Exh.No.26
सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्र. 14/2015
तक्रार दाखल झाल्याचा दि. 05/03/2015
तक्रार निकाल झाल्याचा दि. 04/11/2015
श्री अभिजित नंदकुमार कुलकर्णी
वय 25 वर्षे, धंदा – नोकरी,
रा.ब्लॉक नं.2, गुरु अंगण, छत्रपतीनगर,
ता.रत्नागिरी, जिल्हा – रत्नागिरी. ... तक्रारदार
विरुध्द
दि ओरिएंटल इंश्युरंस कंपनी लिमिटेड,
शाखा कुडाळ तर्फे शाखाधिकारी,
बोभाटे बिल्डिंग, पान बाजार, कुडाळ,
ता.कुडाळ, जिल्हा- सिंधुदुर्ग ... विरुध्द पक्ष.
गणपूर्तीः- 1) श्री कमलाकांत ध. कुबल, प्रभारी अध्यक्ष
2) श्रीमती वफा ज. खान, सदस्या.
तक्रारदारतर्फे विधिज्ञ – कु.एस.ए. सामंत.
विरुद्ध पक्षातर्फे विधिज्ञ – श्रीमती एस.आर. मसुरकर
निकालपत्र
(दि. 04/11/2015)
द्वारा : श्री कमलाकांत धर्माजी कुबल, प्रभारी अध्यक्ष
1) प्रस्तुतची तक्रार विरुध्द पक्षाने सर्व्हेअरच्या अहवालानुसार नुकसानीची नमूद रक्कम नाकारुन अंशतः रक्कम अदा केली ती पूर्णतः मिळावी यासाठी मंचासमोर दाखल करण्यात आलेली आहे.
2) सदरच्या तक्रारीचा थोडक्यात गोषवारा असा -
तक्रारदार हा मारुती झेन/इस्टीलो/LXI रजिस्ट्रेशन नं.MH08-R-3826 या वाहनाचा मालक आहे. सदर वाहनाचा विमा पॉलिसी क्र.161690/31/2014/8636 असा असून तिचा कालावधी 18/02/2014 ते 17/02/2014 पर्यंत वैध असून तो विरुध्द पक्षाकडे उतरविलेला होता. सदरचे वाहन घेऊन तक्रारदाराचा भाऊ दि.19/04/2014 रोजी रत्नागिरी ते कणकवली असा प्रवास करीत असतांना सकाळी 7.00 वाजण्याच्या सुमारास नेरके-राजापुर येथे वाहनासमोर अचानक माकडाची धडक बसली. त्यामुळे वाहनाच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले. अपघातग्रस्त वाहन कणकवली येथील मारुती गाडीचे अधिकृत सेवा केंद्र सापळे ऑटो सर्व्हीस प्रा.लि. यांच्याकडे टोचन करुन आणण्यात आले. तिथूनच विरुध्द पक्षाला वाहनाच्या अपघाताबाबत कळविणेत आले. त्यानुसार विरुध्द पक्षाने आपल्या पॅनेलवरील सर्व्हेअर श्री तुषार आर. खानोलकर यांना वाहनाच्या नुकसानीबाबत सर्व्हे करण्यासाठी नियुक्त केले. त्यानुसार दि.20/04/2014 रोजी सर्व्हेअर श्री खानोलकर यांनी अपघातग्रस्त गाडीचा सर्व्हे करुन गाडीस झालेली नुकसानी रु.28,937/- असल्याचा अहवाल विरुध्द पक्ष यांना दिला. मात्र विरुध्द पक्षाने तक्रारदारास केवळ रु.10,367/- एवढी नुकसान भरपाई अदा केलेली आहे. तक्रारदाराने सदर रक्कम हरकतीसह स्वीकारलेली आहे. तशी लेखी हरकत त्यांने विरुध्द पक्ष यांना दिलेल्या पावतीवर लिहून दिलेली आहे. या अपघातातील गाडी चालक श्री अमित नंदकुमार कुलकर्णी यांचा लायसन्सचा प्रकार L.M.V.(N.T.) M/cycle with gear असा असून सदर परवाना दि.23/03/2007 ते 22/03/2027 पर्यंत वैध आहे. तक्रारदाराने गाडीच्या झालेल्या नुकसान भरपाईची रक्कम रु.28,937.50, गाडी दुरुस्तीसाठी नेण्यास आलेला खर्च रु.5,000/- मिळून 33,937.50 पैकी तक्रारदारास विरुध्द पक्षाने अदा केलेली रक्कम रु.10,367 वजा जाता उर्वरीत रक्कम रु.23,570.50 मिळावेत, तसेच मानसिक, शारीरिक त्रासापोटी रु.10,000/- विरुध्द पक्ष यांनी देण्याचा आदेश व्हावा यासाठी मंचासमोर तक्रार दाखल केलेली आहे.
3) तक्रारदाराने आपल्या तक्रारीच्या पुष्टयर्थ नि.4 वर एकूण 8 कागदपत्रे पुराव्यादाखल दाखल केलेली आहेत.
4) विरुध्द पक्षाने आपले म्हणणे नि.11 वर इंग्रजीमधून व नि.13 वर मराठीमधुन मांडलेले असून सदर तक्रार खोटी व खोडसाळ असल्याचे नमूद करुन अमान्य असल्याचे म्हटले आहे. तसेच आपल्या म्हणण्यात A) सर्व्हेअरने दिलेल्या सर्व्हे रिपोर्ट व बिल चेक रिपोर्टप्रमाणे पूर्ण नुकसान भरपाई दिलेली असून आता कायदयाने विरुध्द पक्ष हे तक्रारदाराचे कोणतेही देणे लागत नाही. B) तक्रारदार यांनी पॉलिसीच्या अटी व शर्तीचा भंग केलेला आहे. C) सदरची तक्रार मुदतीत नाही. D) मागणी केलेली रक्कम अवाजवी व चुकीची आहे असे म्हटले आहे. मात्र नि.क्र.22 वरील तक्रारदाराच्या प्रश्नावलीला उत्तर देतांना नि.क्र.23 वर तक्रारदाराचे वाहनाचा इंश्युरंस उतरविण्यात आला होता हे मान्य केलेले आहे.
5) विरुध्द पक्षाने आपल्या म्हणण्याच्या पुष्टयर्थ पुराव्याचे शपथपत्र नि.क्र.20 वर दाखल केले आहे.
6) तक्रारदाराची तक्रार, कागदोपत्री पुरावा, विरुध्द पक्षाचे म्हणणे, प्रश्नावली, उत्तरावली, लेखी युक्तीवाद या सर्व बाबींचा विचार करता मंच खालील निष्कर्षाप्रत आलेला आहे.
अ.क्र. | मुद्दे | निष्कर्ष |
1 | तक्रारदार हा विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे काय ? | होय. |
2 | विरुध्द पक्ष यांनी तक्रारदारास दयावयाच्या सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? | होय. |
3 | आदेश काय ? | खालीलप्रमाणे. |
7) मुद्दा क्रमांक 1 - तक्रारदाराने विरुध्द पक्षाकडून अपघातग्रस्त वाहनाचा विमा उतरविलेला होता. त्याबाबतचा पुरावा म्हणून विमा पॉलिसी नि.क.4/7 वर दाखल करण्यात आली आहे. शिवाय तक्रारदाराच्या नि.क्र.22 वरील प्रश्नावलीला उत्तर देतांना विरुध्द पक्षाने नि.क्र.23 वरील उत्तरावलीमध्ये विमा पॉलिसी मान्य केली असल्यामुळे तक्रारदार हा विरुध्द पक्षाचा ‘ग्राहक’ असल्याचे स्पष्ट होते.
