द्वारा - श्री.शि.भि.धुमाळ : मा.अध्यक्ष
1) ग्राहक वाद संक्षिप्त स्वरुपात खालील प्रमाणे -
तक्रारदारांनी सामनेवाला क्र.1 यांचेकडून मेडिक्लेम पॉलिसी नं.121200/48/210/12406 घेतली होती. सदरची पॉलिसी ही दि.23/02/2010 ते 22/02/2011 या कालावधीसाठी होती. तक्रारदारांनी मेडिक्लेम पॉलिसीची छायांकित प्रत निशाणी ‘ए’ ला दाखल केली असून त्यामध्ये तक्रारदारांना देणेत आलेली आश्वासित रक्कम रु.1,50,000/- नमूद करणेत आली आहे. सामनेवाला क्र.2 हे सामनेवाला क्र.1 चे टीपीए आहेत.
2) तक्रारदारांना दि.21/06/2010 रोजी अचानकपणे पाठीत भयंकर वेदना जाणवू लागल्यामुळे तक्रारदारांना जवळच्या डोंबिवली (प) येथील जोशी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले व तेथील सर्जन डॉ.दिपक जोशी यांच्या सल्ल्याप्रमाणे त्यांना जोशी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करणेत आले. दि.29/06/2010 पासून ते 03/07/2010 पर्यंत जोशी हॉस्पिटलमध्ये वैदयकीय उपचार केल्यानंतर तक्रारदारांना डिस्चार्ज देणेत आला. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर तक्रारदारांनी सामनेवाला यांचेकडे हॉस्पिटलमधील खर्चाचा क्लेम सादर केला व त्यासोबत आवश्यक ती कागदपत्रे दाखल केली. त्यानंतर सामनेवाला क्र.2 यांचे दि.06/09/2010 या तारखेचे पत्र तक्रारदारांना दि.29/09/2010 रोजी मिळाले. सदरच्या पत्रामध्ये सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदारांकडून जोशी हॉस्पिटलचा फॉर्म ‘सी’ मागितला होता. त्यांनतर तक्रारदारांनी जोशी हॉस्पिटलमध्ये फॉर्म ‘सी’ बद्दल विचारणा केली असता फॉर्म ‘सी’ बद्दल काहीही माहिती नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. हॉस्पिटलने तक्रारदारांना बॉम्बे शॉप्स अॅंण्ड एस्टॅब्लिशमेंट अॅक्ट खाली त्यांना देणेत आलेल्या लायसन्सची सत्यप्रत दिली व सदरची सत्यप्रत तक्रारदारांनी सामनेवाला यांना दिनांक 05/10/2010 रोजी पाठविली. त्यानंतर सामनेवाला क्र.1 किंवा 2 यांनी तक्रारदारांच्या क्लेमसंबंधी निर्णय घेण्यास टाळाटाळ केली. तक्रारदारांनी स्वतः दोन ते तीन वेळा सामनेवाला क्र.2 यांची प्रत्यक्ष भेट घेवून त्याबाबत विचारपूस केली. सामनेवाला क्र.2 यांनी क्लेमसंबंधी निर्णय लवकरच घेतला जाईल असे तोंडी आश्वासन दिले परंतु प्रत्यक्षात निर्णय घेतला नाही. सामनेवाला यांचेकडे क्लेम फॉर्म सादर केल्यानंतर सुध्दा एक वर्षाच्या कालावधीत सामनेवाला यांनी तक्रारदारांच्या क्लेमसंबंधी निर्णय घेतला नाही ही सामनेवाला यांच्या सेवेतील कमतरता आहे. तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे सामनेवाला यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे म्हणून त्यांनी सदरची तक्रार या मंचासमोर दाखल केली आहे.
3) सामनेवाला यांनी तक्रारदारांना हॉस्पिटलमधील वैदयकीय खर्चाची रक्कम रु.11,430.80 पैसे द्यावी असा सामनेवाला यांना आदेश करावा अशी विनंती केली आहे. तक्रारदारांनी वरील रकमेवर द.सा.द.शे. 18 टक्के दराने व्याजापोटी दि.19/07/2010 ते 26/06/2011 पर्यंत रक्क्म रु.1,928/- ची मागणी केली असून या अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.5,200/- ची मागणी केली आहे. तक्रारदारांनी तक्रारअर्जाच्या पुष्टयर्थ स्वतःचे प्रतिज्ञापत्र दाखल केले असून यादीप्रमाणे कागदपत्रे दाखल केली आहेत.
4) सामनेवाला क्र.1 यांनी कैफीयत/पुराव्याचे शपथपत्र दाखल करुन तक्रारदारांची मागणी अमान्य केली आहे. तक्रारअर्ज खोटा व चुकीचा असून सामनेवाला यांचेकडून पैसे उकळण्याच्या उद्देशाने दाखल केलेला असल्याने तो रद्द होणेस पात्र आहे असे प्रतिपादन केले आहे.
5) सामनेवाला यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांचे टीपीए – सामनेवाला क्र.2 यांनी दि.06/09/2010 रोजी तक्रारदारांना पत्र पाठवून आवश्यक ते कागदपत्रे – जोशी हॉस्पिटलचा फॉर्म ‘सी’ मागितला होता. परंतु तक्रारदारांनी सदरचा फॉर्म सामनेवाला यांना अद्याप पाठविलेला नाही. मेडिक्लेम पॉलिसीच्या परिच्छेद क्र.5.4 प्रमाणे क्लेमसंबंधीची आवश्यक ती कागदपत्रे ठराविक मुदतीत देण्याची जबाबदारी विमाधारकावर असते. सदरचे कागदपत्रे तक्रारदारांनी सामनेवाला क्र.2 यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर सात दिवसात पाठविणे आवश्यक होते. अशी कागदपत्रे तक्रारदारांनी सादर न केल्यामुळे सामनेवाला क्र.2 यांना तक्रारदारांच्या क्लेमसंबंधी निर्णय घेता आला नाही. वास्तविक तक्रारदारांनी त्यांच्या क्लेमसंबंधी सामजस्स्याने निर्णय घेण्याबाबत प्रयत्न करणे आवश्यक होते. तथापि, तक्रारदारांनी मुद्दामहून सामनेवाला यांचेविरुध्द सदरचा तक्रारअर्ज दाखल केलेला आहे. वास्तविक सामनेवाला यांच्या सेवेत कसलीही कमतरता नाही. त्यामुळे तक्रारअर्ज खर्चासहित रद्द होणेत पात्र आहे.
6) सामनेवाला क्र.2 यांना तक्रारअर्जाच्या नोटीसीची बजावणी योग्य रितीने होवून सुध्दा सामनेवाला क्र.2 या मंचासमोर हजर राहिले नाहीत म्हणून सामनेवाला क्र.2 विरुध्द दि.30/08/2011 रोजी एकतर्फा आदेश पारित करणेत आला.
7) तक्रारदारांनी लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. दि.12/01/2012 पासून सामनेवाला क्र.1 हे या मंचासमोर हजर राहिले नाहीत. सबब तक्रारदारांचा तोंडी युक्तिवाद ऐकून तक्रारअर्ज निकालासाठी ठेवण्यात आला.
8) तक्रारदारांनी तक्रारअर्जात नमूद केलेली मेडिक्लेम पॉलिसी नं.121200/48/210/12406 सामनेवाला यांचेकडून घेतली होती ही बाब सामनेवाला यांना मान्य आहे. तक्रारदारांनी सदर मेडिक्लेम पॉलिसीची छायांकित प्रत निशाणी ‘ए’ ला दाखल केली आहे व ती पॉलिसी दि.23/02/2010 ते 22/02/2011 या कालावधीसाठी होती व या कालावधीसाठी तक्रारदारांना देण्यात आलेली आश्वासित रक्कम रु.1,50,000/- होती. वरील मेडिक्लेम पॉलिसीच्या कालावधीत तक्रारदारांना दि.21/06/2010 रोजी अचानकपणे पाठदुखीचा त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांना जवळच्या डोंबिवली (प) येथील जोशी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले व तेथील सर्जन डॉ.दिपक जोशी यांच्या सल्ल्याप्रमाणे तक्रारदारांना हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करणेत आले. सदर हॉस्पिटलमध्ये तक्रारदारांनी दि.29/06/2010 पासून ते 03/07/2010 या कालावधीत अंतर्रुग्ण म्हणून उपचार करुन घेतला. याबाबतचे जोशी हॉस्पिटलची Indoor Case Papers तक्रारदारांनी दाखल केली आहेत. जोशी हॉस्पिटलमध्ये तक्रारदारांना वैदयकीय खर्चापोटी रक्कम रु.7,800/- भरावे लागले, त्या पावतीची झेरॉक्स प्रत तक्रारदारांनी निशाणी ‘सी-5’ ला दाखल केली आहे. तसेच तक्रारदारांना वरील वैद्यकीय खर्चापोटी कराव्या लागलेल्या खर्चाची बिले रु.1,683.20 पैसे + रु.770.60 पैसे + रु.1,177/- असा एकूण रु.11,430.80 पैसे इतका खर्च करावा लागला असे दिसते. तक्रारदारांनी वरील मेडिक्लेम पॉलिसीच्या खर्चाची परिपूर्ती व्हावी म्हणून सामनेवाला यांचेकडे क्लेम सादर केला होता त्याची छायांकीत प्रती तक्रारदारांनी तक्रारअर्जासोबत निशाणी ‘सी-1’ व ‘सी-2’ ला दाखल केले आहे. तक्रारदारांनी सामनेवाला यांचेकडे त्यांचा क्लेमफॉर्म दि.19/07/2010 रोजी पाठविल्याचे दिूसन येते. त्यांनतर सामनेवाला क्र.2 यांनी दि.06/09/2010 रोजी तक्रारदारांना पत्र पाठवून जोशी हॉस्पिटलकडून फॉर्म ‘सी’ ची प्रत इत्यादी कागदपत्रे मागितले होते असे दिसते. तक्रारदारांनी त्यांच्या दि.05/10/2010 चे पत्रासोबत जोशी हॉस्पिटलकडून मिळालेली फॉर्म- सी ची सत्यप्रत सामनेवाला क्र.2 यांना पाठविली. तक्रारदारांनी दिनांक 05/10/2010 चे सामनेवाला यांना पाठविलेल्या पत्रामध्ये फॉर्म –सी ची सत्यप्रत पाठविल्याचा उल्लेख आहे. तक्रारदारांनी सामनेवाला क्र.2 यांना दि.30/08/2010 रोजी पाठविलेल्या पत्राची क्लेम अॅफीडेव्हीट सोबत दाखल केलेली प्रत निदर्शनास आणून सामनेवाला क्र.2 यांना मिळाल्याची पोहोच म्हणून सामनेवाला क्र.2 यांचा त्यावरील शिक्का निदर्शनास आणला.
9) वरील कागदपत्रांची पाहणी करता तक्रारदारांनी दि.19/07/2010 रोजी वैद्यकीय खर्चाची परिपूर्ती व्हावी म्हणून सामनेवाला यांचेकडे क्लेम फॉर्म सादर केला असताना सामनेवाला यांनी तक्रारअर्ज दाखल करेपर्यंत तक्रारदारांच्या क्लेमसंबंधी कोणताही निर्णय घेतला नाही असे दिसून येते. सामनेवाला क्र.1 यांचे टीपीए – सामनेवाला क्र.2 यांनी मागितलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता तक्रारदारांनी करुन सुध्दा सामनेवाला यांनी तक्रारदारांच्या क्लेमसंबंधी अद्यापही निर्णय घेतला नाही ही सामनेवाला यांच्या सेवेतील कमतरता आहे असे म्हणावे लागते.
10) तक्रारदारांनी जोशी हॉस्पिटलमध्ये झालेल्या वैद्यकीय खर्च रक्कम रु.11,430.80 पैशांची मागणी सामनेवाला यांचेकडून मेडिक्लेम पॉलिसीखाली केलेली आहे. तक्रारदारांनी आपल्या मागणीच्या पुष्टयर्थ जोशी हॉस्पिटलच्या बिलांची तसेच उपचारासाठी खरेदी केलेल्या औषधांची बिले सादर केली आहेत. वरील कागदपत्रांचा विचार करता सामनेवाला क्र.1 व 2 यांनी तक्रारदारांना वैद्यकीय खर्चापोटी रक्कम रु.11,430.80 पैसे द्यावेत असा आदेश करणे योग्य होईल.
11) तक्रारदारांनी वैद्यकीय खर्चाची रक्कम रु.11,430.80 पैसे यावर दि.19/07/2010 ते 26/06/2011 या कालावधीसाठी द.सा.द.शे. 18 टक्के दराने व्याजाची होणारी रक्कम रु.1,928/- ची मागणी सामनेवाला यांचेकडून केली असून तक्रारअर्ज दाखल तारखेपासून वरील रकमेवर 18 टक्के दराने व्याजाची मागणी केली आहे. तक्रारदारांनी केलेली व्याजाची मागणी अवास्तव जादा आहे. सामनेवाला क्र.1 व 2 यांनी तक्रारदारांच्या क्लेमसंबंधी कोणतेही योग्य कारण नसताना निर्णय घेण्यास विलंब लावला म्हणून सामनेवाला क्र.1 व 2 यांनी तक्रारदारांना रक्कम रु.11,430.80 पैसे यावर दि.19/07/2010 पासून द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज संपूर्ण रक्कम तक्रारदारांना मिळेपर्यंत द्यावेत असा आदेश करणे योग्य होईल. तसेच सामनेवाला क्र.1 व 2 यांनी तक्रारदारांना या अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.3,000/- द्यावेत असा आदेश करणे योग्य होईल.
सबब वरील कारणास्तव तक्रारअर्ज अंशतः मंजूर करुन खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करणेत येत आहे.
अं ति म आ दे श
1. तक्रारअर्ज क्रमांक 206/2011 अंशतः मंजूर करणेत येतो.
2. सामनेवाला क्र.1 व 2 यांनी वैयक्तीकरित्या अथवा संयुक्तरित्या तक्रारदारांना रक्कम रु.11,430.80 (रु.अकरा हजार चारशे तीस व ऐंशी पैसे मात्र) द्यावेत व वरील रकमेवर दि.19/07/2010 पासून
संपूर्ण रक्कम तक्रारदारांना मिळेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज द्यावेत.
3 .सामनेवाला क्र.1 व 2 यांनी वैयक्तीकरित्या अथवा संयुक्तरित्या तक्रारदारांना या अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.3,000/- (रु.तीन हजार मात्र) द्यावेत.
4. सदर आदेशाची प्रमाणित प्रत उभय पक्षकारांना देणेत यावी.