निकालपत्र :- (दि.25/10/2010) ( सौ.प्रतिभा जे.करमरकर,सदस्या) (1) तक्रारीची थोडक्यात हकीगत अशी की – तक्रारदार या आवळी बुद्रुक ता.राधानगरी जि.कोल्हापूर येथील कायमच्या रहिवाशी असून त्यांचा शेती हा व्यवसाय आहे. तक्रारदार यांचा महाराष्ट्र शासनाने शेतकरी व्यकतीगत अपघात विमा योजनेतून विमा उरतवला होता. सदर विमा योजनेचा विमा हप्ता सामनेवालांकडे शासनाने अदा केला आहे. यातील तक्रारदार हया दि.24/0/008 रोजी सकाळी ठीक 10.00 वाजणेचे सुमारास त्यांचे राहते घरी काम करत असताना फरशीवरुन पाय घसरुन पडल्या होत्या. तसेच त्यांचे उजव्या पायाला सुज येऊन यातील तक्रारदार यांचे सदर उजव्या पायाच्या हाडाला मार लागलेमुळे त्यांना ताबडतोब वाळके ऑर्थोपेडीक सेंटर शिवाजी पेठ, कोल्हापूर येथे औषधोपचारासाठी दि.24/06/2008 ते दि.09/07/2008 या कालावधीत दाखल केले होते. तेथे त्यांचे उजव्या पायास बराच औषधोपचार केला होता व आहे. तरीसुध्दा तक्रारदाराचे उजव्या पायास झालेली गंभीर जखम बरी झाली नाही. तक्रारदार यांनी वाळके ऑर्थोपेडीक सेंटर कोल्हापूर येथे उपचार घेऊन सुध्दा तक्रारदाराचा पाय बरा न झालेने त्यांना पायाचे कायमचे अपंगत्व आले. त्याबाबतचा दाखला मेडिकल ऑफिसर सी.पी.आर.हॉस्पिटल,कोल्हापूर यांनी दि.22/05/2009 रोजी दिला आहे. (2) तक्रारदार आपल्या तक्रारीत पुढे सांगतात, दि.24/06/2008 रोजी घरी काम करत असताना फरशीवरुन पाय घसरुन पडल्यानंतर उपचार घेऊनसुध्दा तक्रारदाराचे उजव्या पायाची जखम बरी न झाल्यामुळे त्यांना अपंगत्व आलेमुळे तक्रारदार यांनी दि.14/10/2008 रोजी योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता करुन सामनेवाला यांचेकडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत मिळणारे विमा क्लेमची मागणी केली. तथापि, सामनेवाला यांनी तक्रारदार यांना दि.31/03/2009 रोजी पत्राने ‘अपघाताने झालेले जखम तात्पुरत्या स्वरुपाच्या आहेत व त्या उपचाराने ब-या होणा-या आहेत’’ असे कारण देऊन तक्रारदाराचा क्लेम नाकारला आहे. सामनेवाला यांचे सदरचे कृत्य हे बेकायदेशीर स्वरुपाचे आहे. तक्रारदारांना 50 टक्के कायमचे अपंगत्व आल्यामुळे पॉलीसीतील अटी व नियमाप्रमाणे सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांना विमा क्लेमप्रमाणे नुकसान भरपाई देणे आवश्यक होते. सी.पी.आर.हॉस्पिटलच्या मेडिकल ऑफिसरने तक्रारदारास 50 टक्के कायमचे अपंगत्व आल्याबद्दलचे सर्टीफिकेट तसेच क्लेमफॉर्म सोबत इतरही सर्व आवश्यक कागदपत्र तक्रारदाराने सामनेवाला विमा कंपनीकडे दाखल केली आहेत.तरीही सामनेवाला विमा कंपनीने बेजबाबदारपणे व चुकीच्या कारणाने तक्रारदाराचा न्याय विमा क्लेम नामंजूर केला आहे व ही सामनेवालाच्या सेवेतील गंभीर त्रुटी आहे. म्हणून त्याविरुध्द दाद मागण्यासाठी प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे व आपल्या पुढीलप्रमाणे मागण्या मान्य व्हाव्यात म्हणून विनंती केली आहे. विमा क्लेमची रक्कम रु.50,000/- द.सा.द.शे. 18 टक्के व्याजसह सामनेवाला यांचेकडून वसुल होऊन मिळावेत अशी विनंत तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (3) तक्रारदाराने आपल्या तक्रारीसोबत शेतकरी अपघात विमा क्लेम फॉर्म, तलाठयाचे प्रमाणपत्र, तक्रारदार यांचे नावाचा गट नं.158 व 904 चा 7/12 उतारा, 8 अ उतारा, फेरफार नं.447 चा उतारा, तक्रारदारचे ओळखपत्र, गावकामगार पोलीस पाटील यांचा पंचनामा व दाखला, वाळके हॉस्पिटलचे अॅडमिट कार्ड, मेडिकल सर्टीफिकेट, मेडिकल बिले, लॅब रिपोर्ट, औषधांचे प्रिस्क्रीप्शन, डिसअॅबिलीटी सर्टीफिकेट, सामनेवाला यांचे क्लेम नाकारलेचे पत्र, ओळखपत्र, रेशन कार्ड, रहिवाशी दाखला इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (4) सामनेवाला यांनी आपल्या लेखी म्हणणेत तक्रारदाराची विमा पॉलीसी मान्य केली आहे. परंतु इतर सर्व कथनाला तीव्र आक्षेप घेतला आहे. ते आपल्या लेखी म्हणणेत पुढे सांगतात, तक्रार अर्जातील कलम 4 मधील मजकूर चुकीचा आहे. सबब सामनेवाला कंपनीस मान्य नाही. सदर कलमातील मजकूर ‘’ यातील तक्रारदार दि.24/06/2008 रोजी घरी काम करता असताना फरशीवरुन पडल्या होत्या, त्यांचे उजवे पायास सुज येऊन हाडाला मार लागलेमुळे वाळके आर्थोपेडीक सेंटरमध्ये दि.24/06/2008 ते 09/07/2008 पर्यंत औषधोपचारासाठी दाखल केले होते.बराच औषधोचार घेऊनसुध्दा तक्रारदाराचा पाय बरा झाला नाही. तिला कायमचे अपंगत्व आले आहे. त्याबाबत एम.ओ. सी.पी.आर.हॉस्पिटल,कोल्हापूर यांनी तसा दाखला दिला आहे. इत्यादी सर्व मजकूर चुकीचा आहे व तो सामनेवाला यास मान्य नाही. तक्रारदार हिला तथाकथित अपघातामुळे कायमचे अपंगत्व आले आहे हे म्हणणे पूर्णत: खोटे आहे. तसेच सदर कामी तक्रारदार यांनी हजर केलेले सी.पी.आर.हॉस्पिटल, कोल्हापूर यांचेकडील तथाकथीत सर्टीफिकेट हे कायमच्या अपंगत्वाचे सर्टिफिकेट आहे असे म्हणता येत नाही. सदर सर्टिफिकेटवर कोर्ट कामाच्या वेळी उपयोगाचे नाही असा स्पष्ट उल्लेख सर्टिफिकेटवरच केलेला आहे. या बाबींचा विचार करता तक्रारदार कायमच्या अपंगत्वाबाबत ठोस पुरावा दिलेला नाही हे स्पष्ट होते. सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज कोर्ट खर्चासह नामंजूर करावा. (5) सामनेवाला आपल्या लेखी म्हणणेत पुढे सांगतात, तक्रारदाराला झालेली दुखापत ही औषधोपचाराने बरी होण्यासारखी आहे. त्यामुळे तक्रारदाराला आलेले अपंगतव हे कायम स्वरुपाचे नाही. या बाबींचा पूर्ण विचार करुन व पूर्ण जबाबदारीनेच सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदाराचा विमा क्लेम नामंजूर केला आहे व त्यामध्ये सामनेवाला विमा कंपनीची कुठलीही सेवात्रुटी नाही. तसेच तक्रारदाराने मे. कबाल इन्शुरन्स सर्व्हीसेस मार्फत सदर विमा पॉलीसी घेतली होती. त्यांना सदर कामी पक्षकार करणे आवश्यक होते. त्यामुळे तक्रारदाराची खोटी व फसवणूकीची तक्रार खर्चासह फेटाळून टाकावी तसेच खोटी तक्रार केल्याबद्दल रक्कम रु.5,000/- कॉम्पेंसेंटरी कॉस्ट लावावी अशी मागणी सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे. (6) सामनेवाला यांनी आपल्या लेखी म्हणणेसोबत महाराष्ट्र शासन शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेची प्रत दाखल केली आहे. (7) या मंचाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकला. तसेच दोन्ही बाजूंनी दाखल केलेली कागदपत्रे तपासले. (8) तक्रारदाराला अपघाताने दुखापत झाल्याबद्दल गावकामगार पोलीस पाटील यांचा दाखला सामनेवाला विमा कंपनीकडे क्लेमपेपर्स सोबत दाखल केला आहे. त्यामध्ये डॉ.एस.व्ही. वाळके, आर्थोपेडीक सर्जन यांच्याकडे उपचार घेऊनसुध्दा तक्रारदाराचा उजवा पाय पूर्णपणे निकामी झालेला आहे. सी.पी.आर.हॉस्पिटलच्या वैद्यकीय ऑफिसर डॉ.परदेशी यांनीही आपल्या सर्टीफिकेटमध्ये 50 टक्के अपंगत्व आल्याचे स्पष्ट म्हटले आहे. तक्रारदाराचे वय 55 असून त्या राधानगरी येथील दुर्गम व डोंगराळ भागात राहतात. तेथेच त्यांची शेती आहे. तक्रारदार या विधवा असून स्वत: शेतीकाम करतात व त्यांच्यावरच त्यांच्या दोन मुलांची व कुटूंबाची पूर्ण जबाबदारी आहे. पायाला झालेल्या अपघातामुळे तसेच त्यामुळे आलेल्या 50 टक्के अपंगत्वामुळे त्यांचे कामावर विपरीत परिणाम होणार हे स्वयंस्पष्ट आहे. सामनेवालाने आपल्या युक्तीवादाच्यावेळी सी.पी.आर.हॉस्पिटलच्या डॉक्टरांचे शपथपत्र नाही तसेच सर्टीफिकेटमध्ये सदर सर्टीफिकेट कोर्ट कामासाठी वापरता येणार नाही असे म्हटल्यामुळे ते कामात वाचता येणार नाही असे सांगितले. परंतु ग्राहक संरक्षण कायदयाला इव्हीडन्स अॅक्ट मधील तरतुदी तंतोतंत अभिप्रेत नाहीत. त्यामुळे या मंचाने सामनेवालाने काढलेल्या उपरोक्त मुद्दा ग्राहय मानत नाही. (9) सबब वरील विवेचनाचा विचार करता हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करणेत येते. 2) सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांना नुकसान भरपाईची रक्कम रु.50,000/-(रु.पन्नास हजार फक्त) दि.31/03/2009 पासून द.सा.द.शे.9 टक्के व्याजासह दयावे. 3) सामनेवाला यांनी तक्रारदारास तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.1,000/- दयावेत.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |