निकाल
(घोषित दि. 11.01.2017 व्दारा श्री.के.एन.तुंगार, अध्यक्ष)
ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 अन्वये तक्रार.
तक्रारदार याने दि.18.04.2016 रोजी गैरअर्जदार क्र.1 यांचेकडून गैरअर्जदार क्र.2 यांनी उत्पादीत केलेला कुलर रक्कम रु.14,000/- मध्ये विकत घेतला. गैरअर्जदार यांनी तक्रारदार यास खात्री दिली होती की, सदर कुलर उच्च दर्जाचा असून त्याला बुकींग करावे लागते. परंतू गैरअर्जदार क्र.1 कडे सदर कुलरचे मॉडेल उपलब्ध असल्यामुळे त्याला तात्काळ देता येऊ शकेल. तक्रारदार याने गैरअर्जदार क्र.1 यांचे म्हणणे ऐकून सदर कुलर विकत घेतला. त्यानंतर काही दिवसातच तो कुलर बंद पडला. तक्रारदार यानी गैरअर्जदार क्र.1 यांच्याकडे तक्रार केली त्यावेळी तक्रारदार यास सुचना देण्यात आली की, त्याने एस.एम.एस.द्वारे गैरअर्जदार क्र.2 यांच्याकडे तक्रार नोंदवावी. त्याचप्रमाणे तक्रारदार याने गैरअर्जदार क्र.2 यांच्याकडे तक्रार नोंदविली. त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजे दि.23.04.2016 रोजी औरंगाबाद येथून रघूनाथ भांबरे हे मेकॅनिक तक्रारदार यांचेकडे आले व त्यांनी तक्रारदार याचा कुलर दुरुस्त केला. त्यानंतर दि.10.05.2015 रोजी तक्रारदाराचा कुलर परत बंद पडला, त्यामुळे तक्रारदार याने तक्रार केली असता औरंगाबादहून परवेझ शेख नावाचा मेकॅनिक दि.12.05.2016 रोजी आला. त्यावेळी कुलरमधील मोटार खराब झाल्यामुळे सदर मेकॅनिकने ती मोटार बदलून दिली. दि.22.06.2016 रोजी तक्रारदाराच्या कुलरमधून आवाज येणे सुरु झाले, पाण्याचा पंप बंद पडला. त्याचप्रमाणे एअर कुलरला स्पर्श केल्यावर शॉक बसू लागला त्यावेळी तक्रारदार याने गैरअर्जदार क्र.1 कडे तक्रार केली तेव्हा त्यांनी कंपनीकडे तक्रार करा असे सांगितले. दि.23.06.2016 रोजी तक्रारदार याने टपालाद्वारे गैरअर्जदार क्र.1 यांच्याकडे तक्रार पाठविली. परंतू गैरअर्जदार क्र.1 यांनी सदर तक्रार स्विकारण्यास नकार दिला. कुलर विकत घेतल्यानंतर अवघ्या दोन महिन्याच्या काळात तो तीन वेळा नादुरुस्त झाला. कुलर बंद पडल्यामुळे तक्रारदार याचा मुलगा सय्यद अली आवेझ हा आजारी पडला. त्याच्या उपचाराकरता तक्रारदार यास रु.1500/- खर्च करावे लागले. तसेच त्यांच्या कुटूंबियांना उन्हाचा त्रास सहन करावा लागला. तक्रारदार याने गैरअर्जदार यांना सदर कुलर बदलून द्यावा म्हणून मागणी केली, त्याला गैरअर्जदार क्र.1 यांनी नकार दिला. त्यामुळे तक्रारदार याने हा तक्रार अर्ज दाखल केला आहे. तक्रारदार यांनी अशी विनंती केली आहे की, त्याला विक्री केलेला कुलर निकृष्ट दर्जाचा आहे असे घोषित करावे व तो बदलून द्यावा किंवा त्याची किंमत व्याजासहीत परत करावी.
तक्रारदार याने तक्रार अर्जासोबत गैरअर्जदार क्र.1 यांनी कुलर विक्रीच्या वेळी दिलेली पावती, तसेच कुलर वापरण्याच्या बाबतचे सुचना पत्रकाची नक्कल आणि वॉरंटीच्या संबंधातील वॉरंटीच्या अटी व शर्तीची माहिती असलेल्या कागदाची नक्कल दाखल केलेली आहे. त्याचप्रमाणे गैरअर्जदार क्र.1 यांना पाठविलेल्या नोटीसच्या स्थळप्रतीची नक्कल दाखल केलेली आहे.
गैरअर्जदार क्र.1 यांना नोटीस मिळूनही ते गैरहजर राहिले. त्यामुळे त्यांच्या विरुध्दचे प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश झाला.
गैरअर्जदार क्र.2 यांनी त्यांचा सविस्तर लेखी जबाब दि.13.12.2016 रोजी नि.11 वर दाखल केला आहे. त्यांनी तक्रारदार यांनी लावलेले सर्व आरोप नाकारले आहेत. तक्रारदार याने दि.18.04.2016 रोजी कुलर घेतल्याची गोष्ट गैरअर्जदार यांना मान्य आहे. त्याचप्रमाणे तक्रारदाराने केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने कुलरचा मेकॅनिक तक्रारदाराकडे आला व त्याने कुलरची दुरुस्ती करुन दिली ही गोष्ट गैरअर्जदार क्र.2 यांना मान्य आहे. गैरअर्जदार क्र.2 यांनी उत्पादीत केलेल्या सर्व उत्पादनांची कठोर चाचणी घेतल्यानंतरच सदर कुलर जनतेला विक्रीकरता बाजारात पाठवला जातो. तरीही गैरअर्जदार क्र.2 यांनी उत्पादीत केलेल्या कोणत्याही उत्पादनाची खात्री ग्राहकाच्या निष्काळजीपणामुळे उत्पादनाचे नुकसान झाले असेल तर देता येत नाही. विद्युत पुरवठयातील चढउतार हा सुध्दा उपकरणामध्ये दोष उत्पन्न होण्यास कारणीभूत असतो. जर उत्पादन हवेशीर जागेत ठेवले नसेल तरीही दोष उत्पन्न होतो. त्याचप्रमाणे कुलरमध्ये वेळोवेळी योग्यरितीने पाणी भरले नाही तरी दोष उत्पन्न होतात. अशा परिस्थितीत गैरअर्जदार क्र.2 यांनी उत्पादीत केलेला कुलर सदोष आहे असा आरोप डोळे झाकून करता येणार नाही. तक्रारदार हा गैरअर्जदार क्र.2 यांच्याकडून कुलरच्या किंमतीची मागणी करु शकत नाही. सदर रक्कम मिळण्यास तो पात्र ही नाही. ग्राहक मंचास तक्रारदाराची तक्रार चालविण्याकरता कार्यक्षेत्र उपलब्ध नाही. तक्रार चालविण्याचे कार्यक्षेत्र अहमदाबाद, (गुजरात) येथील न्यायालयास आहे. तक्रारदाराची तक्रार मुदतबाहय आहे. प्राथमिक मुद्यावर तक्रारदाराची तक्रार निकाली काढणे आवश्यक आहे. तक्रारदार यास ही तक्रार दाखल करण्याकरता कोणतेही कारण नाही. अशा परिस्थितीत तक्रारदाराच्या कोणत्याही आरोपास मान्य न करता गैरअर्जदार क्र.2 हे सदिच्छा म्हणून त्यांच्या मेकॅनिकला तक्रारदार यांच्याकडे पाठवून सदर कुलर दुरुस्त करुन देण्यास तयार आहे. त्यामुळे तक्रारदाराची तक्रार नामंजूर करावी अशी विनंती गैरअर्जदार क्र.2 यांनी केलेली आहे.
आम्ही तक्रारदाराचा तक्रार अर्ज व गैरअर्जदार क्र.2 यांच्या लेखी जबाबाचे काळजीपूर्वक वाचन केले. गैरअर्जदार क्र.2 यांनी टपालाद्वारे लेखी जबाब पाठविला, परंतू सदर लेखी जबाबासोबत कोणतेही कागदपत्र पाठविले नाहीत. त्याचप्रमाणे गैरअर्जदार क्र.2 यांनी ग्राहक मंचासमोर हे प्रकरण चालविण्याकरता कोणत्याही वकीलांची नियुक्ती केलेली नाही. लेखी जबाब दि.13.12.2016 रोजी टपालाद्वारे ग्राहक मंचात दाखल झाला, तेव्हापासून आजतागायत गैरअर्जदार क्र.2 यांच्या वतीने कोणीही या प्रकरणात हजर नाही. या उलट तक्रारदार यांचे वकील हजर आहेत. त्यांनी सदर प्रकरणाकडे गैरअर्जदार क्र.2 हे जाणुनबुजून दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे त्यांची वाट न पाहता तक्रारदार यांचा युक्तीवाद ऐकून घ्यावा अशी विनंती केली. आम्ही तक्रारदार यांच्या वकीलांच्या विनंतीत तथ्य आहे असे गृहीत धरुन तक्रारदार यांच्या वकीलांचा सविस्तर युक्तीवाद ऐकला.
तक्रारदार याने तक्रार अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती दाखल केल्या आहेत. त्यापैकी पान क्र.18 वर वॉरंटी रजिस्ट्रेशन कार्डची नक्कल आहे. त्यामध्ये वॉरंटीचा कालावधी 12 महिन्याचा असल्याबाबत स्पष्ट उल्लेख आहे. तक्रारदार याने वादातील कुलर दि.18 एप्रिल 2016 रोजी विकत घेतला. याचाच अर्थ, कुलर विकत घेतल्यापासून आजपर्यंत एक वर्षांचा कालावधीही झालेला नाही. परंतू कुलर विकत घेतल्यापासून दोन महिन्याच्या आत तीन वेळा तो बंद पडला. याचाच अर्थ, सदर कुलरमध्ये प्रत्येकवेळी तांत्रीक स्वरुपाचा दोष उत्पन्न झाला. त्यामुळे तक्रारदार सदर कुलरचा पुरेपूर वापर करण्यास असमर्थ ठरला. कुलरच्या विक्रीच्या पावतीवर कंपनीचे सर्विस सेंटर मधून कुलरला वॉरंटी उपलब्ध असल्याचे हस्ताक्षरात लिहीले आहे. त्याचप्रमाणे विक्री केलेल्या मालाबददल दुसरा माल देण्यात येणार नाही अशा अर्थाचा ही मजकुर लिहीलेला आहे.
तक्रारदार याने तीन वेळा सदर कुलरमध्ये दोष उदभवल्याबददल त्याचे तक्रार अर्जात लिहीलेले आहे.
1) दि.23.04.2016 मेकॅनिक रघुनाथ भांबरे.
2) दि.12.05.2016 मेकॅनिक परवेझ शेख
3) दि.22.05.2016 ही तक्रार स्विकारण्यास गैरअर्जदार यांनी नकार दिला.
अशी परिस्थिती असतानाही गैरअर्जदार क्र.2 हा तक्रारदाराकडून फक्त एकच तक्रार झाल्याबददल लेखी जबाबात लिहीत आहे. आमच्या मताने गैरअर्जदार क्र.2 हे ग्राहक मंचाची या मुद्यावर दिशाभूल करत आहे.
या प्रकरणात उदभवलेल्या सर्व महत्वाच्या बाबींचे एकत्रीतपणे मनन केल्यानंतर आमचे असे मत झाले आहे की, तक्रारदार यांना पुरविलेल्या कुलरमध्ये वारंवार दोष उत्पन्न होत आहे. सदर कुलर रु.14,000/- देऊन तक्रारदार याने घेतला, तरीही त्याला सदर कुलरचा पुरेपूर उपभोग उन्हाळयाच्या कालावधीत घेता आला नाही. वॉरंटीच्या अटी व शर्तीनुसार जर सदर कुलर तक्रारदार यास बदलून देणे करारानुसार शक्य नसेल तर गैरअर्जदार यांनी तो कुलर तज्ञ मेकॅनिककडून चांगल्या दर्जाचे सुटे भाग बसवून योग्यरितीने चालू करुन देणे अपरिहार्य आहे. त्याचप्रमाणे सदर कुलर दुरुस्त करुन दिल्यानंतर किमान वॉरंटी कालावधीमध्ये तो विना अडथळा व योग्यरितीने चालणे आवश्यक आहे.
तक्रारदार यांनी असा आरोप केला आहे की, कुलर बंद पडल्यामुळे त्याचा मुलगा आजारी पडला, त्याच्या वैद्यकीय उपचाराकरता बराच खर्च करावा लागला, उन्हाळयात कुलर बंद पडल्यामुळे त्याच्या कुटूंबियांना खुप गैरसोय व त्रास झाला. हया सर्व बाबी ख-या आहेत असे आम्ही गृहीत धरतो. या सर्व गोष्टींचा विचार करुन तक्रारदार खालीलप्रमाणे आदेशास पात्र आहे.
आदेश
- तक्रारदार यांचा तक्रार अर्ज खालीलप्रमाणे मंजूर करण्यात येतो.
2) गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी स्वतंत्रपणे अथवा संयुक्तपणे तक्रारदाराच्या
कुलरची दुरुस्ती चांगल्या दर्जाचे सुटे भाग बदलून तज्ञ मेकॅनिकच्या हस्ते
करुन द्यावी, जेणेकरुन तक्रारदार यांच्या कुलरमध्ये पुढील एक वर्षांच्या
कालावधीत कोणत्याही प्रकारचा दोष उत्पन्न होऊ नये.
3) गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी स्वतंत्रपणे अथवा संयुक्तपणे सदर आदेशाची
माहिती मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत वादातील कुलरची दुरुस्ती करुन
देणे आवश्यक आहे.
4) गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी स्वतंत्रपणे अथवा संयुक्तपणे कुलरची दुरुस्ती
केल्याच्या तारखेपासून पुढील एक वर्षांकरता तक्रारदार यास वॉरंटीचे
छत्र देणे बंधनकारक आहे.
5) गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी स्वतंत्रपणे अथवा संयुक्तपणे तक्रारदारास यास
तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.3,000/- द्यावेत.
श्रीमती एम.एम.चितलांगे श्री. सुहास एम.आळशी श्री. के.एन.तुंगार
सदस्या सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, जालना