नि.41 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 243/2010 नोंदणी तारीख – 16/10/2010 निकाल तारीख - 25/4/2011 निकाल कालावधी - 189 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ श्रीमती इंदुताई एकनाथ चव्हाण रा.मु.नारळवाडी, पो. मल्हारपेठ, ता.पाटण जि. सातारा ----- अर्जदार (अभियोक्ता श्री प्रशांत खामकर) विरुध्द 1. दी ओरिएन्टल इन्शुरन्स कं.लि. द्वारा रिजनल मॅनेजर, विभागीय कार्यालय क्र.2, 8, हिंदुस्थान कॉलनी, अजनी चौकाजवळ, वर्धारोड, नागपूर – 440 015 . ----- जाबदार क्र.1 (अभियोक्ता श्री.कालिदास माने) 2. अध्यक्ष, कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हिसेस प्रा.लि., मित्तल टॉवर, 118 बी विंग, 11 वा मजला, नरीमन पॉईंट, मुंबई – 400 021 द्वारा मॅनेजर, मे. कबाल इन्शुरन्स सर्व्हिसेस प्रा.लि. मयुर गॅस एजन्सीचे पाठीमागे, कृष्णानगर, सातारा ता.जि. सातारा 3. तालुका कृषी अधिकारी, ता.पाटण जि. सातारा 4. जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी, कार्यालय, जिल्हा परिषद, सातारा ----- जाबदार क्र.2, 3 व 4 न्यायनिर्णय 1. अर्जदार यांचे पती दि.12/7/09 रोजी मोटर अपघातात जखमी होवून मयत झाले आहेत. ते शेतकरी होते. त्या हक्काने शेतकरी अपघात विमा योजनेची रक्कम मिळणेसाठी अर्जदार यांनी आवश्यक ती कागदपत्रे जोडून त्यांचा विमा क्लेम तालुका कृषी अधिकारी पाटण यांचेकडे जमा केला. त्यांनी तो प्रस्ताव जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी कार्यालय सातारा यांचेकडे पाठविला. सदरची सर्व कागदपत्रे योजनेची अंतिम तारीख 15/11/2009 पूर्वी जाबदार क्र.2 यांचेमार्फत जाबदार क्र.1 यांना पाठविण्यात आला. परंतु जाबदार क्र.1 यांनी अर्जदारचा विमादावा अंतिम तारखेच्या आत प्राप्त न झालेच्या कारणावरुन नाकारला आहे. सदर योजनेनुसार अखेरच्या दिवसांत झालेल्या अपघातासाठी योजनेचा कालावधी संपल्यापासून 90 दिवसांपर्यंत अगर समर्थनीय कारणास्तव 90 दिवसानंतर प्रस्ताव घेणे जाबदार क्र.1 यांचेवर बंधनकारक होते. सबब सदरचे योजनेअंतर्गत रु.1 लाख व्याजासह मिळावेत, तसेच मानसिक व शारिरिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी रक्कम मिळावी म्हणून अर्जदार यांनी या मंचासमोर दाद मागितली आहे. 2. जाबदार क्र.1 यांनी नि. 