जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ग्राहक तक्रार क्रमांक : 680/2009. तक्रार दाखल दिनांक : 15/12/2009. तक्रार आदेश दिनांक : 01/02/2011. श्रीमती राजश्री दशरथ आटकर, वय सज्ञान, व्यवसाय : घरकाम/ शेती, रा. कुरघोट, ता. दक्षीण सोलापूर, जि. सोलापूर. तक्रारदार विरुध्द 1. तहसीलदार, दक्षीण सोलापूर, जि. सोलापूर. 2. दी ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी, मंडलीय कार्यालय क्र.28, हिंदुस्थान कॉलनी, अजनी चौक, नागपूर - 440 015. विरुध्द पक्ष गणपुर्ती :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे विधिज्ञ : पी.सी. जवळकोटे विरुध्द पक्ष क्र.1 गैरहजर. विरुध्द पक्ष क्र.2 यांचेतर्फे विधिज्ञ : जी.एच. कुलकर्णी आदेश सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य यांचे द्वारा :- 1. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा पॉलिसींतर्गत तक्रारदार यांचे पती दशरथ आटकर (संक्षिप्त रुपामध्ये 'मयत दशरथ') यांचा विरुध्द पक्ष क्र.2 (संक्षिप्त रुपामध्ये 'विमा कंपनी') यांच्याकडे पॉलिसी क्र.181200/42/08/00091 अन्वये रु.1,00,000/- चा अपघाती विमा उतरविण्यात आलेला आहे. दि.2/8/2008 रोजी मयत दशरथ यांचा अपघाती मृत्यू झाला असून त्याची नोंद मंद्रुप पोलीस स्टेशन येथे करण्यात आली. त्यानंतर तक्रारदार यांनी विमा रक्कम मिळविण्यासाठी विमा कंपनीकडे अर्जासह पोलीस पेपर्स, 7/12 व इतर सर्व कागदपत्रे पाठवून दिलेली आहेत. परंतु विमा कंपनीने अद्यापि त्यांच्या विमा क्लेमबाबत निर्णय घेतला नाही आणि तो प्रलंबीत ठेवला आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार दाखल करुन विमा कंपनीकडून रु.1,00,000/- विमा रक्कम व्याजासह मिळावी आणि मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रार खर्चापोटी रु.5,000/- मिळावेत, अशी विनंती केली आहे. 2. विरुध्द पक्ष क्र.1 यांना मंचाच्या नोटीसची बजावणी होऊनही ते मंचासमोर हजर झाले नाहीत आणि म्हणणे दाखल केले नाही. त्यामुळे त्यांच्या विरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश करण्यात आले. 3. विमा कंपनीने रेकॉर्डवर म्हणणे दाखल केले असून तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार विमा पॉलिसी दि.15/8/07 ते 14/8/08 कालावधीसाठी विशिष्ट अटी व शर्तीस अधीन राहून जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार अपघातामध्ये अपंगत्व किंवा मृत्यू आल्यास विमा संरक्षण लागू आहे. मयत दशरथ हे दि.2/8/08 रोजी वाहन अपघातामध्ये मृत्यू झाल्याबाबत क्लेम दाखल असून त्यांनी तक्रारदार यांच्याकडून मृत्यूचे कारण देणारे प्रमाणपत्र, 7/12 उतारा, ड्रायव्हींग लायसन इ. वारंवार मागणी करुनही त्याची पूर्तता करण्यात आलेली नाही. पॉलिसी क्लॉज 6 (2) नुसार वैध व कार्यक्षम वाहन परवाना नसताना वाहन चालविणा-या शेतक-यास विमा नुकसान भरपाई देय नाही. त्यामुळे तक्रारदार यांचा विमा क्लेम नाकारण्यात येऊन दि.31/3/2009 च्या पत्राप्रमाणे कळविले आहे. शेवटी त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी नसल्यामुळे तक्रार खर्चासह रद्द करण्याची त्यांनी विनंती केली आहे. 4. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे म्हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिली आहे काय ? होय. 2. तक्रारदार विमा रक्कम मिळविण्यास पात्र आहेत काय ? होय. 3. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 5. मुद्दा क्र. 1 ते 3 :- महाराष्ट्र शासनाने शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेंतर्गत विरुध्द पक्ष विमा कंपनीकडे दि.15/8/2007 ते 14/8/2008 कालावधीसाठी विमा उतरविल्याविषयी विवाद नाही. तसेच दि.2/8/2008 रोजी मयत दशरथ यांचा मृत्यू झाल्याविषयी विवाद नाही. मयत दशरथ यांच्या मृत्यूनंतर तक्रारदार यांनी विमा कंपनीकडे क्लेम दाखल केल्याविषयी विवाद नाही. 6. प्रामुख्याने, वारंवार पाठपुरावा करुनही विमा रक्कम देण्यात आली नाही, असे तक्रारदार यांनी नमूद केले आहे. उलटपक्षी, विमा कंपनीच्या म्हणण्यानुसार पॉलिसी क्लॉज 6 (2) नुसार वैध व कार्यक्षम वाहन परवाना नसताना वाहन चालविणा-या शेतक-यास विमा नुकसान भरपाई देय नाही आणि त्यामुळे तक्रारदार यांचा विमा क्लेम नाकारण्यात येऊन दि.31/3/2009 च्या पत्राप्रमाणे कळविल्याचे नमूद केले आहे. 7. निर्विवादपणे, तक्रारदार यांचे पती मयत दशरथ यांचे दि.2/8/2008 रोजी निधन झालेले आहे. तक्रारदार यांनी मयत दशरथ यांचे नांव असलेला मौजे कुरघोट, ता. द.सोलापूर येथील गट नं.98/2 चा 7/12 उतारा दाखल केला आहे. त्या अनुषंगाने मयत दशरथ हे विमा लाभार्थी असल्याचे सिध्द होते. तसेच पोलीस पंचनामा पाहता, मयत दशरथ हे रस्त्यावर मोटार सायकलसह पडल्याचे निदर्शनास आल्याचे नमूद आहे. पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये व्हिसेरा राखून ठेवल्याचे निदर्शनास येते. विमा कंपनीने पॉलिसीच्या कोणत्या अटी व शर्तीचा भंग मयत दशरथ यांच्याकडून झालेला आहे, हे उचित कागदोपत्री पुराव्याद्वारे सिध्द केलेले नाही. त्याचप्रमाणे विमा कंपनीने पॉलिसीच्या अटी व शर्ती रेकॉर्डवर दाखल केलेल्या नाहीत. विमा कंपनीच्या तथाकथित अटी व शर्ती पॉलिसीच्या अविभाज्य घटक असल्याचे कोठेही स्पष्ट होत नाही. त्याशिवाय, पॉलिसीच्या अटी व शर्तीचे पत्रक पॉलिसीसोबत देऊन तक्रारदार यांना अवगत केल्याचे स्पष्ट होत नाही. 8. अपघाताच्या वेळी विमा पॉलिसी अटीनुसार विमेदाराकडे वैध लायसन असणे गरजेचे असल्याच्या कथनापृष्ठयर्थ विमा कंपनीने कोणताही पुरावा सादर केलेला नाही. पॉलिसीच्या कोणत्या अटीप्रमाणे विमेदाराने ड्रायव्हींग लायसन विमा दाव्यासोबत सादर करणे विमेदारावर बंधनकारक आहे, हे स्पष्ट होत नाही. त्यामुळे ड्रायव्हींग लायसन सादर करणे, विमेदारावर बंधनकारक असल्याचे पुराव्याअभावी मान्य करता येणार नाही. 9. उलटपक्षी, तक्रारदार यांनी रेकॉर्डवर मयत दशरथ यांचे ड्रायव्हींग लायसन दाखल केलेले आहे. ज्यावेळी तक्रारदार यांनी मंचासमोर ड्रायव्हींग लायसन दाखल केले आहे, त्यावेळी ते निश्चितच विमा कंपनीकडे दाखल केलेले असावे, हे स्पष्ट होते. मयत दशरथ यांच्याकडे वाहन चालविण्याचा असलेला परवाना अवैध असल्याविषयी विमा कंपनीने कोणताही पुरावा दाखल केलेला आहे. 10. निर्विवादपणे, तक्रारदार यांचा क्लेम हा विमा कंपनीच्या पॉलिसी कक्षेत येतो आणि मयत दशरथ यांचा मृत्यू अपघाती असल्यामुळे पॉलिसीप्रमाणे देय लाभ मिळविण्यास तक्रारदार हक्कदार ठरतात. विमा कंपनीने अत्यंत अयोग्य, तांत्रिक व अनुचित कारणे देऊन विमा दावा नामंजूर करुन त्रुटीयुक्त सेवा दिल्याचे सिध्द होते. सबब, विमा कंपनीने तक्रारदार यांना विमा रक्कम रु.1,00,000/- विमा दावा नाकारल्यापासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने द्यावेत, या निर्णयाप्रत हा मंच आला आहे. 11. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. विरुध्द पक्ष क्र.2 यांनी तक्रारदार यांना विमा रक्कम रु.1,00,000/- दि.31/3/2009 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाच्या आत द्यावी. 2. विरुध्द पक्ष क्र.2 यांनी तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी रु.1,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत. 3. विरुध्द पक्ष क्र.2 यांनी उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी नमूद मुदतीत न केल्यास मुदतीनंतर एकूण रकमेवर द.सा.द.शे. 12 टक्के व्याज देय राहील. (सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार) (सौ. संगिता एस. धायगुडे÷) सदस्य अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/स्व/25111)
| [HONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT | |