जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – ७२/२०१२
तक्रार दाखल दिनांक – २५/०४/२०१२
तक्रार निकाली दिनांक – २३/०५/२०१३
श्री. अक्षयवर बिग्गु शर्मा
ओम नमो नारायण मेटल्स
३ व ५२ धंदा – व्यापार
रा मोहाडी उपनगर ता.जि. ............. तक्रारदार
विरुध्द
दि ओरिएंटल इंश्योरंस कंपनी लि.
नोटीसीची बजावणी म शाखाधिकारी धुळे
यांचेवर व्हावी ............ सामनेवाला
न्यायासन
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
(मा.सदस्या – सौ.एस.एस.जैन)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – अॅड.ए. व्ही. मैन)
(सामनेवाला तर्फे – अॅड. ए.बी. देशपांडे)
निकालपत्र
(दवाराः मा.सदस्या – सौ. एस.एस. जैन)
सामनेवाला यांनी तक्रारदारचा नुकसानभरपाई विमा दावा मंजुर न केल्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार या मंचात दाखल केली आहे.
१. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, तक्रारदार यांचा मौजे रनमाळे ता.जि. धुळे येथे गट नं.१२४/१-१-१ येथे अल्युमिनियम चे भांडे तयार करण्याचा कारखाना आहे.
सदर कारखान्याची इमारत, मशिनरी, माल व फर्निचर इ. चा विमा तक्रारदारने सामनेवाला यांचेकडे काढलेला असून सदर पॉलिसीचा नं.१०२४०१/११/२०११/००१ असा असुन त्याचा अवधी दि.०८/०९/२०१० ते दि.०८/०९/२०११ असा होता.
दि.२७/०८/२०११ रोजी भयंकर पाऊस पडल्याने सदर कारखान्याचे पुर्वेकडील ७० फुट भिंत कोसळली त्यामुळे कारखान्याचे बांधिव शेड २०x१२ चे कोसळले त्यामुळे तक्रारदारचे व्यवसायाचे मिळकतीचे अतोनात नुकसान झालेले आहे.
२. तक्रारदार चे पुढे असे म्हणणे आहे की, सदर घटनेचा मा. तलाठी रनमळा यांनी दि.२८/०८/२०११ रोजी पंचनामा केला. तक्रारदारने सामनेवाला यांचेकडे सदर घटनेची सुचना दि.३०/०८/२०११ रोजी दिलेली आहे. त्यानुसार सामनेवाला यांनी श्री.पी.के. राठी इंजिनियर यांना घटनेचे अवलोकनार्थ पाठविले. त्यांनी दि.०१/०९/२०११ रोजी प्रत्यक्ष भेट देवून नुकसानीची पाहणी करून कागदपत्रांची मागणी केली.
३. त्यानंतर सामनेवाला यांचे दि.०१/०९/२०११ चे पत्रानुसार तक्रारदार यांनी श्री.जे.आर. चांदसरकर यांचे मार्फत पाहणी करून घेवुन नुकसानीबाबत अहवाल घेतलेला आहे. त्यात श्री.चांदसरकर यांनी संपूर्ण मालमत्तेचे मुल्यांकन रू.१७,९०,०००/- इतके केले व नुकसानीचा अंदाज रू.१,८३,०००/- व आर्थिक नुकसान रू.५०,०००/- असे एकूण रू.२,३३,०००/- चे नुकसान झाल्याचा रिर्पोट सादर केलेला आहे.
४. श्री. चांदसरकर यांचे नुकसानीबाबत केलेले अंदाज सदोष आहेत. तक्रारदारास केवळ एकच भिंत बांधून होणार नाही, त्यास पूर्ण कारखान्याचे काम नव्याने करावे लागणार आहे. त्याबाबत त्यांचे अहवालात नमुद केल्याप्रमाणे जागेची किंमत वगळता रू.११,९०,०००/- खर्च अपेक्षित आहे. कारखान्याचे इमारतीचा रू.२०,००,०००/- चा विमा असल्याने सामनेवाला हे तक्रारदारास संपूर्ण खर्च देण्यास जबाबदार असल्याने तक्रारदारने सामनेवाला यांचे कडे क्लेम अर्ज केला असता सामनेवाला यांनी दि.०५/०३/२०१२ चे पत्रान्वये सदर नुकसान भरपाई अर्ज नामंजूर केलेला आहे. त्यामुळे सामनेवाला यांनी सेवेत त्रृटी केलेली आहे.
५. तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्याकडून नुकसान भरपाई रू.११,९०,०००/-, आर्थिक नुकसानीसाठी रू.५०,०००/- व्याजासह देववावे. तसेच शारिरिक व मानसिक त्रासासाठी रू.५०,०००/- देववावे अशी विनंती केली आहे.
६. तक्रारदार यांनी आपले म्हणण्याच्या पृष्टयार्थ नि.३ सोबत पंचनामा, विमा दावा नाकारल्याचे पत्र, इस्टिमेट, आर्थिक नुकसानीचा दाखला, मालमत्तेचे मुल्यांकन रिर्पोट, विमा पत्र, पी.के. राठी यांचे पत्र, कारखाना बांधकाम नकाशा, इ. कागदपत्रे दाखल केली आहेत.
७. सामनेवाला विमा कंपनीने आपले लेखी म्हणणे नि.६ वर दाखल केले आहे. त्यात त्यांनी तक्रारीतील मागणी खोटी आहे. विमा कंपनीने कोणत्याही प्रकारे सेवेत कमतरता केलेली नाही. संबंधीत पॉलीसीच्या अटी व शर्तीप्रमाणे या कोर्टाला तक्रार चालविण्याचा अधिकार नाही. सबब सदरचा अर्ज रदद करावा. तसेच सर्वेअरच्या अहवालानुसार ‘जास्त पावसाने जमिनीची माती खचल्याने तसेच बरोबर व योजनापूर्वक बांधकाम न केल्याने नुकसान झाले आहे’, त्यामुळे सदरचे नुकसान पॉलीसीच्या जोखमीत बसत नसल्याने नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी सामनेवाला यांची नाही. असे नमुद केले आहे.
८. विमा कंपनीने आपल्या म्हणण्याच्या पृष्टयार्थ नि.७ वर शपथपत्र, नि.९ सोबत सर्वेअर पी.के. राठी यांचा सर्व्हे रिपोर्ट दाखल केला आहे.
९. तक्रारदार यांची तक्रार, सामनेवाला यांचा खुलासा व युक्तिवाद ऐकल्यानंतर व दाखल कागदपत्रे पाहता आमच्या समोर निष्कर्षासाठी खालील मुददे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
मुददे निष्कर्ष
१. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना दयावयाच्या
सेवेत त्रृटी केली आहे काय ? होय
२. तक्रारदार कोणता अनुतोष मिळण्यास
पात्र आहेत काय ? अंतिम आदेशाप्रमाणे
३. आदेश काय ? खालीलप्रमाणे
विवेचन
१०. मुद्दा क्र.१- तक्रारदार यांची मुख्य तक्रार अशी आहे की, त्यांचा अल्युमिनियमचे भांडे तयार करण्याचा कारखाना आहे. सदर कारखान्याचे जागी दि.२७/०८/२०११ रोजी भयंकर पाऊस पडल्याने कारखान्याचे पुर्वेकडील ७० फूट भिंत कोसळली. त्यामुळे कारखान्याचे बांधिव रोड २० बाय १२ चे कोसळले. सदर कारखान्याचा विमा सामनेवाला विमा कंपनीकडे काढलेला असल्याने विमा प्रस्ताव विमा कंपनीकडे पाठवला असता विमा कंपनीने सदर नुकसानभरपाई देण्याचे नाकारलेले आहे व सेवेत त्रृटी केली आहे.
११. या संदर्भात विमा कंपनीने आपल्या खुलाश्यामध्ये सदरचे नुकसान हे तक्रारदारने घेतलेल्या पॉलिसीच्या जोखमीत बसत नसल्याने सदरची नुकसानभरपाई देण्याची जबाबदारी विमा कंपनीची नाही असे महटले आहे.
१२. आम्ही तक्रारदारने तक्रारीसोबत दाखल केलेल्या नि.३ सोबतच्या कागदपत्रांचे बारकाईने अवलोकन केले आहे. त्यात नि.३/D वर श्री. चांदसरकर यांचे आर्थिक नुकसानी बाबतचे सर्व्हे प्रमाणपत्र दाखल आहे. सदर प्रमाणपत्रात `The approximate financial losses due to collapse of compound wall are to tune of Rs. 50,000/- (Rupees Fifty Thousand Only)’ असे नमुद आहे. सदर प्रमाणपत्रावर दि.२९/०९/२०११ ही तारीख नमुद आहे. म्हणजेच सदर प्रमाणपत्र घटना घडल्यानंतर महिन्याभरात देण्यात आलेले आहे.
१३. तसेच आम्ही सामनेवाला विमा कंपनीने नि.९ सोबत दाखल केलेल्या श्री.पी.के. राठी यांच्या सर्व्हे अहवालचेही बारकाईन अवलोकन केले आहे. त्यात त्यांनी,‘The loss assessed towards compound wall is Rs.50,000/- Net Assessed loss after deducting depreciation & salvage value for debris will be around Rs.32,000/- only’ असे नमुद केलेले आहे.
सदर प्रमाणपत्रावर दि.२०/०२/२०१२ ही तारीख नमुद आहे. म्हणजेच सदर अहवाल घटना घडल्यानंतर सुमारे ७ महिन्यांनी देण्यात आलेला आहे.
१४. तक्रारदार यांचे तक्रारीत नमुद व त्यांचे वकील अॅड.मैन यांनी आपले युक्तिवादात म्हटले नुसार श्री. पी.के. राठी यांनी दि.०१/०९/२०११ रोजी घटनेच्या ठिकाणी प्रत्यक्षात येवून पाहणी करून सुध्दा तक्रारदार यांना खाजगी सर्वेअरची नेमणूक करून तसा सर्वे अहवाल सामनेवाला कंपनीला पाठविण्याचे त्याच दिवशी म्हणजे दि.०१/०९/२०११ रोजी पत्र दिले होते. वास्तविक श्री. राठी हे स्वतः अहवाल देवू शकत होते. परंतु त्यांनी तसे न करता तक्रारदार कडून खाजगी सर्वेअरचा अहवाल मागवून त्यांचे अहवालावरून दुसरा अहवाल तयार करून उशिराने तक्रारदार यास दिला.
१५. मात्र सदर अहवाल पाहाता घसारा व शिल्लक बाबींचे मुल्यांकन नेमके कोणत्या निकषांवर कले, त्याचे प्रमाण / टक्केवारी काय ? हयाचा उलगडा होत नाही. त्यांनी काढलेली रू.३२,०००/- ही नुकसानभरपाईची रक्कम या कामी प्रमाण मानता येणार नाही. त्यामुळे घटना घडल्यानंतर लगेचच दि.२९/०९/११ चा श्री. चांदसरकर यांच्या सर्वेक्षण अहवालात नमुद नुकसान भरपाईची रककम या कामी रू.५०,०००/- विचारात घेणे योग्य होईल असे आम्हांस वाटते.
१६. वरील परिस्थिती पाहता विमा कंपनीने दोन्ही सर्वेअरचा अहवालात तक्रारदारचे नुकसान झालेचे नमुद असुनही तक्रारदारास नुकसान भरपाई न देवून सेवेत त्रृटी केली आहे. या मतास आम्ही आलो आहोत. महणून मुददा क्रं.१ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
१७. मुद्दा क्र.२- तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्याकडून नुकसान भरपाई रू.११,९०,०००/-, आर्थिक नुकसान रू.५०,०००/-, व्याजासह. तसेच शारिरिक व मानसिक त्रासासाठी रू.५०,०००/- ची मागणी केली आहे. आमच्या मते तक्रारदार हे श्री. चांदसरकर यांचे अहवालानुसार नुकसान भरपाईची रककम रू.५०,०००/-, मानसिक व शारिरिक त्रासापोटी रू.२०००/- तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रू.१०००/- मिळण्यास पात्र आहेत.
१८. मुद्दा क्र.३- वरील विवेचनावरून आम्ही खलीलप्रमाणे आदेश देत आहोत.
आ दे श
१. तक्रारदार यांचा अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
२. सामनेवाला दि ओरिएंटल इंश्योरंस कंपनी लि. यांनी तक्रारदारास रक्कम रू.५०,०००/- या आदेशाच्या प्राप्तीपासून ३० दिवसाच्या आत दयावेत.
३. सामनेवाला दि ओरिएंटल इंश्योरंस कंपनी लि. यांनी मानसिक त्रासापोटी रू.२०००/- व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रू.१०००/- या आदेशाच्या प्राप्तीपासून ३० दिवसाच्या आत दयावेत.
४. सामनेवाला दि ओरिएंटल इंश्योरंस कंपनी लि. यांनी उपरोक्त आदेश मुदतीत रक्कम न दिल्यास रू.५०,०००/- वर दि.०५/०३/२०१२ पासून द.सा.द.शे. ९% दराने व्याज दयावे.
(सौ.एस.एस. जैन) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
सदस्या अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.