26 कडे म्हणणे देऊन तक्रार नाकारली आहे. जाबदार यांचे कथनानुसार सदरची विमा पॉलिसी ही नागपूर येथे उतरविण्यात आली आहे त्यामुळे या मंचास प्रस्तुतची तक्रार चालविण्याचे अधिकारक्षेत्र नाही. विमा पॉलिसीच्या अटीनुसार क्लेमची कागदपत्रे तीन महिन्यांमध्ये किंवा पॉलिसीचा कालावधी संपणेपूर्वी कंपनीकडे सादर करावीत. पॉलिसीचा कालावधी संपला असेल तर कालावधी समाप्तीच्या तारखेनंतर 90 दिवसांपर्यंत क्लेम स्वीकारले जातील. परंतु उशिरा सादर केलेल्या क्लेमचे बाबतीत विमा कंपनीला उशिर झाल्याबाबतची कारणे पटली तर विमा कंपनी झालेला उशिर माफ करेल. अर्जदार यांचा क्लेम हा मुदतीत प्राप्त झाला नाही. तसेच त्याबाबत कोणतीही समर्थनीय कारणे अर्जदार यांनी जाबदारचे निदर्शनास आणली नाहीत. त्यामुळे अर्जदारचा विमादावा नामंजूर केला आहे. त्रिपक्षीय कराराच्या अटीनुसार क्लेमबाबत तक्रार उदभवल्यास त्याचे निराकरण जिल्हाधिकारी यांचे अंतर्गत नेमण्यात आलेल्या समितीमार्फत करण्यात यावे. परंतु अर्जदार यांनी या समितीकडे दाद मागितलेली नाही. सबब तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार यांनी कथन केले आहे. 3. जाबदार क्र.3 व 4 यांनी नि.12 व 14 कडे म्हणणे दाखल केले आहे. अर्जदारचे विमादाव्याबाबतची कागदपत्रे विहित वेळेत जाबदार क्र.2 यांचेकडे सादर करण्यात आली आहेत. विमा भरपाईची रक्कम अर्जदार यांना देणे जाबदार क्र.1 यांचेवर बंधनकारक असून ती दिल्यास जाबदार क्र.3 ची हरकत नाही. सबब जाबदार क्र.3 यांना या प्रकरणातून वगळण्यात यावे असे जाबदार क्र.3 यांनी कथन केले आहे. 4. जाबदार क्र.2 यांनी याकामी नि.32 कडे पोस्टाद्वारे पत्र पाठवून त्यांचे म्हणणे सादर केले आहे. जाबदार क्र.2 ही केवळ सल्लागार कंपनी आहे. विमाधारकांच्या कागदपत्रांची पूर्तता व पडताळणी करुन ती विमा कंपनीकडे पाठवून देण्याचे काम जाबदार क्र.2 कंपनी करीत असते. त्यासाठी जाबदार कंपनी शासनाकडून अगर शेतक-यांकडून कोणताही मोबदला घेत नाही. सबब जाबदार क्र.2 यांना मुक्त करण्यात यावे असे जाबदार क्र.2 यांनी कथन केले आहे. 5. अर्जदार व जाबदारतर्फे तोंडी युक्तिवाद ऐकणेत आला तसेच अर्जदार व जाबदार यांची दाखल कागदपत्रे पाहणेत आली. 6. अर्जदारची तक्रार पाहता अर्जदारने मुदतीत सर्व कागदपत्रांची पूर्तता जाबदारकडे करुनही जाबदारने अर्जदारचे मयत पतीचा अपघाती विमा दावा नाकारला अशा पध्दतीने सेवेत त्रुटी केली आहे. 7. जाबदार क्र.1 यांनी नि.26 कडे म्हणणे तसेच नि.27 कडे शपथपत्र देवून अर्जदारची तक्रार नाकारली आहे. जाबदारने नं.1 चे कथनानुसार दि.15/11/2009 पूर्वी अर्जदारचा विमादावा प्राप्त होणे आवश्यक होते परंतु तो उशिरा म्हणजे दि.15/11/2009 नंतर मिळाला आहे. सबब विमा दावा मुदतीत नसलेने योग्य कारणासाठी नाकारला आहे असे कथन केले आहे. परंतु त्याचबरोबर मयत एकनाथ चव्हाण शेतकरी असलेबाबत तसेच त्यांचा विमा असलेबाबत तसेच अपघात झालेबाबतच्या बाबी नाकारल्या नाहीत. 8. अर्जदारचे तक्रारअर्जातील कथने पाहता अर्जदारने प्रथम प्रस्ताव जाबदार क्र.3 तालुका कृषी अधिकारी ता. पाटण जि. सातारा यांचेकडे पाठवला. त्यांनी तो जाबदार क्र.4 जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद सातारा यांचेकडे पाठवला व त्यांनी जाबदार क्र.2 कबाल इन्शुरन्स यांचेमार्फत जाबदर क्र.1 ओरिएन्टल इन्शुरन्स कं.लि. यांचेकडे पाठवला आहे. निर्विवादीतपणे नि.17/1 कडील महाराष्ट्र शासनाने परिपत्रक योजनेची अंमलबजावणी कार्यपध्दती वगैरे पाहता योग्य पध्दतीनेच अर्जदारचा प्रस्ताव जाबदार क्र.1 कडे गेलेला आहे. 9. जाबदार क्र.3 यांनी नि.12 कडे आपले म्हणणे दाखल केले आहे. तसेच नि.13 कडे शपथपत्र दाखल केले आहे. तसेच जाबदार क्र.4 यांनी नि.15 कडे आपले म्हणणे दाखल केले आहे तसेच नि.16 कडे शपथपत्र दाखल केले आहे. जाबदार क्र.3 व 4 यांनी अर्जदारचे कथनाशी सहमती दर्शविली आहे. तसेच तक्रारदाराचा विमा प्रस्ताव जाबदार क्र.3 यांचेमार्फत जाबदार क्र.4 यांचेकडे दि.7/9/2009 रोजी प्राप्त झाला आहे व तो दि.7/9/2009 रोजीच जाबदार क्र.2 यांचेकडे सादर करणेत आला आहे. इतकेच नाही तर प्रस्तावामधील त्रुटी कागदपत्रे मयताचा इन्क्वेस्ट पंचनामा तक्रारदार यांनी जबादार क्र.3 यांचेमार्फत दि.8/10/2009 रोजी पाठवला असून तो दि.12/10/2009 रोजी जाबदार क्र.2 यांचेकडे जाबदार क्र.4 यांनी सादर केला आहे. म्हणजेच मुदतीत कागदपत्रे जाबदार क्र.2 यांचेकडे गेलेली आहेत असे कथन केले आहे. 10. निर्विवादीतपणे जाबदार क्र.3 व जाबदार क्र.4 यांनी आपले कथनाचे पृष्ठयर्थ नि.14 व नि.17 सोबत कागदपत्रे दाखल केली आहेत. सदर कागदपत्रे पाहता नि.14/1 कडे जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी सातारा यांनी जाबदार क्र.2 कबाल इन्शुरन्स ब्रोकिंग सर्व्हिसेस प्रा.लि. सातारा यांना अर्जदार यांचा प्रस्ताव प्राप्त झाला असून आपल्याकडे पुढील कारवाईसाठी पाठवत आहे असे कळवले असलेची प्रत दाखल केली असून त्यावरती कबाल इन्शुरन्स यांनी दि.7/9/2009 रोजी सदर प्रस्ताव मिळालेबाबत सही केली आहे. तसेच नि.14/2 कडील तालुका कृषी अधिकारी पाटण यांचे पत्रानुसार मयत एकनाथ चव्हाण यांचा इंन्क्वेस्ट पंचनामा सुध्दा जाबदार क्र.2 क्र.2 कबाल इन्शुरन्स यांना दि.12/10/2009 रोजी प्राप्त झाला आहे हे कबाल इन्शुरन्स यांचे सहीवरुन दिसून येते. सबब जाबदार क्र.3 व 4 यांनी अर्जदारचा प्रस्ताव कागदपत्रांसह मुदतीत जाबदार क्र.2 यांचेकडे पाठवला आहे हे स्पष्ट आहे. 11. जाबदार क्र.2 कबाल इन्शुरन्स ब्रोकिंग सर्व्हिसेस प्रा.लि. यांनी नि.32 कडे आपले म्हणणे दाखल केले आहे. जाबदार क्र.2 चे कथनानुसार अर्जदारचा प्रस्ताव आम्हास दि. 11/11/2009 रोजी प्राप्त झाला व तो दि.13/11/2009 रोजी जाबदार क्र.1 ओरिएन्टल इन्शुरन्स कं.लि. नागपूर यांचेकडे पाठवणेत आला आहे असे कथन केले आहे. 12. निर्विवादीतपणे जाबदार क्र.1 चे कथन तसेच जाबदार क्र.1 ने अर्जदारास दि. 22/3/2010 रोजी विमादावा नाकारलेचे संबंधीतांने पाठविलेले पात्र पाहता विमा दावा cut off date दि.15/11/2009 नंतर प्राप्त झाला असलेने नाकारला आहे असे कळवलेचे दिसते. निर्विवादीतपणे जाबदार क्र.1 ओरिएन्टल इन्शुरन्स कं.लि. यांना विमा दावा दि.15/11/2009 नंतर प्राप्त झाला असेल तर दि.15/11/2009 नंतर दावा प्राप्त झाला हे शाबीत करणेची जबाबदारी जाबदार क्र.1 इनशुरन्स कंपनीवरती आहे. परंतु जाबदार कं.1 यांनी स्वतःचे कथनाव्यतिरिक्त दावा दि.15/11/2009 नंतर मिळाला हे दाखवणेसाठी कोणताही पुरावा दाखल केला नाही. सबब दाखल कागदपत्रांवरुन जाबदार क्र.1 यांनी अर्जदारचा विमा दावा मुदतीत मिळाला आहे. परंतु अयोग्य कारणासाठी जाबदार क्र.1 यांनी विमा दावा नाकारुन अर्जदारास सदोष सेवा दिली आहे या निर्णयाप्रत हा मंच आला आहे. 13. जाबदार क्र.1 यांनी म्हणणेमध्ये तसेच युक्तिवादामध्ये अर्जदार याचे क्लेम सेटलमेंटबाबत तक्रार निर्माण झालेस अर्जदार यांनी प्रथम निराकरण समितीकडे तक्रार करणेस पाहिजे होती व तरीसुध्दा समितीचा निर्णय मान्य नसेल तरच ग्राहक मंच अथवा लोकपाल यांचेकडे दाद मागणेची असते. परंतु अर्जदार असे न करता ग्राहक मंचाकडेच दाद मागत आहेत हे चुकीचे आहे असे कथन करतात. परंतु जाबदार क्र.3, 4 हे युक्तिवादामध्ये अशी कोणतीही समिती प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेचे कथन करतात तसेच जाबदार क्र.2 ही अशा कोणत्याही समितीबाबत कथन करत नाहीत. सबब प्रत्यक्षात समिती असलेबाबचा पुरावा दाखल नसलेने जाबदार क्र.1 चे प्रस्तुतचे कथन मान्य करणे योग्य होणार नाही. 14. जाबदार क्र.2, 3 व 4 यांनी सदोष सेवा दिली हे दिसून येत नाही सबब जाबदार क्र.2, 3 व 4 यांचेविरुध्द तक्रार रद्द करणेत येत आहे. 15. सबब आदेश. आदेश 1. अर्जदारचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. 2. जाबदार क्र.1 यांनी अर्जदारास विमा दाव्यापोटी रक्कम रु.1,00,000/- (एक लाख फक्त) द्यावेत. 3. जाबदार क्र.1 यांनी अर्जदारास या तक्रारीचा खर्च तसेच मानसिक त्रासासाठी रक्कम रु.10,000/- द्यावेत. 4. जाबदार क्र.2, 3 व 4 विरुध्द तक्रार रदृ करणेत येत आहे. 5. जाबदार क्र.1 यांनी वरील आदेशाचे अनुपालन त्यांना या न्यायनिर्णयाची सत्यप्रत मिळाल्यापासून 30 दिवसात करावे. 6. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि. 25/4/2011 (सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT | Mr. Sunil K Kapse, MEMBER | |