8) मुद्दा क्रमांक 2 व 3 - तक्रारदाराला सर्व्हेअरच्या अहवालाप्रमाणे assessed value प्रमाणे कागदोपत्री पुराव्यावरुन रु.16764.11 देणे क्रमप्राप्त होते. मात्र विरुध्द पक्षाने रु.10,367/- एवढीच रक्कम विम्यापोटी तक्रारदाराला दिलेली आहे. विरुध्द पक्षाने आपल्या म्हणण्यामध्ये अथवा युक्तीवादात रु.10,367/- कशा पध्दतीने हिशोब केला याचा तपशील अथवा पुरावा मंचासमोर आणलेला नाही. त्यामुळे सर्व्हेअरच्या अहवालाप्रमाणे रु.16764.11 देय असतांना कमी रक्कम देणे ही सेवेतील त्रुटी आहे.
9) तक्रारदाराच्या मागणीप्रमाणे रु.28937.30 ची नुकसान भरपाई मिळावी असे तक्रार अर्जात नमूद आहे. मात्र सर्व्हेअरच्या अहवालाचे अवलोकन केले असता assessed value विचारात घेणे आवश्यक आहे. त्यामुळे तक्रारदाराची प्रस्तुत मागणी मान्य करता येणारी नाही.
10) विरुध्द पक्षाने सर्व्हेअरच्या अहवालानुसार रक्कम दिली नसल्याने हरकत नोंदवून तक्रारदाराने रक्कम स्वीकारलेली आहे. तक्रारदाराने विहित मुदतीत तक्रार दाखल केली असल्याने मुदतीची बाधा सदर अर्जाला येत नाही. त्यामुळे विरुध्द पक्षाने घेतलेला आक्षेप हे मंच अमान्य करीत आहे.
11) उपरोक्त सर्व बाबींचा साकल्याने विचार करता तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करणे योग्य वाटते. तक्रारदाराने मागणी केलेली रु.28,937.30 ही नुकसान भरपाई अमान्य करुन सर्व्हेअर अहवालाप्रमाणे रु.16764.11 मधून विरुध्द पक्षाने तक्रारदाराला यापूर्वी दिलेली रक्कम रु.10,367/- वजावट करुन रु.6397.11 द.सा.द.शे.10% व्याजदराने अदा करणे योग्य वाटते. तसेच तक्रारदारास झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासापोटी व तक्रार खर्चापोटी रु.10,000/- विरुध्द पक्षाने अदा करावेत या निकर्षाप्रत हे जिल्हा मंच येत आहे.
सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्द पक्षाने तक्रारदाराला वाहनाच्या विम्याच्या नुकसान भरपाईची रक्कम रु.6,397/- (सहा हजार तीनशे सत्त्याण्णव मात्र) तक्रार दाखल तारखेपासून म्हणजेच दि.05/03/2015 पासून द.सा.द.शे.10% दराने अदा करणेबाबत आदेश पारीत करणेत येतात.
- विरुध्द पक्षाने तक्रारदाराला झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासापोटी व प्रकरण खर्चापोटी रु.10,000/- (रुपये दहा हजार मात्र) अदा करणेबाबत आदेश पारीत करणेत येतात.
- विरुध्द पक्ष यांनी वरील आदेशाची अंमलबजावणी 45 दिवसांच्या आत न केल्यास तक्रारदार विरुध्द पक्ष यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 25 व 27 अन्वये कार्यवाही करु शकतील.
- मा.राज्य आयोग, मुंबई यांचे परिपत्रक्र क्र.राआ/महा/आस्था/-3/जि.मं.कामकाज/ परिपत्रक/2014/3752 दि.05 जुलै 2014 नुसार उभय पक्षकारांनी 45 दिवसानंतर म्हणजेच दि.18/12/2015 रोजी आदेशाची पुर्तता झाली किंवा नाही ? हे कळवणेसाठी या मंचासमोर हजर रहावे असे आदेश देण्यात येतात.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 04/11/2015
सही/- सही/-
(वफा ज. खान) (कमलाकांत ध.कुबल)
सदस्य, प्रभारी अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्टाने रवाना दि.
प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने रवाना दि.