निकालपत्र :- (दि.07/12/2010) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला त्यांचे वकीलांमार्फत हजर होऊन त्यांनी लेखी म्हणणे दाखल केले आहे. उभय पक्षांचे वकीलांचा अंतिम युक्तीवाद ऐकला. प्रस्तुतची तक्रार सामनेवालांनी तक्रारदाराच्या विमा क्लेमबाबत कोणताही निर्णय न दिल्याने दाखल केलेली आहे. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:- अ) तक्रारदार हा मौजे आसळज ता.गगनबावडा जि.कोल्हापूर या गावचा कायमचा रहिवाशी आहे. त्याचा मुलगा संग्राम राजेश धावडे हा आसळज विद्यामंदिर मु.पो.आसळज ता.गगनबावडा जि.कोल्हापूर येथे इयत्ता 3 रीच्या वर्गात शिकत होता व त्याचा राजीव गांधी विदयार्थी अपघात विमा सामनेवाला विमा कंपनीकडे उतरविलेला होता. ब) तक्रारदाराचा मुलगा संग्राम हा दि.12/06/2005 रोजी सर्पदंशाने सदर मौजे आसळज येथे मयत झाला. सदरचा मृत्यू अपघाती आहे. त्यामुळे तक्रारदाराने सामनेवालाकडे क्लेमफॉर्मसोबत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुन विमा रक्कमेची मागणी केली. सामनेवालांनी सदर तक्रारदाराचे मुलाचा मृत्यू हा सर्पदंशाने झाला नसल्याची बतावणी करुन विमा रक्कम देणेची टाळाटाळ करीत आहेत. क) तक्रारदाराचे मुलगा सर्पदंश झालेनंतर औषधोपचाराकरिता नेले असताना उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. त्याचा रिपोर्ट दि.12/06/2005 रोजी जुना राजवाडा पोलीस ठाणेस दिलेला आहे. विमा रक्कमेच्या मागणीसाठी दि.13/11/2009 रोजी वकील नोटीस पाठवली त्यास सामनेवालांनी दि.21/12/2009 रोजी उत्तर दिले आहे. त्यावर चर्चा करणेसाठी तक्रारदार तसेच त्यांचे वकील व शाळेचे मुख्याध्यापक यांना बोलावले; त्याप्रमाणे तक्रारदार स्वत: गेले असता कागदपत्रे दिसून येत नसलेने कागदपत्रे पुन्हा देणेस सांगितले. त्याप्रमाणे तक्रारदाराने कागदपत्रांची पूर्तता केली. तरीही सर्पदंशाने मृत्यू झाला नसलेने विमा नुकसान भरपाई रक्कम देणे लागत नाही असे सांगून जबाबदारी नाकारत आहेत. त्यामुळे प्रस्तुतची तक्रार दाखल करणे भाग पडले. सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर करुन राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा योजनेअंतर्गत रक्कम रु.50,000/-, मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/-, सामनेवालांकडून 18 टक्के व्याजासह वसुल होऊन मिळावेत अशी विंनती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (03) तक्रारदाराने आपल्या तक्रारीच्या पुष्टयर्थ सामनेवाला कंपनीचा क्लेम फॉर्म, सी.पी.आर.हॉस्पिटल यांचेकडील मृत्यू प्रमाणपत्र, जुना राजवाडा पोलीस ठाणे यांचे सहा.फौजदार यांचे पत्र, मयत संग्राम राजेश धावडे यांचा पोस्ट मार्टेम, पोलिस निरिक्षक, गगनबावडा जि.कोल्हापूर यांचेकडील मरणोत्तर पंचनामा, संग्राम राजेश धावडे यांचे मृत्यूप्रमाणपत्र, सामनेवाला यांना पाठविलेली रजि.ए.डी.नोटीस, त्याची पोष्टाची पावती, सामनेवाला यांनी सदर नोटीसला रजि.ए.डी.ने पाठविलेली उत्तरी नोटीस इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच व्हिसेरा रिपोर्ट दाखल केलेला आहे. (04) सामनेवालांनी दाखल केलेल्या लेखी म्हणणेनुसार सामनेवालांनी कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही. तक्रार मुदतीत नाही. परिच्छेदनिहाय तक्रार नाकारली आहे. सामनेवाला पुढे असे प्रतिपादन करतात की, सामनेवालांनी प्रस्तुतची फाईल बंद केलेली आहे. सामनेवाला कंपनीने तक्रारदारास वारंवार सुचना देऊन स्मरणपत्र देऊनही तक्रारदाराने कागदपत्र दाखल केलेली नाहीत. तसेच शवविच्छेदन अहवालावरुन डॉक्टरांचे मत हे राखीव असलेचे दिसून येते. साप चावलेच्या खुणा अथवा मृत्यूचे कारण सर्पदंश असल्याचे नमुद केलेले नाही. व्हिसेरा रिपोर्ट अदयापही राखून ठेवलेला आहे. सदर वस्तुस्थितीचा विचार करता तक्रारदार क्लेम मिळणेस पात्र नाही तसेच सामनेवालांनी कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करावी अशी विनंती सामनेवालांनी सदर मंचास केली आहे. (05) सामनेवाला यांनी आपल्या लेखी म्हणणेच्या पुष्टयर्थ जिल्हा परिषद कोल्हापूर यांचे सुचना पत्राची सत्यप्रत दाखल केली आहे. (06) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदाराचा लेखी युक्तीवाद सामनेवाला यांचे लेखी म्हणणे व दाखल कागदपत्रे, उभय पक्षांचे वकीलांचा युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. 1. सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी केली आहे काय ? --- होय. 2. काय आदेश ? --- शेवटी दिलेप्रमाणे मुद्दा क्र.1 :-युक्तीवादाच्या वेळेस सामनेवालांचे वकीलांनी पॉलीसीची प्रत दाखल केलेली नाही. त्यामुळे सदर पॉलीसी अस्तित्वात नाही असे प्रतिपादन केले आहे. याचा विचार करता सामनेवालांनी दि.06/12/2010 रोजी दाखल केलेले जिल्हा परिषद कोल्हापूर यांचे सुचनापत्राचे अवलोकन केले असता राजीव गांधी विद्यार्थी अपघात विमा योजनेच्या कार्यवाहीबाबत असून यामध्ये सदर योजनेअंतर्गत शासनमान्य प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी सामनेवाला विमा कंपनीमार्फत योजना राबवली जात असून त्यास महाराष्ट्र शासनाने मान्यता देऊन विमा हप्ता भरलेला असलेचे स्पष्टपणे नमुद केले आहे. सबब तक्रारदाराचा मुलगा संग्राम राजेश धावडे हा मौजे असळज विद्यामंदिर मध्ये शिकत होता व सदरची शाळा ही शासनमान्य शाळा असलेचे क्लेम फॉर्मवर स्पष्टपणे नमुद असून शाळेचा शिक्काही दिसून येतो. त्याबाबत वाद असणेचे कारण नाही. कारण सदर शाळेत तक्रारदाराचा मुलगा 1 ली मध्ये दि.05/07/2003 पासून शिकत होता. दि.13/05/2005 अखेर 3 री मध्ये शिकत असताना त्यांचे आकस्मिक निधन झालेने त्याचे नाव शाळेच्या जनरल रजिस्टरवरुन कमी करणेत आलेबाबत दाखला दिलेला आहे. यावरुन तो शासनमान्य शाळेत शिकत होता ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे. त्यामुळे नमुद विमा योजनेखाली त्याचा समावेश होता ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे.सबब सदर मुलाचा विमा नव्हताच हे सामनेवालांचे प्रतिपादन हे मंच ग्राहय धरु शकत नाही. तक्रारदाराचा मुलगा संग्राम याचा मृत्यू हा दि.12/06/2005 रोजी सर्पदंशाने झाला असे तक्रारदाराचे म्हणणे आहे. याबाबत सामनेवालांकडे कागदपत्रे पाठवलेचे दिसून येते. मात्र त्याबाबत सामनेवालांनी कोणतीही क्लेम नाकारला अथवा मान्य केलेचे लेखी कळवलेचे दिसून येत नाही. सदर क्लेम संदर्भात चर्चा करणेसाठी यावे अशा प्रकारचे तक्रारदाराने पाठविलेल्या वकील नोटीसला दि.21/12/2009 रोजी उत्तरी पत्र दिलेले आहे. सामनेवालांनी सदर क्लेम मान्य केला किंवा नाकारला हे स्पष्टपणे कळवलेले नाही. तक्रारदाराने दि.16/09/2005 रोजी सर्व कागदपत्रे पाठवलेचे दिसून येते. त्यावर नमुद सामनेवाला यांचा शिक्क आहे. सदरची कागदपत्रे पुन्हा पाठवून दिलेली आहेत. तरीही त्याबाबत सामनेवालांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही. ही त्यांचे सेवेतील त्रुटी आहे. युक्तीवादाच्या वेळेस सामनेवालांच्या वकीलांनी आपले म्हणणेमध्ये तक्रारदाराचे मुलाचा मृत्यू सर्पदंशाने झालेला आहे ही बाब नाकारलेली आहे. वादाचा मुद्दा आहे तो त्याचा मृत्यू सर्पदंशाने झाला का? याचा विचार करताना तक्रारदाराने दाखल केलेल्या पोलीस निरिक्षक गगनबावडा पोलीस ठाणे यांना जुना राजवाडा पोलीस ठाणेमार्फत पाठविलेल्या रिपोर्टमध्ये दि.12/06/2005 रोजी संग्राम राजेश धावडे याचा 3 वाजता त्यांचे राहते घरी विषारी साप चावलेने उपचारासाठी सी.पी.आर.हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक तपासाची कागदपत्रे तजवीज करणेबाबत नमुद केलेचे दिसून येते. तसेच मरणोत्तर पंचनामा कलम 10 मधील f (ii) मध्ये डाव्या हाताच्या आंगठयाजवळ साप चावलेला व्रण असलेचे स्पष्टपणे नमुद केले असून (vii) मध्ये सदर साप हा त्याचे राहते घरी जमिनीत झोपलेल्या ठिकाणी चावला असून उपचारदरम्यान मृत्यू झालेचे नमुद केले आहे. मृत्यूचा दाखला दाखल आहे. शवविच्छेदन अहवालामध्ये मृत्यूचे संभाव्य कारणामध्ये व्हिसेरा राखून ठेवलेचे नमुद केले आहे. सदर व्हिसेरा रिपोर्ट दि.12/05/2010 रोजी तक्रारदाराने दाखल केला असून त्याचा मृत्यू हा सर्पदंशानेच झाल्याचे नमुद अहवालावरुन दिसून येते. सबब तक्रारदाराचे मुलाचा मृत्यू हा सर्पदंशाने झालेने तो मृत्यू अपघाती आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तक्रारदाराने योग्य त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन क्लेम मागणी केली असता सदर क्लेमबाबत सामनेवालाने कोणताही निर्णय घेतलेला नाही ही सेवेतील गंभीर त्रुटी आहे. तसेच प्रस्तुतची तक्रार दाखल झालेवर सुध्दा त्याबाबतची योग्य कार्यवाही केलेली नाही. सबब तक्रारदाराचा न्याय व योग्य क्लेमबाबत निर्णय न घेऊन सेवेत गंभीर त्रुटी ठेवलेली आहे. तसेच सर्व कागदपत्रे मिळूनही सदरचा क्लेम न्याय योग्य व मिळणेस पात्र असतानाही सामनेवालांनी तो तोंडी प्रतिपादनाव्दारे नाकारला आहे ही सुध्दा गंभीर त्रुटी असलेचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मुद्दा क्र.2:- तक्रारदाराने शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे विमाधारक विदयार्थ्यांच्या मृत्यूनंतर विमा रक्कम मागणी करावयासाठी आवश्यक असणारी कलम 7 ते 10 प्रमाणेची सर्व कागदपत्रे सामनेवालांकडे पाठविलेली आहेत व प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेली आहेत. सदर कागदपत्रे व वरील विस्तृत विवेचनाचा विचार करता तक्रारदार विमा क्लेमची रक्कम रु.50,000/- मिळणेस पात्र आहे तसेच सदर रक्कमेवर व्हिसेरा रिपोर्ट मिळाले दि.20/05/2006 पासून ते संपूर्ण रक्कम मिळेपर्यत व्याज मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सदरचा क्लेम मागणी करुनही सामनेवालांनी त्याबाबत कारवाई न केलेने तक्रारदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहे व हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश (01) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते. (02) सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारास नुकसान भरपाई रक्कम रु.50,000/-(रु.पन्नस हजार फक्त) अदा करावी. सदर रक्कमेवर दि.20/05/2006 पासून ते संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के प्रमाणे व्याज अदा करावे. (03) सामनेवाला यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) अदा करावेत.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |