदेणार यांच्या शाळेमध्ये घेतला होता. तक्रारदारांनी दिनांक 30/4/2011 रोजी प्रवेश रद्य करण्याचा अर्ज दिला परंतू मुलाचा प्रवेश दुस-या शाळेत घेतला होता हे त्यांनी लपवून ठेवले. जाबदेणार यांचे असे म्हणणे आहे की सगळयाच शैक्षणिक संस्थांमध्ये एकदा प्रवेश घेतल्यानंतर त्या पाल्याची जागा ही नक्की होते. त्यामुळे जर प्रवेश रद्य केला तर ती जागा रिकामी राहू शकते. त्यामुळे प्रवेश रद्य करता येत नाही. जाबदेणार शाळा ही नामांकीत असून तक्रारदारांनी जाबदेणार नाव मलीन करण्यासाठी ही खोटी तक्रार दाखल केली आहे. जाबदेणार यांच्या सेवेत त्रुटी नाही. सेवेत निष्काळजीपणा नाही. ग्राहक संरक्षण कायदयानुसार तक्रारदार ग्राहक होऊ शकत नाही तसेच जाबदेणार यांनी तक्रारदारांना दिलेल्या सेवा या ग्राहक संरक्षण कायदयात नमूद केल्याप्रमाणे सेवा होऊ शकत नाहीत. उलट तक्रारदारांनीच खोटी तक्रार केल्यामुळे रुपये 25,000/- दंड व खर्च जाबदेणार यांना मिळण्यात यावा अशी मागणी जाबदेणार करतात. जाबदेणार यांनी शपथपत्र दाखल केले.
3. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदारांनी दिनांक 26/3/2011 रोजी त्यांच्या मुलासाठी जाबदेणार यांच्या शाळेत इयत्ता दुसरीसाठी प्रवेश घेतला होता. काही परिस्थिती मुळे तक्रारदारांनी दिनांक 30/4/2011 रोजी त्यांच्या मुलाचा जाबदेणार यांच्या शाळेतील प्रवेश रद्य केला. प्रवेश शुल्क [फी] म्हणून तक्रारदारांनी जाबदेणारांकडे रुपये 43,000/- व कॉशन मनी डिपॉझिट रुपये 10,000/- भरले होते. जाबदेणार यांनी तक्रारदारांना फक्त कॉशन मनी डिपॉझिट रुपये 10,000/- परत केले व उर्वरित रुपये 43,000/- परत मिळणार नाही असे सांगितले. शाळा जून 2011 मध्ये सुरु होणार होती. यावर जाबदेणार यांच्या म्हणण्यानुसार एकदा शाळेत प्रवेश घेतल्यानंतर पाल्याची शाळेतील जागा नक्की होते त्यामुळे जर प्रवेश रद्य केला तर ती जागा रिकामी राहू शकते. परंतू तक्रारदारांनी त्यांच्या मुलाचा प्रवेश रद्य केल्यानंतर ती जागा वर्षभर रिकामी राहिली यासंदर्भातील कोणताही कागदोपत्री पुरावा जाबदेणार यांनी मंचासमोर दाखल केला नाही. जाबदेणार यांच्या म्हणण्यानुसार प्रवेश घेतांना अटी व शर्ती तक्रारदारांना समजावून सांगण्यात आल्या होत्या. त्या अटी व शर्ती तक्रारदारांवर बंधनकारक आहे. त्याचवेळी शाळेत एकदा प्रवेश घेतल्यानंतर प्रवेश रद्य करता येत नाही आणि शुल्क [फी] चा परतावा दिला जाणार नाही असेही तक्रारदारांना सांगण्यात आले होते. परंतू एकदा प्रवेश घेतल्यानंतर प्रवेश रद्य करता येत नाही यासंदर्भातील अटी व शर्ती जाबदेणार यांनी मंचासमोर दाखल केलेल्या नाहीत. तक्रारदारांनी मुलाच्या प्रवेशापोटी शुल्क म्हणून रुपये 43,000/- जाबदेणार यांच्याकडे भरल्याची दिनांक 26/3/2011 रोजीची पावती मंचासमोर दाखल केली आहे. सदरहू पावतीचे अवलोकन केले असता त्यात अॅडमिशन फी रुपये 20,000/-, स्टुडंट डेव्हलपमेंट फंड रुपये 10,000/-, टर्म फी फर्स्ट टर्म 2011-12 रुपये 8,000/-, अॅक्टीव्हीटी फी रुपये 2500/-, कॉम्प्युटर फी रुपये 2500/- एकूण रुपये 43,000/- चे स्पष्टीकरण दिलेले आहे. तक्रारदारांनी दिनांक 30/4/2011 रोजी मुलाचा प्रवेश रद्य केला, त्यामुळे स्टुडंट डेव्हलपमेंट फंड, अॅक्टीव्हीटी फी, कॉम्प्युटर फी यापैकी एकाही हेडचा उपयोग तक्रारदारांच्या पाल्यानी करुन घेतलेला नाही त्यामुळे या रकमा ठेवून घेण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. अॅडमिशन फी रुपये 20,000/- पावतीमध्ये नमूद करण्यात आलेली आहे. जाबदेणार यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी नाही, निष्काळजीपणा नाही. तक्रारदारांनी त्यांच्या मुलाचा शाळेतील प्रवेश रद्य केल्यानंतर वर्षभर जाबदेणार यांनी तक्रारदारांच्या मुलाच्या जागी दुस-या पाल्याला प्रवेश दिला नाही किंवा ती जागा रिकामीच राहिली यासंदर्भातील कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल केला नाही. तसेच प्रवेश रद्य केल्यानंतर अॅडमिशन फी परत देता येत नाही यासंदर्भातील अटी व शर्ती देखील जाबदेणार यांनी मंचासमोर दाखल केलेल्या नाहीत. त्यामुळे तक्रारदारांनी त्यांच्या मुलाचा जाबदेणार यांच्या शाळेतून प्रवेश रद्य केल्यानंतर भरलेले शुल्क [फी] रक्कम रुपये 43,000/- परत न देणे ही जाबदेणार यांनी अवलंबलेली अनुचित व्यापारी पध्दती आहे असे मंचाचे मत आहे. म्हणून जाबदेणार तक्रारदारांना रक्कम रुपये 43,000/- दिनांक 30/4/2011 पासून 9 टक्के व्याजासह परत देण्यास जबाबदार ठरतात. तक्रारदारांना व्याज देण्यात आल्यामुळे तक्रारदारांची नुकसान भरपाईची मागणी मंच नामंजुर करीत आहे.
वरील विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहे-
:- आदेश :-
[1] तक्रार अंशत: मान्य करण्यात येत आहे.
[2] जाबदेणार यांनी तक्रारदारांना रक्कम रुपये 43,000/- 9 टक्के व्याजासह
दिनांक 30/4/2011 पासून संपूर्ण रक्कम अदा होईपर्यन्त आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत दयावी.
[3] जाबदेणार यांनी तक्रारदारांना तक्रारीचा खर्च रक्कम रुपये 1000/- अदा करावा.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.